Saily-Panse
Saily-Panse

संगीताचं महत्त्व (सायली पानसे-शेल्लीकेरी)

आवाज, इच्छा, आवड, वेळ, वय या सर्व अडचणी बाजूला ठेवून आपल्या आरोग्यासाठी प्रत्येकानं संगीत शिकलंच पाहिजे. गाणं शिकून उद्याचा ‘तानसेन’ तयार होवो न होवो; पण एक निरोगी शरीर तयार होईल आणि संगीतजगताला एक उत्तम ‘कानसेन’ मिळेल हे नक्की.

संगीताची आवड असो किंवा नसो, प्रत्येकाच्या आयुष्यात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व असतं व ते असायलाच हवं. कारण, संगीतश्रवणातून व त्याहीपेक्षा स्वतः म्हटलेल्या गाण्यातून व केलेल्या वादनातून अनेक प्रकारचे फायदे शरीराला व मनाला होत असतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संगीताचा परिणाम सर्व सजीवांवर होतो. संगीतश्रवणातून दृश्यात्मक असे अनेक परिणाम दिसून येतात. संगीत ऐकवल्यावर गाई-म्हशी अधिक दूध देतात, वनस्पतींची लक्षणीय वाढ होते हे प्रयोगांतून सिद्ध झालं आहे. मानवी मेंदूवरही संगीतश्रवणाचा परिणाम होतो. डावा आणि उजवा असे मानवी मेंदूचे दोन भाग असतात. त्यांपैकी डाव्या भागात अधिक केंद्रे असतात. यांत भाषा, गणित, सारासार विचार इत्यादी गोष्टी कार्यरत असतात, तर उजवा भाग निर्मिती, कला, सृजनशीलता यांसारख्या गोष्टींसाठी कार्यरत असतो. सर्वसामान्यपणे माणसाचा डावा मेंदू अधिक कार्य करत असतो, उजवा मेंदू विशेष वापरला जात नाही; परंतु मेंदूचे दोन्ही भाग कार्यरत असणं महत्त्वाचं असतं. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी अनेक प्रयत्न केले जातात; परंतु मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी क्वचितच प्रयत्न केले जातात. कुठल्याही कलेमुळे उजव्या मेंदूची कमी-अधिक केंद्रे जागृत होत असतात. संगीतामधून उजव्या मेंदूची सर्वात जास्त, म्हणजेच तब्बल १७, केंद्रे जागृत होत असतात आणि म्हणूनच संगीताची आवड असो वा नसो, आवाज चांगला असो वा नसो, प्रत्येकानं संगीताचा आस्वाद घेणं हे मेंदूच्या दृष्टीनं फायद्याचं असतं. मेंदूच्या सर्वांगीण विकासासाठी संगीतापेक्षा प्रभावी माध्यम अस्तित्वात नाही. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक सामान्य माणसाला नावीन्यपूर्णतेची, सकारात्मकतेची गरज आहे. संगीतातून मानसिक आरोग्य सुधारतं आणि परिणामी शारीरिक तब्येतही चांगली राहते. संगीताची आवड असो किंवा नसो, संगीतश्रवणातून प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा मिळत असते.

संगीतापासून होणारे फायदे अनेक आहेत...
तब्येत चांगली राहण्यासाठी
एखादी गोष्ट लक्षात राहण्यासाठी
प्रत्येक कामात एकाग्रता राहण्यासाठी
रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी
दुखणं विसरण्यासाठी
ताण-तणाव कमी करण्यासाठी
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

संगीत ऐकणं जितकं फायद्याचं आहे त्याहीपेक्षा स्वतः गाणं अधिक महत्त्वाचं आहे हे प्रयोगाअंती सिद्ध झालेलं आहे. गाण्याचा मूळ पाया म्हणजे भावनांचं प्रकटीकरण. मनुष्य आनंदात असला की आपोआप गुणगुणायला लागतो. आंघोळ करताना अतिशय प्रसन्न आणि ताजंतवानं वाटतं म्हणूनच अनेक लोक तेव्हा गाणं गातात. अशा भावना प्रकट होणं हे निरोगी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं; परंतु गाता येत नाही किंवा इतर लोक ऐकतील या भीतीनं गायलं जात नाही आणि भावना दबल्या जातात व गाणं केवळ बाथरूमपुरतं मर्यादित राहतं. असं न करता प्रत्येकानं गाण्यातून व्यक्त झालं पाहिजे. याचं मुख्य कारण असं की, कितीही गोड आवाजाच्या किंवा अत्यंत तयारीच्या गायकाचं गाणं ऐकलं तरी आपल्या मेंदूवर सर्वात जास्त परिणाम होतो तो स्वतःच्या आवाजाचाच. मेंदू अधिक कार्यक्षम राहण्यासाठी स्वतःचा आवाज सर्वात प्रभावी असतो. याच कारणामुळं प्रत्येकानं आवाजाची तमा न बाळगता मनसोक्त गायलं पाहिजे.

सध्याच्या युगात ताण-तणावाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काम, कामाच्या वेळा, ट्रॅफिक, नात्यांमधले चढ-उतार वगैरेंसारख्या असंख्य कारणांमुळे मनावर ताण निर्माण होत असतो. असा ताण आल्यावर शरीरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यानं निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात. अशा वेळी शरीर साठवलेली ऊर्जा वापरतं आणि ताण कमी करण्याचा प्रयत्न करतं. अशी साठवलेली ऊर्जा खर्च झाली की प्रतिकारशक्ती कमी होते आणि रोगाला आमंत्रण मिळतं. हे सर्व टाळण्यासाठी संगीत ऐकणं महत्त्वाचं ठरतं. संगीतश्रवणातून ताण कमी होतो आणि शरीरानं साठवलेली ऊर्जा खर्च होत नाही.

मेंदूच्या पेशींचा आकडा प्रत्येक माणसात सारखा असतो. मेंदूच्या पेशींमधलं तंतूंचं जाळं जितकं दाट तितका मेंदू तल्लख. मेंदूच्या वाढीच्या वयात म्हणजेच वय वर्ष दहापर्यंत संगीताचा उपयोग केला गेला तर, चांगलं संगीत कानावर पडलं किंवा चांगलं संगीत शिकवलं गेलं तर त्याचा चांगला परिणाम मेंदूवर दिसून येतो. याच कारणासाठी प्रत्येक लहान मुलाला संगीत शिकवलं पाहिजे. गर्भवती महिलांनीदेखील नियमितपणे संगीत ऐकल्यास त्याचा परिणाम गर्भावर दिसून येतो.

आपली पंचेंद्रिये म्हणजेच कान, डोळे, जीभ, नाक, त्वचा यांच्याकडून मेंदूला संवेदना पोहोचत असतात. त्यापैकी कानाच्या माध्यामातून येणाऱ्या संवेदना मेंदूसाठी जास्त महत्त्वाच्या ठरतात. संगीतही कानाद्वारे ऐकलं जातं व म्हणूनच मेंदूवर त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम होतो. या सर्व गोष्टींमधून एकच निष्कर्ष निघतो व तो असा की, आवाज, इच्छा, आवड, वेळ, वय या सर्व अडचणी बाजूला ठेवून आपल्या आरोग्यासाठी प्रत्येकानं संगीत शिकलंच पाहिजे. गाणं शिकून उद्याचा ‘तानसेन’ तयार होवो न होवो; पण एक निरोगी शरीर तयार होईल आणि संगीतजगताला एक उत्तम ‘कानसेन’ मिळेल हे नक्की.

गेलं वर्षभर चाललेल्या या सुरेल प्रवासाची पुढच्या लेखानं सांगता होईल...

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com