सात्त्विक अन्नसंस्कृतीची आखाती झेप

भारतीय संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अन्नाचं अपार महत्त्व वारंवार सांगितलं गेलं आहे. भूक लागल्यावर पुरेसं आणि योग्य अन्न पोटात गेलं तर पचनास सुलभ होतं आणि शरीर व्याधिमुक्त राहतं.
Manisha and Sachin Chitale
Manisha and Sachin ChitaleSakal
Summary

भारतीय संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अन्नाचं अपार महत्त्व वारंवार सांगितलं गेलं आहे. भूक लागल्यावर पुरेसं आणि योग्य अन्न पोटात गेलं तर पचनास सुलभ होतं आणि शरीर व्याधिमुक्त राहतं.

भारतीय संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अन्नाचं अपार महत्त्व वारंवार सांगितलं गेलं आहे. भूक लागल्यावर पुरेसं आणि योग्य अन्न पोटात गेलं तर पचनास सुलभ होतं आणि शरीर व्याधिमुक्त राहतं. भुकेला जठराग्नी असंही म्हणतात. जठर म्हणजे अन्न पचवण्याचं शरीरातलं स्थान. उपनिषदांनी अग्नीच्या पंचतत्त्वांमध्ये तहान-भुकेचाही समावेश केला आहे. प्रमाणात राहिलेला अग्नी ऊब देतो आणि पोषण करतो. अग्नीचं प्रमाण बिघडलं तर उष्ण आणि थंड रूपं प्राप्त होतात. ही दोन्ही प्रमाणाबाहेरची रूपं मनुष्यहिताची नाहीत. स्वाभाविकतः अन्न पुरेसं आणि योग्य असेल तर आणि तरच शरीरातला अग्नी प्रमाणात राहतो. अन्नाचं हे अपरंपार महत्त्व आपल्याला कळत-नकळत ठाऊकही असतं; तथापि, ‘कळतं; पण वळत नाही’ अशी आपली स्थिती असते.

विशेषतः प्रवासात असताना आणि त्यातही परदेशात असताना, काळाच्या कसोटीवर कसदार ठरलेलं, भारतीय पद्धतीचं अन्न सहजी मिळत नाही आणि मग जठराग्नी कसाही शमवण्याचा प्रयत्न शारीरिक व्याधींना निमंत्रण देतो. त्यामुळे परदेशात असलेले लाखो भारतीय ‘भारतीय पद्धती’च्या अन्नाच्या शोधात असतात. आखाती प्रदेशातही असाच शोध वर्षानुवर्षं घेणाऱ्या भारतीयांना एका मराठमोळ्या माउलीनं निव्वळ अस्सल भारतीयच नव्हे; तर शब्दशः जठराग्नी शमवणारी घरगुती अन्न पुरवण्याची सेवा सुरू केली. आज या सेवेला दशक होत आहे आणि मनीषा सचिन चितळे नावाचा ब्रँड दुबईमध्ये स्थिरावला आहे. चितळेंच्या सेवेनं शेकडो भारतीयांच्या घरगुती अन्नाची सोय तर झालीच; शिवाय मराठी खाद्यसंस्कृतीही वाळवंटातल्या नंदनवनात विकसित झाली.

घरचे अन्नसंस्कार

‘मनीषाज् किचन’ या सेवेला केवळ ‘हॉटेल’ असं संबोधणं योग्य नाही, हे मनीषा यांच्याशी बोलताना जाणवतं. शिक्षणानं कमर्शियल आर्टिस्ट असलेल्या मनीषा या मूळच्या दादरमधल्या. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबातला. सन १९९५ मध्ये लग्नानंतर त्या दुबईला गेल्या. घरचे अन्नसंस्कार दुबईतल्या वास्तव्यात प्रकर्षानं आठवत राहिले आणि त्यातून निर्माण झालं ‘मनीषाज् किचन.’ मनीषा सांगतात : ‘लग्नानंतर पती सचिन यांचा नोकरीसाठीचा प्रवास, दोन मुलं यांमुळे तशी दगदगच होती. स्वतःचा व्यवसाय वगैरे या कल्पना डोक्यात नव्हत्या; पण मला स्वयंपाक करणं आवडतं.

माझ्यावर घरचे अन्नसंस्कार आहेत. आजी घरातून व्यवसाय करायची. आई खूप निगुतीनं स्वयंपाक, खाद्यपदार्थ करायची. आमचं खाणं-पिणं, मिठाया, सणावारांचे पदार्थ याबद्दलची चर्चा आमच्या घरात चालायची. आई मेतकूट, जवसाची चटणी करायची. माझ्या मनात कुठं तरी हे संस्कार होते.

उदाहरणार्थ : संक्रांतीला गुळाची पोळी कशासाठी करायची; तर गूळ, तीळ हे उष्ण घटक...तूप थंडावा देणारं...संक्रांत हा सण थंडीच्या दिवसांत येतो. सगळे पौष्टिक घटक शरीराला योग्य काळात मिळावेत, म्हणून गूळपोळी. अशा चर्चांमधून अन्नसंस्कार घडत गेले होते. ते अन्नसंस्कार उपयोगात आले. दुबईत घरगुती केटरिंग सुरू केलं.’

क्षुधेलिया अन्न। द्यावे पात्र न विचारून।

धर्म आहे वर्माअंगी। कळले पाहिजे प्रसंगी।।

जगद्गुरू संत तुकाराममहाराज म्हणतात की, भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं हाच धर्म आहे. अशा व्यक्तीला अन्न देताना ती कोण, कुठली हे पाहू नये.

मनीषा यांनी दुबईत घरगुती जेवणाची सेवा जणू याच भावनेनं सुरू केली, तेव्हा सुरुवातीला ती अगदी तीस-चाळीस लोकांपुरती मर्यादित होती. वर्षभरात त्यात दुपटीनं वाढ झाली. पतीची नोकरी, घरी लहान मुलं अशा परिस्थितीत त्यांनी, बाजारहाट करण्यापासून ते स्वयंपाकाची भांडी शोधण्यापर्यंत सगळं केलं. अन्नसंस्कारांमुळे आलेला आत्मविश्वास, जिद्द आणि पतीचा पाठिंबा या बळावर त्यांनी वीस वर्षांपूर्वी पहिल्यांदाच तीनशे किलोंचे दिवाळीचे पदार्थ तयार केले. त्यापाठोपाठ २००४ ला स्थानिक महाराष्ट्र मंडळाचं पूजेच्या प्रसादाचं काम मिळालं आणि त्यानंतर त्यांची खऱ्या अर्थानं व्यावसायिक वाटचाल सुरू झाली. ‘मनीषाज् किचन’ लोकांच्या परिचयाचं होऊ लागलं, त्याची एक ओळख निर्माण झाली.

‘तेव्हा मंडळाचे अध्यक्ष अग्निहोत्री हे होते...त्यांच्या समितीनं खूप सहकार्य केलं,’ असं मनीषा आवर्जून सांगतात.

दुबईत भारतीय पदार्थ मिळतात; पण रुचकर मराठी जेवणाची सोय नव्हती. पोहे, मिसळ, बटाटेवडा, उपमा, उकडीचे मोदक, भाज्या, भाताचे प्रकार, पुरणपोळी-गूळपोळ्या ही दुर्मिळातली दुर्मिळ बाब होती. मनीषा यांच्या अनुभवानुसार, उपाहारगृह चालवणं हा अत्यंत कष्टाचा व्यवसाय.

‘ज्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता त्यांनी बंदही केला. तुम्ही माणसांची हमी नाही देऊ शकत. मी ते आव्हान पेललं. प्रत्येकजण पेलू शकतो असं नाही. आव्हान पेलण्यासाठी मनात केवळ व्यावसायिक भाव असून चालत नाही,’ असं मनीषा यांचं म्हणणं.

मनीषा आपला अनुभव सांगताना म्हणतात : ‘दुबईतल्या मराठी समुदायासाठी ‘पोळी-भाजी कॉम्बो’ सुरू केला अन् अल्पावधीत तो लोकप्रिय झाला. दोन भाज्या, तीन पोळ्या आणि वरण-भात, तूप-लिंबू हा अस्सल मराठी बेत. ‘मनीषाज् रेस्टॉरंट’चं नाव होऊ लागलं.’

व्यवसाय म्हणून वाढ होऊ लागली की मूळ दर्जा मागं पडण्याचा धोका सर्वत्रच असतो. अन्नपदार्थांमध्ये तर दर्जाला अतोनात महत्त्व. कुटुंबासाठी स्वयंपाक, अन्नपदार्थ तयार करताना प्रेमाचा घटक असतोच असतो; अनोळखी ग्राहकासाठी हा घटक कसा आणणार? मग अन्नाचा दर्जा सांभाळला कसा, यावर मनीषा यांचं उत्तर आजच्या रेस्टॉरंट व्यवसायाला मार्गदर्शक ठरावं असं.

त्या म्हणतात : ‘माझं लॉजिक सोपं आहे. माझं अन्नावर प्रेम आहे. माझ्या स्टाफलाही मी हीच गोष्ट सांगते. ग्राहकाला चहाही उत्तम दिला पाहिजे...थर्मासमध्ये भरून ठेवलेला चहा नका देऊ...आल्याचा ताजा चहाच द्या. व्यवसायाचा हा दृष्टिकोन मी सांभाळला आहे. व्यवसाय आहे, तर नफा हवाच; पण त्यासाठी कमी दर्जाचा माल वापरायचा नाही. एकवेळ एखादा खाद्यपदार्थ संपला असेल तर ‘संपला’ म्हणून सांगते; पण नफेखोरीसाठी दर्जाशी तडजोड होऊ देत नाही. नफा हवा; पण हाव नको, हे साधं सूत्र आहे व्यवसायाचं.’

इच्छा तिथं मार्ग

‘मनीषाज् रेस्टॉरंट’च्या आज दुबईशिवाय अजनानमध्येही शाखा आहे. दरम्यानच्या काळात कोरड्या खाद्यपदार्थांची कंपनी सुरू झाली. आता, ‘मनीषाज् रेस्टॉरंट’चे पॅकबंद खाद्यपदार्थ दुबईतल्या अनेक मॉल्समध्ये मिळतात. ही वाटचाल सोपी नव्हती. गुंतवणूकदारांशिवाय शक्यही नव्हती. ‘मराठी रेस्टॉरंट काढायचं, या माझ्या कल्पनेला साथ दिली पती सचिन यांनी. भांडवलाचा प्रश्न भेडसावत होता. मुलं-बाळं असलेली गृहिणी रेस्टॉरंट चालवेल, ही कल्पना गुंतवणूकदारांच्या पचनी पडत नसायची. शेवटी आम्ही स्वतःचं भांडवल घालायचं ठरवलं. ते फार मोठं नव्हतं; त्यामुळं जागेचा प्रश्न होता. इच्छा तिथं मार्ग असतो. सात-आठ महिन्यांच्या शोधानंतर एक जागा मिळाली. एक जण त्यांचं जुनं रेस्टॉरंट विकणार होते..आपल्या भावना जशा, तशी माणसं भेटतात. इथं मालक सुरेश यांनी आमची आर्थिक अडचण जाणून घेतली. आमच्या सोईनुसार पैसे देण्याची मुभा दिली. आम्ही पुण्याचा प्लॉट विकला. जमवलेले पैसे घातले आणि ‘मनीषाज् रेस्टॉरंट’ २०१२ मध्ये दिमाखात उभं राहिलं. मंदार दामले, आनंद जोशी आणि रेस्टॉरंट-क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले दिगंबर राणे या त्रिमूर्तीनं दिलेली साथ अनमोल...’ अशी आठवण मनीषा सांगतात.

धंदेवाईकपणा आणि व्यावसायिकता

आत्मसंतुलनासाठी ‘युक्ताहारविहारस्य’ असा शब्दप्रयोग भगवद्गीतेत अन्नाबद्दल आला आहे. ‘योग्य प्रमाणात आहार (आणि विहार...हिंडणं-फिरणं) हवा,’ असं मार्गदर्शन भगवद्गीता करते. त्याही पुढं जाऊन सात्त्विक, राजसिक आणि तामसिक प्रकारच्या आहारांचं वर्णनही भगवद्गीतेत येतं. सात्त्विक आहाराबद्दल गीतेचा श्लोक आहेः

आयु:सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः।

रस्या स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः।।

आयुष्य, सत्त्व, बळ, आरोग्य, सुख, प्रेम वाढवणारा रसयुक्त, स्निग्ध, स्थिर, आनंदी आहार सात्त्विकांना आवडतो. मनीषा यांच्या सेवेमागची भावना समजावी, यासाठी भगवद्गीतेतलं हे उदाहरण.

अन्न हे आनंददायी असावं, ही त्यांची व्यवसायामागची भावना. हॉटेलिंग म्हणजे चैन, हॉटेलिंग म्हणजे निव्वळ धंदा असं मानणाऱ्यांसाठी त्या सांगतात : ‘मला वाटतं की अन्नाचा धंदेवाईकपणा होऊ नये. अन्नपदार्थांमागं भावना महत्त्वाची असते. एकच तेल अनेकदा वापरणं, रंग वापरणं हा झाला धंदेवाईकपणा. आजच्या काळात जेव्हा अनेकदा परिस्थितीमुळे बायकाही घरात बसून स्वयंपाक करू शकत नाहीत, तिथं हॉटेल्स ही चैन राहिलेली नाही. मुद्दा आपण कशा पद्धतीनं व्यवसाय करायचा हा आहे. घरगुती संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून रेस्टॉरंट चालवलं तर धंदेवाईकपणा येत नाही. माझ्याकडे खूप प्रकारचे लोक येतात. नोकरीनिमित्त ते आखाती प्रदेशात आलेले असतात. एकीकडे पैसा मिळवायचा आणि दुसरीकडे खराब अन्नामुळे आरोग्यावरचा खर्च वाढवायचा, असं घडतं. त्यांना उत्तम अन्न देणं ही जबाबदारी आहे. त्याबद्दलची जागृती आपल्याकडे व्हायला हवी. ती आली, तर उत्तम आणि दर्जेदार सेवा देणाऱ्या रेस्टॉरंटबद्दलची जागृतीही समाजात वाढेल.’’

‘खरं तर आपण आहारशास्त्र हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला पाहिजे. मुला-मुलींसाठी तो आवश्यक आहे. अन्नपदार्थ, स्वयंपाक करता येणं ही अत्यंत मूलभूत गरज आहे. पोळी-भाजी-आमटी-भात तुम्हाला करता आलाच पाहिजे. तुम्ही ध्येयाकडे धावताना तुमची प्रकृती धड पाहिजे. कुटुंबाला शिकवावं, पैसे मिळावेत म्हणून आरोग्याची किंमत मोजून कित्येक जण काम करतात. त्यांना तीन पोळ्या, एक उसळ, एक कांदाचटणी मिळाली पाहिजे. भाकरी मिळाली पाहिजे. अशा गोष्टी आपल्या अभ्यासक्रमाचा भाग झाल्या पाहिजेत. दहावीपर्यंत आठवड्याला एक लेक्चर पाहिजे. हे करणं आता खूप गरजेचं आहे,’ केवळ स्वतःच्या व्यवसायाबद्दलच नव्हे, तर एकूणच अन्नसंस्कृतीकडे पाहण्याचा मनीषा यांचा हा दृष्टिकोन आहे. व्यवसायात यशाच्या मार्गावर धावणाऱ्या मनीषा सारं श्रेय आपल्या श्रद्धास्थानांना देतात.

‘मी देव मानते. मी माझ्या गुरूंना मानते. गुरूंनीच प्रेरणा दिली, अशी माझी भावना आहे. दुबईत पाऊल ठेवलं तेव्हा माझ्या हाती काही नव्हतं. आपल्या खाद्यसंस्कृतीतल्या सुरेख डेलिकसीज् सोबतीला होत्या. मोदक-भाकरी-पुरणपोळ्या होत्या. फार मोठी मराठी संस्कृती माझ्याबरोबर होती. माझ्या गुरू आई कलावती म्हणतात, ‘प्राण हा अन्नमय आहे.’ माझा व्यवसाय या प्राणाचं पोषण करणारा आहे, ही माझी श्रद्धा आहे,’ अशी मनीषा यांची भावना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com