ऑन एअर : समस्या सोडविण्याच्या मर्यादा

On-Air
On-Air

मागच्या लेखाचा शेवट करताना मी म्हटलं होतं, की पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली, आपण सगळे छोट्या छोट्या दैनंदिन कृतीतून त्याचं संवर्धन करायला लागलो, याचा विपरीत परिणाम पडतोय, क्लायमेट क्रायसिस सोडविण्याच्या दृष्टीनं याचा फायदा नसून उलट धोकाच आहे.

हे माझं ‘प्रक्षोभक’ भाष्य वाचून, तुम्ही पुढच्या वेळीसुद्धा लेख वाचायला याल, या हेतूनं मी ते लिहिलेलं नव्हतं. माझ्या या विधानात अजिबात अतिशयोक्ती नाही. क्लायमेट क्रायसिसचा अगदी बेसिक अभ्यास जरी केला, तरी हे लगेच स्पष्ट होतं, की आपल्यासमोरची आव्हानं प्रचंड मोठी, अभूतपूर्व आहेत. खऱ्या अर्थानं मोठं संकट येणार, अशी चिन्हं दिसत आहेत आणि यासाठी आपल्याला मानवता म्हणून जे करावं लागणार आहे ते इतकं व्यापक आणि विशाल आहे, की कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला त्याबद्दलचा विचारदेखील सुन्न करणारा आहे.

अवघड आणि किचकट ध्येय साधायचं असेल, तर नुसतं अंतिम टप्याकडे लक्ष देऊन चालत नाही. त्याला छोट्या छोट्या, रोज साध्य करता येतील अशा गोल्समध्ये वाटून घ्यावं लागतं. उदाहरणार्थ ‘२५ किलो वजन कमी करा- नाहीतर हृदयविकारानं तुमचा काही महिन्यांत मृत्यू अटळ आहे,’ असं डॉक्टरांनी सांगितल्यावर, हे आपल्याला शक्यच नाही, जमणारंच नाही असं म्हणून रुग्ण हतबल होतो, निराश होतो आणि पाच किलोसुद्धा वजन कमी करत नाही. म्हणून त्याला रोजचं, आठवड्याचं, आणि महिन्याचं ध्येय आणि ते साधण्यासाठी आचार आणि विचार यातले छोटे-छोटे बदल सुचवण्यात येतात. हा ॲप्रोच यशस्वी ठरतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हेच आपण क्लायमेट क्रायसिसबद्दल करतोय. ‘सगळ्यांनी आपल्या जीवनशैलीत छोटे छोटे, क्वचित एखादा थोडा मोठा बदल घडून आणला तर सगळं ठीक होईल, आपण शेवटी यावर मात करू,’ असं आपल्याला वाटतं. २५ किलो कमी करायचं असेलतर हे बरोबर आहे; पण ५०-६० किलो वजन कमी करायचं असेल, इतर आजार असतील तर गॅस्ट्रिक बायपाससारख्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात! 

आपल्या पृथ्वीला वाचवायचं असेल, तर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ‘मी कापडी पिशवी वापरतो (किंवा बसनं प्रवास करतो, टेरेस गार्डन केलंय वगैरे), अजून काय पाहिजे? सगळ्यांनी हे केलं तरी खूप झालं,’ असं ज्या लोकांना वाटतं, त्यांना त्यांच्या (सगळ्यांच्या!) पुढच्या पिढ्या इतक्या शिव्या घालणार आहेत, की त्या ऐकून जॅकी श्रॉफसुद्धा लाजतील.

मॉलेमसारख्या जंगलांची कत्तल झाली, तर ती माझ्या टेरेस गार्डनमुळे भरून निघणार नाही. सगळ्यांना कायद्यानं रेनवॉटर हार्वेस्टिंग करायला लावलं नाही, तर माझ्या तांब्याभर पाणी वाचवण्याचा काहीच उपयोग नाही. पब्लिक ट्रान्स्पोर्ट सुधारलं नाही, तर मी अधूनमधून पायी जाऊन भाज्या आणण्याला काहीच अर्थ राहत नाही. 

इंडस्ट्री साठी कडक प्रदूषणाचे कायदे आणले नाही तर माझ्या शेकोटी न करण्याचा काही फायदा नाही. या सगळ्या गोष्टी सारकर स्थरावर झाल्या पाहिजे. मंत्र्यांनी अशी धोरणं, कायदे आणून, ते नोकरशाहीतर्फे राबवून घेतले पाहिजेत. मग प्रशासन असं का करत नाही? पॉलिटिकल- इंडस्ट्रिअल- ब्युरोक्राटिक नेक्सस, ‘जैसे थे’ वाद वगैरे ही सगळी करणं आहेत. पण सगळ्यांत मोठं कारण म्हणजे...

मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी मी रेडिओवर ‘पर्यावरण हा महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो का, मत मागायला आलेल्या उमेदवाराला आपण, तुम्ही पर्यावरणासाठी, क्लायमेट क्रायसिसविरुद्ध नेमकं काय करणार आहात वगैरे विचारू शकतो का,’ असा सवाल केला होता. जवळजवळ सगळ्या लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. अनेकांना माझ्या भोळेपणाची कीव आली असेल. देशासमोर इतके मोठे प्रश्न असताना- कुपोषण, स्वास्थ्य, बेरोजगारी, गरिबी, कृषी प्रश्न वगैरे-  हा काय घेऊन बसलाय?...

...पण क्लायमेट क्रायसिसमुळे हे सगळे प्रश्न अधिक तीव्र होणार आहेत, किंबहुना झालेलेच आहेत. पर्यावरणासाठी आपण आपल्या परीनं प्रयत्न करू नयेत, असं मी म्हणत नाहीये; पण या प्रयत्नांची मर्यादा ओळखावी आणि आपण खुरपं घेऊन शेत नांगरायचा प्रयत्न करतोय हे लक्षात ठेवावं. एकदा का पेरणीची वेळ निघून गेली, की मग आयुष्यभरच नाही, तर पिढ्यान्‌पिढ्या दुष्काळ सोसावा लागेल!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com