esakal | बाटलीतला राक्षस...!
sakal

बोलून बातमी शोधा

Terrorist

बाटलीतला राक्षस...!

sakal_logo
By
अरुण तिवारी tiwariarun@gmail.com

दहशतवाद ही आधुनिक जगातील सर्वांत मोठी आपत्ती मानावी लागेल. सर्वप्रकारच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक सुधारणा देखील हे संकट रोखण्यात असमर्थ ठरल्या आहेत. काही सुरक्षित ठिकाणांवर दबा धरून बसलेला दहशतवाद त्याच्या मनात येतं तेव्हा अन्य देशांत धुमाकूळ घालत असतो. यामुळं जगभरातील संस्कृती वेळोवेळी घायाळ झालेल्या पाहायला मिळतात.

तब्बल वीस वर्षांच्या संघर्षानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानातून घेतलेली माघार हेच सत्य अधोरेखित करणारी आहे. आजही आपल्या देशातील आर्थिक स्रोत हे मोठ्या प्रमाणावर दहशतवाद विरोधी लढ्यासाठी खर्च होताना दिसतात. आपल्या देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी फार मोठी रक्कम खर्च होते. जगातील या सैतानी शक्तींचा भारत पुन्हा लक्ष्य झाला तर काय होईल? खरं तर याचा विचार देखील करवत नाही.

जागतिक राजकारणाचा विचार केला तर भारत मोठ्या नाजूक वळणावर उभा आहे. आज आपण विश्वास ठेवावेत असे फार कमी मित्र आपल्या सभोवताली आहेत. लहान आणि मोठ्या शत्रूंनी आपल्याला वेढलं आहे. यातील काहीजण त्यांचेच परस्परांचे शत्रू आहेत. ते आता फक्त योग्य संधीची वाट पाहत आहेत.

पाश्चिमात्यांचे प्रभुत्व असलेल्या जगाची ही अखेर आहे का? याच जगानं आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियाई देशांत वसाहतींचे राज्य आणलं होतं. या शक्तींचा जन्म नेमका कधी झाला? आणि त्या अजिंक्य कधी बनल्या? या सगळ्या प्रश्नांचा विचार करताना आपल्याला विचारसरणीचे चष्मे काढून ठेवावे लागतील. आणि त्यांना वेगळी नावे दयावी लागतील. १९६८ मध्ये २२ जुलैला आधुनिक दहशतवादाचा जन्म झाला. पॉप्युलर फ्रंट फॉर दि लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन (पीएफएलपी) या संघटनेनं रोमहून तेल अवीवच्या दिशेनं जाणाऱ्या विमानाचं अपहरण केलं होतं. यानंतर विमान अपहरणांचं सत्रच सुरू झालं. विमानातील प्रवाशांना ओलिस ठेवून पॅलेस्टिनी दहशतवाद्यांची सुटका करण्याचा एक सिलसिलाच सुरू झाला. इस्राएलच्या तुरुंगांत कैद असलेल्या अनेक दहशतवाद्यांची याच मार्गानं पॅलेस्टाइनने सुटका केली. पण हे सगळे १९६८ नंतरच का घडले? दुसऱ्या जागतिक महायुध्दानंतर जेत्या राष्ट्रांनी पॅलेस्टाइनच्या भूमीचा वापर करून इस्राएलची निर्मिती केली. पुढं पॅलेस्टाइननेही अरब देशांना हाताशी धरून ही भूमी परत मिळविण्याचा बराच प्रयत्न केला पण त्यात त्यांना फारस यश आलं नाही. बलाढ्य अशा इजिप्तचा १९६७ साली छोट्याशा इस्राएलनं पराभव केला तेव्हा पॅलेस्टाइनला खऱ्या अर्थानं समजलं की पारंपरिक युद्धाचा काळ संपला असून दहशतवादाच्या नव्या संस्कृतीचा जन्म झाला आहे.

दहशतवादाचा पुढचा अवतार हा १९७२ मध्ये पाहायला मिळाला. तेव्हा पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी म्युनिक ऑलिंपिकमध्ये अकरा इस्राएली खेळाडू आणि जर्मन पोलिसांना ठार मारलं होतं. या घटनेनं खेळाच्या वार्तांकनासाठी जमलेल्या जागतिक माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं. २३ जून १९८५ ला खलिस्तानी दहशतवाद्यांनी कॅनडाहून भारताच्या दिशेनं झेपावलेल्या कनिष्क विमानात आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणले. यात ३२९ लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भविष्यातील हल्ल्यांचा एक वेगळाच पॅटर्न तयार झाला. २१ डिसेंबर १९८८ रोजी लिबियाच्या दहशतवाद्यांनी लंडनहून न्यूयॉर्कच्या दिशेनं जाणाऱ्या विमानाला अशाच पद्धतीनं हवेतच नष्ट केलं होतं. यात २७० लोकांचा हकनाक बळी गेला होता. २४ डिसेंबर १९९९ रोजी इंडियन एअरलाइनच्या आयसी-८१४ या विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. पुढे तेच विमान अफगाणिस्तानातील कंदहार येथे नेण्यात आलं.

भारताला १७६ प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात मौलाना मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुस्ताक अहमद झारगर या क्रूर दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती. या घटनेत २५ वर्षांच्या रिपेन कट्याल या प्रवाशाला दहशतवाद्यांनी आधीच गोळ्या घालून ठार मारलं. २००१ मध्ये १ सप्टेंबरला अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेला हल्ला या सगळ्यांचं शिखर मानावं लागेल. यानंतर अमेरिकेनं दहशतवादाविरोधात युद्ध छेडलं. इराक आणि अफगाणिस्तानवर त्यानंतरच हल्ले झाले. लिबियाचे सर्वेसर्वा मुअम्मर गडाफी यांना त्यानंतरच भर रस्त्यावर गोळ्या घालून ठार करण्यात आलं. ओसामा-बिन-लादेनलाही पाकिस्तानमध्ये पकडल्यानंतर अशाच पद्धतीनं गोळ्या घालण्यात आल्या. इराकच्या सद्दाम हुसैन यांच्यावर देखील अशाच पद्धतीनं खटला भरून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. इराणचे जनरल कासीम सुलेमानी यांच्यावरही ड्रोन हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आलं. आता पुन्हा अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात सोपवून अमेरिकेनं तिथून पळ काढला आहे. जसं काही तिथं काहीच घडलं नाही असं दाखवविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.

अफगाणिस्तान हा जगापासून फार वेगळा प्रांत नाही. दहशतवादाचा कर्करोग जगभर पसरला आहे. जगातील उदयोन्मुख नेते, चीन आणि रशियासारख्या देशांनीही याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. हा राक्षस बाटलीत बंद झाला नाही तर याचे दुष्परिणाम त्यांच्या लोकांना देखील भोगावे लागतील. ही बाब त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. यामुळे त्यांच्या हिताला देखील बाधा येऊ शकते. तालिबाननं अफगाणिस्तानसारखा देश गिळंकृत केल्यानंतर आता इसिस, बोको हराम आणि अल-कायदासारख्या संघटना देखील गप्प बसणार नाहीत. हे निश्चित आहे. ते देखील आतापर्यंत ज्या ठिकाणांवर दावा सांगत होते, ती परत मिळविण्याचा प्रयत्न करतील. त्यांची करणी आणि कथनी दोन्ही अमानवीय आणि क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या आहेत. आता भारताने देखील या आधुनिक जगात कोणीही आपला मित्र नाही ही बाब लक्षात घ्यायला हवी. आताच्या या जगात एकाचा तोटा हा दुसऱ्याचा फायदा असतो. प्रत्येक गोष्टीकडं व्यवहाराच्या नजरेतून पहिलं जातं. थोर इंग्रजी कादंबरीकार एरिक आर्थर ब्लेअर यांच्या भाषेत सांगायचं झालं तर " दहशतवादाचं ध्येय हे दहशतवादच असतो. शोषणाचं ध्येय हे शोषणच असते. हेच तत्त्व हिंसाचार आणि सत्तेलाही लागू पडतं. आता तुम्हाला मी काय म्हणतोय हे लक्षात आलं असेल. आता आपल्याला प्रत्येक गोष्टीला शुगरकोटेड करता येणार नाही. काही गोष्टींना आपल्याला निश्चित नावं द्यावी लागतील, त्यांचं खरं रूप जाणून घ्यावं लागेल. त्याचा धोका देखील मान्य करावा लागेल. १.४ अब्ज लोकसंख्या असलेला आपला हा देश हे नक्कीच करू शकेल.

(सदराचे लेखक ज्येष्ठ वैज्ञानिक आणि विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी)

loading image
go to top