जातिभेदाच्या दुष्परिणामांची सैद्धान्तिक मांडणी ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cast Matters

मराठी साहित्यात विविध दलित आत्मकथनांनी वेगळी वाट निर्माण केली. या वाटेचा महामार्ग व्हावा इतक्‍या मोठ्या प्रमाणात दलित साहित्यिकांची, विचारवंतांची आत्मचरित्रं प्रसिद्ध झाली.

जातिभेदाच्या दुष्परिणामांची सैद्धान्तिक मांडणी !

मराठी साहित्यात विविध दलित आत्मकथनांनी वेगळी वाट निर्माण केली. या वाटेचा महामार्ग व्हावा इतक्‍या मोठ्या प्रमाणात दलित साहित्यिकांची, विचारवंतांची आत्मचरित्रं प्रसिद्ध झाली. दलित व्यक्तींनी केलेला संघर्ष समाजाच्यासमोर आला, तसेच भटक्‍या विमुक्त जाती-जमातींतील तळातील माणसांनीदेखील आपला जीवनसंघर्ष मांडला. या सर्व पुस्तकांपेक्षा वेगळं पुस्तक म्हणजे ‘कास्ट मॅटर्स'' म्हणावे लागेल. सूरज एंगडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रियंका तुपे आणि प्रणाली इंगळे यांनी केला आहे. अमेरिकेत दीर्घकाळ काम केलेल्या सूरज यांनी या पुस्तकात जातिव्यवस्थेची आणि त्यातून तयार झालेल्या विषमतामूलक परिस्थितीची अत्यंत परखड चिकित्सा केली आहे. हे पुस्तक म्हणजे एखाद्या दलित व्यक्तीची आत्मकथा नाही. हे पुस्तक संपूर्ण दलित समाजाची व्यथा तर मांडतेच; पण समाजव्यवस्थेत एवढ्या मोठ्या वर्गाकडे दुर्लक्ष कसे झाले, त्यांना नाकारले कसे गेले याची सांगोपांग चिकित्सा करते. हॉर्वर्ड विद्यापीठात वेगवेगळ्या व्याख्यानांच्या निमित्ताने, तसेच तेथील विद्यार्थ्यांशी चर्चा करताना तिथल्या विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अनुभवविश्‍व किती वेगळे आहे किंबहुना त्यांना या प्रश्‍नाची नेमकी कल्पना कशी नाही हे एंगडे स्पष्ट करतात.

जात म्हणजे नेमके काय आणि जातिभेद म्हणजे काय हे सांगतानाच दिसून न येणाऱ्या पण विविध टप्प्यांवर दलित समाजाची कशा पद्धतीने कोंडी होते, किती गोष्टींमध्ये त्यांना संधी नाकारली जाते यावर एंगडे तीव्र असा प्रकाशझोत टाकतात. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना १९४५ मध्ये झाली तेव्हापासून आजपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत जातीय हिंसाचाराचा निषेध करणारा एकही ठराव मंजूर झालेला नाही हे एकच उदाहरण किती बोलके आहे असे जेव्हा एंगडे म्हणतात तेव्हा नवउदारमतवादी विकास संस्थांच्या लेखी ३० कोटी दलितांच्या जगण्याचे महत्त्व किती आहे ते लक्षात येते. पुस्तकात सात प्रकरणांमध्ये एखाद्या पीएच.डी.च्या प्रबंधासारखे एंगडे यांनी या समस्येचे स्वरूप किती भीषण आणि किती अक्राळविक्राळ आहे ते विविध उदाहरणे देत मांडले आहे. ‘दलित असणं ’या पहिल्याच प्रकरणात ते अनेक गोष्टी मांडतात; त्या वाचत असताना कुठलाही संवेदनशील माणूस अस्वस्थ होईल. ब्राह्मणी व्यवस्था म्हणजे नेमके काय, या व्यवस्थेच्या नियंत्रणाखाली अनेक वर्षे खूप मोठा समाज राहिल्यामुळे विविध घटकांवर कसे दुष्परिणाम झाले, दलित समाजाला किती आणि कोणत्या स्वरूपात काय भोगायला लागले, त्याची केवळ जंत्री न देता एंगडे त्याचे व्यापक स्वरूप ते वाचकांसमोर ठेवतात. ही चिकित्सा जेवढी विचारप्रवृत्त करते तेवढीच अस्वस्थही करते.

नवदलितत्त्वाचा उदय, दलितांच्या अनेक छटा, दलित मध्यमवर्ग, दलित भांडवलशाही आणि ब्राह्मणवादाच्या विरोधातील ब्राह्मण या साऱ्या प्रकरणांमधून या व्यवस्थेची शास्त्रीय चिकित्सा एंगडे करतात. खरे तर ही एका फार मोठ्या समाजघटकाची चिकित्सा असूनही आमच्यावर केवळ अन्याय झाला अशी हाकाटी न पिटता विविध पुरावे देत अन्यायाची ही यंत्रणाच कशी ‘व्यवस्था’ आहे असे सांगण्याचा प्रयत्न कसा झाला त्याच्यावर एंगडे मार्मिक कोरडे ओढतात. त्याचबरोबर देशातील दलित नेतृत्वाचीदेखील परखड चिकित्सा करतात. प्रसंगी काही नेत्यांवर कडक टीका करताना ते मागेपुढे पाहत नाहीत. साहित्य क्षेत्रात तसेच भांडवलशाहीमध्ये काय घडले त्याची आकडेवारी मांडत ते भांडवलशाहीचीच तपासणी करतात.

भांडवलशाही म्हणजे काय हे सांगताना जागतिक पातळीवर त्यांनी काम केलेले असल्यामुळे रूढ पुस्तकी सिद्धांत न मांडता भांडवलशाहीबद्दल आपली स्वतंत्र मते आणि त्याचे परीक्षणही करतात.

जात महत्त्वाची कशी आहे आणि मानवी आयुष्यात लक्षात राहील असा ओरखडा ती कसा उमटवते याचे आपल्या लहानपणाचे एक उदाहरण लेखक देतो. ते उदाहरण वाचल्यावर कुठलाही संवेदनशील माणूस अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे; पण हे चूक आहे हे व्यवस्थेला वाटतच नाही ही खरी समस्या आहे. याच समस्येवर एंगडे आपल्या पुस्तकातून झगझगीत असा प्रकाशझोत टाकतात. नोकरशाही किंवा अन्य सरकारी यंत्रणांमध्ये दलित समाजाचा आवाज कसा दडपला जातो, तसेच सामाजिक व्यवस्थेमध्ये दलितांकडे कसे बघायला हवे याबद्दल नेमके मार्गदर्शन हे पुस्तक करते.

प्रचंड अभ्यासातून काढलेले निष्कर्ष, मात्र केवळ हे निष्कर्ष किंवा त्याच्यावरचे उपाय पुस्तकी न होता ही व्यवस्था बदलून दलित समाजाला न्याय कसा मिळेल याची चर्चा एंगडे यांनी या पुस्तकात केली आहे किंबहुना जातीच्या भेदामुळे आणि जात पाळण्याच्या व्यवस्थेच्या गुप्त आग्रहामुळे दलित समाजाला किती भोगावे लागते आणि दलित समाजातील व्यक्ती या व्यवस्थेतल्या छोट्या-छोट्या सोयींपासून (सुखाची तर बातच नाही) किती लांब आहेत याची कल्पना येते. दलित समाजाचा आक्रोश या पुस्तकातून केवळ मांडला गेला आहे असे नाही किंवा आम्ही व्यथा सांगत आहोत असा कुठेही आव आणलेला नाही किंबहुना तशी मांडणीही नाही; पण माणूस म्हणून या व्यवस्थेनेच दलित समाजाला कसे नाकारले आणि नाकारलेपण आजतागायत व्यवस्थेने ठळकपणे कोणाच्या विशेषतः ज्यांनी अन्याय केला त्यांच्यापर्यंत पोचू दिले नाही हे उघडपणे मांडते. त्याचबरोबर जातिभेद संपला, आता जात अस्तित्वात नाही असे या समाजव्यवस्थेतील उच्चवर्णीय वर्ग म्हणतो तेव्हा त्यांना जातिभेदाचे चटके किंवा जातिभेदामुळे एका खूप मोठ्या समाजघटकाला किती आणि काय भोगायला लागले याची कल्पनाही नसते हेच अत्यंत भेदकपणे हे पुस्तक लक्षात आणून देते. अत्यंत गरिबीत व संघर्ष करत आज अमेरिकेत तिथल्या व्यवस्थेत यश मिळवत आपलं स्वतःचं स्थानं निर्माण करून एंगडे यांनी या पुस्तकात जी सैद्धान्तिक चर्चा केली आहे त्यामुळं हे पुस्तक विचारप्रवृत्त करतं आणि तितकचं अस्वस्थही करतं.

शाब्बास गुरुजी

राजेंद्र दिघे यांच्या या लेखसंग्रहात जिल्हा परिषदेच्या शाळांसह विविध शाळांमधील वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. ‘सकाळ''च्या नाशिक आवृत्तीत प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेखांचे हे संकलन असून, प्रत्येक लेखामध्ये दिघे यांनी उपक्रमशील शिक्षक आणि त्यांच्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला, तसेच शिक्षणाची गंगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचली यावर भर दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील कर्तबगार शिक्षकांची कामगिरी नेमकी कशी होती, अडचणीतून त्यांनी मार्ग कसा काढला, तसेच लोकसहभाग घेऊन शाळांचा कायापालट कसा केला ते यातील लेखांतून कळते.

प्रकाशक : चपराक प्रकाशक (७०५७२९२०९२) पृष्ठं : १७६

मूल्य : २५० रुपये

ऋणानुबंध

शशी भालेकर यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या विविध व्यक्तींचा त्यांच्यावर कसा प्रभाव पडला, त्यांचे आयुष्य या व्यक्तींमुळे कसे बदलले याविषयी लिहिले आहे. यातील माणसे अत्यंत दिग्गज अशी आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांच्याशी भालेकरांचा संबंध आला होता. वेगवेगळ्या कारणांनी या दिग्गजांशी त्यांची जी भेट झाली त्यातून त्यांना काय शिकता आले ते त्यांनी यामध्ये नेमकेपणाने मांडले आहे. कमाल आमरोही, आचार्य अत्रे, जयवंत दळवी यांच्याबद्दलही त्यांनी ओलाव्याने लिहिले आहेत.

प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन, पालघर (९८२०७४८०८१)

पृष्ठं : १२०

मूल्य : २०० रुपये

पुस्तकाचं नाव : कास्ट मॅटर्स

लेखक : सूरज एंगडे अनुवाद : प्रियंका तुपे, प्रणाली एंगडे

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठं : ३०८ मूल्य : ४२५ रुपये

Web Title: Article Writes On Book Caste Matters

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bookarticlesaptarang
go to top