गुंतवणुकीचं वैविध्य (अरविंद परांजपे)

arvind paranjpe
arvind paranjpe

गुंतवणुकीची सुरवात आर्थिक नियोजनानं होणं गरजेचं असतं आणि त्यात वैविध्य असणं आवश्‍यक असतं. या वैविध्याच्या निश्‍चितीला "ऍसेट ऍलोकेशन' म्हणतात. हे ऍसेट ऍलोकेशन कसं करायचं, त्यासाठी काय विचार करायचं, निवड कशी करायची आदींबाबत माहिती.

गुंतवणुकीची सुरवात आर्थिक नियोजनानं होणं गरजेचं असतं आणि ऍसेट ऍलोकेशन हा आर्थिक नियोजनातला सर्वांत महत्त्वाचा पायाभूत घटक असतो- ज्यावर गुंतवणुकीची इमारत उभी असते. एखादा स्मार्ट शेतकरी शेतामध्ये विविधतेचं जे धोरण राबवतो, तसंच नियोजन गुंतवणूकदारानं ऍसेट ऍलोकेशन करून राबवलं, तर त्याची आर्थिक उद्दिष्टं वेळेत पूर्ण होऊ शकतात. शेतकरी पूर्ण नियोजन करून विविधता असलेल्या पिकांची निवड करतो आणि त्याला त्याप्रमाणंच उत्पन्न मिळते. भरड धान्य, नकदी पिकं (मसाले), फळं, पालेभाज्या अशा विविध पिकांचा समावेश केल्यानं त्याचा सर्व भरवसा एकाच पिकावर राहत नाही. जे शेतकरी फक्त एकाच पिकावर अवलंबून राहतात, त्यांचं नशीब चांगलं असेल, तरच त्यांना फायदा होतो. मात्र, कुठल्याही कारणानं त्या पिकाचं नुकसान झालं किंवा त्याला योग्य बाजारभाव मिळाला नाही, तर त्यांची परिस्थिती बिकट होते. म्हणूनच विविध पिकांची योग्य निवड करण्यानं निसर्गाचा किंवा बाजारभावाचा तडाखा कमी बसतो.

ऍसेट ऍलोकेशन म्हणजे गुंतवणुकीच्या कोणत्या प्रकाराची निवड करावी आणि कोणत्या प्रकारात किती पैसे गुंतवावेत याचं तंत्र. गुंतवणुकीवर स्थिर परतावा मिळण्याकरता सर्वांत महत्त्वाचं असतं ते तुमचं ऍसेट ऍलोकेशन. "सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नये,' हे तत्त्व गुंतवणुकीच्या बाबतीतही खरं आहे आणि ऍसेट ऍलोकेशन केल्यानं ते प्रत्यक्षात येतं. एकाच गुंतवणूक प्रकारावर अवलंबून राहण्यातली जोखीम कमी करणं हे ऍसेट ऍलोकेशनमुळं साध्य होतं. विविधतेमुळं वार्षिक उत्पन्नात स्थिरता येते, कारण सर्व प्रकारांत एकाच वेळी नुकसान होण्याची शक्‍यता फार कमी असते. म्हणजेच एखाद्या वर्षात झाली तर खूप कमाई, नाही तर खूप नुकसान असं कधी होत नाही. बाजार कसा परतावा देईल हे गुंतवणूकदाराच्या नियंत्रणाखाली नसल्यानं प्रकारांची योग्य निवड करणं आणि एकदा केलेल्या ऍसेट ऍलोकेशनला चिकटून राहणं हा यशाचा मंत्र आहे.

गुंतवणूक प्रकारांची निवड
तुमची आर्थिक उद्दिष्टं, कालावधी, जोखीमक्षमता आणि परताव्याची अपेक्षा या सर्वांचा विचार करून ही निवड काळजीपूर्वक करायला पाहिजे. ऍसेट ऍलोकेशननुसार तुमच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल हे ठरतं, असं दिसून आलं आहे. तुम्ही फक्त मुदत ठेवींतच पैसे गुंतवले, तर तुम्हाला दोन आकडी परतावा मिळण्याची शक्‍यता कमी. निश्‍चित उत्पन्न ठेवी, इक्विटी, स्थावर मालमत्ता आणि सोनं अशा गुंतवणुकींचे प्रकार निवडून तुम्ही त्यांचा एक पोर्टफोलिओ बनवायचा आणि त्या संपूर्ण पोर्टफोलिओवरच्या परताव्याकडं लक्ष द्यायचं. पोर्टफोलिओमधल्या ऍसेट प्रकारांच्या परताव्यात कमीत कमी नातं (कोरिलेशन) असणं आवश्‍यक आहे. एकाच प्रकारातल्या अनेक योजना घेतल्या, तर वैविध्य होत नाही. उदाहरणार्थ, अनेक बॅंकांतल्या ठेवी किंवा फक्त लार्ज कॅप फंडांतल्या अनेक कंपन्यांच्या योजना ही विविधता नाही, तर पुनरावृत्ती आहे. "डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट'मुळं पोर्टफोलिओच्या परताव्याची चंचलता (व्होलॅटिलिटी) कमी होते आणि स्थैर्य वाढतं.

गुंतवणुकीचे प्रकार (ऍसेट क्‍लास)
- निश्‍चित उत्पन्न देणारे (मुदत ठेवी, एनएससी, पीपीएफ इत्यादी) पर्याय, डेट प्रकार
- समभाग (शेअर्स), इक्विटी म्युच्युअल फंड
- स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट- दुसरं घर, फार्म हाऊस, दुकान इत्यादी)
- सोनें/चांदी
- पुराण वस्तू (अँटिक), दुर्मिळ वस्तू, पेंटिंग्ज, मौल्यवान नाणी आदी प्रकार.

गुंतवणुकीवरचा परतावा
या घटकांवर परतावा आणि जोखीम अवलंबून असते:
1. ऍसेट प्रकार
2. त्या प्रकारातल्या प्रत्यक्ष गुंतवणुकीची निवड
3. गुंतवणुकीची समय-अचूकता
दीर्घकाळात "ऍसेट ऍलोकेशन' हा परतावा ठरवणारा सर्वांत मोठा घटक आहे; पण यातल्या समय-अचूकता व प्रत्यक्ष गुंतवणुकीची निवड यालाच विनाकारण जास्त महत्त्व दिलं जातं. ऍसेट ऍलोकेशन करताना ते तुमच्या आर्थिक उद्दिष्टांप्रमाणं केलं पाहिजे. उदाहरणार्थ, अल्पकालीन (तीन वर्षांपर्यंत) उद्दिष्टांकरता "डेट' (ठेव) प्रकारांतली गुंतवणूक, तर मध्यम (चार ते दहा वर्षं) आणि दीर्घकालीन (दहा वर्षांहून अधिक) उद्दिष्टं आहेत त्यांच्याकरता इक्विटी प्रकार योग्य असतात.

खात्याचं पुनर्संतुलन (रिबॅलन्सिंग)
"ऍसेट ऍलोकेशन' ठरवलं, की त्याप्रमाणं तयार केलेल्या पोर्टफोलिओत बदलत्या बाजारभावामुळं मूळ ऍसेट ऍलोकेशन बदलतं. त्यामुळं पोर्टफोलिओचा बिघडलेला तोल सावरण्याकरता म्हणजेच खात्याचं पुनर्संतुलन (पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग) करावं लागतं. पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग केल्यानंतर खरेदी (बाय), विक्री (सेल) किंवा जैसे थे (होल्ड) यांचे निर्णय घेणं तुम्हाला सोपं जातं- कारण वस्तुनिष्ठता (ऑब्जेक्‍टिव्हिटी) आल्यामुळं भावनाप्रधानता कमी होते. यामुळं मानसिक त्रासही कमी होतो. "आता विक्री करू का' हे इतरांना न विचारता तुम्ही ठरवू शकता. ऍसेट ऍलोकेशन संभाळल्यानं "कमी दरानं खरेदी आणि चढ्या दरांत विक्री' हे फायदा कमवायचं सनातन सूत्र प्रत्यक्षात येतं.

या गोष्टी लक्षात ठेवा
- ऍसेट ऍलोकेशन म्हणजे, गुंतवणुकीच्या प्रकारांची निवड आणि त्यामध्ये किती पैसे गुंतवावेत याचं तंत्र.
- प्रत्येक गुंतवणूक प्रकारावरचा परतावा आणि जोखीम वेगळी असते.
- पोर्टफोलिओवरचा एकूण परतावा आणि जोखीम यांचा एकत्रित विचार करणं महत्त्वाचं आहे.
- ठराविक कालावधीनंतर किंवा ऍसेट प्रकारांच्या मूळ प्रमाणात फरक पडला तर रिबॅलन्सिंग करावं.
- ऍसेट ऍलोकेशन केल्यानंतर खरेदी, विक्रीचे निर्णय तुमचे तुम्ही घेऊ शकता.

नमुना ऍसेट ऍलोकेशन
इक्विटी : 50 टक्के, ठेवी : 20 टक्के, स्थावर : 20 टक्के, सोनं : 10 टक्के.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com