माझं पहिलं पुस्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

book kavlyanchya kavita

आमच्या संस्थेच्यावतीनं १५ कवितासंग्रह आणि संपादित व इतर पुस्तकांसह शंभर पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झाली आहेत. पहिल्या पुस्तकाची आठवण मात्र अधूनमधून येत असते.

माझं पहिलं पुस्तक

- अरुण शेवते shevatearun@gmail.com

आमच्या संस्थेच्यावतीनं १५ कवितासंग्रह आणि संपादित व इतर पुस्तकांसह शंभर पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झाली आहेत. पहिल्या पुस्तकाची आठवण मात्र अधूनमधून येत असते. आपला तो जडणघडणीचा काळ असतो. आपण फक्त प्रवाहात पोहत असतो, किनारा माहीत नसतो आणि प्रवाहाची खोलीही आपल्याला ठाऊक नसते. माझी तर पहिल्यापासून मुक्त जगण्याची संकल्पना, त्यामुळे कुठल्याच गोष्टीला धरबंद नव्हता. साधारण १९७५च्या सुमारास मी कविता लिहायला सुरुवात केली. शिक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष; पण कवितेकडे मुळापासून ओढा. पुस्तकं वाचणं, लेखक - कवींना भेटणं, रात्र रात्र जागरण करणं, उन्हं अंगावर आली की जाग यायची असा तो काळ. स्थानिक वृत्तपत्रांतून आणि अविनाश डोळस यांच्या मासिकांमधून अनेक कविता प्रकाशित झाल्या.

‘माझ्या घरावर बसणाऱ्या माकडाला

मी इतिहासाचे संदर्भ सांगितले

तेव्हा त्याने

आपली शेपटी कापून दिली

इतिहासाचा संदर्भ पुरा होण्यासाठी...’

सत्यकथेत प्रसिद्ध झालेली ही माझी एकमेव कविता. त्या वेळी झालेला आनंद आजही आठवतो. सत्यकथेचा अंक घेऊन आमच्या शिक्षकांना भेटलो. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या ‘वाणी’ या कार्यक्रमात अनेक वेळा कविता वाचण्याची संधी दिली. शे-दीडशे रुपये मिळायचे.. पण माडगूळकरांबरोबर होणाऱ्या गप्पांचा आनंद वेगळाच. कार्यक्रम झाला की माडगूळकर मला इराण्याच्या हॉटेलवर चहा प्यायला घेऊन जायचे. आमच्या कॉलेजच्या नियतकालिकात डॉ. सदानंद मोरे यांनी फोटोसह ‘वाचे बरवे कवित्व’ या शीर्षकासह दहा कविता छापल्या. सगळीकडून मला चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यादरम्यान ‘स्वामी’कार रणजित देसाई यांच्याशी स्नेह जडला. त्यांच्या कोवाड या गावी अधूनमधून जात असे, त्यांना कविता वाचून दाखवत असे.

‘५०८९ शेरकर लेन, माळीवाडा, अहमदनगर’ हे माझ्या आजोळचं घर. मला घरात कधी झोप येत नसे. माझ्या आईने अंगणात माझ्या उंचीएवढा मोठा ओटा बांधून घेतला, त्या ओट्यावरच मी झोपत असे. दिवसभर मला कविता सुचत नसत; पण रात्री कविता सुचायच्या. मी उशाशी वही आणि पेन घेऊन झोपत असे. रात्री कविता सुचली की लिहून काढायचो. असा तो धुंदीचा काळ.

मी अकरावीला होतो. कॉलेजमधून घरी येताना रस्त्यावर मरून पडलेला कावळा पाहिला आणि अस्वस्थ झालो. मनात विचार आला, त्या कावळ्याला जर भाषा येत असती, तर तो माणसांविषयी काय म्हणाला असता? दिवसभर हेच विचारचक्र. दुसरं काही सुचत नव्हतं. त्या सात-आठ दिवसांत मध्यरात्री सगळ्या कविता लिहिल्या.

जवळजवळ ५५ कविता. त्या सगळ्या कवितांना शीर्षक दिलं ‘ कावळ्यांच्या कविता’ आणि त्या दरम्यान रात्रीच्या वेळी इतरही कविता लिहिल्या, त्या कवितांना शीर्षक दिलं ‘काही कविता कावळ्यांच्या नावाने’. नंतर महिन्याभरातच कविता संग्रहाची प्रत तयार झाली. त्यावेळेस वर्तमानपत्रांत जाहिरात आली होती - पहिल्या कविता संग्रहाला सरकारचं अनुदान मिळून पुस्तक प्रसिद्ध होणार. पुस्तक तयार झालं; पण प्रस्तावना कोणाची घेणार ? नरहर कुरुंदकर माझ्या घरी आले होते, त्यांच्याशी स्नेह जुळला होता. त्यांना प्रस्तावनेसाठी कवितासंग्रह पाठवून दिला. महिनाभरातच त्यांची प्रस्तावना आली. प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं,

‘माझे तरुण मित्र अरुण शेवते यांचा व माझा परिचय अगदी ताजा आहे. एका कार्यक्रमानिमित्त परवा नगरला गेलो होतो, तेव्हा अगदी अनपेक्षितपणे या कवीचा व माझा परिचय झाला. तरुण वयात स्वाभाविक असणारा मनाचा स्वप्नाळू भावप्रधान आकार त्यांच्या स्वभावाला आहे. मी जीवनात भावुक मनोवृत्तीचंही महत्त्व मानतो; पण भावनाप्रधानतेमुळे गुंतागुंतीचं जीवन कवी साधं सरळ सोपं मानू लागतात आणि वास्तवतेच्या कठोर सत्यस्पर्शाला मुकतात, याची मला नेहमी खंत वाटत आलेली आहे. अरुण शेवते यांच्या कविता वाचत असताना मला पुन्हा एक आनंदाचा धक्का बसला. हा कवी जितका भाबडा आणि भावुक आहे, तितकाच वास्तवाला सामोरं जाताना सत्याचा जाणीवपूर्वक शोध घेणारा जिज्ञासू भक्तही आहे, असं दिसून आलं. जो मानवी जीवनाचा जिज्ञासू भक्त आहे, त्याच्या स्वप्नाळूपणाबाबत माझी भूमिका संपूर्णपणे स्वागताची आहे.

शेवते यांनी आपल्या कवितेचा फार मोठा भाग कावळ्यांना दिला आहे. कावळ्यांचा इतका तपशिलाने आपल्या कवितेत विचार करणारा हा पहिलाच कवी आहे. या कवितांच्या मधील कावळा हा केवळ प्रतीक नाही, निमित्त कावळ्याचं करून माणसांच्या विशिष्ट वर्गाविषयी बोलण्याचा प्रयत्न नाही. कितीही प्रयत्न केला तरी प्रतीकांना एकपदरीपणा टाळता येत नसतो. जसा हा कावळा केवळ प्रतीक नाही. केवळ पक्षी म्हणून कावळ्याचं जे काही स्वरूप असेल ते असो. पण, कावळ्यांना संस्कृतीत अनेक सांकेतिक संदर्भ प्राप्त झालेले आहेत. हा कावळा संस्कृतीचे सारे संदर्भ चिकटलेला, संस्कृतीशी अपरिहार्यपणे संलग्न असणारा पक्षी आहे. पक्षी, सांस्कृतिक संकेत, प्रतीक आणि या साऱ्यांसह असणारं जीवनभाष्य यांना एकरूप करून हा कावळा अस्तित्वात आलेला आहे. कावळ्यांच्या विषयी आम्ही माणसं काय म्हणू इच्छितो हा भाग पार्श्वभूमीत ढकलून, जर हे कावळे मानवी संस्कृती मान्य करून माणसांच्या भाषेत बोलू लागले तर काय म्हणतील, हे या कवितेने सांगितलेलं आहे.’

कुरुंदकरांच्या प्रस्तावनामुळे माझा आनंद गगनात मावेना. पुस्तकाच्या मनोगतात मी लिहिलं,

‘जगात जोपर्यंत कावळा कोकिळेची अंडी उबवील, तोपर्यंत जग सुंदर आहे. ज्या दिवशी कावळा कोकिळेची अंडी उबवायचं नाकारेल, त्याच दिवशी जगाच्या अंतास सुरुवात होईल. ते होऊ नये असं वाटत असेल, तर झाडांनी निष्पर्ण झालं तरी आपल्या देहावर कावळ्यांची घरटी जगवायला हवीत. एकदा अशी श्रद्धा माणसामध्ये निर्माण झाली की, तो माणूस वाळवंटात गेला तर खजुराची झाडं लावील, आसाममध्ये गेला तर चहाचे मळे पिकवील आणि कुठंच रहायला जागा मिळाली नाही, तर जिथे धर्मशाळेचं बांधकाम चालू असेल, तिथं तो गवंडी म्हणून जाईल.’

पुस्तकाला अनुदान मिळालं. अनिल मेहतांकडे पुस्तक प्रकाशनासाठी आलं. बेळगावचे प्रख्यात चित्रकार के. बी. कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ आणि रेखाचित्रं पुस्तकाला लाभली. रणजित देसाई, माधवी देसाई यांनाच मी पुस्तक अर्पण केलं.

पुस्तकावर कॉपीराइट लिहिताना मनात विचार आला, आपल्या या सामाजिक कविता आहेत. आपण कवी आहोत. सामाजिक जाणिवेतून कविता लिहिल्या; पण प्रत्यक्ष आयुष्य जगताना सामाजिक जीवनात आपला काही सहभाग नाही. तेव्हा कॉपीराइट म्हणून आपलं नाव कशाला हवं ? तर तरुणपणापासून आपलं आयुष्य समाजासाठी झोकून देणाऱ्या बाबा आमटे यांचंच नाव कॉपीराइट म्हणून हवं. बाबांच्या सामाजिक कवितेने आणि त्यांच्या विचाराने भारावलेपण मनात होतं. तेच कागदावर उमटलं. बाबांना न कळवता पुस्तकावर © बाबा आमटे, आनंदवन, वरोरा असं लिहिलं. मेहतांनी पुस्तक प्रकाशित केलं. (१९८० मध्ये) पुस्तकाचं मानधन मला दिलं. कॉपीराइट बाबांचा असल्यामुळे मी मानधनाची मनीऑर्डर त्यांना केली आणि बाबांना पुस्तक आणि पत्र पाठवलं. बाबांनी मला कागदाच्या चिठोऱ्यावर इंग्रजीत आणि मराठीत पत्र लिहिलं. विकास आमटे यांनी मला त्यासोबत लिहिलं,

‘तुझं अप्रतिम पुस्तक बाबांच्या उशाशीच होतं, तथापि त्यांच्या डोळ्यांना मध्यंतरी झालेल्या अपघातामुळे वाचन जवळपास बंद होतं. आज काय मूड आला माहीत नाही, अत्यंत परिश्रमाने त्यांनी काही ओळी खराब कागदावर खराब पेनने खरडल्यात.’

बाबा आमटेंनी पत्रात लिहिलं,

‘प्रिय चिरंजीव अरुणजी,

कावळ्यांच्या कविता वाचल्या. माय बेड बिकम माय कॉफिन. शवपेटीतल्या मुडद्यासारखा अंथरुणावर पडून असतो. तुमच्या कविता वाचल्यानंतर लक्षात आलं, हे आपलं अंथरूण हे कॉफिन नसून गर्भाशय आहे. तुमच्या कवितेने गाणं म्हणायला उन्हाचा डफ घेतला आहे. रस्त्यावरच्या जखमेत आयुष्य भरत जाणारा मी. तुमच्या कवितेने जाणीव करून दिली - कुणाचीच नाही. तुझी जखम तुझी जखम, कुणाचीच नाही. आधीच महारोगाबद्दल दूषित ग्रह. पुन्हा महारोग होतो स्वप्नांचा हे कशासाठी? विश्वासाच्या अमाप कविता तुमच्या लेखणीतून उतरतील ही खात्री. सावल्यांच्या महालात तिचं बस्तान नाही हेही कळलं. कवितांचे सारे अधिकार मला दिलेत, धन्यवाद. म्हणूनच हे धारिष्ट्य करत आहे.

- बाबा आमटे’

इंग्रजीत त्यांनी लिहिलं,

‘My dear Arun,

I will keep the tears of your crow in my memory. There is peace in your pain and freedom in your tears. Belly hunger of black crows can not be satisfied with dreams. Your pen is marked for bigger and better things.

Yours,

Baba Amte’

बाबांनी पुस्तकाचं कॉपीराइट स्वीकारलं, याचा खूप आनंद झाला. माझ्या या पहिल्याच कविता संग्रहाला राज्य पुरस्कार लाभला. आज या गोष्टीला ४३ वर्षं झाली. या ४३ वर्षांत भिंतीवर राज्य पुरस्काराची मोहोर आहे आणि मनात बाबा आमटे यांचं मला आलेलं हे पत्र आहे.

(लेखक ‘ऋतुरंग’ या प्रकाशनसंस्थेचे संचालक आणि ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाचे संपादक आहेत.)

टॅग्स :Booksaptarang