दारुड्यांसाठी ‘नवी सोय’ कशाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drink

दारूच्या अचाट परिणामाची ही सारी व्यथा रामलाल या नाटकातील पात्रास सांगताना सुधाकराच्या मुखी गडकरींनी चपखल संवाद लिहिले आहेत.

दारुड्यांसाठी ‘नवी सोय’ कशाला?

- अरुण कामत saptrang@esakal.com

राम गणेश गडकरी लिखित ‘एकच प्याला'' या नाटकाचा पहिला प्रयोग १९१९ मध्ये २० फेब्रुवारीला बडोद्याला झाला. व्यसनाधीनतेमुळे सुखी संसाराची होणारी धुळधाण आणि दारूचे दुष्परिणाम समाजासमोर भांडणारी ही गडकरींची नाट्यकृती. ख्यातनाम वकील सुधाकर व्यसनात बुडून आपली सनद गमावून बसतो, आपल्या मुलालाही मारतो, पत्नी सिंधूचाही मृत्यू होतो आणि स्वतःही आत्महत्या करतो अशी ही शोकांतिका.

दारूच्या अचाट परिणामाची ही सारी व्यथा रामलाल या नाटकातील पात्रास सांगताना सुधाकराच्या मुखी गडकरींनी चपखल संवाद लिहिले आहेत. ‘हजारो परोपकारी पुरुषांनी आपल्या देहाची धरणं बांधली तरी सुद्धा जिचा अखंड ओघ चारी खंडात महापुरात वाहत राहिला, वेदवेदांची पानं जिच्या ओघावर तरंगत गेली. कठोर शक्तीचे मोठाले राजदंड जिच्या गळ्यात रूतून बसले ती दारू म्हणजे काही सामान्य वस्तू नाही!’’ गडकरी यांनी ‘एकच प्याला'' नाटक लिहून १०५ वर्षांचा काळ लोटला. शेकडो नव्हे, हजारो नव्हे, लाखो प्रेक्षकांनी हे नाटक पाहिलं असेल, पण आपल्या समाजावरील दारूचा अंमल काही अजूनही उतरलेला नाही.

गोव्यात मागील काही वर्षांपासून रस्ते अपघातात प्रचंड वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी होणारे बहुतांश जीवघेणे अपघात हे दारू पिऊन वाहन चालविल्याने झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. रात्री उशिरा मोकळे झालेले रस्ते दिसताच मद्यधुंद चालक बेदरकारपणे वाहने हाकतात. वळणावर वा जोडरस्त्यांवर वाहन नियंत्रणा बाहेर जाऊन भीषण अपघात घडताना दिसतात.

हे अपघात टाळण्यासाठी दारू विक्रीवर बंदी वा मर्यादा आणण्याऐवजी आपल्या राज्य सरकारने नवीन उपाययोजना आखण्याचे ठरविले आहे. बारमालकांना मद्यपान केलेल्या आपल्या ग्राहकांना त्यांच्या निवासस्थानी सुखरूप पोचवण्याची व्यवस्था करावी लागेल, असा नियम (वा कायदा) करण्याचा सरकारचा मनोदय आहे. या नवीन नियमामुळे हे अपघात कमी होतील अशी सरकारची अपेक्षा आहे.

गोव्यात पाण्याप्रमाणे दारू वाहते असे म्हटले जाते. येथील मुले अक्षर ओळख होताच A, B नव्हे तर B, A अशी अक्षरे वाचू लागतात. कारण सगळीकडे "अमुक तमुक BAR` लिहिलेले जाहिराती वा फलक त्यांच्या दृष्टीस येतात. आतील विनोद सोडला तरी ही वस्तुस्थिती आहे. अगदी शाळा आणि देवळाच्या परिसरात तुम्हाला चहाचे दुकान भलो न मिळो, दारू आणि सामिष भोजन देणारे दुकान मात्र नक्कीच आढळेल.

व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबाची झालेली वाताहात, तरुण मुलांचे गेलेले बळी, घरातील पैशांची उधळपट्टी, अशी अनेक उदाहरणे आपण अवतीभवती पहात असतो. पण दारूविक्रीवर बंदी वा मर्यादा घालण्याची मागणी होताच अनेक शिक्षित आणि तथाकथित सभ्य लोक त्या विरुद्ध पेटून उठतात. २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगतचा ५०० मीटरच्या आत अंतरातील दारूविक्री दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. या आदेशाचा लाभ घेऊन गोव्यातील दारुविक्रीवर मर्यादा आणण्याची सुवर्णसंधी राज्य सरकारला लाभली होती. या संधीचा फायदा घेऊन काही बार जर बंद झाले असते तर राज्यातील व्यसनाधीनता थोड्या तरी प्रमाणात कमी झाली असती हे निश्‍चित. दर महिन्याला गोव्यात होणाऱ्या १२० मृत्यूपैकी २८-३० मृत्यू प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या दारूशी निगडीत असतात, अशी राज्य सरकारची अधिकृत आकडेवारी स्पष्ट करते. या आकडेवारीत घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर मागे राहिलेल्या कुटुंबियांना भोगाव्या लागणाऱ्या मरणयातनांचा निश्‍चितच समावेश नसेल. त्यांच्या सुखी संसाराचाही तो अप्रत्यक्ष मृत्यूच असतो.

राज्यातील दारूविक्री, त्याबाबतचे मुक्त धोरण आणि राज्यातील पर्यटन व्यवसाय याचेही आता अतूट नाते जमून आले आहे. दारू व्यवसायावर निर्बंध लादले तर त्याचे दुष्परिणाम पर्यटन व्यवसायावरही होतील, या भीतीने राज्य सरकार मग ते कुठल्याही पक्षाचे का असोत त्या विषयाबाबत हात झटकून टाकते. दारू विक्री, कॅसिनो आणि पर्यटन हे तीन व्यवसाय राज्य सरकारासाठी महसूल मिळवून देणारे, सोन्याची अंडी देणारे व्यवसाय ठरले आहेत. या महसुलाच्या बळावरच सरकारी नोकरांना पगार आणि योजना राबविता येतात, असा सरकारचा दावा आहे. विरोधी पक्षात असताना कॅसिनोला विरोध करणारे मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री बनताच कॅसिनोमुळे राज्याला मिळणारा महसूल आणि त्यांनी निर्माण केलेल्या नोकऱ्या विरोधकांना ऐकवून त्यांच्या विरोधाची हवा काढून घेत असत. दारू, पर्यटन आणि कॅसिनो या तिन्ही व्यवसायातून राज्याला आर्थिक दृष्ट्या फायदा झालेला असला तरी सामाजिक दृष्ट्या या तिन्ही व्यवसायांमुळे राज्याचे किती नुकसान आणि अधःपतन झाले आहे ते येणाऱ्या काळात दिसून येईल.

सिगरेटच्या पाकिटावर वैधानिक इशारे देणारे चित्र असते. राज्य सरकारने दारू व्यसनाधीनता कमी करण्यासाठी मद्यालयामध्ये दारूचे दुष्परिणाम दाखविणारे फलक लावणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. बारमालकांनो तुम्ही ग्राहकांना भरपूर दारू पाजा आणि नंतर त्यांच्या सुखरूप प्रवासाची व्यवस्था करा, हे सरकारने सांगणे म्हणजे "चोरी करा पण पोलिसांच्या तावडीत मात्र सापडू नका'' असे सांगण्यासारखे आहे.

गडकरींच्या "एकच प्याला'' नाटकात तळीराम नावाचे पात्र आहे. बैठकीत दारूच्या बाटलीचा ( किंवा ग्लासाचा ) तळ गाठणारा तो तळीराम. गोवा राज्यातील अन्य कुणाच्या वाट्याला अच्छे दिन येवो ना येवो तळीरामांच्या वाट्याला मात्र अच्छे दिन येणार हे निश्‍चित.

टॅग्स :dramaliquordrinksaptarang