ठेवा दुर्मीळ चित्रांचा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rare Prints

ठेवा दुर्मीळ चित्रांचा...

अत्यंत दुर्मीळ भारतीय हस्तलिखितं आणि ग्रंथांनी समृद्ध असलेलं तमिळनाडूमधलं तंजावरचं सरस्वती महाल ग्रंथालय म्हणजे तंजावरचे मराठी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातले सर्फोजी राजे द्वितीय यांनी देशाला दिलेला अनमोल ठेवा आहे. सर्फोजी राजांनी आपलं संपूर्ण आयुष्य विद्याव्यासंग, दुर्मीळ हस्तलिखितं, ग्रंथ, ताम्रलेख, शिलालेख, राजकीय दस्तावेज यांचा संग्रह करणं आणि युरोपियन ग्रंथांचं मराठी, संस्कृत, तमीळमध्ये भाषांतर करणं, या सांस्कृतिक कार्याला वाहिलं. त्यांच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचं फलित म्हणजे, तंजावरचं हे सरस्वती महाल ग्रंथालय. आजच्या काळात सरस्वती महाल हे ग्रंथालय मध्ययुगीन काळात स्थापन झालेलं आशिया खंडातील सर्वांत मोठं व जुनं ग्रंथालय मानलं जातं.

येथील विविध भाषा आणि विषयांमधील अफाट ग्रंथसंपदा आणि असंख्य हस्तलिखितं पाहून कुठलाही ग्रंथप्रेमी माणूस स्तिमित होईल. या ग्रंथालयात मराठी, तमीळ, तेलुगू, संस्कृत, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, इटालियन आदी विविध भाषांमधील ६५ हजारांहून अधिक पुस्तकं आहेत. सरस्वती महाल ग्रंथालयाच्या संग्रहातील एकूण ४६ हजार ७०० हस्तलिखितांपैकी ३९ हजार ३०० संस्कृतात, ३ हजार ५०० तमीळमध्ये, एकतीसशे मराठीमध्ये, तर आठशे तेलुगू भाषेत आहेत. या ग्रंथालयामध्ये असलेला जुनी छायाचित्रं आणि तैलचित्रं या सगळ्यांचा संग्रह तर एकमेवाद्वितीय असाच आहे.

याच छायाचित्र आणि चित्र संग्रहातील काही अतिशय दुर्मीळ चित्रं आणि छायाचित्रं निवडून सर्फोजी राजांचे सहावे वंशज, तंजावरच्या राजघराण्यातले राजपुत्र प्रताप राजे भोसले यांनी ‘रेर प्रिंट्स’ ह्या नावानं एक ई-बुक नुकतंच प्रसिद्ध केलं आहे. आपले पूर्वज सर्फोजीराजे आणि आजोबा तुळजेन्द्र राजे ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून प्रताप राजे ह्यांनी साहित्य आणि संस्कृती सेवेची परंपरा कायम ठेवली आहे. ''रेर प्रिंट्स’ हे त्यांचं चौथं पुस्तक. केवळ २७ वर्षं वय असलेले प्रतापराजे शिक्षणानं अभियंता आहेत; पण आपल्या घराण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा त्यांना सार्थ अभिमानही आहे आणि जाणही. ह्या पुस्तकात त्यांनी आजवर कुठंही प्रसिद्ध न झालेली सरस्वती महाल संग्रहालयातील दुर्मीळ ऐतिहासिक चित्रं प्रसिद्ध केलेली आहेत. पुस्तकाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासकट अनेक मान्यवरांचे संदेश लाभलेले आहेत, तर प्रस्तावना पेरियार मणीअम्माई विद्यापीठाचे कुलगुरू श्री. वीरमणी ह्यांची आहे.

पुस्तकातलं पहिलंच चित्र आहे ते अतिशय दुर्मीळ असं, आपणा सर्वांसाठीच वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं, ग्रंथालयाच्या संग्रही असलेलं चित्र. प्रतापसिंह राजेंच्या मते ह्या चित्राखेरीज हे पुस्तक प्रसिद्ध होऊच शकलं नसतं. घोड्यावर बसलेल्या महाराजांचं हे चित्र खरोखरच अत्यंत देखणं आहे. प्रत्येक चित्राखाली थोडक्यात अतिशय रंजक अशी माहिती दिलेली आहे.

पुस्तकातलं दुसरं चित्र आहे ते शिवरायांचे थोरले सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचं. बंदूक चालवणाऱ्या संभाजी महाराजांचं चित्र आजवर कुणीच पाहिलं नसेल! ह्या चित्राखाली दिलेल्या माहितीनुसार आज दाक्षिणात्य भोजनाचा अविभाज्य भाग असलेली सांभार ही पाककृती तंजावूरच्या राजघराण्याच्या मुदपाकखान्यात सर्वप्रथम बनवली गेली व छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून त्या आमटीला सांभार असं नाव दिलं गेलं. छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आणि सातारचे प्रथम छत्रपती शाहू महाराज पहिले यांचीही दुर्मीळ चित्रं ह्या पुस्तकात आहेत, तसंच श्रीमंत नारायणराव पेशवे, इंदूर संस्थानच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर, पहिले शीख गुरू नानक देव, महाराजा रणजित सिंग इत्यादी इतिहासप्रसिद्ध व्यक्तींची आजवर कुठंही बाहेर प्रसिद्ध न झालेली चित्रं ह्या ई-बुकमध्ये दिलेली आहेत.

एका स्वतंत्र प्रकरणात तंजावरच्या राजघराण्यातल्या व्यक्तींची चित्रं दिलेली आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ, तंजावरचे प्रथम मराठा राजे श्री. एकोजीराजे ह्यांच्यापासून ब्रिटिशांनी तंजावूर संस्थान खालसा करण्यापूर्वीचे तंजावूरचे शेवटचे राजे, शिवाजी राजे दुसरे ह्यांच्यापर्यंतची चित्रं ह्या पुस्तकात दिलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे बंधू एकोजीराजे ह्यांचं पिता शहाजीराजे ह्यांच्यासोबतचं एक आजवर कुठंही न दिसलेलं अत्यंत दुर्मीळ चित्रही या पुस्तकात दिलेलं आहे.

सर्फोजी राजांच्या वनस्पती संग्रहाचे फोटो, त्यांनी स्वहस्ते लिहिलेले डोळ्यांच्या आजाराचे केसपेपर, ईस्ट इंडिया कंपनीनं लिहिलेली पत्रं वगैरे बराच दुर्मीळ दस्तऐवज ह्या पुस्तकात दिलेला आहे. पुढे स्वातंत्र्यानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ग्रंथालयाला दिलेल्या भेटींचे फोटो, तंजावरच्या भव्य बृहदीश्वर मंदिराचे जुने फोटो, ग्रंथालयाच्या संग्रहातल्या दुर्मीळ हस्तलिखित ग्रंथांमधल्या चित्रांचे फोटो वगैरे अनेक ऐतिहासिक चित्रांनी हे पुस्तक ठासून भरलेलं आहे.

सरस्वती ग्रंथालयातील हा दुर्मीळ ठेवा ई-पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करावा असं का वाटलं, असं विचारल्यावर प्रतापसिंहराजे म्हणतात, की "जुने फोटो आणि चित्रांमधून खूप महत्त्वाचं ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन होतं. मला लहानपणापासून अशा चित्रांचं आकर्षण वाटत राहिलेलं आहे. ही दुर्मीळ चित्रं देश-विदेशीच्या वाचकांपर्यंत पोहोचवावीत म्हणून मी हे पुस्तक प्रसिद्ध करतोय."

यातली बरीच जुनी चित्रं ही एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला छापलेली आहेत. जुन्या उत्तम प्रतीच्या हातानं बनवलेल्या कागदावर चिकटवलेली ही चित्रं पुण्याच्या चित्रशाळा प्रेसमध्ये छापली जायची. चित्रं चिकटवण्यासाठी वापरलेले जाड अल्बम आज पाकिस्तानमध्ये असलेल्या कोट राधा किशन ह्या शहरात बनवले जायचे, अशी माहिती प्रतापसिंह राजे भोसले यांनी दिली. प्रतापसिंह राजे यांनी तंजावरच्या इतिहासावर अनेक लेख लिहिले आहेत. ते ह्याच विषयावर स्वतःचा ब्लॉगही चालवतात.

अनेक दुर्मीळ छायाचित्रं आणि रंजक माहिती ह्यांनी भरलेलं ‘रेर प्रिंट्स’ हे प्रतापसिंह राजे भोसले यांचं ई-बुक वेबसाइटवरून विकत घेऊ शकता. पुस्तकाचं संपादन कला समीक्षक जितेंद्र हर्शफेल्ड ह्यांनी केलं आहे. ‘थंजावूर महाराजा सरफोजी सरस्वती महाल लायब्ररी’च्या संग्रहातली दुर्मीळ चित्रं आणि माहिती असलेलं हे आगळं वेगळं ई-बुक प्रत्येक इतिहासप्रेमी व्यक्तीच्या संग्रही असायलाच हवं.

टॅग्स :article