

Future of Artificial Intelligence and Society
esakal
संपदा सोवनी - sampada.sovani@esakal.com
मोबाइलवर आणि संगणकावर अतिशय सोप्या पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या आणि प्राथमिकत: विनामूल्य मिळणाऱ्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चे (एआय) सुरुवातीचे अप्रूप आता ओसरले आहे. एआय लहानथोरांसाठी सवयीचे झाले असून, काहीही अडले की आपसूक ‘एआय’ला ‘प्रॉम्प्ट’ दिला जातो आहे. ‘एआय’चे संभाव्य तोटे आणि त्यामुळे विविध क्षेत्रांतील नोकऱ्यांवर येणारी गदा, ही चर्चा आता रोजची झाली आहे. आपल्याला माहिती असणाऱ्या या गोष्टींच्या एक पाऊल पुढे जाऊन ‘एआय’ आणि मूळच्या बुद्धिमत्तेची तुलना करणारे आणि त्याची नव्या जगातील सामाजिक बदलांशी सांगड घालणारे पुस्तक म्हणजे, विवेक सुतार यांचे ‘उंबरठा... नवं युग सुरू होतंय! (कृत्रिम बुद्धिमत्ता, समाज आणि इंडस्ट्री ५.०)’.
मानवासाठी अपरिहार्य अशा नव्या युगाची ही सफर १८ लेखांमध्ये विभागलेली आहे. प्रत्येक लेखात एक वेगळा विषय घेऊन त्याचे विविध धागे उलगडून दाखवले आहेत. हे सर्व लेख केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेवर नाहीत आणि तिचा वापर कसा करावा हे सांगणारे ‘मॅन्युअल’देखील नाही. सध्याच्या काळात ‘एआय’बरोबरच इतरही अनेक बाबतींत प्रचंड आधुनिकता आली आहे. ती आत्मसात करत, वाढवत आपली मुळे धरून ठेवण्याची सगळी कसरत आहे. समाज म्हणून त्यात रोज आपला कस लागतो आहे. ‘मशीन्सनी काम करावं आणि माणसानं ‘सर्जन’ करावं’ ही उक्ती आता उलट कशी झाली,’ इथपासून सुरुवात करत लेखकाने समाजापुढची ही दुविधा मांडली आहे.