मैत्रसंवेदनेचा हृद्य ‘अर्जुनवेध’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैत्रसंवेदनेचा हृद्य ‘अर्जुनवेध’

मराठी साहित्यामध्ये व्यक्तिचित्रांच्या पुस्तकांची संख्या कमी नाही. यातलं ठळक नाव, म्हणजे अगदी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे पुस्तक आजही मराठी वाचकांसाठी मोलाचे आहे.

मैत्रसंवेदनेचा हृद्य ‘अर्जुनवेध’

मराठी साहित्यामध्ये व्यक्तिचित्रांच्या पुस्तकांची संख्या कमी नाही. यातलं ठळक नाव, म्हणजे अगदी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे पुस्तक आजही मराठी वाचकांसाठी मोलाचे आहे. मुळात लेखकाला आणि वाचकाला साहित्यातील हा प्रकार आवडतो. अनेक नामवंत साहित्यिकांनी व्यक्तिचित्रणात्मक लेखाला प्राधान्य दिले आहे. काही वेळा या व्यक्ती कल्पनेतून साकार झालेल्या असतात, तर काही वेळा आपल्या सभोवतालच्या किंवा आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या खऱ्या व्यक्तींवरही लेखन केले जाते. काही वेळा आयुष्यातील खऱ्या व्यक्तीच्या स्वभावाला किंवा त्याच्या बरोबरच्या सहवासातील क्षणांचा आलेख मांडताना त्यात कल्पनेची भर घालून एखादे व्यक्तिचित्र बुलंद रंगविले जाते.

गौरवग्रंथ किंवा स्मरणिका यामध्ये त्या व्यक्तीच्या कौतुकाचा भाग असतो. अनेकवेळा या लेखामध्ये विश्लेषण फारसे नसते. मात्र गेल्या काही वर्षांत व्यक्तीचे मूल्यमापन करणारे लेख किंवा पुस्तकं येऊ लागली आहेत. या मालिकेतीलच ‘अवलिये आप्त - अव्वल आणि अस्सल ’ हे पुस्तक आहे. सुहास कुलकर्णी यांच्या या पुस्तकात पत्रकारिता, साहित्य, समाजकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील आठ दिग्गजांचा परिचय करून देणारे लेख आहेत. विशेष म्हणजे यातील एकच लेख फक्त ती व्यक्ती गेल्यानंतर लिहिला आहे. बाकी लेख ते हयात असताना लिहिलेले होते. त्यामुळे या लेखांचे महत्त्व वेगळे आहे. वेगवेगळ्या वेळी लिहिलेल्या या लेखांचा संग्रह असलेले हे पुस्तक मैत्रीच्या नात्याचा अनुबंध मांडते. ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर, अनिल अवचट, ना. धों. महानोर यांसारखी मंडळी या पुस्तकात आहेत.

‘श्रीकृष्ण व अर्जुनाच्या गुरू-शिष्याच्या नात्यात नेहमी श्रीकृष्ण होता म्हणून अर्जुनाला महत्त्व आहे. अर्जुनाच्या पराक्रमात श्रीकृष्णाचाच वाटा जास्त. अर्जुन अत्यंत कमी कुवतीचा असा एक युक्तिवाद केला जातो. खरे तर अर्जुन अत्यंत गुणवान होता म्हणून श्रीकृष्णाच्या जवळ होता. श्रीकृष्णाच्या कसोटीला तो उतरलेला होता. त्यामुळे श्रीकृष्णाच्या लाडक्या शिष्यांमध्ये त्याचे स्थान खूप वरचे होते. पुराणातल्या या गोष्टी खऱ्या-खोट्या मानल्या किंवा त्याचा दाखला दिला नाही तरी हे पुस्तक वाचताना सातत्याने असे जाणवते, ते म्हणजे ही दिगद्गज मंडळी आणि सुहास कुलकर्णी यांचं नात श्रीकृष्ण अर्जुनासारखं होतं. ते गुरू शिष्यासारखं होतं आणि नव्हतंही प्रसंगाने त्या नात्याचे पदर बदलायचे पण मूल गाभा होता तो गुणवत्तेची विलक्षण गोड अशी खडाखडी या नात्यात होती. या दिग्गज मंडळींच्या अत्यंत निकटच्या गोटात सुहास कुलकर्णी यांचा प्रवेश झालेला होता. विशेष भाग म्हणजे कुठल्याही प्रकाराने ते त्यांच्या खूष-मस्कऱ्यांच्या किंवा चमचे वाटावेत अशा प्रकारात दुरान्वयानेदेखील नव्हते. या दिग्गज मंडळींचा त्यांनी केवळ स्नेह मिळविला होता असे नाही, तर आपली गुणवत्ता त्यांच्या समोर सिद्ध केली होती. सुहासकडे काम दिले म्हणजे तो ते नुसते मार्गी लावणार नाही, तर त्या कामाचे तो चीज करेल याची खात्री त्या मंडळींना होती. या दिग्गजांनी आपल्या वर्तुळात कुलकर्णी यांना प्रवेश दिला होता तो कुठल्याही अटी-शर्तींशिवाय होता. तेच त्यांचे वेगळेपण आणि या नात्याची ताकद होती.

‘एके दिवशी पुण्यातल्या गर्दीतून वाट काढत मी बाईकवरून कुठेतरी निघालो होतो. खिशात फोन वाजला. टिकेकरांचा होता. मी म्हटलं, ‘रस्त्यात आहे. बाईक चालवतोय.’ तर मला म्हणाले, ‘एवढंच ना? मग रस्त्याच्या कडेला घे गाडी आणि बोल माझ्याशी.’ मी बाईक बाजूला घेतली आणि मग पुढे टिकेकर बोलू लागले. अर्थातच पाऊण तास. मी आणि टिकेकर स्थिर होत; बाकीचं जग आणि रस्त्यावरचा कोलाहल चालू होता. आजही जग चालूच आहे; पण टिकेकर त्यात नाहीत.

टिकेकर यांच्यावरच्या लेखाचा हा शेवट जितका हृदयस्पर्शी आहे तितकाच कुलकर्णी आणि त्यांच्यातील गहिरेपणाची साक्ष देणारा आहे. कुलकर्णी यांची या दिग्गजांबरोबरची जी जवळीक झाली होती त्यात मेलोड्रामा किंवा ते मला वडिलांसारखे होते, आहेत, मी त्यांचा मानसपुत्रच आहे असा नाटकी प्रेमाचा भाग नव्हता किंवा केवळ या नात्यांचा पाया भावनिक नव्हता. कामाच्या ओघाने आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रसंगांनी यांच्यातील नाते रूजत गेले. एकमेकांना आजमावत, पारखत दोघांनी आपापला परीघ एकमेकांना मोकळा करून दिला. नात्यांचा परीघ एकमेकांमध्ये कसा मिसळला गेला, हे या दिग्गजांनाआणि कुलकर्णी यांनाही उमजले नाही. एकमेकांचा फायदा घेण्याची वृत्ती या नातेसंबंधात नव्हती. होता तो निखळ मानवी संबंधांच्या राग लोभाचा सारा व्यापक पट.

महानोरांसारखे साहित्यिक व राजकारणी व्यक्तिमत्त्व असो किंवा टिकेकरांसारखे पत्रकारितेतील बडे नाव असो, या मंडळींनी कुलकर्णी यांच्यावर जबाबदारी टाकली आणि ती त्यांनी पेलली. अशा जबाबदाऱ्यामधूनच विविध मंडळींशी हे नातेसंबंध वाढत गेले. या पुस्तकातील लेखांमध्ये संबंधांचा वेध घेताना आणि त्या व्यक्तीचे चित्रण करताना कुलकर्णी यांनी ‘अर्जुनवेध’ साधला आहे. अत्यंत संवेदनशीलतेने घेतलेल्या या मैत्रसंबंधांचा हा आलेख मनाला स्पर्श तर करतोच; पण मेंदूवरही गारूड करतो, हीच या पुस्तकाची ताकद आहे.

पुस्तकाचं नाव : अवलिये आप्त - अव्वल आणि अस्सल

प्रकाशक : समकालीन प्रकाशन, पुणे (०२०-२४४७०८९६)

पृष्ठं :१८०

मूल्य : २०० रुपये.

टॅग्स :Bookarticle