मिनी महाबळेश्‍वर - माथेरान

मिनी महाबळेश्‍वर - माथेरान

वीकएंड पर्यटन
यंदाच्या उन्हाळ्यानं कहर केलाय. सूर्यदेव नक्कीच कोपलेला दिसतोय. उन्हाच्या लाटांच्या तीव्रतेमुळं अंगाची काहिली होऊ लागलीय. जिवाची ही तगमग घालविण्यासाठी अनेकांनी हिमालयात जाण्याची तयारी सुरू केली असेल. आपल्याकडं वीकएंड पर्यटनासाठी एक पर्याय आहे; तो म्हणजे माथेरान. पश्‍चिम महाराष्ट्रातील महाबळेश्‍वरखालोखाल प्रसिद्ध असलेलं ठिकाण. जवळजवळ प्रदूषणविरहित माथेरान पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. या पर्यटनस्थळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली टॉय ट्रेन. मध्यंतरी काही वर्षं तांत्रिक अडचणींमुळं बंद असलेली ही झुकझुक गाडी डिसेंबर २०१८ पासून पुन्हा सुरू झाली आहे. मुलांसाठी हे एक वेगळं आकर्षण आहे.

रायगड जिल्ह्यातील या पर्यटनस्थळाचं माथेरान हे नाव अगदी सार्थ आहे. डोंगरमाथ्यावर घनदाट वृक्षराजींनी नटलेल्या या छोटेखानी शहरातल्या उत्साहवर्धक हवामानामुळं पर्यटकांची इथं नेहमीच वर्दळ असते. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून काहीशा वेगळ्या झालेल्या रांगेत माथेरान वसलंय. कल्याणच्या हाजीमलंग डोंगरापासून ही रांग सुरू होते. याच रांगेत बदलापूरच्या टवली गुहा, त्यानंतर नवरा-नवरीचा डोंगर, त्याला लागूनच चंदेरीचा सुळका, म्हैसमाळ, नाखिंद आणि किल्ल्याचे अवशेष असलेला पेब डोंगर. त्यानंतर येतो माथेरानचा डोंगर. लाल मातीच्या पायवाटांनी चालताना एक वेगळीच अनुभूती मिळते. पावसाळ्यात इथलं वातावरण अधिकच खुलतं. माथेरानमध्ये विविध ठिकाणी कडे आहेत. हेच कडे पॉइंट म्हणून प्रसिद्ध आहेत.

माथेरान हे गाव पूर्वीपासूनच होतं. मात्र, ब्रिटिश राजवटीत १८५० मध्ये ते थंड हवेचं ठिकाण म्हणून नावारूपास आलं. मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन आणि ठाण्याचा कलेक्‍टर ह्यूज मॅलेट या दोघांनी माथेरानचा नव्यानं शोध लावला. डोंगरमाथ्यावरील दाट झाडीमुळं ते माथेरान या नावानं प्रसिद्ध पावलं. खरंतर हे धनगरांचं गाव. शतकानुशतकं ते इथं राहत होते. त्यांचे पूर्वज याच ठिकाणी मरण पावल्यानं ते या ठिकाणाला ‘मातेचं रान’ असं म्हणत. इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडून सर आदमजी पीरभॉय यांनी पायथ्याच्या नेरळ गावापासून माथेरानपर्यंत एक पायवाट तयार केली. कालांतरानं त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी लोहमार्गासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना प्रत्यक्ष फळ आलं ते १९०५ मध्ये. मधल्या काही वर्षांचा अपवाद वगळता ही टॉय ट्रेन ११४ वर्षांपासून अखंड धावते आहे.

माथेरानमध्ये पाहण्यासाठी पॅनोरमा, गार्बट, अलेक्‍झांडर, हार्ट, लिट्‌ल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लॅंडस्केप, लुईसा, पॉर्क्‍युपाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्‍स, बार्टल अशी तब्बल ३० पॉइंट्‌स आहेत. शार्लोट नावाचं एक तळंही आहे. गावात वाहनांना बंदी आहे. डांबरी रस्तेही नाहीत. सर्वत्र लाल मातीचे रस्ते दिसतात. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वाहनांना गावाबाहेरच वाहनतळावर वाहनं लावून चालत किंवा घोड्यावरून गावात जावं लागतं. इथल्या जंगलात जांभूळ, बेहडा, खैर, हिरडा, आंबा या झाडांबरोबरच विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. डॉ. किशोर शांताबाई काळे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असताना त्यांनी अनेक औषधी वनस्पतींचा शोध लावला होता.

कसे जाल? - पुण्याहून वाहनानं कर्जतमार्गे सुमारे १३५ किलोमीटर. मुंबईहून ११५ किलोमीटर. पुणे आणि मुंबईहून ट्रेननंही जाता येतं. ट्रेननं गेल्यास कर्जतला उतरावं लागतं. नेरळहून ट्रेक करूनही जाता येतं. हे अंतर आहे ११ किलोमीटर. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन किंवा टॅक्‍सी उपलब्ध आहे.
भोजन आणि निवासाची इथं उत्तम सोय होऊ शकते. एमटीडीसीचं रिसॉर्ट, अनेक हॉटेल आहेतच; पण घरगुती राहण्याची सोयदेखील आहे. निवासासाठी ऑनलाइन बुकिंग करून गेल्यास खोळंबा होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com