esakal | दिल्लीत मुजरा करा... 
sakal

बोलून बातमी शोधा

‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील एक प्रसंग.

गोष्टी गाण्यांच्या
‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा चित्रपट लिहित असताना त्यात गाण्याची शक्यता दिसत नव्हती. पण हळू हळू एक जागा दिसू लागली. दिग्दर्शक नागेश भोसले यांना लावणी हवी होती. पण नेहमीसारखी नाही.

दिल्लीत मुजरा करा... 

sakal_logo
By
अरविंद जगताप saptrang@esakal.com

‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा चित्रपट लिहित असताना त्यात गाण्याची शक्यता दिसत नव्हती. पण हळू हळू एक जागा दिसू लागली. दिग्दर्शक नागेश भोसले यांना लावणी हवी होती. पण नेहमीसारखी नाही. राजकीय. कथेला साजेशी. चित्रपटाचं नाव ठरलेलं नव्हतं. सहज शब्द सुचत गेले...‘गल्लीत घाला गोंधळ दिल्लीत मुजरा करा’. खरंतर राज्याच्या राजकारणाचा विचार करताना हा विचार खूपदा येतो. फार कमी नेत्यांना दिल्ली मानवली.  

गुणवत्ता असून, ताकद असून. काय कारण असेल कळत नाही. यशवंतराव चव्हाण दिल्लीत सगळ्यात जास्त यशस्वी ठरलेले नेते. पण त्यांनाही शेवटच्या काळात दिल्ली नेतृत्वाने खूप यातना दिल्या. हिमालयाच्या मदतीला धावून गेलेल्या सह्याद्रीच्या वेदना अजूनही महाराष्ट्र विसरलेला नाही. चिंतामणराव देशमुख एवढे कर्तृत्ववान आणि अभ्यासू नेते. पण आपण त्यांना राजीनाम्यामुळे ओळखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अफाट नेतृत्वक्षमता आणि विद्वान महापुरुषाला राजीनामा द्यावा लागला. असं का घडलं? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रमोद महाजन यांनी कमी काळात शून्यातून विश्व निर्माण केलं. हिंदी इंग्रजी सफाईदार बोलणाऱ्या मोजक्या मराठी नेत्यांपैकी महत्त्वाचं नाव म्हणजे प्रमोद महाजन. ते असते तर नक्कीच पंतप्रधानपदाचे दावेदार असते. पण दुर्दैव. अर्णब गोस्वामींसारखा संपादक खाजगी संभाषणात प्रकाश जावडेकर यांच्याविषयी चुकीचा शब्द वापरतो. पण दिल्लीत त्याचा साधा निषेधसुद्धा कुणी करत नाही. मराठी नेत्यांच्या बाबतीत असं का होतं? अण्णा हजारे देशातल्या सगळ्यात मोठ्या आंदोलनाचे एकहाती नेतृत्व करतात. त्यातून किरण बेदी राज्यपाल होतात. व्ही. के. सिंग केंद्रीय मंत्री होतात. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होतात. खरंतर आज दिल्लीत अण्णांचा शब्द अंतिम असता. पण अण्णा एकटे पडले. अर्थात कारणही अण्णाच होते.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

पण काँग्रेसची सत्ता जायला एक महत्त्वाचे कारण असलेले अण्णा हजारे गेल्या काही वर्षात अगदीच एकाकी वाटताहेत. रामदास आठवले यांना खूप संधी मिळत गेल्या. पण राजकीय ताकद वाढत नाही. एकटा तेजस्वी यादव बिहारमध्ये बीजेपी आणि नितीश कुमारच्या विरोधात लढून सगळ्यात जास्त आमदार निवडून आणतो. जगमोहन रेड्डी आंध्रात एकहाती सत्ता खेचून आणतो. कन्हैया कुमार, चन्द्रशेखर रावण, तेजस्वी यादव, तेजस्वी सूर्या अशा तुलनेने नवख्या नावांनी देशभर आपलं अस्तित्व निर्माण केलय.

मोहुआ मोईत्रा, लडाखचे खासदार नामग्याल यांची गाजलेली भाषणं. स्मृती इराणीसारख्यांची आक्रमकता. या सगळ्यात मराठी नेतृत्व कुठे आहे याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अभ्यास, संघटन आणि समयसूचकता असूनही मराठी नेतृत्व देशव्यापी का होत नाही? दिल्लीत एवढे मोठे शेतकरी आंदोलन चालू आहे आणि आपले शेतकरी नेते कुठे आहेत? आंदोलनाला त्यांची गरज वाटत नाही, का त्यांना आंदोलनाची गरज वाटत नाही?

ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्यांच्याविषयी लिहिणे भाग आहे. आज अमोल कोल्हेंसारखे खासदार लोकसभेत अभ्यासपूर्ण भाषण करतात याचं कौतुकच आहे. ज्यांनी दिल्लीत आपली चमक दाखवली, अस्तित्व निर्माण केलं त्यांच्याविषयी सगळ्यांना माहीत आहे. आदर आहे. पण बाकीच्यांचे काय? 

आपण दर पाच वर्षाला दिल्लीत किती खासदार पाठवतो आणि त्यांचं राज्यासाठी योगदान काय? कित्येक वर्षापासून काही मोजके अपवाद सोडले तर मराठी नेतृत्वानं निराशा केलीय. त्यात दिल्लीला आपण जास्त निष्ठावंत आहोत हे दाखवण्याची स्पर्धा हे मुख्य कारण आहे. त्यामुळे खूप लोक गुणवत्ता असूनही आपसातल्या स्पर्धेत अडकून राहिले. आपापल्या मतदारसंघात दरारा असणारे कित्येक नेते, पदाधिकारी दिल्लीत ताटाखालचे मांजर का होतात? हे खूप काळापासून अस्वस्थ करणारे चित्र आपण बघत आलोय. 

सत्ता बदलते. पण त्यात बदल होत नाही. आपल्या स्वार्थापलीकडे आणि दिल्लीला खूश करण्यापलीकडे व्हिजन नसलेले अनेक नेते वारंवार दिसतात आणि चीड आणतात. संगीतकार शैलेन्द्र बर्वे यांनी बांधलेल्या भन्नाट चालीत ओळी बसत गेल्या.... 

सरकार एवढं जरा, तुम्ही मन लाऊन करा 
फायलीवानी चाळू नका , मला टेंडरवानी धरा.. 
गल्लीत घाला गोंधळ, दिल्लीत मुजरा करा...
विझवा दिवा आता बघा, रात झाली कवाची 
लावा ओठावर माझ्या, लाली लाल दिव्याची 
भूखंड हाये मी मोक्याचा, तुम्ही लगीच नावं करा 
गल्लीत घाला गोंधळ, दिल्लीत मुजरा करा... 
दोघांशिवाय नाही कुणी, गाजवा की हो सत्ता 
लोडशेडींगच्या काळोखात, नाही लागायचा पत्ता 
फायलीवानी चाळू नका, मला टेंडरवानी धरा.. 
गल्लीत घाला गोंधळ, दिल्लीत मुजरा करा...
(सदराचे लेखक गीतकार व लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

loading image