Vidya-Surve-Borase
Vidya-Surve-Borase

निरोप घेताना... (विद्या सुर्वे-बोरसे)

प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, ते दुसऱ्यासारखं नाही. त्याला त्याच्या आकाशात उडू द्यायला हवं... त्याला त्याच्या स्वप्नांचा शोध घेऊ द्यायला हवा... अगोदरच्या पिढीनं कल्पनाही केली नसेल असा सोनेरी  भविष्यकाळ त्याच्यात दडलेला आहे. मुलांसाठी विचार करणाऱ्यांनी हे सगळं लक्षात घ्यायला हवं. 

नेहमीप्रमाणे थंडी आली आहे...नेहमीप्रमाणे वर्ष सरत आलं आहे...नेहमीप्रमाणे जग गारठून गेलं आहे... चाळीस वर्षांपूर्वी कुणीतरी असाच हिशेब मांडला असेल. चारशे वर्षांपूर्वीही असंच घडलं असेल. चाळीस वर्षांनी कुणी तरी असंच लिहील. चारशे वर्षांनंतरही असंच घडेल. माणसं असतात आणि ती वर्षांचा ताळेबंद मांडत जातात. काय कमावलं, काय गमावलं हे कागदावर उतरवत जातात. अर्थात्‌, कागदावर न उतरवता मनातच रेंगाळत राहील असंही पुष्कळ असतं.
जाणारं प्रत्येक वर्ष काही तरी हिरावून नेत असतं, त्याबरोबरच बरंच काही शिकवूनही जात असतं. अधिकचं मिळवणं आणि वजा करणं ही अव्याहत प्रक्रिया आहे. न संपणारी.
वर्षाच्या सुरुवातीला मी म्हणाले होते, ‘चला गोष्टी वाचू, गोष्टी सांगू...’ 
बघता बघता सांगणाऱ्याचीही एक गोष्ट झाली. लिहिता लिहिता लिहीत गेलेल्या वर्षाचीसुद्धा एक गोष्ट झाली. गोष्टी अशा असतात, न संपणाऱ्या. गोष्टी...पुनःपुन्हा अवतीर्ण होणाऱ्या.

नचिकेत मेकाले हा इयत्ता दहावीतला मुलगा. त्यानं गेल्या वर्षी एक गोष्ट लिहिली आणि स्वप्नात घडतं किंवा सिनेमात असतं तसं एक जग निर्माण केलं, त्या जगाचा नचिकेत स्वत:च नायक झाला. प्रकाशाचा पाईक असणारा नायक. अंधाराला विरोध करणारा लढवय्या. हळूहळू लक्षात आलं की तारुण्याच्या चौकटीवर पाय ठेवणाऱ्या प्रत्येक कुमाराला नायक व्हायचं आहे. प्रत्येक कुमारीला परीचे पंख लावून गगनभरारी घ्यायची आहे. वाढतं वय आपल्याला नवी उमेद, नवी जिद्द देत असतं.

वर्षभर निरनिराळ्या शाळांमधल्या बाल-कुमारांनी लिहिलेल्या शब्दांमधून मी विहार करत राहिले. ‘द सेव्हन लेटर्स ऑफ द यूएफओ’ हेसुद्धा असंच भन्नाट पुस्तक. तेरा वर्षांच्या दिव्यांशू सिंह यानं लिहिलेलं ११२ पानांचं हे नाटक. दिव्यांशू आठवीत आहे. वर्षभरापूर्वी त्यानं हे लेखन हातावेगळं केलं होतं. हे वर्ष संपता संपता दिनेश पाटील यांनी एक बाललेखिकेच्या - पालवी मालुंजकर हिच्या - लेखनाचा घेतलेला शोध हाती आला. ‘सर्जक पालवी’ मध्ये तिची पत्रं आहेत, निबंध आहेत, रोजनिशीची पानं आहेत आणि ब्लॉगवरचं लेखनही आहे. अभिप्राय, प्रतिक्रिया, मनोगतं, संवाद यांनी हे संपादन साकारलं आहे. एका बाललेखिकेचा प्रवास समजून घेणं मोठंच रंजक होतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावोगाव मुलं लिहीत आहेत. अगोदर ‘सृजनपंख’, ‘झेप’, ‘बालानुभव’, ‘बालांकुर’ यांसारखी तुरळक पुस्तकं प्रकाशित होत असत. ‘दप्तरातल्या कविता’ घेऊन तृप्ती अंधारे यांच्यासारख्या एखाद्याच शिक्षणाधिकारी पुढं यायच्या. आता या मदतीच्या हातांमध्ये संख्यात्मक वाढ झाली आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातल्या हरोली देशिंगपासून ते मराठवाड्यातल्या अंबेजोगाईपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावपासून ते विदर्भातल्या काटोल-नागपूरपर्यंत किती तरी नवे लेखक समोर आले आहेत. लिहिणाऱ्या या नव्या पिढीचं स्वागत ज्येष्ठ लेखक-कवीही आवर्जून करत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, इंद्रजित भालेराव, नामदेव माळी, विजय चोरमारे, स्वाती शिंदे-पवार, अभिजित जोंधळे अशी मंडळी त्यासाठी पुढं आली आहेत. भावना (श्रावणी दवणे), काव्यज्योत (साक्षी सीताराम लाड), जिव्हाळा (लक्ष्मी बनसोडे), शिवानीच्या कविता (शिवानी चौगुले), सारिकाच्या कविता (सारिका पाटील), तेजश्रीच्या कविता (तेजश्री पाटील), समृद्धीच्या कविता (समृद्धी शेलार) हे शाळकरी विद्यार्थ्यांचे कवितासंग्रह यामुळे प्रकाशित झाले.  

या वर्षी अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटानं शालेय विद्यार्थ्यांना घरात बंदिस्त केलं; त्यामुळे सर्जनाच्या नव्या वाटांचाही शोध घेता आला. मोबाईलपासून आणि संगणकापासून आपल्या अपत्यांना चार हात दूर ठेवणारे पालक हळूहळू ऑनलाईन अभ्यासाला सरावले. मोबाईल हे एक शैक्षणिक उपकरण झालं. फेसबुक, झूम, यू ट्यूब, गुगलमीट, मायक्रोसॉफ्ट टीम या ॲप्लिकेशन्सनी मोबाईलगेमची जागा व्यापली. हाताशी असणारी संसाधनं विद्यार्थी-शिक्षक आणि पालक नव्या अंगानं उपयोगात आणू लागले.

मे-जूनच्या काळात गणेश घुले यांनी ‘सुंदर माझी शाळा’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून बालकांसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना बोलतं केलं. दोन महिने हा उपक्रम त्यांनी चालवला. त्यातून ६० पेक्षा अधिक मान्यवर मुक्तपणे बोलले. मुलांच्या आजारपणापासून ते ‘मी का लिहितो?’ अशा विविध विषयांचा त्यांनी वेध घेतला.

राजीव तांबे आणि श्रीनिवास बाळकृष्ण हे बालकांविषयी निराळा विचार करणारे प्रयोगशील लेखक- चित्रकार आहेत. या जोडीनं दरम्यानच्या काळात अभिनव असा पुस्तकसंच निर्माण केला. ‘मराठीतही आगळी पुस्तकं आहेत’ असं आपण अभिमानानं म्हणू शकू असा हा संच आहे. वारा, पाऊस, नदी, प्रकाश, मित्र, जादू...हे म्हणायला गेलं तर अगदीच साधे-सोपे विषय. हे विषय घेऊन केलेली मांडणी अप्रतिम आहे. गिरीश सहस्रबुद्धे यांनी या दहा पुस्तकांच्या संचातल्या दोन पुस्तकांसाठी चित्रं काढली आहेत. बालसाहित्यात लेखकाइतकाच चित्रकारही कसा महत्त्वाचा असतो हे कळण्यासाठी तांबे यांचा संच उपयोगी पडेल.

‘दहा रुपयांत पुस्तक’ अशा योजनेनंतर ‘पाच रुपयांत पुस्तक’ अशी बालकांसाठीची योजना सुभाष विभूते यांनी प्रत्यक्षात आणली. ‘एका’, ‘महात्मा गांधी’ आणि ‘देशोदेशीच्या कथा’ ही तीन पुस्तकं या योजनेत प्रकाशित झाली. ‘ऋग्वेद’ या मासिकानं ‘एक वाङ्मयप्रकार, एक लेखक’ या भूमिकेतून काही विशेषांक प्रकाशित केले. डी. के. शेख यांच्या ‘दखनी बालकविता’, माया धुप्पड यांच्या ‘कथा-कविता’ हे ‘ऋग्वेद’चे विशेषांक मराठी बालसाहित्य समृद्ध करणारे आहेत.
रत्नाकर मतकरी यांच्या निधनानं मराठी बालरंगभूमीवर पोकळी निर्माण झाली. मतकरी यांनी मराठी बालनाट्याला स्वतंत्र चेहरा मिळवून दिला होता. त्यांच्या बालनाट्यांतली गाणी आणि कविता यांचाही स्वतंत्र विचार करता येऊ शकेल.

सुनंदा गोरे (नवी प्रतिज्ञा), बारीकसारीक गोष्टी (शिरीष पद्माकर देशमुख), माझे गाणे आनंदाचे (कैलास दौंड), नदी रुसली, नदी हसली (सुरेश सावंत), वारूळ (संजय ऐलवाड), आभाळाचे गुपित (देवबा शिवाजी पाटील), फुल-फुलोरा (किसान पाटील), आम्ही गोजिरी फुले (सुभाष किन्होळकर), तू माझी चुटकी आहेस (फारुख काझी), थेंबफुले (एकनाथ डुमणे), पोपटाची पार्टी (समाधान शिकेतोड), बालमानसशास्त्र (प्रतीक्षा सचिन कथले) अशा अनेक पुस्तकांनी या वर्षात वाचनाला गती दिली. 

पुस्तकसंच किंवा समग्र लेखन एकत्रितपणे उपलब्ध करून देणं हे जिकिरीचं आहे; पण अलीकडच्या काही वर्षांत विंदा करंदीकर, गुलजार, किशोर पाठक, कविता महाजन, अनंत भावे यांचं बालसाहित्यलेखन एकत्रित उपलब्ध झालं ही मोठीच कामगिरी म्हणावी लागेल. मंगेश पाडगावकर, विजय तेंडुलकर, भा. रा. भागवत, अमरेंद्र गाडगीळ, आरती प्रभू आणि इतरांचं समग्र बाल-कुमारलेखन प्रकाशित होण्याची आता आवश्यकता आहे.

मराठी बाल-कुमारसाहित्य त्याच्या शेकडो वाटांनी मुलांपर्यंत जाण्याचा मार्ग शोधत आहे असं आपल्या लक्षात येईल. अर्थात्‌, अडथळेही खूप आहेत. वितरणव्यवस्था नीटनेटकी नाही. छोट्या शहरांत आणि पुण्या-मुंबईपासून दूर अंतरावर असणाऱ्या ठिकाणी पुस्तकं पोहोचत नाहीत. ऑनलाईन खरेदीच्या आजच्या या जगातही पुस्तकं उपलब्ध होत नाहीत.

मराठी बालसाहित्याचा समग्र इतिहास अजूनही लिहिला गेलेला नाही. झालेले प्रयत्न तुरळक आहेत, त्यातून फार काही हाती लागत नाही. त्यामुळे बालसाहित्याच्या संदर्भातल्या नोंदीसुद्धा विश्वकोशात आणि अन्य ठिकाणी आढळत नाहीत. आठ-दहा नोंदींत गुंडाळून टाकण्यावर सर्वत्र भर दिसतो. आगामी काळात अगोदर विभागनिहाय असे साहित्येतिहास लिहून घेतले जायला हवेत आणि त्यानंतर मराठीचा सर्वंकष विचार केला जायला हवा.

मराठी बालसाहित्याचा, मुलांच्या आणि पालकांच्या हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या सदरातून मी वर्षभर केला. लिहिणं म्हणजे पुन्हा स्वत:ला तपासून पाहणंही असतं. यानिमित्तानं भूतकाळात डोकावता आलं, भविष्याचा वेध घेता आला.
मुलांसाठी लिहिणारे लेखक आणि मुलं यांच्यातलं अंतर कमी होत आहे ही वर्तमानकाळातली मोठी जमेची बाजू आहे. आजी-आजोबांच्या भूमिकेतून किंवा मार्गदर्शक-हितोपदेशकाच्या भूमिकेतून लेखक हे मैत्रीच्या पातळीवर आले आहेत. मुलांशी त्यांची झालेली ही गट्टी मराठी बालसाहित्याला नवी उभारी देईल. जेव्हा आजूबाजूला केवळ वातावरणातच नव्हे, तर व्यक्तींच्या वागणुकीतही गारठा असतो तेव्हा पुस्तकं आपल्याला ऊब देत असतात. जेव्हा सारं काही संपत आलं आहे असं वाटत असतं तेव्हा पुस्तकं धीर देतात आणि लढण्यासाठी बळ पुरवतात. प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, ते दुसऱ्यासारखं नाही. त्याला त्याच्या आकाशात उडू द्यायला हवं...त्याला त्याच्या स्वप्नांचा शोध घेऊ द्यायला हवा...अगोदरच्या पिढीनं कल्पनाही केली नसेल असा सोनेरी  भविष्यकाळ त्याच्यात दडलेला आहे.  मुलांसाठी विचार करणाऱ्यांनी हे सगळं लक्षात घ्यायला हवं. 

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com