प्रासंगिक : तेजाचा टिळा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंद्रजित भालेराव

प्रासंगिक : तेजाचा टिळा...

- अरुण चव्हाळ, परभणी

कुणीही जर कवी इंद्रजित भालेराव यांच्याकडे ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नजर टाकली तरी त्यांचा चेहरा तेजोमय दिसतोय असाच अनुभव असणार आहे. कवीच्या काळजातील कविता आणि बाह्यचेहरा सदैव तेजोमय राहिलेला असून, आपणांसही तो टवटवीत दृष्टी दाखवतोय. आपण आणि आपल्यांना ‘तेजाचा टिळा’ लावणारा हा सर्वमुखी कवी अखिल भारतीय मराठी कवितेत त्यामुळे ताजेतवाणेपणा देणारा आहे. विचार आणि आचार जपून कवितेसह अनेकांच्या जीवनाला अर्थ आणि आशय देणारे गुरुजी सर्वांनाच प्रभावित करतात.

भालेराव गुरुजींच्या कवितेतील एक ओळ ‘आम्ही कष्टाचंच खातो’ मला मौलिक वाटते. हे अमरतत्त्व जगताना जपले तर कुणाचीच हरकत नसते. रसिकता, मानवता, वैचारिकता, गंभीरता, संशोधन, गुणग्राहकता, कृतज्ञता जपणारी मांदियाळी त्यांनी निर्माण केली. मराठी कवितेसाठी ‘शब्दसह्याद्री साहित्य सन्मान’ चळवळ सुरू केली. लाखो रुपये मदत करूनही सहजता जपली. ते जिथे-तिथे गेले की, वाचन-लेखन करणाऱ्याला आपलेसे करतात. द. ता. भोसले, किशोर कदम, नारायण सुर्वे, उत्तम कांबळे, अनुराधा पाटील, आर. आर. पाटील अशा दिग्गजांना भेटायला जाताना त्यांनी मला सोबत नेले. त्यांचे लेखन मला भावले. माणूस म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचे ते क्षण मला आजही आठवतात.

आपली माणसं ‘मैत्र जिवांचे’ मानून परक्यांनाही आपला माणूस वाटणारे कवी वैश्विकदृष्टीने मोठा असलेले मला मनातून मोठे वाटतात. केंब्रिज विद्यापीठात त्यांची कविता पोचली. भारतीय संसदेत त्यांच्या कवितेने शेतकऱ्यांना वाचा दिली. शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात त्यांच्या कवितेने कार्यकर्त्यांना बळ दिले. पुस्तकांचे पानं-मुलांचे भावविश्व, आया बायांच्या भावना, थोरामोठ्यांचे व बापाचे-माईचे मोठेपण साकारून त्यांनी कागदाला अमर केले. अमेरिकेत कविता ऐकून भारतीय बहिणींना माहेरपणाची पाठभिंत त्यांची कविता वाटली. विद्यापीठाच्या ग्रंथात तिने पोरांना अभ्यासाबरोबर प्रेरणा दिली. झाडाखाली बसून शेषेराव मोहिते, रंगनाथ पठारे, अरुण शेवते, यशवंतराव गडाख यांच्या कवितेचे आस्वादक होताना मी त्यांना अनुभवलेले आहे. विद्या बाळ व एन. डी. पाटील यांनी ‘ऐसे कवी’ मनात जपून ठेवलेले आहेत.

कवीश्रेष्ठ संत तुकारामांवर कवीची एक कविता अशी आहे -

‘तुला एकांताची चाड/वृक्षवेलींची आवड तरी माणसाला तुच्छ/नाही लाविलेस पुच्छ/ कान पिळून बाळाचा/ मुका घेत असे गालाचा/ जनाप्रति तुझा भाव/तसा निर्मळ स्वभाव.’ भालेराव हे तत्त्वाने व सत्त्वाने जगणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या ‘तेजाचा टिळा’ ठळक आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang
loading image
go to top