डेविन... स्पर्धक नव्हे; सहकारी

सध्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’चा बोलबाला आहे. अनेक कंपन्या ‘एआय’ तंत्रज्ञान वापरत असून त्यामुळे नोकऱ्या धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे.
artificial intelligence ai software Cognition devin
artificial intelligence ai software Cognition devin Sakal

- प्रा. डॉ. रजनीश कामत | दिव्येंदू वर्मा

सध्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’चा बोलबाला आहे. अनेक कंपन्या ‘एआय’ तंत्रज्ञान वापरत असून त्यामुळे नोकऱ्या धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच डेविनच्या रूपात जगातील पहिला ‘एआय’ सॉफ्टवेअर इंजिनिअर लाँच करण्यात आला आहे. डेविनच्या येण्याने सॉफ्टवेअर क्षेत्राला खरंच धोका आहे?

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ‘एआय’चे क्षेत्र आता वेगाने विस्तारू लागले आहे. ‘एआय’चा जसजसा विस्तार होत आहे तसतसा विविध उद्योगांवरील त्याच्या परिणामाबाबत चर्चा होत आहे.

अशातच अलीकडील ‘एआय’ क्षेत्रातील एका घडामोडीने खळबळ उडवली. ती म्हणजे डेविनचा उदय! जगातील पहिला पूर्णपणे स्वायत्त ए. आय. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून डेविन ओळखला जातो. अमेरिकन कंपनी ‘कॉग्निशन’ने डेविनला जन्माला घातले आहे आणि आता सर्वत्र त्याचाच बोलबाला सुरू आहे.

जटिल कार्ये स्वयंचलित करून आणि विकास प्रक्रिया साधी-सोपी करून सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या कार्यपद्धतीत क्रांती घडवून आणण्याची ग्वाही डेविनतर्फे दिली जात आहे. तथापि, डेविनच्या क्षमतांबद्दल उलटसुलट चर्चा रंगल्या असतानाच दुसरीकडे सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकऱ्यांवर आणि एकूणच तंत्रज्ञानाच्या विस्तृत परिघावरील त्याच्या संभाव्य परिणामाबद्दलही विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पुनर्व्याख्या

सॉफ्टवेअर विकासाच्या क्षेत्रात उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेषकरून काही वैशिष्ट्ये विकसित केली गेली आहेत. त्या वैशिष्ट्यांसह कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वयंचलन (ऑटोमेशन) क्षेत्रातील गरुडभरारी म्हणजे डेविन होय.

डेव्हलपर टूल्सचा संच आणि रिअल-टाईममध्ये वापरकर्त्यांसोबत सहयोग करण्याच्या क्षमतेसह डेविन नावाचा सॉफ्टवेअर इंजिनिअर सुसज्ज आहे. भविष्यात सॉफ्टवेअर क्षेत्रात काय क्रांती घडविली जाऊ शकते याची एक झलकच तो पेश करतोय. पाहायला गेले तर डेविन फार मोठी क्रांती घडवून आणू शकतो.

डेविनरूपी एआय टूल इतके स्मार्ट आहे, की ते कोड लिहू शकते. वेबसाईट आणि सॉफ्टवेअर तयार करू शकते. पुनरावृत्ती कोडिंग कार्ये बुद्धिमान अल्गोरिदमकडे सोपवली जाऊ शकतात. डेविन अत्यंत कठीण कामे पार पाडू शकणार असल्याने मानवी अभियंते उच्चस्तरीय समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. अधिक नावीन्यपूर्ण कामे करण्यासाठी त्यांना मोकळेपणा मिळू शकतो. अशी क्रांती डेविन घडवून आणू शकतो.

‘कॉग्निशन’च्या मते, डेविनकडे सागरासारखे विशाल ज्ञानभंडार आहे. त्या जीवावर तो कठीण किंवा अत्यंत गुंतागुंतीच्या आव्हानातून मार्ग काढू शकतो. त्या क्षमतेचा योग्य वापर करून तो कितीही क्लिष्ट अभियांत्रिकी कार्य असो त्याचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी अशा आघाडीवर सर्वोत्तम कामगिरी बजावू शकतो.

ॲप्लिकेशन्स तयार करणे असो, त्यांचा वापर करणे असो की कोडबेसमधील दोष ओळखून त्यांचे निराकरण करणे असो, डेविनचे त्यातील प्रावीण्य यापूर्वीच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल्सला मागे टाकणारे आहे.

डेविनकडे अपरिचित तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची अद्‍भुत क्षमता आणि समस्यांचे निराकरण करण्याची कला अवगत आहे. म्हणूनच तो अधिक कार्यक्षमता आणि अचूकतेसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या सॉफ्टवेअर निर्मात्या कंपन्यांसाठी प्रबळ दावेदार म्हणून उदयास आला आहे.

नोकऱ्यांवर परिणाम होणार का?

एकीकडे डेविन आणि त्याच्यातील अद्वितीय क्षमतेबाबत प्रचंड उत्साह आहे. मात्र, दुसरीकडे त्याच्यामुळे सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकऱ्यांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल चिंता व्यक्त होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअर विकासाच्या क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे योगदान देत असल्याने मानवी अभियंत्यांना नोकरीतून काढून टाकण्यासाठी डेविन कारणीभूत ठरेल का, असा प्रश्न विचारला जात आहे.

‘कॉग्निशन’ कंपनीने डेविनला मानवी अभियंत्यांची क्षमता वाढविणारे एक पूरक साधन म्हणून सादर केले असले तरी त्याच्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील मनुष्यबळ भरतीवर त्याचे दीर्घकालीन परिणाम होतील, अशी भीती वर्तवली जात आहे. डेविनची क्षमता उल्लेखनीय असल्याने ते लक्षात घ्यावेच लागेल. ‘एआय’चलित ऑटोमेशनमुळे रोजगारनिर्मिती आणि नोकऱ्या गमावणे अशा दोन्ही बाबी घडून आल्याचा इतिहास आहेच.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या काही पैलूंना डेविनमुळे अधिक उजाळा मिळू शकतो. त्यासोबतच सॉफ्टवेअर उद्योगात नव्या भूमिका आणि संधी निर्माण करण्याची क्षमताही डेविनमध्ये आहे. शिवाय डेविनसारखे एआय टूल ओपन सोर्स सॉफ्टवेअरसारखे सर्वांना खुले करून दिल्यास जगभरातील विविक्ष क्षेत्रांतील कर्मचारी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे या क्षेत्रात नावीन्य आणि विविधतेला चालना मिळू शकते.

डेविनमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रशासनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा फेरविचार करण्याची वेळ आता विविध देशांतील सरकार व नियामक संस्था यांच्यावर आली आहे. युरोपीय संघात १३ मार्च २०१४ रोजी ‘एआय’चे नियमन करण्यासाठी काही नियम पारित करण्यात आले.

त्यात मानवी मूलभूत हक्क आणि नावीन्यता यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारत सरकारनेही १ मार्च २०२४ रोजी देशात ‘जनरेटिव्ह एआय यंत्रणा’ लागू करण्यापूर्वी आपली अनुमती घ्यावी, अशा सूचना देशातील सर्व तंत्रज्ञानविषयक कंपन्यांना दिल्या आहेत.

जरी त्या कायदेशीररीत्या बंधनकारक नसल्या तरी त्यांचे पालन न केल्यास फौजदारी खटल्यांना व शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. भारत सरकारने दिलेला सल्ला म्हणजे त्यांना ‘एआय’च्या विकासासोबतच अपप्रचार, गोपनीयता आणि ऑनलाईन सुरक्षा महत्त्वाची वाटत असल्याचेदाखवून देते.

जनरेटिव्ह ‘एआय’मध्ये सहभागी असलेल्या प्रमुख टेक कंपन्यांना लक्ष्य करून आणि विशिष्ट जबाबदाऱ्यांची रूपरेषा त्यांच्यासाठी आखून सरकारने संवेदनशील क्षेत्रांमध्ये देखरेखीची गरज ओळखतानाच त्यातील कंपन्यांनी स्व-नियमनावर भर द्यावा, असे केंद्र सरकारच्या सल्लाचा अर्थ आहे.

डेविन आणि तत्सम ‘एआय’ आधारित तंत्रज्ञान सॉफ्टवेअर अभियांत्रिकीच्या क्षेत्राला नवा आकार व रूप देत असल्याने आता हे स्पष्ट आहे, की आपण नवीन संकल्पनांच्या आणि सहयोगाच्या युगात प्रवेश करत आहोत.

‘एआय’मुळे नोकऱ्यांमध्ये कपात होण्याची भीती आणि नियामक निरीक्षणाविषयी मोठ्या प्रमाणात चिंता असतानाच मानवी क्षमता वाढवण्याची आणि उद्योगात सकारात्मक बदल घडवून आणण्याचीही प्रचंड गुणवत्ता आहे. शेवटी, डेविनसारख्या ‘एआय’ टूलचे यश केवळ त्याच्या तांत्रिक ताकदीवर अवलंबून नाही तर विद्यमान कामांमध्ये सहजपणे समरस होण्याच्या, सतत शिकण्याच्या आणि बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये नवे बदल लगेच घडवून आणण्याच्या क्षमतेवरही अवलंबून असेल.

‘एआय’ला एक स्पर्धक म्हणून नव्हे; तर भागीदार म्हणून स्वीकारले तर सॉफ्टवेअर अभियंते मोठमोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी आणि डिजिटल युगात चमत्कार घडविण्यासाठी आणि नवनिर्मितीच्या नवीन संधी उघडण्यासाठी डेविनच्या क्षमतेचा नक्कीच उपयोग करू शकतात.

(प्रा. डॉ. रजनीश कामत होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. लेखक दिव्येंदू वर्मा बौद्धिक संपदा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com