हिंदीत पदार्पण, जे झालंच नाही!

तुम्ही हिंदी गाणी का करत नाही, असं मला बरेच जण विचारायचे; पण ‘माझं काम बरं आणि मी बरा’ अशा तऱ्हेने मी वागत होतो. तेव्हा एक संधी चालून आली
ashok palki writes about music hindi songs recording
ashok palki writes about music hindi songs recordingsakal
Summary

तुम्ही हिंदी गाणी का करत नाही, असं मला बरेच जण विचारायचे; पण ‘माझं काम बरं आणि मी बरा’ अशा तऱ्हेने मी वागत होतो. तेव्हा एक संधी चालून आली

तुम्ही हिंदी गाणी का करत नाही, असं मला बरेच जण विचारायचे; पण ‘माझं काम बरं आणि मी बरा’ अशा तऱ्हेने मी वागत होतो. तेव्हा एक संधी चालून आली. थेट गुलशन कुमारजींबरोबर काम करायला मिळालं... त्यांनीही माझ्या गाण्याचं कौतुक केलं. माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटाच्या गाण्याचं रेकॉर्डिंग होणार म्हणून मीही आनंदी होतो; पण असं काही घडलं की हातातोंडाशी आलेला घास गेला....

अशोकजी, तुम्ही इतकी छान छान मराठी गीतं करता; मग हिंदी गाणी करण्याचा प्रयत्न का करत नाही? मला अनेक जण विचारत असतात; पण माझं रोजचं जिंगल्सचं काम सोडून मी हिंदीतल्या कोणत्या प्रोड्युसरला भेटायला जाणार, असा प्रश्न होताच. कारण मी सकाळी आठ ते रात्री बारापर्यंत काम करत होतो. त्यातून मिळणारी बिदागी मला पुरेशी होती.

मला जास्त पैशाची हाव कधीच नव्हती; पण विधिलिखित काहीतरी वेगळं लिहिलेलं असेल तर माहीत नाही म्हणून मी ‘माझं काम बरं आणि मी बरा’ अशा तऱ्हेने वागत होतो... माझ्या एका रेकॉर्डिंगच्या वेळी अनुराधा पौडवाल यांनीही मला विचारलं, की अशोकजी, तुम्ही हिंदी चित्रपटासाठी का प्रयत्न करत नाही?

त्यावर मी म्हटलं, की माझ्याकडे एवढं काम आहे ते सोडून प्रोड्युसरला भेटायला किंवा त्यांच्यासोबत बातचित करायला मला जमेलच असं नाही... पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. ‘ते काही नाही. तुम्ही माझ्याकडे या. तुम्हाला सगळं सविस्तर सांगते आणि येताना नक्श ल्यालपुरींना घेऊन या,’ असा आग्रहच त्यांनी केला.

त्यानंतर दोन-चार दिवसांनी तो योग आला. मी आणि नक्श ल्यालपुरी त्यांच्या घरी गेलो. ‘चारेक दिवसांत गुलशन कुमारजी येताहेत दिल्लीवरून, तर मी त्यांची आणि तुमची भेट करून देते. ते नवीन कलावंतांना संधी देतात. तेव्हा येत्या चार-पाच दिवसांत तुम्ही छान छान गाणी बनवा आणि आपण ती त्यांना ऐकवूया. नक्कीच ते तुम्हाला हिंदी सिनेमा देतील...’ असा विश्वास त्यांनी मला दिला.

आम्हीही मग कामाला लागलो. आमच्या दोघांच्या वेळेप्रमाणे आम्ही अनुराधाजींच्या घरी सीटिंगसाठी जात होतो. रोज एक गाणं करायचं म्हणजे ट्युनही बनायची आणि त्याचं लिखाणही व्हायचं. पाच दिवसांत आमची सहा गाणी तयार झाली. अनुराधाजींना ती खूप आवडली. त्या म्हणाल्या, की आपण गुलशनजींना गाणी ऐकवूया.

ते नक्कीच खूश होतील. दोनेक दिवसांनी गुलशनजी येत आहेत, असा निरोप आला. मी आणि नक्शजी तिथे गेलो आणि सर्व गाणी त्यांना ऐकवली. गुलशनजीही खूप खूश झाले. ‘व्वा बहुत अच्छे गाने आपने बनाए है. मजा आ गया... अगले महिने मे आठ तारीख से हम रेकॉर्डिंग शुरू करेंगे,’ असं म्हणत त्यांनी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये फोन करून लागलीच तारीखही मिळवली.

माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटाच्या गाण्याचं रेकॉर्डिंग होणार म्हणून मला खूप आनंद झाला होता. अशा प्रकारे हिंदी सिनेसृष्टीत माझं पहिलं पाऊल पडणार होतं. त्याचदरम्यान एक दुर्घटना घडली. गुलशनजी आपल्यातून निघून गेल्याची बातमी आली. हिंदी सिनेसृष्टीत सक्रिय असणारा आणि उत्साहाने काम करणारा कलाकार माणूस आपल्यातून निघून गेला होता.

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि माझा हिंदी चित्रपटसृष्टीतला प्रवेश तिथेच थांबला. अगदी हातातोंडाशी आलेला घास गेला. त्या क्षणी मला ‘त्या’ सोलापुरी ज्योतिषाची आठवण झाली. त्याने एकदा माझ्या आईला माझं भविष्य सांगितलं होतं. तो म्हणाला होता, मुलगा खूप मोठा होणार. नाव-पैसा कमावणार. सन्मान मिळवणार; पण फक्त मराठी प्रांतातच. हिंदीमध्ये त्याला नाव मिळणार नाही...

नंतर एकदा दिल्लीहून अशोक खन्ना नावाचे प्रोड्युसर आले. मला म्हणाले, ‘मी एक हिंदी चित्रपट बनवतोय. तुमच्या जिंगल्स ऐकून मला वाटतं, की माझ्या चित्रपटाची गाणी तुम्हीच करावी. पण बजेट जास्तही नाही आणि कमीही नाही.

मला लतादीदी, आशाताई, रफीजी आणि किशोरदा यांच्यासारखे मोठे गायक नको. सुरेश वाडकर अन् कविता कृष्णमूर्ती यांनी गाणी गायली तरीही चालतील.’ मी सर्वांशी बोलतो आणि सांगतो, काय बजेट होईल ते. कोण कोण येतंय तेही आपल्याला कळेल, असं मी त्यांना सांगून टाकलं. सुरेशजींशी मैत्री असल्यामुळे ते म्हणाले, ‘अशोक, तू मला फक्त एक रुपया दे, मी हजर आहे तिथे.’

‘पैशांची गोष्ट का करताय? तुमच्याकडे गायला मिळतंय हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे,’ असं म्हणत कविताही तयार झाली. शान माझा जवळचा मित्र होता. तोही तयार झाला. एक सिंथेसायझरवाला, एक ॲरेंजर आणि एक प्रोग्रॅमर असं करून आम्ही आठेक म्युझिशियन गोळा केले आणि गाणी बनवायला सुरुवात केली.

अपेक्षेप्रमाणे गाणी छान झाली होती. मग तीनेक महिन्यांनी मला प्रोड्युसरचा फोन आला. ‘गाणी शूट करण्यासाठी मी दोन दिवसांनंतर मुंबईला येतोय. ती शूट झाल्यानंतर फायनान्सरला पण दाखवता येतील. कारण फायनान्सर मिळेल तेव्हाच माझा चित्रपट पुढे जाईल. त्यानंतर मी शूटिंग ठेवीन.’ त्यानंतर त्यांनी सहा गाणी शूट केली.

हिरो-हिरोईनच्या रूपात दोन नवोदित कलाकार होते; पण दिसायला छान होते. त्यांच्याकडून त्यांनी सहाही गाणी पंधरा दिवसांत शूट करून घेतली आणि ती फायनान्सरला दाखवायला ते दिल्लीला परत गेले. साधारण महिनाभराने त्यांचा दिल्लीहून फोन आला. अशोकजी, एक फायनान्सर तयार झाला आहे.

मी चंडीगडला शूटिंगसाठी जातोय, असं त्यांनी सांगितलं. साहजिकच मी त्यांना ‘हिरो-हिरोईन कोण?’ असा प्रश्न केला. मला वाटलं, कोणी तरी ओळखीचं असेल; पण ज्यांच्यावर मी गाणी शूट केली आहेत तेच हिरो-हिरोईन आहेत, असे ते म्हणाले. म्हणजे नवीनच कलाकार होते... तर त्यांना घेऊन ते चंडीगडला जाणार होते.

साधारण दोन-अडीच महिन्यांनी मला त्यांचा फोन आला. चित्रपट पूर्ण झाला आणि गाणीही, असं ते म्हणाले. मीही खूश झालो. ‘व्वा, ऑल दि बेस्ट!’ म्हणत त्यांचं कौतुकही केलं. मग ते सगळं मटेरियल घेऊन मुंबईला आले संकलनासाठी.

ते झाल्यानंतर त्यांनी एक ट्रायल ठेवली. ट्रायल पाहिल्यानंतर मला कळलं, की चित्रपटात काही दम नाही... त्यानंतर ते पुन्हा गायब झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांचा व माझा काहीच संबंध आला नाही. जवळपास तीनेक वर्षांनी फोन आला. म्हणाले, अशोकजी, कुणी चित्रपट घेत नाही. बहुतेक डब्यात जाईल, असं वाटतं... पुन्हा एकदा ज्योतिषाचे शब्द खरे झाले होते.

काही कालावधीनंतर अशोक खन्नांचा मला पुन्हा फोन आला. म्हणाले, की अशोकजी, मी खूप आजारी आहे. मला चालताही येत नाही; तरीही मला पुन्हा चित्रपट काढायचा आहे. मी सिच्युएशन पाठवतो. गाणी तयार करा.

मला शानचा आवाज खूप आवडतो. त्याच्याकडून एखादं गाणं गाऊन घ्या. असं सांगून त्यांनी पैसेही पाठवले... पुन्हा नव्या उमेदीने माझी सुरुवात झाली. मी माझा गीतकार मित्र योगेशला फोन केला. नव्या चित्रपटाची गाणी लिहायची आहेत, असं त्याला सांगितलं. त्याने आठ-पंधरा दिवसांनी चार गाणी लिहून आणली आणि माझ्यासमोर ठेवली. मी शानला बोलावलं आणि त्याच्याकडून गाणी गाऊन घेतली. ती चारही गाणी खन्नांना पाठवली. त्यानंतर आमचं काही फारसं बोलणं झालं नाही. काही महिन्यांनी त्यांच्या पत्नीचा फोन आला. म्हणाली, ‘अशोकजी, खन्नाजी अब नही रहे...’ पुन्हा मला तो सोलापुरी ज्योतिषी आठवला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com