esakal | विविध साथी आणि ‘सर्वशक्तिमान’ डास

बोलून बातमी शोधा

Dr Ronald Ross
विविध साथी आणि ‘सर्वशक्तिमान’ डास
sakal_logo
By
अरुण तिवारी tiwariarun@gmail.com

कोणतीही जागतिक साथ कधीच अचानक येत नसते, मलेरिया असो की विषमज्वर, एड्स असो की सार्स किंवा आता आलेला कोरोना, अनेक घातक विषाणू आपल्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेले असतात. आज २५ एप्रिल आहे, म्हणजेच ‘जागतिक मलेरिया दिन’. आपण दरवर्षी या दिवशी विविध उपक्रम राबवत असतो. लोकांमध्ये या आजाराबाबत जागृती करण्याबरोबरच त्यावर नियंत्रण कसे ठेवले जावे, याचे धडेही दिले जातात. डासांच्या दंशामुळे होणारा मलेरियासारखा हा आजार इतर संसर्गांसाठी देखील कारणीभूत ठरतो. कधीकाळी युरोपियन देशांच्या उष्णकटिबंधीय पट्ट्यातील वसाहती असणाऱ्या देशांमध्ये या आजाराने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यामध्ये आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही देशांचा समावेश होता.

मलेरियासाठी कारणीभूत असणारे परजीवी हे अनेक वर्षे संशोधकांसाठी एक मोठे गूढ बनले होते. कारण डास आणि मानवी शरीरामध्ये ते विविध रूपांमध्ये आढळून येतात. हे गूढ उलगडण्याचे काम उत्तराखंडमधील अल्मोडा येथे जन्मलेले संशोधक डॉ. रोनाल्ड रॉस यांनी केले. रॉस यांचा जन्म हा ब्रिटिश लष्करातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या घरी झाला होता.

पुढे रॉस यांच्या वडिलांनी डॉक्टरकीचा पेशा स्वीकारत भारतामध्ये काम करायला सुरुवात केली. याच रॉस यांनी साधारणपणे रात्री माणसाला दंश करणारी ॲनोफेलाइन गटातील डासांची मादी मलेरियाच्या विषाणूची वाहक असल्याचे शोधून काढले. यामुळेच मलेरियाचा प्रसार होत असल्याचेही आढळून आले.

रॉस यांचे संशोधन

मलेरियासाठी कारणीभूत असणाऱ्या परजीवींची मादी डासांमध्ये वाढ होत असल्याचे रॉस यांना आढळून आले. त्यासाठीचा कालावधी हा साधारणपणे आठवडाभराचा असतो. एका छोट्या सुक्ष्मदर्शकाच्या माध्यमातून रॉस यांनी हे संशोधन केले. याच संशोधनाबद्दल १९०२ साली त्यांना नोबेल सन्मान देखील मिळाला होता. रॉस यांच्या सन्मानार्थ हैदराबादेतील उस्मानिया विद्यापीठाने एक प्रयोगशाळा देखील स्थापन केली असून तिचे नाव हे ‘सर रोनाल्ड रॉस इन्स्टिट्यूट ऑफ पॅरासिटॉलॉजी’ असे करण्यात आले आहे. आतापर्यंत मलेरियाच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या चार परजीवींचा शोध घेण्यात संशोधकांना यश आले आहे. यामध्ये पी. फाल्सीपारम (पी.एफ), पी. विव्हॅक्स (पी.व्ही), पी.ओव्हेल (पी.ओ) आणि पी.मलेरियाई (पी.एम) यांचा समावेश होतो.त्यातही मलेरियाच्या साठ टक्के केसेससाठी ‘पी.व्ही’ हा परजीवी कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. ‘पी.ओ’ हा साधारणपणे पश्‍चिम आफ्रिकेमध्ये आढळून येतो. हा परजीवी अनेक वर्षे माणसाच्या शरीरामध्ये जिवंत राहू शकतो त्यामुळे विषाणूचा फैलाव होतच राहतो. ‘पी.एम’ हा दक्षिण अमेरिकेमध्ये आढळून येते. ‘पी.एफ’ हा सर्वाधिक धोकादायक असून तो उष्णकटिबंधीय देशांमध्ये आढळतो. पी.नोलेसी (पी.के) या घटकामुळेही माणसाला संसर्ग होतो. यामुळे प्राण्यांमधील मलेरियाच्या विषाणूची माणसाला बाधा होत असल्याचे दिसून आले आहे. हे सगळे रक्ताच्या एका थेंबाचे सुक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करून शोधता येते.

मलेरियावरील उपचाराचा विचार केला तर ‘ क्वीनाईन’ हे औषध सर्वाधिक परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. त्याचा जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या औषधाच्या यादीमध्ये समावेश आहे. हे औषध १८२० मध्ये तयार करण्यात आले होते. संशोधकांनी तब्बल दोनशे वर्षांनंतर ‘आर्टीमिसिनीन’ हे औषध शोधून काढलं. हे औषध बाधित रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मोडियम या परजीवीचे प्रमाण कमी करू शकते असेही आढळून आले आहे. भारतामध्ये यावर हायड्रोक्सिक्लोरोक्विन हे कृत्रिम औषध मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येते. जागतिक निर्यातीमध्ये त्याचा वाटा ७० टक्के एवढा आहे. भारताचा विचार केला तर औद्योगिक आणि खाणकाम मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या राज्यांमध्ये मलेरियाचा अधिक प्रसार होत असल्याचे दिसून आले.

यामध्ये पश्‍चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा या राज्यांचा समावेश होतो. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाना आणि दिल्ली या कृषी औद्योगिक पट्ट्यालाही मलेरियाचा मोठा धोका असतो. पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनाही डासांचा दंश होत असल्याचे दिसून आले आहे.

अद्याप प्रभावी लस नाहीच

डासांचे पूर्ण उच्चाटन किंवा त्यांचा दंश होऊ न देणे हा मलेरियापासून स्वतःला वाचविण्याचे प्रभावी उपाय आहेत. भारताने २०१६ मध्ये मलेरियाच्या उच्चाटनासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला यासाठी २०३० चे ध्येय निश्‍चित करण्यात आले होते. यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमाचा निधी वाढविण्यात आला. मलेरियाविरोधातील लढाईमध्ये ओडिशाने आघाडी घेतली होती. या लढाईमध्ये मच्छरदाणी हे सर्वात प्रभावी शस्त्र ठरले. सर्वसामान्यांना पाचशे रुपयांत मिळणारी आणि मळल्यानंतर देखील धुवून वापरता येणारी ही जाळी प्रभावी औषध ठरली. मलेरियावर प्रभावी अशी एकही लस आतापर्यंत तयार करता आलेली नाही. याला अपवाद फक्त लंडनमधील मॉसक्विरिक्स या लशीचा. सध्या जगभरात उपलब्ध असलेली मलेरियावरील ही एकमेव लस म्हणावी लागेल. यासाठी रुग्णाला लसीचे चार डोस घ्यावे लागतात पण एवढे करून देखील त्याची प्रतिकारक्षमता केवळ ३० टक्के एवढीच राहते.

तोपर्यंत आजार होणारच

मलेरियाच्या विस्तारित कुटुंबामध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका, पिवळा ताप आणि जपानी हिवताप या आजारांचा देखील समावेश होतो. जनावराला चावा घेतल्यानंतर त्याच कीटकाने माणसाला दंश केल्यानंतर पसरणाऱ्या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो. यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय आणि सामाजिक एकजूट खूप महत्त्वाची असते. जगातील कोणतीही जाळी आज तरी डासांना रोखू शकत नाही. शिवाय डास देखील माणसाला दंश करण्यापूर्वी संपत्ती, बुद्धिमत्ता किंवा त्या व्यक्तीच्या समाजातील स्थानाचा विचार करत नसतात. तुम्ही फक्त मानव प्राणी आहात हीच बाब त्यांना चावा घेण्यासाठी पुरेशी असते. अनिर्बंधपणे वाढत जाणाऱ्या झोपडपट्ट्या आणि कचऱ्यांच्या ढिगांमुळे आजमितीस कोणताही समाज सुरक्षित नाही. लोकच जोवर सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूक होत नाही तोपर्यंत डासांकडून संसर्गजन्य आजारांचे वितरण सुरूच राहील.

(सदराचे लेखक वैज्ञानिक आणि विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी )