विज्ञानाचा मानवी चेहरा!

महान संशोधक डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी मांडलेल्या ‘मानवी चेहरा असलेल्या विज्ञाना’च्या संकल्पनेमुळं मी भारावून गेलो होतो.
Scientist
ScientistSakal

महान संशोधक डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी मांडलेल्या ‘मानवी चेहरा असलेल्या विज्ञाना’च्या संकल्पनेमुळं मी भारावून गेलो होतो. कलाम यांनी स्वतः १९९२ साली उभ्या केलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून संरक्षण तंत्रज्ञानाला असाच एक वेगळा आयाम द्यायचा होता. या प्रकल्पात त्यांनी माझी स्वतःचा खास माणूस म्हणून नेमणूक केली होती. या उपक्रमावर काम करत असताना मी विज्ञान क्षेत्रामध्ये जगावेगळं काम करणाऱ्या काही लोकांना भेटू शकलो. त्यांच्या कामामुळं सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम झाला होता. याच प्रोग्रॅमच्या माध्यमातून देशी बनावटीची ह्रदयासाठीची स्टेंट तयार करण्यात आपल्याला यश मिळू शकलं. हे संशोधन देशाच्या जैववैद्यकीय उद्योगामध्ये नव्या पर्वाची नांदी ठरलं.

डॉ. कलाम २००२ साली देशाचे राष्ट्रपती बनले तेव्हा त्यांनी मला अशा विविध क्षेत्रांमध्ये वेगळं काम करणाऱ्या माणसांना जोडण्यासाठी स्वतःचं राजदूत बनविलं होतं. याच उपक्रमामुळं मी प्रसिद्ध संशोधक डॉ.वर्गीस कुरियन यांना भेटू शकलो. यानंतर स्वतः कुरियन यांनीच मला त्यांच्या घरी खास चहासाठी बोलावलं होतं.

डॉ. कुरियन हे माझ्याप्रमाणं मेकॅनिकल इंजिनिअर होते पण त्यांनी संशोधन केलं ते डेअरी तंत्रज्ञानामध्ये. याच प्रक्रियेतून त्यांनी ‘अमूल’ला जन्म दिला. या यशामागचं रहस्य विचारलं असता ते सहजपणे उत्तरले,‘‘ तुम्हाला जर सामान्य लोकांसाठी काम करायचं असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत त्यांच्यासारखं राहायला हवं.’’ असामान्य लोकं म्हणजे काय तर अधिक काम करणारी सामान्य लोकंच होत, असं त्याचं स्पष्ट म्हणणं होतं. ते कुरिअन पुढे माझे मार्गदर्शक बनले. डॉ. कुरिअन हे २०१२ मध्ये मृत्यूशी झुंज देत असताना अनेकांनी त्यांना चांगल्या उपचारासाठी नादियाद शहरातील रुग्णालयातून मुंबईला जाण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी मात्र त्याला स्पष्टपणे नकार दिला. आपण १९४९ पासून जिथं काम केलं तिथंच आपल्याला मरायला आवडेल, असं सांगत त्यांनी मुंबईला जाण्यास स्पष्ट नकार दिला.

माशेलकरांना वारसा जपला

मानवी चेहरा असलेला विज्ञान नेमकं काय असतं? लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणणं हे विज्ञानाचं अंतिम ध्येय असतं. मुख्य प्रवाहातील विज्ञानापेक्षाही ते फार वेगळं नसतं खरं तर ते त्याचंच सारतत्त्व असतं. अधिक उत्पादन देणारी, रोगांना प्रतिकार करणारी बियाणे आणि वनस्पती, जीव वाचविणाऱ्या औषधी आणि जीवन सुकर करणारे तंत्रज्ञान खरंतर हाच विज्ञानाचा मानवी चेहरा होय. विज्ञानाच्या याच मानवी चेहऱ्याची जाणीवपूर्वक निवड करायला हवी त्यांवर संशोधकांनी आपल्या हयातीत काम करणं अपेक्षित असतं. ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च’ (सीएसआयआर) या संस्थेचं नेतृत्व करताना डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी हाच वसा पुढं नेला. आताही ते हेच करत आहेत.

आपल्या देशाला विज्ञानाची मोठी परंपरा आहे. देशातील प्रतिष्ठित विज्ञान संशोधन संस्था हाच वारसा पुढे नेताना दिसतात. दि कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (सीएसआयर), इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च (आयसीएआर) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रातील तीन मोठी शिखरं आहेत. या संस्थांनी नेमकं काय केलं आणि काय नाही हा प्रश्‍नच नाही. देशाला आधुनिक करण्यात त्यांचा सर्वांत मोठा वाटा आहे. आज या संस्था देशात नसत्या तर हरित क्रांती झाली नसती आणि कोरोना प्रतिबंधक लसही आपण तयार करू शकलो नसतो. विज्ञान संशोधनाच्या आघाडीवर आपण मोठं काम केलं असलं तरीसुद्धा पाच अब्ज लोक हे आजही दारिद्र्याच्या खाईत खितपत पडलेले असल्याचं वास्तव आपण नाकारू शकत नाही. शक्य असताना देखील विज्ञानानं या सामाजिक समस्यांवर तोडगा का काढला नसेल? याच विज्ञानानं श्रीमंतांची तळी का उचलली असेल? आता तेच त्यांच्या संपत्तीवृद्धीचं इंजिन बनलं आहे. या विज्ञानाच्या माध्यमातून जगातील एक टक्का लोकांकडं दुप्पट संपत्ती एकवटली असून उर्वरित जनता मात्र तळाशीच चाचपडताना दिसते. देशातील एक टक्का लोकांकडे आज चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक संपत्ती असून उर्वरित जनता मात्र पैशांना मोताद आहे. हे विषमतेचं चित्र असे असेल तर मग विज्ञान संस्थांचं काम कुठं गेलं? या माध्यमातून नेमकी कोणाची घरं भरली जात आहेत.

लोकांचं विज्ञानाप्रतीचं आकलन आणि त्यांचा त्यातील सहभाग हे खूप कठीण काम आहे, पण ते करणंही आवश्‍यक आहे. आज कृषी कायद्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी खरंतर उच्चउत्पादन क्षमता असणाऱ्या बियाण्यांचा देखील आग्रह धरायला हवा. केवळ भात पिकाचा विचार केला तर आपल्या देशात ४४ दशलक्ष हेक्टर एवढ्या क्षेत्रातून ११० दशलक्ष टन एवढ्या भाताचं उत्पादन होतं. हेक्टरी हे उत्पादनाचं प्रमाण २.४ टन एवढं आहे.

चीनमध्ये ते ४.७ टन, ब्राझीलमध्ये ३.६ टन एवढं आहे. उत्पादन वाढलं तर उर्वरित जमीन अन्य पिकांच्या लागवडीसाठी उपलब्ध होऊ शकेल. यामुळे जमिनीचा दर्जा तर सुधारेलच पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकेल.

आज भारताला तेलबिया उत्पादनाच्या क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. आतापर्यंत आपण स्वस्तातील तेल खरेदीवर खूप पैसा खर्च केला असून या तेलात अन्य तेल मिसळून त्याची ब्रँडेड तेल म्हणून आपण विक्री केली त्याचबरोबर त्यात पोषणमूल्ये असल्याचा खोटा दावाही केला. खतांच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. ज्या आसाममध्ये नैसर्गिक वायूचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत तेथील खत कारखाना कायमस्वरूपी बंद पडला. केवळ तंत्रज्ञानाच्याबाबतीत आपण मागास असल्याने युरिया निर्मिती प्रकल्प चालविणे कठीण झाले. काही मूठभरांच्या हातात गेलेलं तंत्रज्ञान लोकांच्या अडचणी सोडविण्यापेक्षा पैसा कमावण्याचं माध्यम बनलं.

हे माणसाच्या हातात

टिश्‍यू कल्चर तंत्रज्ञानामुळं देशातील सफरचंद बागायतीमध्ये आमूलाग्र स्थित्यंतर घडून आलं. भारतातील शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फायदा झाला. विज्ञान सामान्यांना कसं आधार होऊ शकतं, याचं हे उत्तम उदाहरण मानावं लागेल. याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारत रवांडाला देखील मदत करतो आहे. याआधी या देशाला अन्य देशांतून ही फळे आयात करावी लागत होती. काजू शेतीच्या बाबतीत देखील भारत केनियाला हातभार लावू शकतो. ‘नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट’, कर्नालनं विकसित केलेलं पशूंच्या क्लोनिंगचं तंत्रज्ञान पशुपालन उद्योगासाठी वरदान ठरू शकतं. विज्ञानाचा प्रवाह नेमका कोण राखू पाहतंय? थोडे हितसंबंध असणारे लोक या सगळ्या वैज्ञानिक गोष्टींवर नियंत्रण ठेवू पाहात आहेत. असं करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? चांगलं जीवनमान जगण्याबाबत सामान्य लोकांमध्ये असलेली उदासीनता, बोगस विचारधारा, बदमाष नेतेमंडळी आणि फसवणूक करणाऱ्या उद्योजकांसमोर त्यांनी स्वीकारलेली शरणागती यामुळं हे सगळं घडतं आहे. खरंतर कोणत्याही खात्रीशिवाय विज्ञानानं काम करणं अपेक्षित असून खुलेपणानं क्षितिजाच्याही पलिकडच्या गोष्टींचा त्याला वेध घेत आला पाहिजे. शेवटी विज्ञानाला मानवी चेहरा देणं हे माणसाच्या हातात आहे.

(सदराचे लेखक ज्येष्ठ वैज्ञानिक असून विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत. )

(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com