यशाचा नेमका अर्थ ! (विद्या सुर्वे-बोरसे)

Vidya-Surve-Borse
Vidya-Surve-Borse

घरातील जेष्ठ व्यक्तींच्या वर्तनातून कोणत्या विचारधारा रुजत आहेत? याची पुन:तपासणी आवश्यक आहे. वडिलांनी घरात येण्याअगोदर आपल्या डोक्यातले ऑफिस दरवाजाबाहेर ठेवून येण्याची गरज आहे. कामकरी आईनं घरात येताना आपला मोबाईल पूर्णत: बंद करून पर्समध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे. जेवणाच्या वेळी घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण करण्याची गरज आहे. मुलांचे मित्र कोण आहेत? प्रश्न काय आहेत? त्यांच्या वाढत्या वयातील समस्या काय आहेत? हे दोस्त होऊन पालकांनी ध्यानात घेतले पाहिजे.

बघता बघता २०२० हे वर्ष समाप्तीकडं आलंय. या वर्षाकडून अनेकांना अनेक अपेक्षा होत्या. खूपशी स्वप्नं या वर्षाच्या खुंटीला बांधून ठेवलेली होती. गेल्या वीस वर्षांत सतत बिंबवलं गेलं त्या विचारांची फलश्रुती हे वर्ष घेऊन येणार होतं. देशाची महासत्ता होण्याचं स्वप्नं, युवकांची नोकरीबद्दलची स्वप्नं, हातात काठी असणाऱ्या ज्येष्ठांची आधाराची स्वप्नं आणि बालकांची एका धम्माल शाळेची, मित्रांची, सहलीची, स्पर्धेची स्वप्नं हे सारं काही गतिरोध निर्माण झाल्यावर होतात तशी अडून राहिली. गेल्या वर्षी याच दिवसांत जर कुणी हे जग, जागच्या जागीच स्थिर राहण्याबद्दलचं भविष्य सांगितलं असतं, तर त्यावर कुणी विश्वास ठेवला नसता. पण असं घडलं खरं ! शाळा मार्चमध्ये बंद झाल्या, त्या अजून बंदच आहेत. ज्या भयानं मेंदूचा ताबा मिळवला तो अजूनही पुरता सुटलेला नाही. नव्या नोकऱ्या तर मिळाल्या नाहीतच, पण हाती जे होते तेही निसटून जाते काय, अशी भीती टांगत्या तलवारीसारखी सदैव डोक्यावर आहे. या वर्षानं मानवाला कधी नव्हे इतकं हतबल केलं. असहाय केलं. मानवानं मांडलेला सगळा पट उधळून टाकला गेला. मानवाला पुन्हा एकदा विचारात पाडलं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगेश पाडगावकर यांना ‘सलाम’ या संग्रहासाठी अकादमी पुरस्कार लाभला, त्या वेळी आपल्या भाषणात ‘चार मुलांची आणि त्यांच्या वडिलांची’ गोष्ट त्यांनी सांगितली. ‘तुम्हाला कोण व्हायचे आहे?’ या वडिलांच्या प्रश्नाला सगळ्यात छोट्या मुलानं दिलेल उत्तर, ‘मला समजून घ्यायचे आहे.’ इतरांना अनाकलनीय वाटलं होतं. ‘मला माणूस समजून घ्यायचा आहे. ज्या यशाच्या मागं तो छाती फुटेपर्यंत धावत असतो, त्या यशाचा नेमका अर्थ काय? मृत्यूचा नेमका अर्थ काय? मला समजून घ्यायचं आहे.’ घरातील सगळ्यात छोटा मुलगा म्हणाला होता. २०२० या वर्षानं आपणा सर्वांनाच या मुलाच्या जागी उभं केलं आहे.

याच वर्षी मार्चच्या एक, दोन, तीन तारखा किती अपूर्व होत्या. किती आनंददायी होत्या. नव्या ऋतूच्या आगमनाची प्रतीक्षा होती. येणाऱ्या होळीच्या, रंगात न्हाऊन जाण्याच्या, वसंताच्या, मोहरून येण्याच्या, नव्या शपथांच्या, नव्या उमेदीच्या, एक नवं जग पुन्हा सुरू होत आहे याचं सूतोवाच करणाऱ्या होत्या आणि मग मार्चचा अनपेक्षित शेवटचा आठवडा येऊन दारी उभा राहिला. त्यानं सगळ्यांनाच घरात बंदिस्त करून टाकलं, त्यानं वसंत ऋतू खिडकीतून पाहायला सांगितलं. यंदा वसंत ऋतू आला आणि गेला, त्याचा स्पर्श घरादारातील मुलांना घेता आला नाही. मोहर कसा उमलतो, फुलांचे घोस कसे लगडतात, कैऱ्यांचे पाड कसे होतात? पालवी कशी फुटते? वसंत आपल्यासोबत फळाफुलांचा सुगंध घेऊन कसा चालत येतो, तापलेल्या धरित्रीच्या हाकेवरून डोंगर उतारावरून ढग धावत कसे येतात? काळीभोर शेतं हिरवीगार कशी होतात? पायवाटा ओल्या कशा होतात? ओहोळ कसे झुळझुळतात? हे मुलांना कळलं नाही. आजूबाजूला निसर्गचक्र पूर्वीसारखंच होतं, पण मार्चच्या तीन तारखेपर्यंत पाहिलेली स्वप्नं नव्हती. त्यावर ओरखडा पडला होता.

जग स्पर्धेचं आहे, धावपळीचं आहे, काहीही करून हवी ती वस्तू, गोष्ट मिळवायचीच या ईर्षेनं ग्रासलेलं आहे. त्यासाठी रात्ररात्र केलेली जागरणं आहेत, केलेली कठोर मेहनत आहे, आखाडे आहेत, युक्त्या आहेत, क्लृप्त्या आहेत. शह-प्रतिशह आहेत. हा सगळा पाठलाग, हव्यास किती असावा? याबद्दल कुणी बोलत नाही. थांबायचं कुठं? हे कुणी सांगत नाही. ‘यश म्हणजेच आनंद ’ एवढंच ठाऊक असतं, अपयशाला सामोरं जाणं कुणी शिकवत नाही. आपल्याला जे मिळेल-मिळेल असं शेवटच्या क्षणापर्यंत वाटत असतं, तो हातात आलेला घास, कुणीतरी अलगद काढून नेतं, तेव्हा वागायचं कसं? प्रतिक्रिया द्यायची कशी? हे मग कळत नाही. तेव्हा माणसं कोसळू लागतात. एकमेकांपासून दूर जाऊ लागतात. एक अढी बसते मनात कुठेतरी, ती निघता निघत नाही. यशाच्या पाठीमागं धावताना काय पणाला लावायचं? स्वत:साठी काय जपून ठेवायचं? याचं भान सुटून गेलं, की दिशाहीन प्रवास आणि मनाची हजार शकलं हाती उरतात. तेव्हा वेताळानं विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी कोणताही राजा विक्रमादित्य आपल्यासोबत नसतो.

२०२० संपता संपता बालकुमारांविषयी पुन्हा नव्यानं आपण सर्वांनी विचार करायला हवा असं मला प्रकर्षानं वाटते. जगातील प्रत्येक बाब, मिळवण्यासाठी नसते. मालकी हक्क प्रस्थापित केल्यानं वस्तू, प्रदेश आणि व्यक्ती आपल्या होत नसतात. टीव्ही, संगणकाच्या गेममधून कोणत्या प्रकारची मूल्यं बिंबवली जात आहेत? घरातील जेष्ठ व्यक्तींच्या वर्तनातून कोणत्या विचारधारा रुजत आहेत? याची पुन:तपासणी आवश्यक आहे. वडिलांनी घरात येण्याअगोदर आपल्या डोक्यातलं ऑफिस दरवाजाबाहेर ठेवून येण्याची गरज आहे. कामकरी आईनं घरात येताना आपला मोबाईल पूर्णत: बंद करून पर्समध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे. जेवणाच्या वेळी घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण करण्याची गरज आहे. मुलांचे मित्र कोण आहेत? प्रश्न काय आहेत? त्यांच्या वाढत्या वयातील समस्या काय आहेत? हे दोस्त होऊन पालकांनी ध्यानात घेतलं पाहिजे. एखाद्या संध्याकाळी आपल्या घरातील मुलांसोबत बसून त्यांच्या पाठ्यपुस्तकातील गणितं, विज्ञानाचे सिद्धांत, जगाचे नकाशे, इतिहास आणि भाषेच्या पुस्तकातील उतारे वाचले, चाळले, सोडवले पाहिजेत. शाळा म्हणजे, ट्यूशन म्हणजे सर्व काही नाही. आपुलकी, माया, आस्था हे शब्द पालक आणि बालक यासंदर्भात अधिक अर्थवाही आहेत.

बऱ्याच वर्षांनी सटाण्याला आजोळी गेले. जुने दिवस आठवले. मामा-मामी यांचं प्रेम पुन्हा अनुभवलं. भाचे- भाच्या मोठ्या होतात, आपल्या संसारात रममाण होतात, निरनिराळी पदं मिळवतात, समाजात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करतात, याचं केवढं कौतुक असतं मामा- मामीच्या शब्दाशब्दांत. आपल्या धावपळीत आपण आपली अत्यंत जवळची माणसं, त्यांचा स्नेह गमावला याची जाणीव तेव्हा होते, जेव्हा आपण आयुष्याचा वेग कमी करून थोडे आडबाजूला जातो. आपल्या काळजातील माणसं गमावून आपण काहीही मिळवू शकत नाहीत आणि मिळवलंच काही, तर त्यात आनंद असेल काय? यशाच्या शिखरावर एकटं आणि एकाकी असणं कुणाला आवडेल? तेव्हा धावताना सोबत असणाऱ्यांचा नेहमी सन्मान करायला शिकलं पाहिजे. ही समज प्रत्यक्ष आचरणातूनच पुढच्या पिढीला देता येऊ शकेल.

आई-बाबांचं जेव्हा भांडण होतं, जेव्हा छोट्या मोठ्या कुरबुरी होतात, तेव्हा घरातील मुलांचे चेहरे बारकाईनं बघा. कोणत्याच मुलाला आपल्या आई-बाबांनी भांडलेलं आवडत नाही. आणि मग बाबा बाहेर गेल्यानंतर कुनू-मुनू आईजवळ येऊन म्हणतात, ‘मी मोठ्ठा झालो नं की तुझ्यासाठी असं घर बांधील आणि इतके सगळे नोकर ठेवीन, की तू खूप आनंदी राहशील. तिथं तुला कुणी-कुणी रडवणार नाही.’ बाळांचे हे उद्गार प्रातिनिधिक आहेत. बहुतेक सामान्य घरातील असेच चित्र आहे. सुखी माणसाचा सदरा बाजारात मिळत नसतो. तो प्रत्यक्ष कृतीतून कमवावा लागतो. अशांसाठी कस्तुरीमृग हाकेच्या अंतरावर उभे असतात, अशांसाठी पाऊस नसला तरी मोर नृत्य करतो, अशांसाठी अवेळीच वसंत फुलून येतो. अशांना सप्टेबर, ऑक्टोबरमध्ये आपोआप आपुलकीच्या नात्यांची ऊब मिळते.

मला लोककथा आवडतात, भुरळ घालतात, कारण तिथं सुखांत असतो. प्रत्यक्ष जीवनातही माणसाला जीवनाचा गोड शेवट हवा असतो. संकटांशी दोन हात प्रत्येकालाच करावे लागतात, लढणं हा जन्मजात मानवी स्वभाव आहे. माणूस साहसी आहे, पराक्रमी आहे. काळाशी भांडण घेणं तो युगानुयुगं करत आला आहे. त्यानं पृथ्वीला प्रदक्षिणा घातली, चंद्रावर पाउल ठेवलं, मंगळाला स्पर्श केला, त्यानं विश्वाचं कोडं आपल्या सामर्थ्यानं सोडवू पाहिलं. बाबूराव बागुल यांनी एका कवितेत म्हटल्याप्रमाणं –
‘हे माणसा
तूच आहेस सर्व काही
तुझ्यामुळेच सजीव सुंदर
झाली ही मही’
हे प्रतिभावान माणसाचं कर्तृत्व आहे. त्यामुळे पराभवातही मानव सुंदरच होतो. त्याचे प्रयत्न त्याला सुंदर करतात. म्हणूनच त्याचं साफल्य त्याला लाभावं असं लोककथेतल्यासारखं मला वाटतं. हे वर्ष काही दिवसांनी संपेल, पण या वर्षाच्या आठवणी मानवी इतिहासात कितीतरी शतकं काढल्या जातील. असं एक वर्ष होतं ज्यानं मानवी गाडा थांबवला आणि त्याला स्वत:च्या भरधाव वेगाचा विचार करायला भाग पाडलं, एकमेकांना समजून घ्यायला बाध्य केलं असं म्हटलं जाईल. पण कधी कधी मला प्रश्न पडतो आम्ही या वर्षाकडून खरंच काही शिकलो का? या वर्षात जे गमावलं त्याबद्दल एक क्षण थांबून विचार केला काय? यानिमित्तानं एवढंच विचारावंसं वाटतं, पालक बालक नात्याचा पुन्हा एकवार विचार तर कराल काय? यशाचा नेमका अर्थ शोधाल काय?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com