‘भैया, हम है फटीचर...?’

तुम्ही भणंगपणे जगणं बंद करा... तुम्ही ‘फटीचर लाईफ’ जगू नका, असं मला या लेखातून तुम्हाला सांगायचं आहे! मी थोडं कटू सत्यच सांगणार आहे तुम्हाला, या लेखातून.
‘भैया, हम है फटीचर...?’
Summary

तुम्ही भणंगपणे जगणं बंद करा... तुम्ही ‘फटीचर लाईफ’ जगू नका, असं मला या लेखातून तुम्हाला सांगायचं आहे! मी थोडं कटू सत्यच सांगणार आहे तुम्हाला, या लेखातून.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो,

तुम्ही भणंगपणे जगणं बंद करा... तुम्ही ‘फटीचर लाईफ’ जगू नका, असं मला या लेखातून तुम्हाला सांगायचं आहे! मी थोडं कटू सत्यच सांगणार आहे तुम्हाला, या लेखातून.

या लेखाची पहिली ओळ वाचल्यानंतरही तुम्ही पुढं हा लेख वाचत आहात याचा अर्थ, तुम्ही या विषयाशी कुठं ना कुठं ‘रिलेट’ करत आहात.

आता तुम्ही म्हणाल, ‘म्हणजे काय?’

तर, सांगतो. मी असे बरेच लोक पाहतो...कसं कोण जाणे; पण हे लोक अशा भणंग, फाटक्‍या आयुष्यात खूश असतात. मी स्वतः याच प्रकारचा होतो.

इथं ‘फाटकं’ म्हणजे ‘श्रीमंत-गरीब’ अशा अर्थानं घेऊ नका, तर तुम्ही तुम्हाला मिळालेलं आयुष्य पुरेपूर, भरभरून जगत आहात का, अशा अर्थानं घ्या. तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत पुढं जात आहात का, तुम्ही स्वतःचंच ‘बेस्ट व्हर्जन’ होण्याचा प्रयत्न करत आहात का, अशा अर्थानं घ्या. तुमचं तुमच्या आयुष्यातील ज्या गोष्टीवर नियंत्रण असतं, त्या गोष्टी तुम्ही सर्वोत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहात का? काही लोक असा कुठलाही प्रयत्न करत नाहीत.

...तर, आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात. उदाहरणार्थ : आपली उंची. आपली उंची आपल्या हातात नसते. आपण कुठल्या घरात जन्म घ्यायचा ते आपल्या हातात नसतं. आपले आई-वडील किती श्रीमंत आहेत, किती ‘पॉवरफुल्ल’ आहेत, त्यांची कुठं कुठं ‘कनेक्‍शन्स’ आहेत हे आपल्या हातात नसतं. आपल्या केसांचा रंग आपल्या हातात नसतो...अशा बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. अशा गोष्टींवर आपण फार वेळ खर्च करण्यात काही अर्थच नसतो. कारण, त्या आपल्या हातातच नसतात.

मात्र, आपल्या आयुष्यातल्या इतर बऱ्याच गोष्टी आपल्या हातात असतात... आपल्या ‘कंट्रोल’मध्ये असतात. उदाहरणादाखल सांगायचं तर, आपला आहार. ही गोष्ट काही प्रमाणात आपल्या हातात असते; कारण, अर्थातच त्यात ‘परवडणं’ हा मुद्दा असतो; पण आपण शिळं-अनारोग्यकारक खावं की खाऊ नये? चार चार महिन्यांपूर्वी पुडक्‍यात बंद केलेले पदार्थ दुकानात मिळतात. ते पदार्थ खावेत की ताजे पदार्थ खावेत? ही निवड करणं आपल्या हातात असतं. भारतात अजून गाजर-मुळा हे पदार्थ तितकेसे महाग नाहीयेत. त्यामुळे आपण ते खाऊ शकतो. मात्र, त्याऐवजी तुम्हाला ‘भूजिया’ आणि ‘इन्स्टन्ट नूडल्स’ खायच्या असतील तर...तर, काय निर्णय घ्यायचा ते तुमच्या हातात आहे. तुमच्या घरच्या पद्धतीनुसार, तुमच्या परिस्थितीनुसार, तुम्ही उत्तम आहार घेणार आहात की ‘फटीचर डाएट’ घेणार आहात...? काहीही अरबट-चरबट खाणार आहात? तुम्ही आयुष्यात अशा ‘फटीचर’ गोष्टी जितक्‍या करत राहाल, तितकं तुमचं आयुष्य आणखी ‘फटीचर’ होत जाईल.

मी पाहतो की, तरुण मुलं दिवसभर वेबसिरीज्, ओटीटी बघत असतात.

खरं तर, मीही सिनेमा केला आहे...सिनेनिर्मितीशी माझाही संबंध आलेला आहे...सिनेमा- टीव्ही-ओटीटी हे माझ्याही जिव्हाळ्याचे विषय आहेत. तो माझ्या कामाचा भागच आहे. या माध्यमांतलं काम जर कुणी पाहिलं तरच मला काम मिळणार आहे. लोकांनी हे पाहण्यात काहीच गैर नाहीये; पण लोक दिवसभरात चार-चार, पाच- पाच तास हे ‘कन्टेन्ट’ बघत असतात. दिवसभरात अर्धा तास-एक तास पाहिलं, अधूनमधून पाहिलं, वीकेंडला पाहिलं तर ठीक आहे; पण लोकांना ‘बिंज-वॉचिंग’चं व्यसनच जडलेलं आहे. ‘मी अमक्‍या-तमक्‍याचे सगळे सीझन पाहिले,’ असं ते अगदी अभिमानानं सांगत असतात.

मला सांगा, हे योग्य आहे का? तुम्ही सगळा वेळ या प्लॅटफॉर्म्सवर घालवत असाल तर विचार करा...यासाठी आयुष्यातला इतका वेळ खर्च करणं तुम्हाला परवडणारं आहे का? (सध्या असे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत. दर आठवड्याला त्यांत भर पडत असते आणि त्यावर चांगले कार्यक्रम असतात!).

पुन्हा त्यात जर, तुमचे मित्रही ‘फटीचर’ असतील - म्हणजे, आयुष्यात ज्यांनी काही ध्येयच बाळगलेलं नाहीये, त्यातल्या कुणालाही आयुष्यात पुढं जायचंच नाहीये - तर अशा संगतीचाही परिणाम होत असतो. हे जसं मुलांच्या बाबतीत असतं, तसंच ते मुलींच्याही बाबतीत असतं. तुमचं जे ‘सर्कल’ असतं, तुम्ही ज्यांच्या ‘कंपनी’त, अर्थात् सहवासात, असता ते लोक जितपत पुढं जाऊ शकतात, जे ध्येय बाळगतात, तशाच प्रकारे तुमचीही वाटचाल होत असते. जर तुमच्या सर्कलमध्ये निरुद्योगी, रिकामटेकडे लोक असतील - जे दिवसभर टीव्ही पाहणं, व्हिडिओ-गेम्स खेळणं, इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा मारत बसणं - तर तुम्हीही तसेच व्हाल. आय ॲम सॉरी...पण हे ‘फटीचर लाईफ’ आहे.

आपल्याला एकुलतं एक आयुष्य मिळालेलं आहे, ज्यात कुठलं ‘रिवाइंड’ बटण नसतं. आपण मागं जाऊ शकत नाही...आपण घडून गेलेल्या गोष्टी बदलू शकत नाही...‘चला, पुन्हा एकदा करू या,’ अशी संधी, घडून गेलेल्या गोष्टींबाबत, कुणालाच मिळत नाही...घड्याळाचे काटे पुढं पुढंच जात असतात...काळ सरत असतो...हे सगळं तुम्ही स्वतःला बजावा.

‘मला असलं भणंग, फाटकं आयुष्य जगायचं नाहीये,’ असं तुम्ही स्वतःला ठामपणे सांगा. आता तुम्ही विचाराल की, माझं आयुष्य उत्तम व्हावं यासाठी मी काय करायचं? तर, त्यासाठी ज्या गोष्टी तुमच्या ‘कंट्रोल’मध्ये आहेत, त्या उत्तम प्रकारे करायला सुरुवात करा. अगदी साधा ‘फॉर्म्युला’ आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत - समजा, तुमची ‘तिजोरी’ अजून भरलेली नाही...ठीक आहे, नसू देत - पण तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी तर घेऊ शकता ना? शरीरसौष्ठव तर कमावू शकता ना?...मग तुम्ही का नाही ती काळजी घेत? ही ताकद नसेल तर तुम्ही तिजोरी भरण्याचं काम कसं काय करू शकणार आहात?

‘मी माझं भणंग आयुष्य जगायला तयार आहे,’ अशीच तुमची भावना असेल तर तुमची प्रगती कशी होणार?

आणखी एक गोष्ट, तुम्ही अभ्यास भरपूर करता की जेमतेम अभ्यास करून, बाकी टीव्ही, वेबसिरीज् अशा गोष्टींत वेळ वाया घालवता?

माझ्या बाबतीत सांगायचं, तर मी या गोष्टी फारशा पाहत नाही. याआधी मी असल्या गोष्टींत बराच वेळ वाया घालवला आहे; पण आता मी ‘अमुक एक शो किंवा सिरीज फार छान आहे, तू आवर्जून बघ,’ असं मला कुणी सांगतं तेव्हाच बघतो; पण तेसुद्धा माझी सगळी कामं करून झालेली असतात, मला खरंच रिकामा वेळ असतो तेव्हाच बघतो. बरेचदा विमानप्रवासातसुद्धा सध्या माझी पसंती पॉडकास्ट ऐकण्यालाच अधिक असते. त्यातही, माझ्यात सुधारणा होण्यास ज्यांच्यामुळे मदत होईल...ज्यांच्यातून नवं काही शिकता येईल, अशाच गोष्टी मी प्रामुख्यानं पॉडकास्टवर ऐकतो. काही वेळ मी वाचनही करतो. काही वेळ लॅपटॉपवर काम करतो. अगदी कधी पाहिलाच तर, विमानप्रवासात किंवा गाडीनं दूरवर प्रवासाला जाताना मी एखाद्‌-दुसराच एपिसोड पाहतो. मला एक सीझन पाहायला कमीत कमी एक-दीड महिना लागतो. लोक एका दिवसात एक सीझन पाहतात! मग दुसऱ्या दिवशी दुसरं काही तरी...

तुम्ही हे थांबवायला हवं...अरे! हे काय करत आहात तुम्ही? हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे, याचा विचार करा.

‘मी चांगला सकस आहार घेणार नाहीये...मी नीट अभ्यास करणार नाहीये...मी माझा वेळ वाया घालवणार आहे...अशी हार तुम्ही इतक्‍या तरुण वयातच मानली आहे...पण आता बास! तुम्ही हे सगळं बंद करा. तुम्ही हा लेख इथपर्यंत वाचला असेल तर त्याचा अर्थ आहे की, मी जे सांगतोय ते तुमच्या आतमध्ये उतरतंय.

हे वाचून झाल्यानंतर काही तरी कृती करा...स्वतःमध्ये बदल घडवा. स्वतःचं वागणं बदला. ‘मला फाटकं, ‘फटीचर’ आयुष्य जगायचं नाहीये, हे सर्वात आधी स्वतःला निक्षून सांगा. आणि मग, सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घ्या...स्टार्ट चेसिंग एक्‍सलन्स. ‘थ्री इडियट्‌स’मध्ये एक वाक्‍य आहे - ‘काबीलियत रखो, सफलता अपने आप पीछे आयेगी...’ आयुष्यात तुम्ही जे काही कराल ते चांगल्या प्रकारे करा.

तुम्ही स्वयंपाक करत असाल तर तो उत्तम प्रकारे करा...शरीरसौष्ठव कमावत असाल तर ते उत्तम प्रकारे कमवा, करिअर घडवत असाल तर ते उत्तम प्रकारे घडवा. ‘मला फाटकं, ‘फटीचर’ आयुष्य जगायचं नाहीये,’ हा विचार ठामपणे बाळगा. बरेच लोक - जवळजवळ ऐंशी-नव्वद टक्के लोक- फाटकं, ‘फटीचर’ आयुष्य जगत असतात. असे लोक अशा प्रकारचे लेख वाचतच नाहीत; पण तुम्ही हा लेख वाचत आहात; म्हणजे, तुम्ही अशा लोकांपेक्षा वेगळे आहात, तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं आहे. तर मित्रांनो, स्वतःचं वागणं बदला, काहीतरी करा. आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे याचा विचार करा.

स्वतःला बजावा : ‘मला हे एकुलतं एक आयुष्य मिळालं आहे, त्यात मला भणंगासारखं जगायचं नाहीये. मी माझ्या आजूबाजूच्या अशा लोकांना आयुष्यातून दूर करीन आणि भव्य स्वप्ने पाहणाऱ्या चांगल्या लोकांची संगत धरीन. कारण, मलाही भव्य स्वप्ने पाहायची आहेत. फाटक्‍या, ‘फटीचर’ आयुष्यात काहीच गंमत नाहीये.’

तुम्ही तुमचं आयुष्य उत्तम प्रकारे जगा...सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घ्या आणि ‘फटीचर’ गोष्टी करणं बंद करा. एक दिवस तुमचं आयुष्य खरोखरी ‘अमेझिंग’ होईल.

टेक केअर!

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com