स्वागत नव्या पुस्तकाचं

अभिनेत्री आणि लेखिका नीलकांती पाटेकर यांच्या ललित लेखांचा हा संग्रह. या पुस्तकातले काही लेख ध्वनिचित्रफितीत साभिनय सादर केलेले आहेत.
Books
Bookssakal

असरट पसरट

अभिनेत्री आणि लेखिका नीलकांती पाटेकर यांच्या ललित लेखांचा हा संग्रह. या पुस्तकातले काही लेख ध्वनिचित्रफितीत साभिनय सादर केलेले आहेत. या फिती पाहण्यासाठी लेखाच्या शेवटी जे क्यू आर कोड दिले आहेत, त्याच्या साहाय्यानं या फिती पाहता येतील. नीलकांती पाटेकर यांनी आयुष्यातल्या विविध अनुभवांना इथं शब्दबद्ध केलंय. तसेच काही महत्त्वाच्या व्यक्तींची शब्दचित्रं मनात घर करतील, या पद्धतीनं रेखाटली आहेत.

लेखिकेचा मनस्वीपणा आणि त्या व्यक्तीबद्दलची असोशी यातल्या लेखातून नेमकपणानं प्रकटली आहे. त्यांना अनेक मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभला. या व्यक्तींचं मोठेपण सांगतानाच, त्यांच्यातला साधेपणा आणि सच्चेपणा त्यांनी अचूक रीत्या इथं मांडलाय. प्रकाशक : इंद्रायणी साहित्य, पुणे (०२०- २४४५८५९८) पृष्ठं : १९२ मूल्य : ३५० रुपये.

चला आपणच बदलू या राजकारण

निवडणूक आणि राजकारण याबद्दल सगळे जण बोलत असतात. त्यातल्या वाईट बाबींबद्दल तर अनेक जण टीका करतात. निवडणूक आणि त्यातले गैरपक्रार याबद्दल अनेकांची नाराजी असते. मात्र त्याबद्दल नेमकेपणानं काय करायचं याबद्दल मतभिन्नता असते. लोकशाहीमधल्या या सर्वांत महत्त्वाच्या बाबींतला मुख्य घटक म्हणजे मतदार आणि मतदान.

सुरेश ओसवाल यांनी या निवडणूक पद्धतीत नेमकी काय सुधारणा व्हायला हवी, लोकांनी मतदान करताना कुठल्या बाबींना प्राधान्य द्यायला हवं याबद्दल या पुस्तकात तपशीलवार विवेचन केलंय. कुठंलही आंदोलन, हिंसक कारवाया न करता शांततेच्या आणि सदनशीर मार्गानं देशात बदल कसा घडवता येईल, याची विविध उदाहरणं देत त्यांनी मोजक्या शब्दांत इथं मार्गदर्शन केलंय. प्रकाशक : सुनीता ज्ञानगंगा, पुणे (९९६०११४९६७) पृष्ठं : १०४ मूल्य : १६५ रुपये.

कर्ता-करविता कार्यकर्ता

विकास लवांडे यांनी सामान्य कार्यकर्त्याला डोळ्यासमोर ठेवून इथं मार्गदर्शन केलंय. विविध पक्ष, त्यांची विचारधारा, तसेच देशपातळीवर कार्यरत विविध नेतेमंडळींचं कार्य आणि त्यांची तत्त्व यांच्याबद्दलची माहिती नेमक्या शब्दांत त्यांनी दिली आहे. एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला ज्या बाबी माहीत असणं आवश्‍यक आहे, त्याबद्दलची माहिती देताना त्यांनी विविध विषयांना स्पर्श केलाय.

वेगवेगळे विचारप्रवाह, राज्यातलं प्रशासन कसं चालतं, राज्यघटनेनं दिलेले हक्क याबद्दल विवेचन केलंय. ज्येष्ठ नेते कुमार सप्तर्षी यांची प्रस्तावना आहे. कार्यकर्त्याला अभ्यासासाठी प्रवृत्त करणारं व त्याला प्राथमिक बाबींची जाणीव करून देणारं असं हे पुस्तक आहे. प्रकाशक : नवनाथ जगताप, रुद्र एंटरप्राइजेस, पुणे (९०७५४९६९७७, ८९७५९३०२५८) पृष्ठं : २४० मूल्य : २५० रुपये.

रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना

संदीप भानुदास तापकीर यांनी या पुस्तकात कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यांचा वेध घेतला आहे. पन्हाळा, विशाळगड, गगनगड यांसारख्या प्रसिद्ध गडांची माहिती त्यांनी इथं दिलीच आहे; पण त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील अपरिचित गडांचा सविस्तर परिचय करून दिलाय. गडांचे फोटो, तिथं कसं जायचं याची माहिती, त्या गडाची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी, तसेच गडासंदर्भातील आख्यायिका यांचाही तपशील त्यांनी इथं दिला आहे.

ऐतिहासिक वैभव आणि गडाची आजची स्थिती या दोन्हीचा समन्वय साधत मराठेशाहीतल्या पराक्रमाच्या विविध बाबी सांगत वाचकांना गडाची सफर घडवून आणली आहे. प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२४५२५५३८, ९१६८६८२२००) पृष्ठं : ११६ मूल्य : १९५ रुपये

दोस्त ऋतू

विश्वास वसेकर यांच्या बालकवितांचा हा संग्रह. निसर्गचक्रातले विविध ऋतू तसेच आकाशातील तारे, मुलांच्या मायेची पणजी अशा विविध बाबी यातील कवितांमधून उलगडली गेल्या आहेत. संतोष घोंगडे यांची चित्रं कवितांची वाचनीयता वाढवतात. लहान मुलांना प्रचंड कुतूहल असतं. त्यांचं कुतूहल शमविताना चुकीची माहिती देऊन चालत नाही. मात्र त्याचबरोबर पांडित्यपूर्ण माहितीही देता येत नाही.

त्यांना समजेल उमजेल, त्यांचे भावविश्व समृद्ध करेल अशा प्रकारची माहिती आवश्यक असते. त्यात मनोरंजन हवं आणि आशयही हवा यातील कविता ही अपेक्षा पूर्ण करतात. माजी साहित्य संमेलानाध्यक्ष भारत सासणे यांनी या कवितांचं जे कौतुक केलंय त्यातून या कवितांमागची भूमिका आणि या कवितांचं वेगळेपण लक्षात येतं. प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे (०२०-२४४९७३४३, ९८२३०६८२९२) पृष्ठं : ४० मूल्य : १२०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com