esakal | उजळावा दिवा म्हणूनिया किती....
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Jagtap

गोष्टी गाण्यांच्या
गाण्यांच्या निर्मितीमागची कथा आगळीच असते. सूर, ताल, लय चा मेळ साधणाऱ्या या कलाकृतीमागं बरचं काही घडलेलं असतं. तो इतिहास उलगडणारं सदर

उजळावा दिवा म्हणूनिया किती....

sakal_logo
By
अरविंद जगताप saptrang@esakal.com

आयुष्यात एकदातरी कविता लिहिली नाही अशी माणसं फार कमी असतात. वहीच्या शेवटच्या पानावर शब्दांची जुळवाजुळव केलेली असतेच आपण. ते शेवटच्या पानावरचे शब्द आयुष्यभर लक्षात राहतात. खारे वारे, मतलई वारे, संपृक्त द्रावण, मूलद्रव्य वगैरे मागे पडत जातात. सोबत राहतात आपल्याच ओळी. खूप वेळा फोटो लावलेले असायचे वर्तमानपत्रातून काढून. नट्यांचे, क्रिकेटपटूचे. किती निरागस होतो आपण. कोण कुठली नेपाळची मनीषा कोईराला, जर्मनीची स्टेफी ग्राफ, अमेरिकेतली मेरलिन मन्रो असे कुणाकुणाचे फोटो असायचे सगळ्यांच्या वहीत. पण हळूहळू कवितेतून, बोलण्यातून, जगण्यातून प्रेम अलगद गायब झालं. आधी अवतीभवती असलेलं राजकारण फक्त निवडणुकीच्या काळात समोर यायचं. प्रचारासाठी मटका कुल्फीच्या बोलीवर पोरं गल्लीत घोषणा देत फिरायचे. आपण कुणाचा प्रचार करतोय याचं भानच नसायचं. फक्त कुल्फी महत्वाची होती. वर्तमानपत्र हातात घेतलं की शेवटच्या पानावरच्या क्रिकेटच्या बातम्या वाचायची सवय जाऊन हळूहळू आपण पहिल्या पानावर अडकून पडलो. राजकारणात. किंवा प्रत्येक गोष्टीतलं राजकारण कळायला लागलं हे खूप वाईट झालं.

सप्तरंगमधील आणखी दर्जेदार लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शेकोटी पेटवलेली असायची. ज्याला शेकत बसायचं त्याने स्वतःचा काहीतरी वाटा आणायचा सोबत. जाळायला काहीतरी लाकूड, पाचोळा, काड्या असं काही.. खूप ठिकाणी या गोष्टीला शेकोटीसाठी सासू आणा असं म्हणतात. चहाच्या हॉटेलवर माणसं बसलेली असतात. सकाळपासून. पेपरमधला शब्द न शब्द वाचून काढलेला असतो. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी तावातावाने चर्चा चालू असते. कोणता पक्ष चांगला, कोणता नेता चांगला यावर गावोगाव भांडण. या निवडणुकीच्या काळात रंगणारया गोष्टी आता सोशल मिडिया आल्यापासून बारा महिने चालू असतात. प्रचारासाठी पाच वर्षात एकदा राबणारी पोरं आता चोवीस तास सोशल मिडीयावर कुणाचा ना कुणाचा प्रचार करत असतात. जत्रेत किंवा प्रचारात दिसणारे नेत्याचे फोटो आता रोज कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात होर्डिंगच्या रुपात दिसत असतात. मुतारीवर पण अमक्या नेत्याच्या सौजन्याने असा बोर्ड असतो. गटारी पण कुणा कार्यक्षम नेत्यांच्या कृपेने बनतात हे बोर्ड वाचल्यावर कळतं. आमदार असो किंवा नगरसेवक, सतत लोकांच्या गराड्यात असतो. काम तर फार काही घडताना दिसत नाही. मग या लोकांभोवती सदैव गर्दी करून असणारे लोक कोण असतात?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या माणसांबद्दल नेहमी कुतूहल वाटत आलं. एकेकाळी कार्यकर्त्यांच्या गर्दीत असणारे नेते अचानक चमच्यांच्या गर्दीत अडकत गेले. पुढाऱ्याच्या मागे पुढे फिरून आयुष्याचं भलं होणार हे कधीपासून वाटू लागलं लोकांना? कारण एखाद्या विचारधारेशी प्रामाणिक राहून आयुष्यभर हलाखीत जगलेले, कायम विरोधी पक्षात राहिलेले पण कधीही पक्षांतराचा विचार सुद्धा न शिवलेले हजारो लोक आपण पाहिले. पण आता असे तत्त्व आणि निष्ठेसाठी आयुष्य पणाला लावणारे लोक दिसत नाहीत. कायम दुसरीकडे उडी मारण्याच्या पवित्र्यात असलेली बेडकं कशी दिसतात तसे खूप  राजकारणी दिसतात. अशावेळी प्रामाणिकपणे एखाद्या नेत्यासाठी, पक्षासाठी, विचारसरणीसाठी आयुष्य वेचलेले लोक हटकून आठवतात. असे लोक होते हे आता सांगूनसुद्धा पटत नाही. पण आपण प्रेमात पडलो होतो त्यांच्या त्यागाच्या. त्यांच्या निष्ठेच्या. त्यांच्या शोकांतिकेची वेदना आपणही अनुभवली. म्हणून आपल्या कवितेचा भाग बनले हे लोक नकळत. आणि मी लिहून गेलो...

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?

आपल्या नेत्याला विजयाचा गुलाल लागत नाही तोपर्यंत चप्पल न घालण्याची शपथ घेतलेला तरुण, त्याच्या म्हातारपणी त्याची इच्छा पूर्ण झाली. कार्यकर्ता कसा असावा तर असा म्हणून त्याचं नेहमी कौतुक करणारा नेता विजयी झाला. मिरवणूक निघाली.पण आयुष्यभर अनवाणी राहिलेला तो तरुण गर्दीत हरवून गेला होता. आपला नेता विजयी झाला म्हणून त्याने वीस वर्षात पहिल्यांदा पायात चप्पल घालून पाहिली. पण आता ती चप्पलच त्याला जास्त टोचू लागली होती. विजयी सभेत नेत्याने त्याचा उल्लेख सुद्धा केला नाही हे ऐकून आपला जन्म अनवाणी राहण्यासाठीच झालाय हे त्याला कळून चुकलं होतं.   

आजवर ज्यांची वाहिली पालखी 
भलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आता उगा माथेफोडी 
दगडात माझा जीव होता…

आपला भवताल आपल्या लिखाणात येतच असतो. कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणं लिहिताना वेगळं काही सुचायची गरजच नव्हती. अवधूत गुप्ते यांनी झेंडा चित्रपटासाठी लिहायला सांगितलं होतं. आम्ही आधीही एक गाणं केलं. पण तेव्हाच गुप्तेंच्या लक्षात आलं की मी काही मीटरवर लिहिणारा गीतकार नाही. मुळात मी गीतकारच नाही. कविता लिहू शकतो कधीतरी. तशीच एक कविता लिहिली आणि गुप्तेंच्या हातात टेकवली. त्यांनी तिचं सोनं केलं. आपल्याला जे म्हणायचंय तसंच काही संगीत दिग्दर्शकालाही म्हणायचं असलं की सूर जरा जास्तच जुळून येतात. आणि अगदी पोटतिडकीनं गाणारा ज्ञानेश्वर मेश्रामचा आवाज प्रत्येक कार्यकर्त्याचा वाटू लागतो. मी आजवर पाहिलेल्या कार्यकर्त्यांच्या वेदना मांडत गेलो फक्त...
(सदराचे लेखक गीतकार व लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

loading image