देव चोरला माझा देव चोरला

Ganpati
Ganpati

राजकारणातल्या आणि भवतालच्या असंख्य गोष्टी आपण पाहिलेल्या असतात. लाखो माणसं भावी सरपंच किंवा भावी आमदार म्हणून ओळखले जातात. पक्षासाठी, साहेबानी दिलेल्या शब्दासाठी राब राब राबतात. असे अनेक भावी आमदार म्हणून वापरले गेलेले कार्यकर्ते फक्त विनोदाचा विषय होतात. खरंतर या लोकांना वापरून, या लोकांच्या कष्टाने नेते घडत असतात. मंत्री बनत असतात. कधी यांना डावा हात किंवा उजवा हात म्हणतात. कधी कार्यकर्ता. कधी चमचा. कधी पंटर. आजकाल तर भक्त पण म्हणतात एकमेकांच्या कार्यकर्त्यांना. कुठलाही शब्द वापरला तरी व्यथा बदलत नाही.

मोठ्या झालेल्या नेत्यांची संख्या माहीत आहे. पण कार्यकर्त्यांची संख्या किती आहे? कार्यकर्ते अडगळीत पडतात. असं का होतं? कार्यकर्त्याने गरीब राहण्यातच नेत्याचा मोठेपणा दडलेला असतो. एवढं असूनही कार्यकर्ते एकमेकात भांडत राहतात. शिवीगाळ करत राहतात. एक दिवस ज्याच्यासाठी आपण समोरच्याला शिव्या देतोय, भांडतोय तोच उडी मारून दुसऱ्या पक्षात जातो. रातोरात नेता झेंडा बदलतो. कार्यकर्त्याला तेवढं सोपं नसतं झेंडा बदलणं. त्याने गाडीवर रंगवलेला असतो झेंडा. कपड्यावर, पेनवर, सोशल मीडियावर असतो झेंडा. ते सगळं बदलायला खूप अवघड जातं. ज्यांच्याशी उभा दावा मांडला त्यांच्या मांडीला मांडी लावून एका मंडपात घोषणा देत बसायचं एवढ सोपं नसतं.    

भक्ताच्या कपाळी सारखीच माती 
तरी झेंडे वेगळे, वेगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती
विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती

अवधूत गुप्ते यांच्याबरोबर काम करताना मला ‘झेंडा’  चित्रपटातील विठ्ठला कुठला झेंडा घेऊ हाती या गाण्यात हे सगळं मांडता आला, त्यानंतर ‘मोरया’मध्ये पुन्हा अवधूत गुप्ते यांच्याबरोबर काम करता आलं.  ‘देव चोरला’ हे गाणं ‘मोरया’ चित्रपटासाठी लिहिलं. संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते. झेंडा चित्रपटात गाणी लिहिली त्याला राजकीय कार्यकर्त्यांचा संदर्भ होता. मोरया चित्रपटात गणपती मंडळासाठी मन लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संदर्भ होता. खरंतर गाणं केवळ देव या विषयाच्या निमित्तानं होतं. ते व्यापक अर्थानं माणसांचा देव या विषयाला स्पर्श करणारं झालं. 

अवधूत गुप्ते यांच्या सोबत काम करताना सामाजिक विषयावर भाष्य करण्याची नेहमी संधी मिळत गेली. या चित्रपटाच्यावेळी हे एक वेगळं म्हणणं मांडायची अवधूत गुप्ते यांची इच्छा होती. कुठेतरी आपल्या भोवती असणारी आभाळासारखी माणसं कमी होत चालली. देवत्व असणारी मंडळी दुर्मीळ होत चालली. आणि देवा च देवपण माणसांच्या राजकारणाने झाकोळून जाऊ लागलं. 

देव छोटा- मोठा ठरवू लागले लोक. देवाच्या संपत्तीवर त्यांची तुलना होऊ लागली. हे अतिशय वेदनादायी चित्र गेल्या काही वर्षात अधिक प्रकर्षाने समोर येताना दिसतय.

देव चोरला माझा देव चोरला
भला थोरला माझा देव चोरला

देवाच्या नावाने माणसं गटा तटात विभागली गेली की गोंधळ वाढू लागतो. देव माणसं जोडणारा असतो. आपल्या नावानं विभागणी होईल असं देवाच्या गावीही नसेल. आपल्या भक्तांच्या सहवासात जेवढं समाधान वाटत असेल तेवढं झगमगाटात किंवा रोषणाईत  कुठे समाधान वाटत असेल ?

झगमग पाहूनिया पाठ फिरवून गेला
रोषणाई मध्ये माझा देव हरवून गेला
नाही उरली भक्ती भाव नाही उरला
देव चोरला माझा देव चोरला

या गाण्याची एक खास जागा मनात आहे. कारण शास्त्रीय संगीता सारखी चाल याआधी माझ्या कुठल्याच गाण्याला नव्हती. देव चोरला हे गाणे खास शास्त्रीय प्रकारात अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले. राहुल देशपांडे, अवधूत गुप्ते या दोघांनी ते आपापल्या शैलीत गायलय. एकाच गाण्याला असे दोन तगड्या गायकांचे सूर लाभणे ही भाग्याचीच गोष्ट.

पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शकाला जे म्हणायचं आहे त्या कसोटीला उतरणे. अवधूत गुप्ते यांच्यासाठी गाणं लिहिताना त्यांच्याकडून मिळणारी दिलखुलास दाद खूप बळ देऊन जाते. आणि  विचार मांडता येतो. ज्यावर गुप्तेशी एकमत असत.

हरवुनी गेले संत काल उरलेले थोडे
पावलाचे नसे मोल आज महागले जोडे
नाही उरली भक्ती नाही भाव उरला
देव चोरला देव चोरला

(सदराचे लेखक गीतकार व लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com