...गंमत असते भारी

मोबाईल नव्हता तो काळ आठवला की खूपदा छान वेळ जातो. मोबाईलमुळं माहितीचा खजिना हाती आला असेल; पण खूप छोट्या छोट्या गोष्टी गायबसुद्धा झाल्या.
Fun
FunSakal

मोबाईल नव्हता तो काळ आठवला की खूपदा छान वेळ जातो. मोबाईलमुळं माहितीचा खजिना हाती आला असेल; पण खूप छोट्या छोट्या गोष्टी गायबसुद्धा झाल्या. खरंतर किती साध्या आणि छोट्या गोष्टींत आपण रमायचो! आकाशात दिसणाऱ्या बगळ्यांना बघून हवेत हात करायचो आणि म्हणायचो, "बगळ्या बगळ्या कवड्या दे" आणि काही वेळानंतर नखांकडं बघायचो. नखांवर पांढरे ठिपके दिसायचे कधी छोटे, छोटे. ते त्या बगळ्यांनी दिलेल्या कवड्या वाटायच्या. छोट्या छोट्या फुलपाखरांच्या मागे फिरायचो, झाडांवर चढायचो. आता शहरांतील किती मुलांना झाडावर चढता येतं? एक मित्र कौतुकानं सांगत होता, "माझ्या मुलाला डायनिंग टेबलशिवाय जेवताच येत नाही, त्याला मांडी घालायला जमतच नाही." धक्का बसला होता हे ऐकून. हा कौतुकाचा विषय कसा काय असू शकतो? आज कुठलाही खेळ खेळायचा तर खेळाचं साहित्य विकत आणायला लागतं. आपण स्टम्प, बॅट स्वतःच बनवायचो. विटी-दांडू सारख्या कितीतरी गोष्टी बनवता यायच्या. क्रिकेटची खेळपट्टी स्वतः बनवण्यात केवढी मजा होती. मुलींचे खेळसुद्धा अगदी घराच्या आसपास असणाऱ्या गोष्टींत होते. चिंचोके, सागरगोटे, फरशीचे किंवा मडक्याचे तुकडे, झाडाला बांधलेला झोका... त्या सगळ्या गोष्टी आजच्या मुलांनी खेळाव्यात असं नाही; पण आपलं खेळाचं साहित्य आपण बनवण्यात जो आनंद होता, तो मुलांना मिळत नाही, याची खंत वाटते.

आजी सांगते तशा भन्नाट गोष्टी गुगललापण माहीत नसतात. गावाकडून आजोबा आणतात तसा हुरडा कधीच ऑनलाइन मिळत नाही. खूप गोष्टी आहेत. आजकाल आपले मित्र फोटोवर खूप वेगवेगळे स्टिकर पाठवतात. पण काकूनं किंवा मावशीनं पाठीवर धपाटा मारून दिलेली शाबासकी जेवढी भारी असते, त्याची सर कशाला नाही. पण आपण हे सगळं मिस करतोय आता. का?

मुलांना मोबाईलवर गेम खेळण्यात आनंद वाटतो. मुलं तरी स्वतःच्या आनंदासाठी ऑनलाइन गेम खेळत असतात; पण बरीचशी मोठी माणसं सोशल मीडियावर फक्त इतरांच्या भावनेशी खेळत असतात. मोबाईलवर घालवलेल्या वेळेचा नंतर खूप त्रास होतो. सेल्फीसाठी रोज दहावेळा फोन हातात घेतात लोक. त्याच्या अर्ध्यावेळा जरी पुस्तक हातात घेतलं, तर लोकच कदाचित फोटो काढतील आपल्यासोबत. पण मोबाईलचं व्यसन भयंकर असतं... आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट ही आहे, की मोबाईल हे व्यसन आहे, हेच कुणी सांगत नाही आपल्याला. खूप घरांत परिस्थिती अशी असते, की स्वतःच मोबाईलवर पडीक असलेले आई-बाप कोणत्या तोंडानं सांगणार मुलांना, की मोबाईल दूर ठेव; आणि गेम खेळताना मुलंही एवढं गुंतून जातात, की ठरवूनही मोबाईल हातून सुटत नाही. पण, जरा शांतपणे विचार करा; ज्या वयात हातात टेनिसची रॅकेट पाहिजे, क्रिकेटची बॅट पाहिजे, त्या वयात ऑनलाइन गेम खेळताना नकळत त्यांच्या हातात बंदूक आलीय. मोबाईल आधी आपली भाषा बिघडवतो. लहानपणापासून घरच्यांच्या संस्कारातून आलेली भाषा एकदा बिघडवली, की मोबाईलचं काम सोपं होतं. मग थोडं मोठं होत गेलं, की मुलं सोशल मीडियाच्या नादी लागतात. त्यांचे मित्र-मैत्रिणी त्यांच्या अकाउंटवरून फोटो टाकत असतात, लाइक मिळवत असतात. मुलांना मोह होतो, आपला फोटो भारी दिसावा म्हणून. मग महागडा फोन, गोरं दिसण्याच्या नावानं पांढरे फटक चेहरे करून देणारे ॲप आपण शोधू लागतो. खरंतर मुलाचा चेहरा आई-बाबांच्या चेहऱ्यासारखा असतो. त्याच चेहऱ्याची त्याला लाज वाटत असेल, तर त्यासारखं दुर्दैव नाही. आपण चांगलं दिसण्यासाठी प्रयत्न करतो, असा प्रत्येकाचा गैरसमज आहे. नकळत आपण खोटं दिसण्यासाठी प्रयत्न करतो. आपण जसं नाही तसं जगाला दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. सगळेच असे इफेक्टवाले फोटो वापरू लागलेत आजकाल. यामुळं आपल्या सच्चेपणावर केवढा मोठा इफेक्ट झालाय याचा विचारही कुणी करत नाही.

खरंतर तरुण पिढीनं मोबाईलवरच्या गेममुळं आपण आळशी झालोय का, याचा विचार केला पाहिजे. मोबाईलवर खेळताना तो जिंकत असतो; पण तो आयुष्याच्या मैदानातला पराभव असतो. पण मुलं वेड्यासारखं ऑनलाइन गेम खेळणाऱ्या काही लोकांना आदर्श मानू लागतात. कदाचित तुम्हाला माहीत नसेल; पण या ऑनलाइन गेम खेळणाऱ्या लोकांनी त्यांच्या व्हिडीओत आपलं नाव घ्यावं म्हणून कित्येक मुलं घरात चोऱ्या करून त्यांना पैसे पाठवतात. ज्या वयात सैन्यात जाऊन देशासाठी पराक्रम करावा असं वाटायला हवं, त्या वयात मुलं गेमिंगमध्ये जिवाची बाजी लावण्याचा विचार करताहेत. ज्या वयात मुलांनी शास्त्रज्ञ होऊन शोध लावण्याचं स्वप्न बघावं, त्या वयात मुलं वायफाय हॅक करण्याचे फंडे शोधताहेत. आणि पालक मोठ्या कौतुकानं ''नवी पिढी खूप स्मार्ट आहे'' असं सांगत फिरतात. वायफायचा पासवर्ड चोरणं म्हणजे स्मार्टनेस नसतो. खूप लोकांना तर असं वाटतं की मोबाईलमधली हिस्ट्री डिलीट करता येणं म्हणजे स्मार्टनेस. पण हिस्ट्री डिलीट करता करता आपण आपलं फ्युचरपण डिलीट करतोय याची जाणीवसुद्धा व्हायला पाहिजे.

हे सगळं सांगायचं कारण, या मोबाईलमुळं आपण छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद हरवून बसलोय; मोठेही आणि मुलंही. आपण तरी काही काळ जगलोय या कृत्रिम यंत्राशिवाय. पण, मुलांनी हे का मिस करायचं? त्यांना या छोट्या छोट्या गोष्टी आपणच शिकवायच्या आहेत, दाखवायच्या आहेत. ‘डँबीस’ चित्रपटासाठी मुलांचं गाणं लिहिताना हेच विचार डोक्यात घोळत होते. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं रूपकुमार राठोड यांनी गायलंय.

''आभाळाशी नेते

इवल्या झोक्याची दोरी

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये

गंमत असते भारी

वारा गातो गाणं

तू सोबत गाऊन बघ

फूलसुद्धा कसं लाजतंय

तू हात लावून बघ

हिरव्यागार गवतामध्ये

बेडकासारख्या मार उड्या

झुळझुळ वाहत्या पाण्यामध्ये

सोड कागदाच्या होड्या

चिखलामध्ये लडबडलास

तरी डोंट वरी

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये

गंमत असते भारी

दगडातही दिसतो देव

फक्त हात जोडल्यावर

पाण्याची ओली माया

कळेल पाण्यात शिरल्यावर

पेरू लागेल अजून टेस्टी

झाडावरती चढलास जर

वाटणार नाही कधी भीती

एकदा खाली पडलास तर

आज धडपडलास तर

आला मंतर कोला मंतर

पण आजचं बालपण

येणार नाही पुन्हा नंतर

मारून घे उड्याबिड्या

कर धमाल सारी

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये

गंमत असते भारी....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com