संगीतसमीक्षा (सायली पानसे-शेल्लीकेरी)

saily-Panse-shellikeri
saily-Panse-shellikeri

कंठसंगीतात समीक्षेचा एक निकष जर ‘गायकाचा आवाज’ हा असेल तर या आवाजाबद्दल समीक्षकानं विवेचन करणं अपेक्षित असतं. त्या विवेचनातून त्याचे निकष समोर येणं महत्त्वाचं असतं. आवाज मधुर, आसयुक्त, घुमारदार व भावदर्शी असल्यावर गायन यशस्वी होतं. अशा प्रकारे निश्चित झालेले निकष हे मूल्यमापनासाठी महत्त्वाचे ठरतात...

संगीत ही कला मुळात भावनांच्या अभिव्यक्तीकरता उपयोगात आली. संगीत हे अभिव्यक्तीचं साधन आहे आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून संगीतसमीक्षा जन्माला आली. एखाद्या कार्यक्रमात जेव्हा गायक-कलाकार रसिकांसमोर एक सौंदर्यक्षेत्र निर्माण करतो तेव्हा रसिक सुखावतात. आनंदप्राप्तीचा मूळ हेतू सिद्धीस जातो. मात्र, अशा आस्वादकांमधला संगीतसमीक्षक या आनंदप्राप्तीची कारणं डोळसपणे शोधू लागतो. मैफल का रंगली किंवा का रंगली नाही याबाबत समीक्षक त्याचे विचार मांडतो. कोणतेही सिद्धान्त हे कलासापेक्ष असतात, म्हणूनच समीक्षेतही कालमानपरत्वे बदल घडत असतात. संगीताचा प्राचीन ग्रंथ, भरतनाट्यशास्त्रात, संगीतसमीक्षेबद्दल सविस्तर सांगितलं गेलं आहे.

रसिकानं उत्तम कलाकृतीचा आस्वाद-आनंद कसा घ्यावा, तसंच कलाकृतीचं मूल्यांकन याबाबतचे विचार म्हणजे समीक्षा. कोणत्याही कलेचा आस्वाद घेण्यासाठी त्या कलेची मूलतत्त्वं व सिद्धान्त आवश्यक असतात. समीक्षा करण्यासाठी याच सिद्धान्तांची व निकषांची गरज भासते. संगीतसमीक्षेत गायन-वादन-नृत्य या तिन्ही कलांची समीक्षा येते. तीत घटकांचा आस्वाद घेणं, योग्यायोग्यतेचा निर्णय देणं महत्त्वाचं असतं. संगीताचे हे निकष अभिरुचीवर अवलंबून असतात व अभिरुची कायम बदलत असते. या बाबीचं भान ठेवून समीक्षा करणं महत्त्वाचं असतं. कंठसंगीतसमीक्षेत अंतर्भूत असणारे सिद्धान्त म्हणजे रस, ध्वनी, नावीन्य, समतोलपणा, सुसूत्रता, पुनरावृत्ती, नियमितता, बदल, ताल, लय, संवादतत्त्‍व, आकृतिमयता, कलवंताचं चैतन्य, व्यक्तित्व, आवाज, बुद्धिमत्ता वगैरे. कंठसंगीतात समीक्षेचा एक निकष जर ‘गायकाचा आवाज’ हा असेल तर या आवाजाबद्दल समीक्षकानं विवेचन करणं अपेक्षित असतं. त्या विवेचनातून त्याचे निकष समोर येणं महत्त्वाचं असतं. आवाज मधुर, आसयुक्त, घुमारदार व भावदर्शी असल्यावर गायन यशस्वी होतं. अशा प्रकारे निश्चित झालेले निकष हे मूल्यमापनासाठी महत्त्वाचे ठरतात. कंठसंगीताच्या सादरीकरणातून सापडलेल्या संकल्पनांच्या व तत्त्वांच्या अनुभवांतून संगीतसमीक्षेचे निकष ठरत जातात. या निकषांपासून सिद्धान्त निर्माण होतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समीक्षा करताना पुढील गोष्टींचा विचार होणं महत्त्वाचं असतं.

  • गायनाविष्काराचा हेतू काय होता?
  • गायककलाकाराचा परिचय व त्याची शैली काय होती?
  • गायलेल्या रागांचा आढावा, ख्यालाच्या बंदिशींचा अर्थ व वैशिष्ट्यं, स्वर-लय-ताल यांचा सांगीतिक परिणाम.
  • गायकानं सादर केलेल्या रागाविषयीचा तपशील, सादरीकरणातला वेगळेपणा, सौंदर्यस्थळं, रागविस्ताराचा तपशील, गायकाची शैली, परंपरा, घराण्याचं वैशिष्ट्य यांविषयी.
  • एकूण सादरीकरणाविषयी मूल्यमापन व टिप्पणी.
  • रागाविष्कारामागची अपेक्षा व अपेक्षापूर्तीविषयी.
  • आविष्कारामागची भूमिका, श्रोत्यांचा प्रतिसाद
  • आयोजकांची भूमिका व आयोजनातली वैशिष्ट्यं काय होती?
  • कार्यक्रमाचं स्थळ-वेळ-वातावरण कसं होतं?
  • उपस्थित श्रोतृवर्ग कसा होता? त्यांची श्रवणपातळी कशी होती? प्रतिक्रिया कशा होत्या?
  • गायककलाकाराचं व्यक्तिमत्त्व, त्याची जडघडण, साधना, तपश्चर्या यांविषयी मौलिक माहिती.

याव्यतिरिक्त समीक्षेच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक अशा समीक्षकाची लेखनशैली हीदेखील महत्त्वाची असते. प्रत्येक समीक्षक त्याची विचारसरणी, भाषा, मांडणी, उपमा, प्रतिभा आदींद्वारे त्याची समीक्षा प्रभावी करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक समीक्षेतून समीक्षकाची लेखनशैली समृद्ध होत जाते आणि समीक्षकाची स्वतंत्र ओळख त्यामुळे निर्माण जाते. संगीतसमीक्षकाच्या विशिष्ट आंतर्दृष्टीमुळे सामान्य रसिकांच्या दृष्टीला न जाणवणारं असं काही तो आपल्या सूक्ष्मावलोकनातून टिपून घेतो.

समीक्षकाच्या वैचारिक जाणिवा ज्यानुसार प्रगल्भ होत जातात, त्यानुसार त्याचं अवलोकन व अवलोकनाची पद्धतही सुधारत जाते. समीक्षकाजवळ तरल, तीक्ष्ण व तर्कशुद्ध बुद्धिमत्ता असणं फार महत्त्वाचं असतं, तिच्या जोरावर गायनाकृतीची सर्व अंगं वेगवेगळी करून तो पुनःपुन्हा न्याहाळून बघत असतो. समीक्षकाला जाणवलेला ताणही रसिकांपर्यंत पोहोचवणं हे त्याचं काम असतं. गायनाचा आस्वाद घेणं हे व्यक्तिसापेक्ष तसंच कालसापेक्षही असतं. समीक्षकानं त्यासाठी नव्या-जुन्या काळातल्या आस्वादनाच्या दिशा समजून घेणं महत्त्वाचं असतं.

या सगळ्यातून रसिकांची भावस्थिती ही हळूहळू कलावंताची भावस्थिती समजून घेण्याइतकी सक्षम करणं हे खऱ्या समीक्षकाचं यश असतं. संगीतसमारोहांचा आढावा यापुढच्या लेखात...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com