
वर्षभर थोडेथोडे पैसे पेटीत टाकले. जमा झाले ३५-३६ रुपये. दुकानात गेलो; मात्र पेटीची किंमत हाेती ५० रुपये. तरीही ती विकत घेतली, त्याची ही गोष्ट.
पै-पै गोळा करून ‘संवादिनी’शी जुळले स्वर!
संगीताची आवड जोपासण्यासाठी वाद्ये वाजवण्याची गरज होती. त्यासाठी स्वत:ची ‘संवादिनी’ हवी होती. वर्षभर थोडेथोडे पैसे पेटीत टाकले. जमा झाले ३५-३६ रुपये. दुकानात गेलो; मात्र पेटीची किंमत हाेती ५० रुपये. तरीही ती विकत घेतली, त्याची ही गोष्ट.
दादरला कोहिनूरजवळ सामंत ब्रदर्स म्हणून एक लोण्याचे दुकान होते. तिथून श्रीखंड-चक्का वगैरे आणायला मला आई सांगायची. मग आमची स्वारी सकाळी नऊ-दहा वाजता निघायची; परंतु पहिली भेट आमची लोण्याच्या दुकानात नाही, तर कोहिनूर चित्रपटगृहाला. तेथे कोणता चित्रपट लागला आहे आणि त्यामध्ये गाणी किती आहेत, ते पाहायचो... सगळी चौकशी करून त्यातील गाणी आवडीची वाटली, तर लोणी वगैरे गेले तेल लावीत. मी तो चित्रपट पाहायला जायचो आणि चित्रपट संपल्यानंतर लोणी-चक्का आणायला जायचो. त्यानंतर घरी जायला मला तीन ते चार वाजायचे. तोपर्यंत घरच्या सगळ्या मंडळींनी जेवण वगैरे उरकून घेतलेले असायचे. मला उशिरा आल्याचे पाहिल्यानंतर माझा चांगलाच समाचार घ्यायचे. ही गोष्ट वारंवार होऊ लागल्यामुळे या मुलाचे काही आता खरे नाही... सिनेमा आणि गाणी यातच तो गुंतलेला आहे, असे सगळे म्हणायचे.
तेव्हा चित्रपटात दहा ते बारा गाणी असायची. चित्रपटांमध्ये संगीताची मेजवानी असायची. आमची घरची परिस्थिती तेव्हा तशी बेताची होती. माझी छोटी बहीण मीना तेव्हा तेरा वर्षांची आणि मी सोळा वर्षाचा. तिचा आवाज गोड होता आणि ती गाणीही छान गायची. त्यामुळे एके दिवशी माझ्या बाबांच्या काही मित्रांनी बाबांना येऊन सांगितले की, मीना तुमची गाणी खूप छान गाते. तिला आर्केस्ट्रामध्ये गाण्यासाठी पाठव ना... चार पैसेही मिळतील आणि मदत होईल. मग आम्ही सगळ्यांनी विचारविनिमय केला आणि मेलोडी मेकर्स, झंकार अशा काही आर्केस्टांमधून माझी बहीण गाणी गाऊ लागली. सुरुवातीला मी आणि बाबा तिच्याबरोबर जात होतो. नंतर नंतर बाबा काही यायचे नाहीत. मग मी तिचा बॉडीगार्ड म्हणून जात असे. जेव्हा आर्केस्ट्रा सुरू व्हायचा तेव्हा मी विविध वाद्यांचे निरीक्षण करायचो. ते कसे वाजविले जात आहे, त्याचे नाव काय, ते पाहायचो. घरी आल्यानंतर डबा वगैरे घेऊन बडवीत बसायचो.
आपल्याला संगीताची आवड आहे म्हटल्यानंतर वाद्ये वाजवायला यायला पाहिजे, असे मला सतत वाटत होते. मीच बहिणीला म्हणालो, की ‘‘तू कार्यक्रम करतेस. तुला मिळणाऱ्या पैशातून मला एकेक आणा देत जा ना... पन्नास रुपये झाले की हार्मोनियम घ्यायचा म्हणतोय.’’ माझी ती हौस पूर्ण होईल, असे वाटले. कारण आता आमच्या घरी तीच कमावती होती. त्यामुळे तिच्याकडेच मी पैसे मागितले. ती मला कधी एक आणा तर कधी चार आणे देत गेली. मी ते पैसे एका पेटीत जमा करत गेलो. जवळपास एक वर्ष मी पैसे जमविले आणि पैसे नक्कीच जमा झाले असतील या उत्सुकतेने पेटी उघडायचे ठरवले. पेटी उघडली तर अवघे ३५-३६ रुपये जमा झालेले होते.
दादर स्टेशनजवळ हरिभाऊ विश्वनाथ यांचे दुकान आहे. तिथे संगीताची सगळी वाद्ये मिळतात. त्या दुकानात जमलेले सगळे पैसे घेऊन गेलो. त्यांना सांगितले की, ‘‘कमीत कमी किमतीतील हार्मोनियम हवा आहे. दाखवा ना.’’ दुकानदाराने एक पेटी काढली आणि तिची किंमत सांगितली, ‘‘पन्नास रुपये.’’ मी त्यांना सांगितले की, ‘‘माझ्याकडे ३५ रुपये आहेत आणि याच किमतीतील पेटी काढा ना.’’ ते म्हणाले, ‘‘हीच स्वस्तातल्या स्वस्तातील पेटी आहे.’’
आता काय करायचे, माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला. मी निराश झालो आणि हताश मनाने त्या दुकानातून बाहेर पडणार तोच त्या दुकानाच्या मालकांची थाप माझ्या पाठीवर पडली. त्यांना माझ्या या केविलवाण्या चेहऱ्याची दया आली आणि त्यांनी ती पेटी मला पस्तीस रुपयात दिली. ती देताना चांगला रियाज कर... उत्तम अभ्यास कर... वगैरे वगैरे उपदेशही त्यांनी दिला.
पेटी मिळताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आता पेटी मिळाली खरी; परंतु ती शिकवणार कोण, असा प्रश्न होता. मी स्वतःच घरी प्रॅक्टिस करू लागलो आणि पहिले गाणे बसविले शंकर-जयकिशनचे ‘तेरा मेरा प्यार अमर... फिर क्यू मुझ को लगता है डर.’’ दुसरे गाणेही शंकर-जयकिशनचेच, ‘‘ये रात भिगी भिगी...’’ माझा हात जरा जरा चालायला लागला. मग सगळे म्हणायला लागले, ‘‘अशोक, तुझा हात पेटीवर बऱ्यापैकी चालतो; तरीही तू ग्रँट रोडला पंडित मनोहर चिमुटे आहेत ना, त्यांच्याकडे हार्मोनियम शिकायला जा... एखाद वर्षात चांगलाच तयार होशील. अगदी पाण्यासारखा तयार होशील.’’ मग मनात पुन्हा प्रश्न तयार झाला की, आता शिकायला पैसे कुणाकडे मागायचे? पुन्हा आईला मस्का लावला. कारण मी नेहमीच पैशासाठी आईला मस्का लावायचो. आईने ही बाब बाबांना सांगितली. त्यानंतर हो-नाही करता करता बाबांनी परवानगी दिली आणि मी आठवड्यातून दोन दिवस हार्मोनियम शिकायला ग्रँट रोडला जाऊ लागलो. तेव्हा ती फी होती तीस रुपये. शिवाय रेल्वेचा पास वगैरे खर्च होताच. एक महिना झाला आणि मी त्यांना फी द्यायला गेलो, तर ते मला म्हणाले, की ‘‘उद्यापासून तू येऊ नकोस.’’ मला आश्चर्य वाटले आणि रडू लागलो. त्यांना विचारले की, ‘‘माझे काही चुकले का?’’ते म्हणाले, ‘‘नाही. आता मी येथील क्लास बंद करीत आहे आणि वसईला सुरू करीत आहे. तुला तेथे यायला फार त्रास होईल. कारण तुझे शिक्षण वगैरे आहे.’’ ते वसई-विरारला राहात होते आणि त्यांच्या तब्येतीचा विचार करता त्यांनी असा निर्णय घेतला होता. तिथून निघता निघता त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि म्हणाले, ‘‘अशोक, तू माझ्याकडे केवळ एक महिना शिकलास; परंतु तू एक वर्षाचे शिकून घेतले आहेस.’’ त्यांनी माझे तेव्हा खूप कौतुक केले आणि त्याच कौतुकाच्या जोरावर माझी आज वाटचाल सुरू आहे.
Web Title: Ashok Palki Writes About Harmonium Brought Story
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..