अधिकारी घडवणारा अधिकारी ! (संदीप काळे)

Sandip-kale
Sandip-kale

उपळाई या आपल्या गावातून अधिकारी जन्माला यावेत, यासाठी बघितलेले स्वप्न या राज्यात दारिद्र्याने खितपत पडलेल्या प्रत्येक गावासाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. या कामासाठी गावकऱ्यांनी दिलेले योगदान निश्‍चितच नोंद घेण्यासारखं आहे. आपण मोठे होतो, पण मागच्या लोकांना विसरतो; पण इथल्या अधिकाऱ्यांनी तसं केलं नाही. गावच्या शाळेकडं गावकऱ्यांनी लक्ष दिलं. शिक्षकांचंही योगदान मिळालं. त्यातून गावच्या इतिहासाची पायाभरणी झाली. 

मित्रवर्य विकास रायमाने याचा त्या दिवशी दुपारी मला फोन आला. विकास म्हणाला, संदीप कुठं आहेस, मी आणि बापू (सुभाष देशमुख) बेलापूरच्या दिशेने येतोय. बापू तुझी आठवण काढत होते. भेट होणे शक्‍य आहे का?
मी लगेच होकार दिला. मी ऑफिसमध्येच आहे. तुम्ही या असे त्यांना सांगितले. विकास, बापू आणि त्यांच्यासोबत एक उंचीपुरी गोरी  व्यक्ती असे तिघेजण ऑफिसवर आले. आमच्या गप्पा सुरू झाल्या. विकासनं त्या उंच व्यक्तीची मला ओळख करून दिली. ‘‘ हे संदीप भाजीभाकरे आय.पी.एस. आहेत,’’ असं विकास म्हणाला.. थोड्या वेळानं बापू आणि विकास दोघेही घरी निघाले. संदीप भाजीभाकरे हेही निघणार होते, मी त्यांना थांबण्याची विनंती केली. आपण थोडा वेळ गप्पा मारू, अशी विनंती मी त्यांना केली. माझ्या विनंतीनंतर ते बसले. मला म्हणाले, एक-दोन महत्त्वाचे फोन करायचे आहेत, मी ते करतो...

मी म्हणालो, हो सर. त्यांनी दोन म्हणत चार-पाच कॉल केले. विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था, कुठल्या तरी मुलाच्या ऍडमिशनचा प्रश्‍न, कुठल्या तरी मुलाचं प्रमाणपत्र राहिले, कुणी स्पर्धा परीक्षेविषयी विचारत होते, हे बोलण्यावरून लक्षात येत होतं. माझ्या लगेच लक्षात आलं की, हे भाजीभाकरे नावाचं रसायन काहीतरी वेगळं आहे. त्यांनी फोनवर बोलणे झाल्यावर माझ्याकडे पाहिलं आणि ते शांतपणे म्हणाले, गावाकडली मुले असतात हो, त्यांना मदत करावी लागते. मी लगेच म्हणालो, एवढं बोलणं रोज असतं का? ते म्हणाले,  हो. अगदी रोज असतं. माझं गाव, आसपासची गावं, तालुका, जिल्हा, मित्र, नातेवाईक या सगळ्यांचे शैक्षणिक कारणांसाठी मला सातत्याने फोन येत असतात. अतिशय सकारात्मक पद्धतीनं युवकांना येणाऱ्या अडचणींविषयी ते माझ्याशी चर्चा करत होते. तुमचं गाव कुठलं, इथपर्यंत कसे आलात ? घरी कोण ? हे सगळं चर्चांमधून पुढे पुढे येऊ लागलं. मी ज्या व्यक्तीच्या समोर बसलो होतो ती व्यक्ती, त्या व्यक्तीच्या अवतीभोवती असलेलं, सगळं गावकुसातले वातावरण, हे नक्कीच वेगळं असल्याचं माझ्या लक्षात आलं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाच मिनिटं गप्पा माराव्यात आणि मग एकमेकांचा निरोप घ्यावा. या उद्देशानं आम्ही बोलत होतो. पण पुढं आम्ही चार तास एकमेकांसोबत कसे घालवले, त्या चर्चेतून किती नवनवीन विषय पुढे आले, हे सांगायला असे चार लेख कमी पडतील. त्या गप्पांमध्ये अनेक विषय पुढं आले, जे विषय महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावांमध्ये पोचले पाहिजेत, प्रत्यक्षात आले पाहिजेत. संदीप यांनी तो सगळा इतिहास माझ्यासमोर ठेवला. संदीप भाजीभाकरे (९८२३५८८१००) यांनी त्यांचा स्वतःचा, गावाचा, अधिकारी बनण्याचा जो प्रवास होता, तो मला सांगितला. तो ऐकून मी एकदम थक्क झालो. सोलापूर जिल्ह्यामधला माढा तालुका आणि माढा तालुक्‍यामधलं उपळाई (बुद्रुक) हे गाव. दुष्काळ हा या गावाच्या पाचवीला पुजलेल्या होता. दुष्काळग्रस्त गावात, पिण्याच्या पाण्यासाठी ओरड. तिथे शेतीला पाणी असण्याचे काही कारण नव्हतं. शेतीत राम नाही, उद्योग जमत नाही.  

हे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपला मोर्चा वळवला, गावातली शाळा विकसित करण्यासाठी. गावकऱ्यांच्या जोडीला शाळेतले सगळे शिक्षक होतेच. शाळेचा पाया इतका मजबूत होत गेला, की या गावातून अधिकाऱ्यांच्या फौजांच्या फौजा बाहेर पडायला लागल्या. २००५ ला संदीप भाजीभाकरे हे ए.सी.पी. झाले. त्यानंतर २००७ ला त्यांचीच बहीण रोहिणी भाजीभाकरे या आय.ए.एस. झाल्या. त्यानंतर त्याच गावामधला शिवप्रसाद नकाते, आय.ए.एस. झाला. स्वप्नील पाटील हा आय.ए.एस. झाला. प्रमोद शिंदे उपअभियंता झाले. श्रीकृष्ण नकाते आरटीओ मध्ये अधिकारी झाले. गावात प्रथम वर्ग  अधिकाऱ्यांची फौज गावात निर्माण झाली. या सगळ्यांचे केंद्रबिंदू होते संदीप भाजीभाकरे. एवढे अधिकारी बनवणे इथपर्यंत हा प्रवास थांबला नाही. फौजदार, प्राध्यापक, इंजिनिअर, सैनिक, पोलिस आणि शिक्षक अशी भली मोठी यादी या गावात निर्माण झाली. संदीप मला सांगत होते आणि मी शांतपणे सगळं ऐकत होतो. खरंतर मी अनेक गावातल्या यशोगाथा, वेगवेगळे विषय ‘भ्रमंती''च्या निमित्ताने अनुभवले आहेत; पण माझ्यासाठी हा विषय वेगळा होता. त्याला दोन कारणे होती एक म्हणजे, गावातली मुलं शहराच्या मुलांच्या तुलनेत काही करू शकत नाहीत, हा समज इथं पुसला गेला होता आणि दुसरा - स्पर्धा परीक्षेमध्ये सतत अपयश आल्यानं खचून जाणाऱ्या मुलांसाठी या गावातल्या यशस्वी युवकांची यादी, हा मोलाचा संदेश होता.

संदीप पुढे सांगत होते, खरं तर माझं किंवा अधिकारी झालेल्या सगळ्या जणांच्या पायाभरणीचं काम गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं केलं. हे ऐकून मला धक्का बसला. हल्ली जिल्हा परिषदेची शाळा असं म्हटलं की अऩेकजण नाक मुरडतात, पण इतिहास मात्र या जिल्हा परिषदेच्या शाळांच करतात, हे नव्याने शिकणाऱ्या इंग्लिश मीडियमच्या मुलांना आणि इंग्लिश शाळेचा आग्रह धरणाऱ्या पालकांना सांगायचं कुणी ? संदीप बोलत असताना अनेक विषय माझ्यासमोर येत होते; पण मी या सगळ्या विषयांना बाजूला सारत, संदीप यांच्यासोबत असलेला संवाद यसाची वाट कशी सापडते याकडं नेण्याचा प्रयत्न करत होतो.  

तेव्हाचं गावातलं वातावरण, घरची जेमतेम परिस्थिती, उराशी बाळगलेली स्वप्नं पूर्ण होतात की नाही, तेव्हाचा सर्व प्रवास संदीप मला अगदी बारकाईने सांगत होते. संदीप यांचा फोन मधून-मधून वाजत होता. तो फोन घरच्या कुण्या मंडळींचा, नातेवाईकांचा नव्हता, तर मोठ्या आशेनं मदत मागणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचा होता. ज्यांना संदीपसारखंच व्हायचंय. मी संदीप यांना अगदी शांतपणे म्हणालो, दादा, तुम्ही मला तुमच्या बाबांचा फोन नंबर द्या. मी बाबा आणि आई यांच्याशी बोलतो. तोपर्यंत तुम्ही जे फोन वाजलेत त्यांपैकी महत्त्वाच्या लोकांशी बोलून घ्या. संदीप म्हणाले, सगळेच लोक महत्त्वाचे आहेत हो. आपण या मुलांना मदत करणार नाही, तर कोण करणार. यांना तर बोलावं लागेल.

संदीप यांनी त्यांच्या वडिलांचा दूरध्वनी क्रमांक दिला. मी संदीपच्या वडिलांना दूरध्वनी लावला. संदीप हे अन्य मुलांशी फोनवर बोलायला लागले. मी संदीप यांचे वडील रामदास भाजीभाकरे काका यांना दूरध्वनी लावला. माझी ओळख सांगितली, अगदी जुनी ओळख आहे, या सुरात त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली. जसे संदीप अगदी तसेच संदीप यांचे वडील. दोघांचाही स्वभाव मनमोकळा. हे मला जाणवायला लागलं. काका मला सांगत होते, आमचे ग्रामदैवत नंदिकेश्वर  आणि पांडुरंग यांनी मला इतकं भरभरून दिले की, मी आयुष्यात प्रचंड समाधानी आहे. आमच्या घरात कुठलाही शैक्षणिक वारसा नाही; पण मुलांनी ज्या पद्धतीने यश संपादन केलं ते पाहून असं वाटतं, आमच्या आयुष्याचं सोनं झाले. माझी आई नव्वदी पार केलेली आहे. ती म्हणते, आपल्या पोरांनी मागील पिढ्याचे पांग फेडले. कधी भावनिक सुरात, कभी अभिमानाच्या सुरात, कधी अगोदर भोगाव्या लागलेल्या हालाच्या  आठवणींनी आवाज काहीवेळा कातर होत,  काकांनी संवादातून अनेक विषय मला सांगितले .

आपण म्हणतो ना, आपण निसर्गाकडं काही तरी वरदान मागतो; पण निसर्ग अनेक प्रकारचे वरदान आपल्याला देत असतो. रामदास काकांच्या बाबतीतही तेच झालं होतं. आपल्या घरात एखादा अधिकारी असावा, असं त्यांना काही प्रसंग आल्यामुळे सातत्याने वाटायचं; पण आता त्यांच्या घरात आय.पी.एस. आय. आणि आय.ए.एस.ची रांग लागली की काय, असं वाटायला लागलं.

काका सांगत होते आणि मी "हा, हा'' म्हणत ऐकत होतो. काका म्हणाले, माझी मुलगी रोहिणी आय.ए.एस. आहे. तिचे यजमान विजेंद्र बिद्री आय.पी.एस. आहेत. त्यांचे वडील शंकरआप्पा बिद्री आयपीएस होते. ते पोलिस महासंचालक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांची कन्या विजयालक्ष्मी बिद्री- प्रसन्ना ही पण आय.ए.एस. आहे. तिचे यजमान के. एल. एन. प्रसन्ना, हे पण आय.पी.एस. आहेत. मी बाप रे, म्हणून काका जे जे सांगत होते ते थक्क होऊन ऐकत होतो. काका म्हणाले, मी आता एक बैठक बोलवली आहे. नाही तर आपण अजून छान विस्ताराने बोललो आसतो. काकांना मी म्हणालो, कशाची बैठक आहे, काका म्हणाले, ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. सतत गट-तट भांडणं, यामुळे अनेक तरुण मुलं या गावच्या राजकारणामध्ये विनाकारण अडकतात. जर गावातली निवडणूक बिनविरोध झाली; तर चार मुलं अजून अधिकारी होण्यात भर पडेल. म्हणून आपल्या गावातली निवडणूक बिनविरोध घ्या, अशी माझी मागणी आहे. बघू आता काय होते ते. काका म्हणाले, तुम्ही संदीपच्या आईशी बोला. काकांनी सुवर्णलता भाजीभाकरे काकू यांच्याकडे दूरध्वनी दिला. काकूही माझ्यासोबत मनमोकळेपणी बोलत होत्या. आपल्या डोळे दिपवून टाकणाऱ्या संसारामध्ये घडणाऱ्या अनेक चांगल्या प्रसंगावर त्यांनी कविता केल्याचे त्यांनी सांगितले. दोन कविता त्यांनी मला ऐकवल्यासुद्धा. नातवंड शहरात राहतात, त्यांची सतत आठवण येते. त्या आठवणीतून त्या लिहित्या झाल्या. आईची माया कोणाला येत नाही, हे खरं आहे; पण त्यापलीकडे जाऊन आजीसारखे प्रेमही इतर कुठली महिला करू शकत नाही, हेही तेवढंच खरं आहे. काकूंच्या बोलण्यामध्ये आपल्या शहरात कर्तबगार मुलांच्या आठवणी होत्या. नातवांना आपल्या अंगा-खांद्यावर सतत खेळावं, यासाठी त्यांचा किती आग्रह होता, हे त्यांच्या बोलण्यामध्ये मला जाणवत होतं. मुंबईला आलात की सांगा. मला आपले आशीर्वाद घ्यायचेत, असं त्यांना मी आवर्जून सांगितलं. आणि काकूंचा फोन ठेवला.

माझ्यासमोर बसलेल्या संदीप यांचं बोलणं झालं होतं. आमची पुन्हा खूप चर्चा झाली. प्रत्येक गावांमध्ये या स्वरूपाचं काम केलं गेलं आणि असे अधिकारी निर्माण झाले, तर ग्रामीण भागात दारिद्य्राचा शिक्का त्या प्रत्येक काळजीवाहू आई-वडिलांच्या चेहऱ्यावरून पुसला जाईल. आपला पोरगा अधिकारी झाला पाहिजे, आपण अधिकारी झाले पाहिजे, असं बापासह मुलांनाही वाटू लागलं. जे अधिकारी झालेत त्यांचा सन्मान झाल्याचे पाहून नवीन मुले भारावून जातात. सतत गरिबीच्या लाजेची ठिगळे जोडता-जोडता आता कुठे अनेक बापांच्या चेहऱ्यावर या मुलांच्या यशामुळे तेज आलं. त्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्या बापासारखे उज्ज्वलतेचे तेज आपल्याही बापाच्या चेहऱ्यावर यावं. आपल्या आईने आपले यश पाहून, हसून आपल्या पदराने आपले आनंदाश्रू पुसावेत, असं गावातल्या प्रत्येक तरुणाला वाटू लागलं. इथे दोन गोष्टी प्रामुख्याने काम करत होत्या. एक होतं ते म्हणजे, गावातला प्रत्येक माणूस आपल्या गावात असलेल्या शाळेकडे एक उन्नतीचे केंद्र म्हणून पाहू लागला. शाळेतील प्रत्येक शिक्षकांने विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाच्या पायाभरणीसाठी जिवाचं रान केलं. आणि दुसरे, संदीप भाजीभाकरे किंवा रोहिणी भाजीभाकरे यांच्यासारखी मंडळी केवळ मोठे अधिकारी म्हणून त्यांच्या कामाच्या ठिकाणी आपला ठसाच उमटवत नाहीत; तर आपल्याच गावात इच्छुक असलेल्या प्रत्येक मुलाला मदत झाली पाहिजे, यासाठी पुढाकार घेत आहेत. मग गावात ग्रंथालय विकसित केले. स्पर्धा परीक्षेत रुची असणाऱ्या मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर सुरू केले. त्या पलीकडे जाऊन जर कुणाला बोलायचं असेल, तर हीच गावाची अधिकारी मंडळी एका फोनवर उपलब्ध आहेत. अजून काय पाहिजे सांगा! मोठा होण्यासाठी आत्मविश्वास सतत जागृत ठेवावा लागतो, असे संदीप मला सांगत होते. मीही संदीप यांनी सांगितलेला प्रत्येक विषय चकीत होऊन ऐकत होतो. संदीप यांच्या वडिलांकडून शाळेत शिकवणाऱ्या मुख्याध्यापिका वंदना नकाते यांचा संपर्क नंबर मी घेतला. वंदना नकाते यांच्याशी मी बोललो. त्याही माझ्याशी भरभरून बोलल्या.

त्या म्हणाल्या, आमच्या शाळेची पहिल्यापासून परंपरा आहे. शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे. किंबहुना तो वेगळा आहे, असा विश्वास त्याच्या मनावर कोरला गेला पाहिजे, यासाठीच आम्ही काम करतो. वंदना यांच्या बोलण्यात मला कमालीचा आत्मविश्वास वाटत होता. बघा किती कमाल आहे. इथल्या बापाची आणि शिक्षकाची. एकदा या शाळेला, तिथल्या शिक्षकांना, या गावाला आणि गावातल्या त्या प्रत्येक नवं स्वप्न पाहणाऱ्या माणसाला आपण भेटले पाहिजे, असं मनात मी ठरवून टाकलं.

आमचे चार तास कधी गेली कळले नाही. परत भेटू आणि कोणाचं चांगलं होत असेल, तर त्यासाठी एकदिलाने मदत करू, असा आत्मविश्वास देऊन संदीप भाजीभाकरे हे आमच्या बेलापूरच्या ऑफिसमधून घराकडे जायला निघाले. आज आपण एका वेगळ्या आणि कर्तृत्ववान असलेल्या, सतत कर्तृत्वान राहिलं पाहिजे, यासाठी पुढाकार घेणाऱ्या माणसाला भेटलो, याचं समाधान मनामध्ये होतं. उपळाई या आपल्या गावातून अधिकारी जन्माला यावेत, यासाठी बघितलेले स्वप्न या राज्यात दारिद्य्राने खितपत पडलेल्या प्रत्येक गावासाठी एक महत्त्वपूर्ण दुवा आहे. या कामासाठी गावकऱ्यांनी दिलेले योगदान निश्‍चितच नोंद घेण्यासारखे आहे. आपण मोठे होतो, पण मागच्या लोकांना विसरतो; पण इथल्या अधिकाऱ्याने तसे केले नाही. गावातल्या शाळेकडे गावकऱ्यांनी बारकाईने लक्ष दिलं. शिक्षकांचंही शाळेला योगदान मिळालं. त्यातूनच इतिहासाची पायाभरणी झाली. अजूनही गावातली निवडणूक बिनविरोध झाली, तर चांगले पोषक वातावरण नक्कीच मिळेल, असेही येथे रामदास काकांना वाटते. आपल्या कल्पकतेतून उपळाईच्या गावकऱ्याने हा इतिहास केला. हे वातावरण अजून पोषक राहावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूही आहेत. मग तुम्ही-आम्ही असेच प्रयत्न करू या ना..! इतिहास नक्की घडेल... अगदी उपळाईसारखा...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com