प्रेमस्पंदनं (अरविंद जगताप)

अरविंद जगताप jarvindas30@gmail.com
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

प्रेमावर जेवढं आपण लिहितो, तेवढं नितळ प्रेम आपण करू का शकत नाही? किल्ले, झाडं, तोफांवरसुद्धा बदाम काढून एकमेकांचं नाव कोरणारे प्रेमवीर आपण बघतो. मग ते किल्ल्याच्या भिंतीवर निर्लज्जपणे कोरून ठेवलेलं प्रेम पुढं कुठं जातं? प्रेमाला आपण एवढे नियम लावून दिलेत, की ते नियम पाळण्यात सगळा वेळ जातो आणि प्रेम करायचं राहून जातं. "तू हि रे'सारख्या चित्रपटात या विषयावर मला लिहायचं होतं. तेव्हा मला ही गोष्ट खूप अवघड आहे हे जाणवलं. आपण आपल्यातलं प्रेम हरवत जातो. आपलं प्रेमाबद्दल गणित ठरलेलं असतं. बेहिशेबी प्रेम फार कमी वेळा आपण बघतो.

प्रेमावर जेवढं आपण लिहितो, तेवढं नितळ प्रेम आपण करू का शकत नाही? किल्ले, झाडं, तोफांवरसुद्धा बदाम काढून एकमेकांचं नाव कोरणारे प्रेमवीर आपण बघतो. मग ते किल्ल्याच्या भिंतीवर निर्लज्जपणे कोरून ठेवलेलं प्रेम पुढं कुठं जातं? प्रेमाला आपण एवढे नियम लावून दिलेत, की ते नियम पाळण्यात सगळा वेळ जातो आणि प्रेम करायचं राहून जातं. "तू हि रे'सारख्या चित्रपटात या विषयावर मला लिहायचं होतं. तेव्हा मला ही गोष्ट खूप अवघड आहे हे जाणवलं. आपण आपल्यातलं प्रेम हरवत जातो. आपलं प्रेमाबद्दल गणित ठरलेलं असतं. बेहिशेबी प्रेम फार कमी वेळा आपण बघतो.

चित्रपट लिहितालिहिता किंवा या क्षेत्रात काम करताकरता एक गोष्ट लक्षात येतं, की आपल्याला या क्षेत्रात अजून खूप काही शिकावं लागेल. कारण हे वेगानं बदलत जाणारं माध्यम आहे. नव्या पिढीची भाषा वेगात बदलतेय. जुन्या चित्रपटांचे संवाद आणि आजच्या चित्रपटांचे संवाद यात किती फरक पडलाय ते आपण बघतोच. लेखक म्हणून सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे. संवाद ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची असते. संवाद हरवत चाललाय या विषयावर कितीतरी संवाद लिहिले जातात, परिसंवाद घेतले जातात. खरंतर आपण बोलकी माणसं आहोत. संवाद एवढा सहजासहजी हरवू शकत नाही. माध्यम बदलू शकतं. याचं सगळ्यात मोठं उदाहरण प्रेमाचं आहे. या विषयावर जगभर असंख्य चित्रपट झाले. होतच आहेत. प्रेम हा व्यक्त होण्यासाठी सगळ्यात सोपा विषय आहे का?
प्रेमावर जेवढं लिहिलं जातं तेवढं आपल्याकडे प्रेम केलं जातं का? स्वतःकडे बघूनसुद्धा मला असं वाटतं. प्रेमावर जेवढं आपण लिहितो, तेवढं नितळ प्रेम आपण करू का शकत नाही? बघायला गेलो तर प्रत्येक अनाथाश्रम भरलेला आहे. दरवर्षी शंभर तरी प्रेमकथा असणारे चित्रपट भारतात निर्माण होतात. किल्ले, झाडं, तोफांवरसुद्धा बदाम काढून एकमेकांचं नाव कोरणारे प्रेमवीर आपण बघतो. मग ते किल्ल्याच्या भिंतीवर निर्लज्जपणे कोरून ठेवलेलं प्रेम पुढं कुठं जातं? तुम्ही खूप ठिकाणी बघा, जरा कुठं जोडपी बसलेली दिसली, की कुल्फी, चणे, पेरू विकणारे समोरच येऊन बसतात. तुम्ही काहीतरी विकत घेतल्याशिवाय ते हलतच नाहीत. प्रेमाला एवढे शत्रू फार कमी ठिकाणी असतील. प्रेमाला आपण नैतिक चौकट देऊन त्याची मोजमापं घेण्यात धन्यता मानत असतो. आपली पावित्र्याची व्याख्या इतरांच्या प्रेमाला फिट्ट बसते का, हे तपासत राहतो. प्रेमाला आपण एवढे नियम लावून दिलेत, की ते नियम पाळण्यात सगळा वेळ जातो आणि प्रेम करायचं राहून जातं.

"तू हि रे'सारख्या चित्रपटात या विषयावर मला लिहायचं होतं. तेव्हा मला ही गोष्ट खूप अवघड आहे हे जाणवलं. आपण आपल्यातलं प्रेम हरवत जातो. काळाच्या ओघात याची जाणीव झाली. खूपदा आपण कर्तव्य केल्यासारखं प्रेम करत असतो. तसंही प्रेम आपल्याकडं खूप रुटीन असावं अशी अपेक्षा असते. म्हणजे एखाद्या मुलीनं मुलाला प्रपोज केलं, तर ती खूप धक्कादायक बाब असते. आपलं प्रेमाबद्दल गणित ठरलेलं असतं. बेहिशेबी प्रेम फार कमी वेळा आपण बघतो. प्रेमात आजही काही अलिखित नियम असतात आणि त्या नियमाप्रमाणंच प्रेम करायचं अशी परंपरा आपण पाळत असतो. "तू हि रे'मधली नायिका म्हणते ः "एक लक्षात ठेवा- जो स्वतःच्या वहीत लिहितो तो अरेंज्ड मॅरेज करतो. जो बेंचवर लिहितो तो लव्ह मॅरेज करतो.' किंवा नियमाचा भाग कसा असतो ते सांगताना नायिका म्हणते ः "माझी आजी म्हणते नवरा हा प्रसादाच्या शिऱ्यासारखा असतो. रवा कोणता आहे? तूप किती आहे? गोड आहे का नाही? त्यात मनुका आहे का नाही? असं विचारायचं नसतं. मिळालं त्यात समाधान मानायचं.'

आपण प्रेम का केलं नाही हे आपल्या पतीला सांगताना ती म्हणते ः "प्रेम करायचं राहून गेलं. गावात माझ्या दोन मावश्‍या, तीन आत्या, चार काका, एक मामा आणि पंचवीस चुलत मावस आणि मामेभाऊ राहतात. आता एवढे सगळे लोक बघायला असल्यावर कुणाची हिम्मत होणार माझ्याकडं बघायची? म्हणून मग देवळात जाताना चप्पल बाहेर काढून ठेवतात तसा प्रेम करायचा विचार काढून ठेवला.'
प्रेमावर एवढ्या कथा आल्या; पण आपली प्रेम करण्याची पद्धत मात्र रुटीनच असते. कित्येक वर्षं गजरा हेच प्रतीक होतं प्रेम व्यक्त करण्याचं. अजूनही प्रेम व्यक्त करायला "आय लव्ह यू'च्या पुढं गाडी फार सरकत नाही. आपण साधं मराठीत "आय लव्ह यू'सारखं एखादं वाक्‍यपण रूढ करू शकलो नाही. किती मुलं मुली "माझं तुझ्यावर प्रेम आहे' असं म्हणत असतील? आपल्या भाषेत प्रेम व्यक्त करता न येणं हीसुद्धा खूप मोठी शोकांतिका आहे. आजही बघा नवरा गाडीवर बायकोच्या मागं बसला तर त्याला गाढवावर बसवलाय आणि मिरवणूक काढलीय असा त्याचा चेहरा असतो. आणि बघणारेही असंच बघतात. आजही बायकोने काही क्षण पर्स हातात दिल्यावर नवऱ्याचा चेहरा कसा होतो बघा. अगदी रस्त्यानं नवरा-बायको हातात हात घेऊन जात असलेलेही सहन होत नाहीत बऱ्याच लोकांना. एकतर आपल्याकडे ही हातात हात घेऊन चालण्याची पद्धत नवीन नवीन लग्न झाल्यावर काही महिने असते. तेवढंसुद्धा सहन होत नाही लोकांना. लोक म्हणतात ः "बायकोचा हात धरून चालायची काय गरज आहे? ती काय पळून जाणार आहे का?' पण मुळात पळून जाईल एवढ्याच कारणानं हात धरायचा का? आणि जी पळूनच जाणार आहे अशी खात्री असेल तिचा कोण कशाला हात धरेल? पण आपल्याकडे साध्या साध्या गोष्टीवर आक्षेप खूप. त्यात एकनिष्ठ असण्याचा नियम. एकनिष्ठ असणारी माणसं मिरवत नसतात. आणि बऱ्याच नवऱ्यांना बघा. त्यांचं बायकोशी एकनिष्ठ असणं हे प्रीतीपेक्षा भीतीमुळं असतं. स्वीमिंग पूलमध्ये हात-पाय न हलवता काही लोक जसे पायरीला धरून नुसते एका जागी उभे असतात. म्हणून काही ते त्या पायरीशी एकनिष्ठ असतात असं नाही. त्यांची खोल पाण्यात शिरायची हिंमत नसते खूपदा; पण त्यांना पण एकनिष्ठ वगैरे समजतो आपण. प्रेमात असे गोंधळ खूप असतात.

प्रेम मिसिंग असलं की नातं असंच होतं. मग ते ऑफिसच्या कामासारखं होत जातं. आपल्याकडं नवरे बायकांबद्दल केवढे विनोद करत असतात आणि बायका नवऱ्याबद्दल केवढ्या तक्रारी करत असतात. कधी कधी असं वाटतं, की काही बायका नवऱ्याना बाथरूमला वापरायच्या चपलेसारखं समजत असतील. बाथरूमची चप्पल जुनी झाली तरी बदलायचा विचार येतो का मनात? नाही. कारण त्या चपलेच्या क्वालिटीकडं आपण लक्ष देत नाही. उलट यापेक्षा काय बरं मिळणार आहे बाजारात असा विचार करून शांत राहण्यासारखी ही गोष्ट आहे.

शाळेत रोज खाल्लेला डबा मोठं झाल्यावर लक्षात राहत नाही. चोरून कधीतरी खाल्लेला डबा आयुष्यभर लक्षात राहतो. म्हणून आपण चोरून कुणाकडे बघतो ते खूप महत्त्वाचं असतं. प्रेमावर विचार करताना असे स्वतःमधलेच, भोवतालचे खूप विरोधाभास लक्षात येत गेले. लिहिताना भयंकर भीतीदायक गोष्ट एकच असते, की आपण आदर्श नायकाच्या तुलनेत स्वतःचा विचार करायला लागलो की जाम अपराधी असल्यासारखं वाटतं. अर्थात त्याचा फायदाही असतो. आपण काही दिवस बरे वागायला लागतो. आपल्याच विचारांच्या ओझ्यानं. मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. पण राहूनराहून वाटतं आपण प्रेम पाहतो, लिहितो, वाचतो त्यापेक्षा जास्त प्रेम केलं पाहिजे.

आपल्याकडं "बाजीराव मस्तानी'सारख्या कितीतरी प्रेमकथा आहेत. हरणाच्या कातड्याची चोळी हवी हा हट्ट पुरवणारा राम आहे. पार्वतीचा हट्ट पुरवणारा शंकर आहे. मग "स्वयंपाक करणारीच बायको पाहिजे,' हा संस्कार कुठून आला असेल? प्रश्न खूप असतात. नकळत चित्रपटासारख्या माध्यमात आपण व्यक्त होतो. यानिमित्तानं खूप पूर्वी ऐकलेली एक सुंदर गोष्ट आठवते. जशी आठवते तशी सांगतो. गोष्ट महायुद्ध चालू असतानाची. नायिका एका बॉम्ब बनवण्याच्या कारखान्यात काम करते. युद्ध सुरू असल्यानं खूप काम आहे. रात्री उशीर झाला तरी व्यवस्थापक सोडायला तयार नाही आणि त्यात या बिचारीच्या डोक्‍यात बॉम्ब बनवताबनवतासुद्धा सैन्यात असलेल्या आपल्या प्रियकराचे विचार. त्याच्या आठवणी. त्यांनी एकत्र घालवलेले प्रेमळ क्षण. हे सगळं डोक्‍यात असल्यावर कामात लक्ष कसं लागणार? तिच्याकडून बॉम्बची वात लावताना चूक होते. व्यवस्थापक रागावतो. तिला कामावरून हकलून देतो. भर रात्री ती एकटीच निघालीय. विमानं मधूनच आकाशात मोठ्याने आवाज करत जातात. अचानक एक बॉम्ब तिच्या अगदी जवळ येऊन पडतो. ती जागेवरच बसते. कान बंद करून घेते. सगळं काही संपलय. तिच्या डोळ्यासमोर तिचा प्रियकर येतो; पण खूप वेळ होऊनही बॉम्ब काही फुटत नाही. ती डोळे उघडून बघते. बॉम्ब तसाच आहे. ती हलकेच हसते. तिच्या लक्षात येतं. शत्रू राष्ट्रातही आपल्यासारखाच कुणीतरी असणार- जो प्रेमात पडलाय. आपल्या माणसाच्या काळजीनं ज्याचं कामात लक्ष नाही....कथा संपते; पण प्रेमावर खूप मोठं भाष्य करून!

Web Title: arvind jagtap write love article in saptarang