...नातं मातीशी आणि अक्षरांशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Book Bhuibhingari

शिक्षणक्षेत्र आणि कृषिक्षेत्र यांची खरंतर सांगड लावता येत नाही; पण शेतमजूर असो किंवा शेतकरी आणि शिक्षणक्षेत्रात काम करणारे शिक्षक आणि प्राध्यापक यांची व्यथा एकच असते.

...नातं मातीशी आणि अक्षरांशी

शिक्षणक्षेत्र आणि कृषिक्षेत्र यांची खरंतर सांगड लावता येत नाही; पण शेतमजूर असो किंवा शेतकरी आणि शिक्षणक्षेत्रात काम करणारे शिक्षक आणि प्राध्यापक यांची व्यथा एकच असते. शिक्षक किंवा प्राध्यापक झालेल्याला शिक्षण घेताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हा त्रास तो शिकल्यानंतर आपल्याला चांगले दिवस येतील म्हणून सहन करीत असतो; पण शिकूनही त्याला चांगले दिवस आले नाहीत तर काय, असा प्रश्‍न पडतो. त्याचं जे, तेच शेतकऱ्याचं. शेतकऱ्याला जमिनीत लावलेल्या पिकासाठी प्रचंड कष्ट घ्यायला लागतात. पीक चांगलं येण्यासाठी तो प्रचंड मेहनत करतो; पण पिकाला भाव किती मिळेल, हे त्याच्या हातात नसतं. त्याच्या उत्पादनाला भाव चांगला मिळत नाही, त्यामुळे शिक्षक आणि शेतकरी या दोघांची अवस्था एकच असते. एक जण जमिनीत बी पेरून अनेकांची भूक भागवितो, तर शिक्षक मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचं बी पेरून त्यांना चांगले नागरिक घडवतो. मात्र, संपूर्ण समाजव्यवस्थेने या दोन्ही घटकांना - एकाला बळिराजा आणि दुसऱ्याला गुरुदेव असं नाव देऊन मोठेपण दिलं आहे; पण दोघांची होरपळ मात्र थांबलेली नाही.

हे सारं प्रकर्षाने जाणवतं ते म्हणजे, प्रा. वसंत खोत यांच्या ‘भुईभिंगरी’ या आत्मकथनामध्ये. खरंतर वसंत खोत यांचं आयुष्य सुरू होतं ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अरग या छोट्या गावापासून. मिरज तालुक्‍यातील एका छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणाला फारसं महत्त्व नसलेल्या या घरात खोत शिकतात ते आईमुळे. आईचा पाठिंबा असल्यामुळे ते शिक्षण घेऊन दापोली इथं प्राध्यापकाची नोकरीही करतात. महाविद्यालयात नोकरी करीत असताना बातमीदाराचंही काम करतात.

शिक्षण क्षेत्रात आलेले वाईट प्रवाह, त्यानंतर तेथील शिक्षकांच्या जागा भरण्याच्या पद्धती, तसंच संस्थाचालकांचं राजकारण यांबद्दल कोठेही तक्रारीचा सूर न लावता शिक्षकवर्गाला काय-काय भोगायला लागतं, ते खोत यांनी इथं नेमकेपणाने सांगितलं आहे. शेतकरी कुटुंबातून आल्यावर संघर्ष किती मोठा असतो ते सांगताना सहानुभूती मिळविण्याचाही त्यांचा कुठला प्रयत्न नाही. जे जसं घडलं ते त्यांनी तिथं मांडलं आहे. कुठलंही तिखट-मीठ लावून किंवा व्यवस्थेने माझ्यावर अन्याय केला असाही आव इथं आणलेला नाही. बरोबरचे सहकारी कसं वागतात, त्यांच्यातील हेवेदावे, मनुष्यस्वभाव हे मांडताना खोत इथं कोणालाही नायक किंवा खलनायक अशा एकाच पद्धतीच्या व्यक्तींच्या गटात ढकलत नाहीत.

संस्थाचालकांचा बेरकीपणा कळत असूनही नोकरी करणाऱ्या शिक्षकाची किती अडचण असते, आपले हक्क कळत असूनही त्याबद्दल भांडताही येत नाही, ही बोचरी वेदना ते नेमकेपणाने मांडतात. एकीकडे ज्ञानदानाचं तुम्ही काम करता असं या वर्गाला संबोधलं जातं; मात्र या वर्गाच्या हालाचं आणि त्यांच्या कष्टाचं योग्य मोल दिलं जात नाही, ही खंत ते इतक्‍या प्रभावी पद्धतीने मांडतात, की नकळत आपण त्यांच्या कहाणीमध्ये गुंतून जातो. कुठंतरी त्यांना मोठा ब्रेक मिळावा, अशी इच्छा आपोआपच तयार होते, हेच त्यांच्या लेखनाचं यश आहे. मिरज ते दापोली हा प्रवास महाविद्यालयीन जीवनातील त्यांचे उपक्रम, संसाराच्या आघाडीवर येणाऱ्या अडचणी, संसारातील आनंद हे सारं त्यांनी तपशिलाने मांडलं आहे. त्याचबरोबर कोकणातील निसर्गाचं वर्णनही त्या निसर्गाची जाणीव व्हावी अशा पद्धतीने केलं आहे.

इतक्‍या साऱ्या अडचणी असतानाही अध्यापनावरची त्यांची निष्ठा आणि साहित्याबद्दल त्यांचं प्रेम कमी होत नाही, त्याचा ठायी-ठायी प्रत्यय यातील विविध प्रसंगांतून येतो. स्वतः कॉलेजला शिकायला जाताना चांगली पॅंट शिवण्यासाठी त्यांना पैसे उभे करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, त्याचबरोबर चप्पल घेण्यासाठीसुद्धा आजोबांना विनवणी करावी लागते, इतक्‍या संघर्षाच्या काळातून शिक्षण घेत महाविद्यालयीन शिक्षक बनणाऱ्या खोत यांचा प्रवास खरंतर कोणालाही प्रेरणादायी ठरेल; पण या प्रवासात त्यांना किती गोष्टींचा सामना करावा लागला आणि किती ओरखडे उमटले, या सगळ्यांची कल्पना या पुस्तकातून येते.

खरंतर हिंदी चित्रपटातील नायकासारखं खोत यांच्या आयुष्यात थरारक किंवा चाकोरीबाहेरचं असं काही घडत नाही; पण साध्या सामान्य माणसाच्या आयुष्यातदेखील किती घटना घडत असतात, रोजचं आयुष्य जगतानादेखील किती गोष्टींना सामोरं जायला लागतं याचा पडताळा यातील अनेक प्रसंग वाचताना येतो. संस्थाचालक राजकारणी असेल, तर त्या संस्थेत काम करणाऱ्या माणसांना त्यांच्या राजकारणाचे काही फटके कसे बसतात, याचाही तपशील कळतो. ग्रामीण भागातील राजकारण, तिथल्या माणसांची समज, गावातील निवडणुका हे कादंबरीमध्ये खूप सगळं चांगलं असतं; पण वास्तवात जगताना अनेकांना त्याचे चटकेही बसतात. या चटक्‍यांमागची वेदना या पुस्तकातून कळते. सरळ आणि थेट भाषेत आपलं जीवन मांडणारं हे आत्मकथन एकट्या खोत यांचं राहत नाही. १९६० च्या दरम्यान जन्म घेतलेल्या पिढीच्या वाट्याला आदर्श आणि व्यवहारातील फटके यांचा तोल सांभाळताना जी परिस्थिती आली, त्या परिस्थितीचं प्रतिनिधित्व हे आत्मकथन करतं. आत्मकथनात सतत आपलं दुःख सांगणे किंवा अडचणींचा तपशील सांगणे, अथवा त्यांची जंत्री देणे असा कुठलाही हेतू नाही. मात्र, पुस्तक वाचत असताना खोत यांना जे काही भोगावं लागलं, त्यामुळे वाचकच अस्वस्थ होतो. मात्र, खोत यांचा आशावाद आणि आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेकडे विवेकवादाने बघणं यामुळे वाचकाला खोत एका अर्थाने हिरो वाटू लागतात, हेच कथनशैलीचं यश आहे आणि त्यांच्या प्रचंड आशावादातून मिळणारी प्रेरणा आहे.

पुस्तकाचं नाव : भुईभिंगरी

लेखक : वसंत खोत

प्रकाशक : दर्या प्रकाशन, पुणे (७८४१०५६३०१, ७७७५८१५५३०)

पृष्ठं : १६६,

मूल्य : २५० रुपये

Web Title: Article Writes Book Bhuibhingari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bookarticlesaptarang