esakal | संकट भलं मोठं, मदतही हवी तेवढी...
sakal

बोलून बातमी शोधा

संकट भलं मोठं, मदतही हवी तेवढी...

संकट भलं मोठं, मदतही हवी तेवढी...

sakal_logo
By
टीम SFA

सकाळ माध्यम समूहातील सकाळ सोशल फाउंडेशन अंतर्गत ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंग साठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्म वर स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत , त्याचबरोबर वैद्यकीय कारणासाठी व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी क्राउड फंडिंग मिळवून देण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक मदतीसाठी क्राउड फंडिंगचे प्रयत्न करण्यात येत आहेत. २३ मे च्या ‘सप्तरंग’मध्ये शुभांगी नानाजी माने या चोवीस वर्षीय तरुणीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती.

शुभांगी माने या तरुणीवर पुण्यातील डेक्कन येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते तिच्यावर यकृत प्रत्यारोपण हाच शेवटचा पर्याय आहे. यकृत प्रत्यारोपणासाठी जवळपास अठरा लाख रुपयांचा खर्च आहे. २८ जूनला शुभांगीवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरुणीच्या वडिलांची व कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, यकृत प्रत्यारोपणासाठी एवढी मोठी रक्कम त्यांना उभी करणे शक्य नाही. तसेच आत्तापर्यंतच्या उपचारांवर व आधीच्या दोन शस्त्रक्रियांवर तरुणीच्या वडिलांची नानाजी माने यांची आयुष्यभराची पुंजी खर्च झाली आहे. आपल्या मुलीवर यकृत प्रत्यारोपण करून, मुलीला नवसंजीवन देण्यासाठी नानाजी माने यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना, स्वयंसेवी संस्थांना व खाजगी आस्थापनांना आर्थिक मदतीसाठी ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे आवाहन केले होते. या आवाहनाला महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला असून, एक लाख सत्तर हजार रुपयांची देणगी मिळाली आहे. परंतु यकृत प्रत्यारोपणाचा खर्च अठरा लाख रुपये असून, शुभांगी माने या तरुणीला अजून समाजातील सर्व स्तरांमधून मदतीची आवश्यकता आहे.

याशिवाय शुभांगी माने व तिच्या कुटुंबीयांनी व्यक्तिगत स्तरावरील प्रयत्नांमधून पंतप्रधान सहाय्यता निधी मधून तीन लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून एक लाख रुपये, सिद्धिविनायक ट्रस्ट मधून पंचवीस हजार रुपये व ठाणे जिल्ह्यातील एका ट्रस्ट कडून पंचवीस हजार रुपये असा चार लाख पन्नास हजार रुपयांचा निधी जमा केला आहे. एकूण निधी सहा लाख वीस हजार रुपये आत्तापर्यंत जमा झाला आहे. अजून अकरा लाख ऐंशी हजार रुपयांची गरज आहे.

मदत कशी कराल...

शुभांगी नानाजी माने या तरुणीला यकृत प्रत्यारोपणासाठी सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर इंडिव्हिजवल सेक्शन मध्ये शुभांगी नानाजी माने या तरुणीची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती , माहिती -तंत्रज्ञान कंपन्या , सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन शुभांगी नानाजी माने या तरुणीची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी

व्हाट्सअँप क्रमांक - ८६०५०१७३६६