ऑन एअर : पश्चातबुद्धी

ऑन एअर : पश्चातबुद्धी

एखादी घटना घडून गेल्यावर ‘मला वाटलंच होतं, असं होणार!’ म्हणणारे अनेक लोक भेटतात. घटना घडायच्या आधी ते आपलं मत मांडत नाहीत. पण, नंतर मात्र आपण अंतर्यामी असल्याचा दावा करतात.

‘‘तुझं त्याच्याबरोबर ब्रेकअप होणार, हे मला आधीच माहितीत होतं, तुम्हा दोघांना एकत्र बघितल्या बघितल्याचं ते मला क्लिअरली जाणवलं.’’, ‘‘तू तो स्टॉक आधीच विकायला पाहिजे होतास, मार्केट खाली जाणार हे मला आधीच माहिती होतं.’’, ‘‘तू तो स्टॉक उगाच विकलास, मार्केट वर जाणार हे मला आधीच माहिती होतं.’’, ‘‘याला डिप्लोमाला घालायला पाहिजे होतं, डायरेक्ट इंजिनिअरिंग झेपणार नाही हे मला माहीत होतं...’’
...अरे, पण माझ्या आप्तजनांनो, आधीच माहीत होतं तर तोंड उघडून बोलला का नाहीत?

काही लोक सल्ला देतात; पण तो दोन्ही बाजूंनी असतो किंवा सावध असतो; पण त्यांचं भाकीत खरं ठरलं, की त्यांना आपल्या सावधपणाचा सोईस्कर विसर पडतो. यालाच ‘हाइंडसाइट बायस’ किंवा ‘पश्र्चातबुद्धी’ किंवा ‘पश्र्चातदृष्टी पूर्वग्रह’ म्हणतात.

मग ही मंडळी असं का बोलतात? आणि जे बोलत नाहीत ते मनातल्या मनात हा विचार करत असतात हे आपल्याला माहीत असतं, आणि आपल्याला माहीत आहे हे त्यांना माहीत असतं- गुणिले अनंतात. ते किती हुशार आहेत आणि आपण किती मूर्ख आहोत हे दाखवायला? बरं असं करणारी मंडळी आपलीच असतात- मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, घरातले, सहकारी वगेरे. मग ते एवढी असंवेदनशीलता का दाखवतात? आणि आपणच त्यांची अशी वैचारिक फसवणूक का नाही करत?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेच्या डूलुथ शहराच्या महानगरपालिकेपुढे एक महत्त्वाचा प्रश्न होता. शहरातून वाहणाऱ्या नदीच्या पुलाखाली राडारोडा तुंबून पाण्याचा प्रवाह कमी होण्याची शक्यता होती; पण ते टाळण्यासाठी प्रचंड मोठा खर्च करावा लागणार होता. जगभरात प्रशासकीय आणि राजकीय नेत्यांना रोज अशा शेकडो प्रश्नांना सामोरं जावं लागतं. कुठल्या प्रकल्पावर किती खर्च करावा हे मोठे कठीण निर्णय घ्यावे लागतात. भविष्यात काय फाटे फुटतील हे माहीत नसतं, प्रत्येक रुपयासाठी अनेक वेगळे प्रकल्प आणि लाभार्थी लाइन लावून उभे असतात. डूलुथच्या अधिकाऱ्यांनी हा खर्च करायचं नाही असं ठरवलं आणि कालांतरानं नदीचा प्रवाह थांबला. हा मामला कोर्टातदेखील गेला.

दुसऱ्या शहरातल्या लोकांना, ‘तुम्ही प्रशासक असता तर काय केलं असतं?’ हा प्रश्न विचारला गेला. आधी लोकांचे दोन गट पाडले गेले. पहिल्या गटाला तेवढीच माहिती दिली जेवढी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे होती. दुसऱ्या गटाला त्यांनी हा प्रकल्प तयार झाल्यावर, वापरल्यावर काय अडचणी आल्या हे ही सांगितलं; पण त्यांना निर्णय घेताना या माहितीकडे दुर्लक्ष करायला सांगितलं म्हणजेच प्रशासनाकडे निर्णयप्रक्रियेवेळी जेवढी माहिती होती तेवढीच माहिती वापरून आपला निर्णय घ्यायला सांगितलं. 

पहिल्या गटाच्या ७६ टक्के लोकांनी पालिकेसारखाच निर्णय घेतला- राडारोडा प्रतिबंधासाठी अधिकचा खर्च केला नसता अशी भूमिका घेतली; पण दुसऱ्या गटातल्या फक्त ४४ टक्के लोकांनी प्रशासनासारखाच निर्णय घेतला. कारण प्रयत्न करूनही ते नंतर झालेल्या घटनेची माहिती विसरू शकले नाहीत, त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकले नाहीत.

बरुच फिशऑफ नावाच्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांनी १९७२ मध्ये केलेला प्रयोग तर याच्या पुढचा आहे. राष्ट्रपती निक्सन यांच्या चीन आणि रशियाच्या दौऱ्याआधी त्यांनी आणि रूथ बेयथ यांनी एक सर्व्हे केला- ज्यात लोकांनी, निक्सन कुठल्या मुद्द्यावर किती यशस्वी होतील याची शक्यता (probability) नोंदवली. निक्सन दौऱ्यावरून परत आल्यानंतर पुन्हा त्याच लोकांना, त्यांनी काय भाकित केलं होत हे आठवायला सांगितलं.

आणि काय गंमत! ज्या घटना खरंच घडल्या, त्या घडण्याची शक्यता जास्त आहे असं आपण आधीच नोंदवलं होतं असंच लोकांना आठवलं; पण खरतर सर्व्हेमध्ये तसं नमूद केलेलं नव्हतं! म्हणजे एखादी घटना घडली, की आपण आपल्या आसपासच्या लोकांनाच नाही तर स्वतः स्वतःलादेखील फसवतो. आपल्याला खरंच वाटतं, की ‘मला माहीतच होतं असं होणार! मी म्हटलोच होतो!’

या लेखाला चांगला प्रतिसाद मिळाला, तर मी स्वतःला सांगेन, ‘मला अपेक्षित होतंच. इतका अवघड विषय इतक्या प्रगल्भपणे मांडण्याची प्रतिभा माझ्यासारख्या लेखकात आहे.’
...आणि नाही मिळाला तर, ‘एवढं उच्चकोटीचं लिखाण सामान्य माणसाला झेपणार नाही, हे मला आधीच माहीत होतं..!’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com