मुलींची शाळा

शाळेसमोर खूप झाडं होती, रांगेत प्रार्थनेला उभी असतात मुलं तशी. त्या झाडांची नावं आठवत नाहीत, फुलं सुद्धा येत होती की नाही ठाऊक नाही, कारण त्या झाडांमधून दिसायची मुलींची शाळा, बाकी माहीत नाही.
Girl School
Girl SchoolSakal

शाळेसमोर खूप झाडं होती, रांगेत प्रार्थनेला उभी असतात मुलं तशी. त्या झाडांची नावं आठवत नाहीत, फुलं सुद्धा येत होती की नाही ठाऊक नाही, कारण त्या झाडांमधून दिसायची मुलींची शाळा, बाकी माहीत नाही, कारण मुलींच्या शाळेला उंच भिंत होती.

स्वप्न तरंगत येतंय हवेत असं वाटायचं, मुली सायकलवर यायच्या तेव्हा. खुपदा रांगेत लावलेल्या सायकल पडायच्या रांगेतच गणिताच्या तासाला एकामागोमाग एक पडणाऱ्या प्रश्‍नासारख्या.

खूप जुनी गोष्ट नाही, मुलींच्या डोक्यात फुलं असायची तेव्हा. समोरच्या सीटवर बसलेली मुलगी आपल्यासाठीच फूल घालून आलीय वेणीत असं वाटायचं. एकदा सीटवर बसलेल्या एका मुलीने दप्तर घेतलं होतं मी उभा होतो म्हणून त्या दिवशी शिक्षणाचं सगळं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. खूप जुनी गोष्ट नाही, मुली लाजायच्या बिजायच्या तेव्हा बोलायची वेळ आली तर.

फार काही घडलं नाही. सायकलवर जातांना तिने एक दोनदा मागे वळून पाहणं एवढंच. पण आज मागे वळून बघताना तेच मोठं वाटतं. बाकी सगळं खोटं वाटतं. चिंचेच्या गाडी समोर होणारी गर्दी, मुली चिंचांकडे आपण मुलींकडे बघत राहणं सारख्याच हावरटपणे.

चिंच खाताना डोळा मारल्यासारखा होणारा तिचा चेहरा, असं काय एक एक भारी असायचं. तिच्या चेहऱ्यावर प्रमेयं असती भूमितीची, तर आपणच वर्गात पहिले आलो असतो असं वाटायचं.

बऱ्याचदा शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभं करायचे सर तर बाहेर झाडांची रांग आणि समोर मुलींची शाळा, आणि त्या शाळेसमोर एक उंच भिंत. दहावी पास झालो तेव्हा, त्या भिंतीला नारळ फोडावा वाटला., पुढे कॉलेजात मुली वर्गात होत्यापण कुतूहल नव्हतं.

स्कूटीवर भुर्रकन उडून जाणाऱ्या बऱ्याच पोरी दिसल्या. पण आपल्या मनात सायकलवर तरंगत जाणारं स्वप्न तसच राहिलं.

त्या भिंतीसारखं. एवढं काय आहे त्या भिंतीत? भिंतीत नाही..पलीकडे. आपण एवढा तरल, एवढा हळूवार आणि एवढा भाबडा

विचार केला त्या मुली आहेत पलीकडे...अजूनही... पुन्हा कधी आपलं मन तेवढं निरागस झालं नाही..

त्या भिंतीच्या पलीकडे खूप भाबडी स्वप्न आहेत राजपुत्राने राक्षस व्हायच्या आधी पाहिलेली.

त्या निरागस विश्‍वातून आपण कधी बाहेर पडतो आपल्यालाही कळत नाही. राजपुत्राने राक्षस व्हायची ती नेमकी वेळ ध्यानात येत नाही. पण आपण सगळे एवढे भाऊक आणि हळवे होतो हे आठवलं तरी मस्त वाटतं. कुणीतरी विदेशी लेखकाने प्रेमाची खूप व्यवहारी व्याख्या केलेली आहे. ‘आवडती वस्तू मिळेपर्यंत टिकणारे वेड म्हणजे प्रेम.’ खूपदा असच होतं. आपल्याला आवडणारी घड्याळ, फोन जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण सारखा त्याच गोष्टीचा विचार करतो. आवडती कार दारात येत नाही तोपर्यंत तिच्याबद्दल किती बोलतात लोक. पण एकदा कार दारात आली की काही महिन्यांत तिला धुवायच विसरून जातात. काही लोकांच्या कारच्या सीटवर जोपर्यंत ते मेणकापड असतं तोपर्यंतच त्यांचं नावीन्य टिकून राहतं. नंतर नाही. आधी कारला साधा ओरखडा पडला तरी तीळपापड होतो माणसाचा. नंतर नंतर कारचा पत्रा चेमटला तरी खूप दिवस लक्ष जात नाही. तसाच राहतो. वस्तूंच्या बाबतीत हे होतं. पण माणसांच्या बाबतीत पण व्हायला लागतं. कित्येक प्रेमविवाह बघतो आपण. लग्नासाठी एवढा संघर्ष, हाणामारी, पळून जाण वगैरे. आणि एक दोन वर्षाच्या संसारात कुरबुर सुरू. चिडचिड सुरू. नेहमीच नाही पण खूपदा होतं हे. कदाचित एखाद्याच्या मनात जागा निर्माण करता करता आपण त्याच्या मनावर ताबा मिळवायला बघतो म्हणून होत असेल. लग्नाआधी कुठल्याही विषयावर तासन् तास बोलणारी माणसं लग्नानंतर गप्प गप्प राहू लागतात. जोडीदार निवडलाय हे विसरून मालक होण्याचा प्रयत्न करू लागतात. आपण सगळेच थोड्याफार फरकाने या चुका करतो. करत राहणार आहोत. कारण चोरून भेटण्यात जी गंमत अनुभवलेली असते ती राजरोसपणे भेटण्यात हरवत जाते. घटना नसल्या, गाणी नसली की खुपदा सिनेमा रटाळ वाटू लागतो. सिनेमात त्या लेखक दिग्दर्शक घडवत असतात. पण आपल्या आयुष्याच्या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आपण असतो. आपली पटकथा आपल्यालाच बनवायची असते. आपली गाणी आपल्यालाच फुलवायची असतात. कशी ती प्रत्येकाने ठरवायची गोष्ट आहे. पण या संदर्भात अशोक नायगावकर यांची एक कविता फार मस्त आहे...

मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू

ती म्हणाली यापुढे चोरून भेटू

मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला

ती बिचारी खरकटी उरकून आली

मी तिला फेसाळ लाटा दाखविल्या

ती म्हणाली दूध हे उतू जाते

रूम मित्राने दिली एकांत रात्री

ती म्हणाली राहिली पोरे उपाशी

परतलो मग शेवटी आपल्या घराला

ती म्हणाली, कोणती भाजी आज डब्याला?

आयुष्यात तडजोडी आल्याच. आपल्याला माहिती असतं हे असच चालू राहणार आहे. तरीही त्यात नावीन्य शोधायचं. कारण आपलं आयुष्य खास असतं. तो एक सिनेमाच असतो. तो बेचव, रटाळ होता कामा नये. त्याची पटकथा भन्नाट असली पाहिजे. आपला कुणाला कंटाळा यावा ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आपली माणसं नेहमी आपल्या भवताली असण्याने प्रसन्न असली पाहिजेत. दिवस तोच असतो रोज. चंद्रही तोच. पण त्याचही रूप बदलत राहतं. रोज नवा दिसतो. आपणही रोज नवं असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे एवढ सोपं नसतं. पण यासाठी प्रयत्न करण हेच तर जगणं आहे. आणि त्यासाठी आपण जोडीदाराच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडलं पाहिजे. भांडण होतच राहतात. भांडणारी माणसं खरी असतात. खोटं कौतुक करणाऱ्यापेक्षा बरी असतात. प्रेमात माणसं फक्त एकमेकांचं कौतुक करत असतात. संसारात एकमेकांना समजून घेऊ लागतात. एकमेकांना सावरू लागतात.

संगीतकार शशांक पोवार यांच्यासाठी एक गाणं लिहिलं होतं. एकदा तरी प्रेमात पडलं पाहिजे यार. गाणं अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलंय.

एकदा तरी प्रेमात पडलं पाहिजे यार

सिनेमातल्या सारखं घडलं पाहिजे यार

तासन् तास कुणी वाट बघत बसावं

किती राग आला तरी गोड हसावं

कुणीतरी आपलं फक्त आपलं असावं

आपल्यासाठी कुणी रडलं पाहिजे यार

सिनेमातल्या सारखं घडलं पाहिजे यार

(सदराचे लेखक पटकथाकार आणि गीतकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com