

Mangeshkar Family Memories
esakal
सगळ्या बहिणी आणि आईपेक्षाही आशाताई सशक्त आणि मजबूत होत्या. त्यांच्या निर्धारामुळेच त्या हृदयनाथांसह काश्मीरला गेले होते. तिथल्या आठवणी आणि एका मेजवानीत आशाताईंवर एक संकट आलं पण त्याचा मुकाबला त्यांनी कसा केला, हे सारं विलक्षणं असून स्वर्गीय आशाताईंच्या आठवणींच्या हृद्यपटाचा हा दुसरा भाग...
मी, आशाताई, उषाताई काश्मीर भूमीवर
उभे होते. सारा परिसर सौंदर्याने नटला
होता. कुठेही पाहिलं की फक्त सौंदर्य.
नेहमी आकाश, आपलं वेगवेगळे रूप,
सौंदर्य, रौद्र रूप, विशाल रूप, पावसऋतूत दयार्द्र रूप,
वादळवेळी आपले क्रौर्य रूप प्रकट करत असतं.
पण काश्मीरमध्ये आकाश फक्त सौंदर्य, माधुर्य,
मुलायमत्व प्रसन्नमत्व प्रकट करत असतं.
इंग्लिश माध्यमातून शिकणारे, पाश्चात्त्य
संस्कृतीचे पाईक, नेहमी विश्वाचे नंदनवन
म्हणजे स्विझर्लंड असे आग्रहाने सांगतात.
सत्य म्हणजे हे, की त्यांनी साधे महाबळेश्वर
पाहिलेले नसते. पण १५० वर्षे गुलामगिरी
पत्करलेले जीव अजूनही त्या इंग्रजांचे,
इंग्लिश भूमीचे, गुणगान करत असतात. पण
ज्यांनी स्विझर्लंड आणि काश्मीर पाहिले आहे, ते प्रामाणिकपणे हेच सांगतील, की
काश्मीरची साधी गल्लीही स्विझर्लंडहून
सुंदर आहे,
केव्हा तुटणार या गुलामगिरीच्या शृंखला?
आशाताई अचानक म्हणाली.
‘‘बाळ! काम करून करून कंटाळा आला आहे.
चल आपण काश्मीरला जाऊ या.’’
नेहमीप्रमाणे आई म्हणाली,
‘‘आशा ! अगोचरपणा करू नकोस, काश्मीरमध्ये
हिंदूंना मारतात. बायकांवर तेथे अत्याचार
करतात. नाही, नाही, तेथे जायचे नाही.
आपल्याकडे माथेरान, महाबळेश्वर आहे,
कोठेही फिरून या."
आशाताई कावली, एकदम म्हणाली.
‘‘माई ! या तुझ्या भित्र्या स्वभावामुळे तू
बाबांचे नुकसान केलेस, त्यांना इथेच डांबून
ठेवलेस. महाराष्ट्राबाहेर त्यांना कुणीही ओळखत नाही.
हिंदुस्थानाबाहेर लतालाही कुणी ओळखत
नाही, तू लताला इंग्लंड, अमेरिका येथे
जाऊ देत नाहीस. तिला तेथे केवढी मोठी
संधी आहे. पण तू पाय मध्ये घालतेस.
ती बिचारी आज्ञाधारक गप्प बसते. पण
मी आशा भोसले आहे. बाबा मला हब म्हणजे
म्हैस म्हणायचे, अग ! अख्ख काश्मीर शिंगावर
घेईन मी. आशा भोसले म्हणतात मला.’’
आई गप्प बसली आणि मी, आशाताई,
उषाताई काश्मीरला आलो.
(ही गोष्ट १९६५ ची आहे. त्या वेळी काश्मीर
नंदनवन होतं. आतासारखं नव्हतं.)
आम्ही म्हम्दुच्या (महंमद) शिकाऱ्यात
उतरलो. एखाद्या फाइव्ह स्टार हॅाटेल सारखा तो
शिकारा (पाण्यावरली नाव) होता.
आशाताई सरळ त्या म्हम्दुच्या स्वयंपाक
घरात शिरली. मांसमटण, माशांचे प्रकार,
शाकाहारी जेवण या सर्व प्रकारात आशाताई
सुगरण होती, मजरूह सुलतानपुरी
यांच्या स्वयंपाक घरात घुसून तिने
लखनौवी स्वयंपाक शिकला होता.
एस, डी. बर्मन यांच्या स्वयंपाक घरात घुसून
तिने बंगाली स्वयंपाक शिकला होता,
सुधीर फडके यांच्या स्वयंपाक घरात शिरून
तिने पुणेरी, ब्राह्मणी स्वयंपाक शिकला होता.
सुलोचनाबाई यांच्यावर
आक्रमण करून ती कोल्हापुरी मटण
पांढरा रस्सा, लाल रस्सा, वगैरे सारे मटणाचे
प्रकार शिकली होती. गुजराथी, गोव्याचे
पदार्थ ती लहानपणीच शिकली होती.
मी नेहमी तिची टिंगल करायचा,
‘‘आशाताई ! गाण्याचे हाल करण्यापेक्षा,
गाण्यावर आक्रमण करण्यापेक्षा तू हॉटेल काढ,
करोडो कमावशील.’’ माझे गमतीत उच्चारलेले
शब्द खरे ठरले.