देवकीच्या आवाजाची ‘आभाळमाया’

गेल्या पाच दशकांमध्ये गायकांच्या चार पिढ्यांबरोबर काम केले, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.
Devaki Pandit
Devaki PanditSakal
Summary

गेल्या पाच दशकांमध्ये गायकांच्या चार पिढ्यांबरोबर काम केले, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

गेल्या पाच दशकांमध्ये गायकांच्या चार पिढ्यांबरोबर काम केले, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. मराठी चित्रपटसृष्टीत मी सगळ्याच गायक-गायिकांबरोबर काम केले आहे; पण सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, देवकी पंडित, स्वप्नील बांदोडकर, अवधुत गुप्ते यांच्याबरोबर काम करताना खूप मजा आली. त्यांच्या गाण्यामागच्या तळमळीबरोबरच गाणे कसे चांगले व्हावे, त्यामध्ये आपण काय आऊटपूट द्यावे हे सगळे त्यांच्याबरोबर काम करताना दिसून येते. त्यांच्यातीलच एक देवकी पंडित. काटा रुते कुणाला, रंगूनी रंगात माझ्या, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, सप्तसुरांनो... अशी कित्येक गाणी देवकीने आपल्या आवाजाने श्रीमंत केली आहेत.

देवकीचा आवाज अतिशय सुरेल. सुरांवरची पकड आणि शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गाण्याचे अभ्यासपूर्ण सादरीकरण म्हणजे देवकी पंडित. तिची आईसुद्धा गायिकाच होती. ती खूप छान गायची. मला जेव्हा पंडित जितेंद्र अभिषेकीबुवा आणि दि गोवा हिंदू असोसिएशनने पहिले संगीत बालनाट्य करायला दिले, तेव्हा देवकी पंडितची आई उषा पंडित माझ्याकडे गायल्या आहेत. तेव्हा देवकी शाळेत जात होती. तिने संगीताचे धडे आपल्या घरातूनच घेतले. वयाच्या नवव्या वर्षी देवकीने आपली पहिली मैफल सादर केली.

सुरुवातीला देवकी पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे गाणे शिकत होती. त्यानंतर तिने गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे तब्बल अकरा वर्षे गाण्याचे शिक्षण घेतले. अभिषेकीबुवांकडे तिने शास्त्रीय संगीत, ठुमरी, गझल अशा विविध प्रकारचा अभ्यास केला. देवकी अनेक हिंदी, मराठी व गुजराती संगीतकारांसाठी गाणी म्हणायची.

१९८६ मध्ये मला ‘अर्धांगी’ चित्रपट मिळाला तेव्हा त्यात ठुमरी प्रकारचे एक गाणे होते. हे गाणे कुणाकडून गाऊन घ्यावे, असा प्रश्न मनात घोळत होता, पण लगेच माझ्या डोळ्यासमोर देवकी उभी राहिली. ‘चुनरी नको ओढू...’ असे त्या गाण्याचे शब्द होते. ते गाणे मी देवकीकडून गाऊन घेतले. देवकी ते गाणे छान गायली आणि तिला त्या वर्षीचा राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला. मलाही सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिला मी जिंगल्स गाण्यासाठी बोलवायचो; पण तिला ते पसंत नव्हते. मला काही तरी चांगले गाण्यासाठी बोलवा, असे ती मला सांगत असे. अखेर २००० मध्ये अल्फा मराठी म्हणजे आताच्या झी मराठीसाठी मी तिला मालिकेचे शीर्षकगीत गाण्यासाठी बोलावले. ती मालिका होती आभाळमाया. त्याचे असे झाले, की तिने गायलेले आणि सुधीर मोघे यांनी संगीतबद्ध केलेले एक हिंदी शीर्षकगीत आजीवासन स्टुडिओमध्ये मी ऐकले. आमचा रेकॉर्डिस्ट प्रमोद घैसास याला विचारले, की कोण एवढे छान गायले आहे रे... तो म्हणाला, की देवकी पंडित. तेव्हाच मी मनाशी पक्के केले, की ‘आभाळमाया’साठी बोलवायचे ते देवकी पंडितलाच.

रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशी तिला फोन केला आणि सांगितले, की आपल्याकडे केवळ दोन तासच स्टुडिओ आहे. तेवढ्या वेळेतच गाणे झाले पाहिजे. तिने होकार दिला आणि ठरल्याप्रमाणे ती आली. आम्ही रिहर्सलला बसलो. ‘आभाळमाया’साठी मी दोन ते तीन चाली लावल्या होत्या आणि तिला हे गाणे सांगता सांगता मला चौथी चाल सुचली. ती चाल अंतिम झाली. आम्हा सगळ्यांना ही चौथी चाल आवडली. त्यानंतर ती ऐकताना प्रेक्षकांना आनंद झाला. आजही ‘आभाळमाया’चे शीर्षकगीत ऐकले, की कान तृप्त होतात. त्यानंतर दुसरी मालिका केली ती ‘वादळवाट’. तिसरी मालिका ‘अवघाचि संसार’, मानसी, गुंतता हृदय हे, ग्रहण, बंधन... माझा मालिकांना शीर्षकगीत देण्याचा प्रवास सुरू होता. या प्रवासातच मला चॅलेंज देणारी एक मालिका आली, तिचे नाव होते ‘अधुरी एक कहाणी...’

ही मालिका माझ्याकडे आली तो एक किस्सा आहे. ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी...’ असे ते गाणे आले. मी राकेश सारंगला म्हणालो, की अरे माझ्याकडे अरुण दाते यांचे गाणे आले आहे. चुकून हे गाणे आले आहे... त्याचदरम्यान शिवाजी मंदिरला मी आणि मंगेश पाडगावकर दोघेही प्रमुख पाहुणे म्हणून एका कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा पाडगावकर यांनी विचारले, की ‘‘अहो पत्की, तुम्ही म्हणे माझ्या गाण्याला चाल लावताय...?’’ मी म्हटलं, ‘‘अधुरी एक कहाणी मालिकेचे बोलता का?’’ ते म्हणाले, ‘‘हो.’’ पुढे ते म्हणाले, ‘‘त्याला काय नवीन चाल लावणार?’’ मी म्हणालो, ‘‘मीदेखील हाच विचार करतो आहे. चॅनेलला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. राकेशला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता बघू काय होते ते. देवाच्या हातात आता आहे ते.’’ पाडगावकर म्हणाले, ‘‘हे तुमच्यासमोर मोठे चॅलेंज आहे.’’ खरोखरच ते माझ्यासाठी चॅलेंजिंग होते. कारण अगोदरच हे गाणे खूप लोकप्रिय ठरलेले होते आणि त्याला नवीन चाल लावायची!

रेकॉर्डिंगचा दिवस उजाडला. देवकीला मी गाणे लिहून घे असे सांगितले. भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक रानी, अर्धावरती डाव... मी सांगत असतानाच देवकी म्हणाली, ‘‘अहो हे गाणे ऐकलेले आहे.’’ मी तिला म्हटलं, ‘‘हो, तुझं बरोबर आहे. अरुण दाते यांनी गायलेलं, यशवंत देव यांनी संगीत दिलेलं आणि मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं ते गाणं.’’ तिने विचारले, ‘‘तुम्ही काय करताय या गाण्याचे.’’ मी म्हटले, ‘‘आपल्याला याला नवीन चाल लावायची आहे.’’ मग आमची रिहर्सल सुरू झाली आणि ते गाणे आम्ही रेकॉर्ड केले. मालिकेच्या कथानकाप्रमाणे ही चाल झाली होती. त्यामुळे लोकांना ते आवडले होते. ते गाणे झाल्याबरोबर चारकोपला या मालिकेचे चित्रीकरण होते. मालिकेतल्या कलाकारांनी हे गाणे ऐकले आणि त्यांची फोनाफोनी सुरू झाली. सगळ्यांनी या गाण्याचे कौतुक केले. देवाची कृपा असेल तर असे सगळे होते. देवकीचा आवाज गोड आहे आणि ठसठशीत आहे. तिच्या गाण्यातील शब्दन्‌ शब्द खोल हृदयापर्यंत पोहोचतो. माझ्या एका फोनवर ती गायला येते. देवकीचे उपकार मानावे तेवढे थोडे आहेत. सुगम संगीत गात असतानाच शास्त्रीय संगीताची ओढ तिला गप्प बसू देत नाही.

सवाई संगीत महोत्सव असो, मेहर संगीत महोत्सव असो किंवा देवगंधर्व संगीत महोत्सव... अशा काही मोठमोठ्या संगीत महोत्सवांमध्ये ती आजही आपली कला सादर करते. तिची गाणी नुसती ऐकली तरी आपण भारावून जातो. लागी कलेजवा कटार, काटा रुते कुणाला, रंगूनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, सप्तसुरांनो... अशी कित्येक गाणी देवकीने आपल्या आवाजाने श्रीमंत केली आहेत. झी मराठीवरील सारेगमप या कार्यक्रमात तिला परीक्षक म्हणून बोलावले होते. तेव्हा गाणे कसे ऐकावे, गाणे कसे गावे, गाण्यातील भावभावना... शब्दांचा थ्रो वगैरे कसा असावा हे ती जेव्हा गाऊन सांगायची तेव्हा नवीन स्पर्धकांना देवकी पंडित किती महान आहेत हे कळायचे. अरुण दाते यांनी हे नवीन चालीतील गाणे ऐकले तेव्हा कधी अशोकला भेटतो आहे असे त्यांना झाले.

माझा पुण्यात एक कार्यक्रम असताना ते आले आणि मला त्यांनी मिठी मारली. माझे भरभरून कौतुक केले आणि म्हणाले, की मला तुमच्याकडे गाणे गायचे राहून गेले. मी म्हटले, की योग लवकरच येईल... बघू या, पण तो योग शेवटपर्यंत कधीच आला नाही.

(लेखक ज्येष्ठ संगीतकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com