संगोपन आणि जबाबदारी महत्त्वाची... (संजीव अभ्यंकर)

Sanjiv-Abhyankar
Sanjiv-Abhyankar

मुली लहान होत्या तेव्हापासून आम्ही जाणलं होतं, की आपण वागणार तसंच मुली वागणार. काय करा आणि काय नाही हे केवळ सांगून उपयोगाचं नाही, तर आपल्यावर जे सांगू तसं वागण्याची जबाबदारी देखील आहे. त्यादृष्टीनं आधीपासूनच घरात मोकळं वातावरण ठेवलं होतं. ‘जे काय मनात असेल ते बोलून मोकळं व्हा, उगाच एक जण तोंड तिकडे करून बसला आहे असं नको,’ हे आईनं सुरुवातीपासूनच शिकवलं होतं. तेच बाळकडू आम्ही आमच्या मुलींना दिलं आहे...

माझ्या पालकांकडून शिकलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारित्र्य. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून दाखवली. मला समोर बसवून कधी त्याचे पाठ दिले नाहीत. ‘चारित्र्य’ या शब्दाची व्याप्ती तशी खूप मोठी आहे. सर्वप्रथम तुम्ही एक चांगला माणूस असलं पाहिजे, वागण्यात साधेपणा असावा, कुठलाही मुखवटा धारण न करता जसे आहात तसंच वागणं, आपण कोणीतरी आहोत असा भाव न ठेवणं, स्वाभाविक राहणं यांसारख्या वृत्तींचा यामध्ये समावेश होतो. या गोष्टी मी माझ्या आजोबांकडूनही शिकलो आहे. आईकडून शास्त्रीय संगीतावर प्रेम करायला शिकलो. मला शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली ती आईमुळे. आपला व्यवसाय नैतिकता राखून करणं, याचा संस्कार वडिलांकडून झाला. तसच निर्व्यसनी असणं हे देखील मी त्यांच्या वागणुकीतूनच शिकलो. या सगळ्या गोष्टींचा संस्कार नकळतपणे माझ्यावर झाला.

छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेणं हे त्यांनी मला शिकवलं, पण त्याचबरोबर गायनाच्या बाबतीत अल्पसंतुष्ट राहायचं नाही हे देखील त्यांनी मला सांगितलं. तुला खूप पुढं जायचं आहे हे कायम लक्षात ठेव असं ते नेहमी सांगत. कारण कुठलंही ज्ञान हे अथांग असतं, तुमची जेवढी क्षमता आहे तेवढं तुम्ही त्यात पोहू शकतात. याचा अर्थ मी किनाऱ्यावरील लाटांवरच पोहायचं असा नसून संगीताच्या खोल समुद्रात शिरावं या अर्थानं अल्पसंतुष्ट न राहाणं त्यांना अपेक्षित होतं, पैशानं नाही. थोडक्यात शास्त्रीय संगीतरुपी अथांग सागरात जितकं खोल जाता येईल तितकं तू खोल जा हे त्यांचं सांगणं होतं. आहे त्यात तृप्तही राहू नकोस आणि आपल्याकडं काही नाही, असंही म्हणू नकोस, त्यातला सुवर्णमध्य साधण्याचं बाळकडू त्यांच्या व्यवहारातून मला मिळालं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझं संगीत शिक्षण हे गुरू-शिष्य परंपरेतून झालं आहे. मी कोणाकडं संगीत शिकावं हे आईनं ठरवलं होतं. माझी आई शोभा अभ्यंकर ही स्वतः संगीतात डॉक्टरेट होती, त्यामुळे तिला त्यातलं सखोल ज्ञान होतं. तिनं ठरवलं होतं पद्मविभूषण पंडित जसराजजी यांच्याकडंच मला शिकायला पाठवायचं. ते मला गाणं शिकवायला तयार झाले, त्यांनी माझा शिष्य म्हणून स्वीकार केला तरच मला पूर्णवेळ गाणं शिकवायला पाठवायचा तिचा मनोदय होता. मी नववीत होतो, तेव्हा हा निर्णय झाला. पुढे गुरुजींनी शिष्य म्हणून माझा स्वीकार केल्यानंतर, मला त्यांच्या हवाली केल्यानंतर आईबाबांनी नंतर त्यात कधीही लुडबुड केली नाही. सुयोग्य गुरूंच्या हवाली केल्यानंतर आता पुढचं व्यवस्थापन तू तुझं कर अशी त्यांची भूमिका होती आणि हे खूप महत्त्वाचं होतं.

ते किती शिकवत आहेत, कसं शिकवत आहेत याची कधी चौकशी केली नाही. गुरूंवर आणि माझ्यावरही त्यांनी पूर्ण विश्‍वास टाकला. पंडित जसराजजींकडं शिकायचं म्हणजे समुद्रात फेकल्यासारखं होतं. आपल्या मुलाची क्षमता बघून त्यांनी मला त्या समुद्रात टाकलं, पण पोहायचं कसं याच्या सूचना नाही दिल्या, तू स्वतः ते ठरव असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्याकडं शिकणं हे पारंपरिक पद्धतीनं शिकण्यासारखं नव्हतं. ही विद्या अनमोल आहे आणि ती अमूल्य पद्धतीनं घेतली जाणार हे निश्‍चित होतं. त्यांच्याबरोबर राहायचं आणि ते सांगतील तेव्हा, सांगतील तसं शिकायचं असं अतिशय वेगळ्या प्रकारचं माझं शिक्षण होतं. गुरुजींकडं मी संगीताचं सखोल शिक्षण घेतलं. पण माझ्या व्यक्तिमत्त्वाला आणखी नेटकं कसं करता येईल यासाठी माझ्या आईबाबांनी प्रयत्न केले. गाताना माझे हातवारे जास्त होत नाहीत ना याकडं आई-बाबांचं लक्ष असायचं.

‘शुद्ध मुद्रा, शुद्ध वाणी ताको बढो मान’ असं आमच्याकडं म्हटलं जातं आणि त्याला खूप महत्त्व आहे. गाताना तुमची भावमुद्रा किती सहज आहे, यांसारख्या बारकाव्यापासून त्यांचं माझ्याकडं लक्ष असायचं. माझं वजन वाढत नाही ना याकडं बाबांचं लक्ष असायचं. कारण वजन वाढलं की श्‍वास कमी होतो आणि श्‍वासावरचं नियंत्रण गेलं की गाण्याची गुणवत्ता बदलते. मी एकावन्न वर्षांचा आहे, पण अजूनही बाबांचं माझ्या वजनाकडं लक्ष असतं. प्रत्यक्ष माझ्या कुठल्याही गोष्टीत ढवळाढवळ न करता त्यांनी अतिशय सुबक पद्धतीनं माझ्या करिअरला आणि आयुष्याला दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जगभरात माझं नाव झाल्यावर देखील आईला जर गाण्यातील एखादी गोष्ट खटकली तर ती लगेच सांगायची. ती म्हणायची, ‘‘जग एकतर तुझं कौतुक करणार आहे किंवा दूर करणार आहे, ते बाकी काही करणार नाही, मला जे योग्य वाटेल ते मी तुला सांगणार.’’ अगदी वागण्या-बोलण्यातील माझा लहेजा कसा आहे याकडेपण त्यांचं लक्ष असायचं. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तुझा ‘टोन’ बरोबर नाही वाटला असं ते सांगायचे. थोडक्यात, मी कायम जमिनीवर राहीन हे ते बघायचे. अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्यामुळे मी कलाकार म्हणून, माणूस म्हणून घडलो. या सगळ्या गोष्टी आई-बाबांनी अगदी सहज आणि फार उपदेश न करता केल्या. माझ्या मते यालाच खऱ्या अर्थानं संगोपन म्हणतात.

मी पालक झाल्यावर याच सगळ्या गोष्टी मी माझ्या मुलींसाठी केल्या आणि करतो. मला दोन मुली आहेत रुचा आणि रश्मी. रुचानं संगणकशास्त्रात पदवी घेतली असून, आता ती पदव्युत्तर शिक्षण घेत आहे, तर रश्मी शाळेत शिकत आहे. माझ्या आणि मुलींच्या संगोपनातील मोठा फरक म्हणजे मी काय करायचं हे फारच ईश्‍वरीय पद्धतीनं डोळ्यासमोर होतं. मी जन्मापासूनच गायन ही कला सोबत घेऊन आलो होतो, त्यामुळे काय करिअर करायचं हे माझ्याबाबतीत खूप सुस्पष्ट होतं. पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, पु. ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे, गंगूबाई हनगल, ज्योत्स्नाबाई भोळे यांच्यासारख्या दिग्गजांनी माझ्या आई-बाबांना सांगितलं होतं, की याला गाण्यातच करिअर करू द्या. मी वयाच्या तेराव्या वर्षापासून गाण्याची स्वतंत्र मैफिल करू लागलो. त्यामुळे मुलाची आवड ओळखणं हा भाग माझ्या बाबतीत माझ्या पालकांना करावा लागला नाही. पण पालक म्हणून मी जेव्हा पत्नी अश्‍विनीसोबत मुलींच्या करिअरबद्दल चर्चा करतो, तेव्हा ती खूपच वेगळी गोष्ट ठरते. मुली लहान होत्या तेव्हापासून आम्ही जाणलं होतं, की आपण वागणार तसंच मुली वागणार. काय करा आणि काय नाही हे केवळ सांगून उपयोगाचं नाही, तर आपल्यावर जे सांगू तसं वागण्याची जबाबदारीची आहे.

त्यादृष्टीनं आधीपासूनच घरात मोकळं वातावरण ठेवलं होतं. जे काय मनात असेल ते बोलून मोकळं व्हा, उगाच एक जण तोंड तिकडे करून बसला आहे असं नको, हे आईनं सुरुवातीपासूनच शिकवलं होतं. तेच बाळकडू आम्ही आमच्या मुलींना दिलं आहे. त्यामुळे आमच्या घरात अतिशय मोकळेपणानं सर्व विषयांवर चर्चा होतात. मुलींना जेव्हा एखादी गोष्ट सांगतो किंवा शिस्तीसाठी काही सूचना देतो तेव्हा ते मी आधी पाळतो, तुझी खोली स्वच्छ ठेव, असं मी मुलीला सांगितलं तर आधी माझी खोली मी स्वच्छ केलेली असते. स्वतः नियम न पाळता मुलांना नुसता उपदेश केला तर मुलं ते ऐकत नाहीत. आपण जे करू तेच अनुकरण मुलं करणार हे लक्षात घेतलं पाहिजे.

रुचाच्या अंगात बऱ्याच कला आहेत. ती गाते, तिची चित्रकला उत्तम आहे, तिला लिखाणाची आवड आहे. तिच्या आयुष्यात तिला कला हवी होती, पण मी तिला, ‘शास्त्रीय संगीत उपजीविका म्हणून करू नकोस,’ असं सांगितलं. कारण तिची वडिलांशी तुलना होईल, हे मला माहीत होतं आणि तुलना कलाकाराला मारून टाकते असं माझं स्पष्ट मत आहे. एखादाच अपवाद उस्ताद झाकिर हुसेन यांच्यासारखा असतो. पण ते करण्याच्या नादात आपण आपल्या मुलांचा छोटा छोटा आनंद हरवू नये असं मला नेहमी वाटायचं. रुचाने संगणकशास्त्रात पदवी घेतली असली, तरी ती आता डिझायनिंगमध्ये पुढचं शिक्षण घेत आहे. त्यामुळे कला तिच्या आयुष्यात कायम राहिली असं म्हणता येईल. करिअर हे फक्त पैसा कमावण्यासाठी नसतं, तर त्यातून तुम्हाला आनंदही मिळाला पाहिजे. आम्ही ते अनुभवलेलं असल्यामुळं मुलींच्या बाबतीत कुठलीच सक्ती केली नाही. एखाद्या विषयात मुलांचा कल आहे, त्यात गती आहे म्हणजे त्यातून त्यांना आनंद मिळणारच. फक्त ते पालकांना ओळखता आलं पाहिजे, म्हणजे मुलांचं करिअर निवडणं सोपं होतं.

रुचाच्या बाबती आम्हाला तिची आवड समजली, आता ती त्यात आनंदी आहे. मुलींच्या संगोपनादरम्यान माझा व अश्‍विनीचा सुरुवातीपासून स्पष्ट विचार होता, की दोघी पुढील आयुष्यात जे काही करतील त्यावर प्रथम त्यांनी प्रेम केलं पाहिजे, मग जे पुढं असेल ते करावं. याबाबत पालकांनीच मुलांना मार्गदर्शन करावं लागतं. कारण दहावीनंतरच्या वयात फार कमी जणांचा विचार याबाबत सुस्पष्ट असतो. त्यामुळे रश्मीच्या बाबतीतही आम्ही हीच भूमिका ठेवली आहे आणि त्यादृष्टीने पावलं उचलत आहोत. तिची आवड ओळखून त्यादृष्टीने तिला मार्गदर्शन करू. मुलांना योग्य संस्कार आणि दिशा दिल्यानंतर तुम्ही पालक म्हणून पुढे काही करू शकत नाही, कारण पुढचा प्रवास हा मुलांचाच असतो. ते स्वतःचं व्यक्तिमत्त्व आणि पूर्व संचित घेऊन आलेले असतात. त्यांच्या कर्माचं बटण ते कशा प्रकारे दाबतात यावर त्यांचा पुढचा प्रवास ठरत असतो.

पूर्वीप्रमाणं मुलं आपल्याबरोबर राहतील असा काळ आता राहिलेला नाही. त्यामुळं मुलं आपल्यासोबत आहेत तोपर्यंतच पालकत्वाचा आनंद घ्यावा. त्यांच्या सर्व गोष्टी आपल्या नजरेसमोर होत असताना त्या संगोपनाचा आनंद घ्यावा. मुलांना पालक म्हणून आपण जेव्हा बुद्धीचं, शिक्षणाचं, संस्कारांचं बळ देतो, तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावाव्या हाच हेतू असतो. तेच आपलं पालक या नात्यानं कर्म असतं. आम्ही ते चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. पुढे मुलांच्या यश-अपयशावर पालकांचा हक्क नसतो.

‘तुम्ही जे शिक्षण घेत आहात ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असावं आणि ते समजलं असेल तरच तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात,’ हे आम्ही मुलींना सांगितलं. गुणांच्या मागे न लागता गुणवत्तेचा आग्रह धरला. यामुळे घेतलेले विषयही त्यांना चांगले समजले आणि त्यामुळे गुणही आपोआपच चांगले मिळाले. रुचा चौऱ्याण्णव टक्के मिळवून पदवीच्या शेवटच्या वर्षी उत्तीर्ण झाली. पालकत्व निभावताना मी कुठल्याही गोष्टीचा, कृतीचा सूक्ष्म विचार करतो, प्रत्येक प्रश्‍न, विषय तळाशी जाऊन समजून घेतो, घरी चर्चा करतो आणि मग कुठलाही निर्णय घेतो.

आपल्याला काय योग्य-अयोग्य वाटतं ते पालकांनी मुलांना शिकवलं पाहिजे, पण त्याचबरोबर आपलीच विचारधारा योग्य आहे असं मानू नका हे देखील सांगितलं पाहिजे. कारण एका ठरावीक वयानंतर मुलं घराबाहेर पडतात, त्यांचं विश्‍व विस्तारतं. तिथं आपण शिकवलेल्या विचारधारेपेक्षा वेगवेगळ्या विचारधारेची मुलं त्यांना भेटतात. अशावेळी मुलं गोंधळू शकतात. म्हणून आमचीच विचारधारा तू स्वीकार असा आग्रह पालकांनी न धरता तुम्ही तुमची विचारधारा तयार करा, पण त्यामागं काही मूलभूत तत्त्व असली पाहिजे आणि त्यामागचं कारण माहीत पाहिजे आणि त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील हे देखील सांगितलं पाहिजे.

आपली मुलं आपली असली तरी काही बाबतीत ती आपल्यापेक्षा भिन्न असू शकतात. त्या गोष्टी चांगल्या असतील तर त्याचा आपण आदर केला पाहिजे. माझी छोटी मुलगी रश्मी वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहे; पण मी तसा नाही. कारण मी परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे. माझं वेळापत्रक निश्‍चित नसतं. पण मी रश्मीला नेहमी सांगतो की तुझी ही सवय खूप उत्तम आहे, ती भविष्यात तुला खूप पुढे घेऊन जाईल. रुचा खूप चांगली लीसनर आहे. हे दोन्ही गुण माझ्यात नसले तरी मी त्यांचं नेहमी कौतुक करतो. रुचाचं दहावी झाल्यानंतर पुढं काय करायचं हे ठरवताना पालक म्हणून आमचा तो थोडा परीक्षेचा काळ होता. कारण ती अभ्यासाबरोबरच, गाणं, चित्रकला यांसारख्या विषयातही उत्तम होती. त्यामुळं यातून निवडलेली दिशा चुकू नये अशी धास्ती मनात होती. पण पुढे तिला योग्य दिशा मिळत गेली आणि ती त्यात यशस्वीपण झाली.

माझ्या व्यवसायमुळं मैफिलींसाठी बरेचदा मला बाहेर जावं लागतं. त्या वेळी मुलींबरोबर वेळ घालवता न येणं हा नाईलाज असतो. पण मी घरी असतो तेव्हा मुलींबरोबर भरपूर वेळ घालवतो. अश्‍विनीनं मला एक गोष्ट सांगितली होती, की तू मुलींच्या अॕक्टिव्हिटीमध्ये सहभागी होत राहिलास तर पुढे मुलींना तू या कारणासाठी कायम लक्षात राहशील, तुझा सहवास लक्षात राहील. त्यामुळे शाळेच्या, कॉलेजच्या प्रवेशाच्या वेळी, निकालाच्या वेळी, शक्य असेल तेव्हा क्लासला सोडणं-आणणं या गोष्टी आवर्जून केल्या आणि करतो. तसं पाहिलं तर अश्‍विनी हे सगळं एकटी करू शकते, पण तिनंच मला सांगितलं होतं, की मुलींच्या आयुष्यात तू सहभागी झाला नाहीस तर ‘बाबांच्या’ सहवासातले क्षण त्यांच्या जवळ राहणार नाहीत. मला ते पटलं म्हणून मी ते आनंदानं करतो.

सध्याचा काळ हा गॕजेटचा आहे. आम्ही रुचाला दहावी झाल्यावर स्मार्ट फोन दिला होता. आधी क्लासला पोहोचली वगैरे निरोप देण्यासाठी अगदी साधा फोन दिला होता. स्मार्ट फोन दिल्यानंतर, ‘हे लक्ष विचलित करणारं आहे, पण या वस्तू योग्य पद्धतीनं वापरल्या तर खूप फायद्याच्या आहेत,’ हे आवर्जून सांगितलं. फोन, लॕपटॉप यांसारख्या वस्तू काळाची गरज आहे. मला स्वतःला, माझ्या शिष्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा खूप फायदा होतो. गायकीतील कोणतीही शंका ते रेकॉर्ड करून मला चटकन विचारू शकतात आणि मी उत्तरही लगेच देऊ शकतो. त्याचं महत्त्व मी जाणून आहे. मी रुचाला फोन देताना तो योग्य पद्धतीनं कसा वापरायचा हे सांगितलं आणि ती तो तसा वापरत आहे का, याकडे लक्षही ठेवलं. योग्य वापरला नाही तर तो काढूनही घेऊ असंही सांगितलं. आमच्याकडं सगळी आधुनिक गॕजेट्स आहेत, पण ‘ही गॕजेट आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही, हे लक्षात ठेवा’, असं मुलींना ठळकपणे सांगितलं. घरात कोणी आलं आहे आणि त्या मोबाईल हातात धरून बसल्या आहेत असं होणं आमच्याकडं शक्यच नाही, मला ते चालत नाही. याची गरज असेल तेव्हाच वापर करावा हे मी सांगितलं आहे आणि त्या ते पाळतात. खरं तर माझ्यासाठी सोशल मीडिया हे प्रमोशनचं मोठं माध्यम आहे, मी ते जास्त वापरणं हा माझ्या व्यवसायाचा भाग आहे. त्यामुळे मुलींना त्या विरुद्ध सांगणं थोडं अवघड होतं. पण मी त्यांना वास्तवता सांगितली आणि तुमचं व माझं आयुष्य याबाबत वेगळं आहे हे समजावून सांगितलं. अशा प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीबाबत मी सखोल विचार करतो, मुलींना तो समजावून सांगतो. शेवटी पालकत्व ही जबाबदारी आहे, हे प्रत्येक पालकाने समजून घेतलं पाहिजे. मूल जन्माला आलं, की आपण आपोआपच ‘पालक’ होतो, पण त्याबरोबर आलेली जबाबदारी स्वीकारून तुम्ही ती निभावतात का? ती निभावणं हे ‘पालकत्व’ आहे.

(शब्दांकन - मोना भावसार)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com