हळुवार प्रेम आणि जंगलातला थरार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

book jennifer and the beast

नरभक्षक वाघाने एखाद्या परिसरात माजवलेला गोंधळ आपल्याला माहीत असतो. त्यासंदर्भातल्या बातम्या आपण वाचतही असतो.

हळुवार प्रेम आणि जंगलातला थरार!

नरभक्षक वाघाने एखाद्या परिसरात माजवलेला गोंधळ आपल्याला माहीत असतो. त्यासंदर्भातल्या बातम्या आपण वाचतही असतो. अशा तणावाच्या वातावरणात एखादी प्रेमकथा फुलेल कशी, असं कोणाला वाटणं स्वाभाविक आहे. मात्र, प्रेमकथा नव्हे; पण एक हळुवार नातेसंबंध मात्र निर्माण होतात ते ‘जेनिफर अँड दि बिस्ट’ या कादंबरीमध्ये. अशोक इंदलकर यांनी लिहिलेल्या या कादंबरीत जेनिफर नावाच्या युवतीचं, तिच्या वडिलांचं अर्थात जेम्स यांचं, तसंच शंकर या रानावनात फिरणाऱ्या युवकाचं आयुष्य समोर येतं.

लेखक इंदलकर यांना जंगल आणि विविध ठिकाणच्या वनराईबद्दल प्रचंड प्रेम, आस्था असल्याने त्याबद्दलची माहिती त्यांनी इथं दिली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात रमणाऱ्या या लेखकाने संपूर्ण कादंबरीत अत्यंत तरलपणे जेनिफर आणि शंकर यांच्यातील नाजूक नात्याचा भावबंध साकारला आहे. महाबळेश्‍वर - पाचगणीच्या परिसरात शिक्षणासाठी आलेली जेनिफर नावाची युवती जंगलात हरवते आणि सुलतान नावाच्या एका वाघाच्या तावडीत सापडते. मात्र, शंकर तिला त्या वाघाच्या तावडीतून वाचवतो. खरंतर ती ज्या वाघाच्या तावडीत सापडलेली असते, तो वाघ नरभक्षक नसतो. शंकरची आणि त्याची दोस्ती झालेली असते. त्यामुळेच कुठलाही चमत्कार किंवा कुठलंही हत्यार न वापरता शंकर सुलतानच्या तावडीतून जेनिफरला वाचवतो.

इंदलकर यांनी या कादंबरीत अनेक गोष्टी एकत्र गुंफल्या आहेत. सरकारी टायगर सेंटरमधले चार वाघ आणि एक बिबट्या तिथल्या पिंजऱ्यातून एका चुकीच्या माणसाकडून सोडले जातात, त्यामुळे सगळा गोंधळ उडतो. सुलतान, शंकर, जेनिफर आणि महाबळेश्‍वरचा परिसर हे सारं एका ठिकाणी घडत असताना शिकारी रुद्रप्रतापच्या माध्यमातून नैनिताल आणि त्या परिसरात त्रासदायक ठरलेल्या नरभक्षक वाघाला रुद्रप्रताप यांनी कसं ताळ्यावर आणलं ते सांगितलं आहे. त्याचबरोबर कोल्हापूर संस्थानमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळात कशा शिकारी होत असत, त्याचीदेखील दुर्मीळ माहिती रंजक पद्धतीने दिली आहे. कादंबरीचा मध्यवर्ती गाभा जंगल, विविध प्राणी, मानव आणि या प्राण्यांचं सहजीवन हा असला, तरी शंकर, जेनिफर आणि महाबळेश्‍वर आणि त्या परिसरातील जनजीवन नेमक्‍या पद्धतीने गुंफून त्यांनी मानव आणि प्राणी यांच्यातील सहअस्तित्व कसं कायम राखता येईल याचा कुठलाही प्रचारकी आव न आणता योग्य असा संदेश दिला आहे.

कल्पना आणि वास्तव यांची सांगड घालत विलक्षण खिळवून ठेवेल असं कथानक गुंफून त्यांनी या कादंबरीचा पट उभा केला आहे. एखादी सीरियल आपण पहावी, तशी विविध प्रकरणं इथं उलगडत जातात. टीआरपीच्या मोहापायी मालिका जशा भरकटतात, तसं इथं मुळीच घडत नाही. लेखकाने कादंबरीत आपल्याला काय मांडायचं आहे हे ठामपणे मनाशी ठरवलं आहे. पात्र योजना तशी केली आहे. त्याचबरोबर जंगल आणि निसर्ग यांची आवड वाचकांच्या मनात रुजली पाहिजे अशी माहिती दिली आहे. मात्र, कुठेही कंटाळा येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. प्रवास वर्णन किंवा जंगलाची अथवा जनावरांची माहिती भूगोलाच्या पुस्तकात द्यावी तशी दिलेली नाही. त्याचबरोबर इसापनीतीसारखा विविध प्राण्यांचा आणि मानवाचा संबंध जोडणाऱ्या बाळबोध कथा असा प्रकारही इथं नाही.

परदेशातून आलेले जेम्स आणि जेनिफर, तसंच शंकर, सरकारी यंत्रणा या साऱ्याचं चपखल वर्णन करताना सरकारी पातळीवरही काम कसं चालतं याचाही वेध इंदलकर यांनी घेतला आहे. पक्षितज्ज्ञ व निसर्ग लेखक मारुती चितमपल्ली यांची या कादंबरीला प्रस्तावना लाभली आहे. मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी या कादंबरीचं महत्त्व थोडक्‍या शब्दांत स्पष्ट केलं आहे. प्राणी आणि मानव यांचा अधिवास आणि दोन संस्कृतींमधले तरुण जीव, त्यांच्यातील भावबंध आणि समाज आणि प्रशासन अशा विविध घटकांचा समन्वय साधत इंदलकर यांनी या कादंबरीत जंगल आणि तिथल्या प्राण्यांच्या सहवासाचा थरार, तर नाजूक प्रेमाचा भावबंध हळुवार पद्धतीने फुलवला आहे.

Web Title: Article Writes Book Jennifer And The Beast

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bookarticlesaptarang