‘आटपाट नगरी...’ने रचला नाट्यसंगीताचा पाया..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आटपाट नगरी...’ने रचला नाट्यसंगीताचा पाया..!

तुमचे काम उत्तम असेल तर तुम्हाला एकापाठोपाठ एक कामे मिळत जातात. माझ्या बाबतीत तस्सेच झाले. ‘आटपाट नगरीची राजकन्या’ या नाटकासाठी अभिषेकी बुवांनी माझ्यावर संगीत देण्याची जबाबदारी सोपवली.

‘आटपाट नगरी...’ने रचला नाट्यसंगीताचा पाया..!

तुमचे काम उत्तम असेल तर तुम्हाला एकापाठोपाठ एक कामे मिळत जातात. माझ्या बाबतीत तस्सेच झाले. ‘आटपाट नगरीची राजकन्या’ या नाटकासाठी अभिषेकी बुवांनी माझ्यावर संगीत देण्याची जबाबदारी सोपवली. ते उत्तम झाल्याची शाबासकीही पंडितजींकडून मिळाली. त्यानंतर मी स्वतंत्ररीत्या ‘कैकेयी’ हे एक नाटक केले. त्यातील संगीत ऐकूनही बुवांनी माझी पाठ थोपटली आणि स्वतंत्ररीत्या संगीतकार म्हणून माझा प्रवास सुरू झाला.

लेकुरे उदंड जाहली हे नाटक कसे काय घडले, याची एक वेगळी कहाणी आहे. या नाटकाचे लेखक वसंत कानेटकर, धी गोवा असोसिएशनचे अध्यक्ष रामकृष्ण नाईक आणि पंडित अभिषेकी हे तिघेही रिगल चित्रपटगृहात एक चित्रपट पाहण्यास गेले होते. चित्रपट पाहिल्यानंतर ते तिघेही बाहेर आले. त्यांना चित्रपट आवडलेला होता; पण कुणाच्याही तोंडून चकार शब्द निघत नव्हता. तेवढ्यात कानेटकरांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि ते रामकृष्ण नाईक यांना म्हणाले, की ‘रामकृष्ण, आपण यावर नाटक करूया का?’ त्यावर रामकृष्ण नाईक म्हणाले, की ‘तो चित्रपट इंग्रजी आहे आणि त्यामध्ये संगीत अधेमधे आहे. यावर नाटक कसे होईल?’ त्यावर कानेटकर म्हणाले, की ‘मी त्याला मराठमोळे करतो. त्यानंतर आपण चर्चा करू.’ तिथेच तिघांचे हे नाटक करायचेच ठरले. त्यानंतर एक-दीड महिन्याने कानेटकर नाटक लिहून घेऊन आले. त्यावर सगळ्यांची साधकबाधक चर्चा झाली आणि ते नाटक रंगभूमीवर आले.

या नाटकात श्रीकांत मोघे आणि कल्पना देशपांडे ही गोव्याची गायिका-अभिनेत्री यांनी काम केले होते. तेव्हा आम्ही या नाटकाच्या गाण्याचे ट्रॅक बनवले होते. नोटेशन्स काढली होती. तेव्हा हा प्रकार आधुनिक होता. तो करताना मजा आली. कलाकारांनीही कमाल केली होती. या नाटकाचा विषयच छान होता. एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक होते. आजही इतक्या वर्षांनी ते नाटक तितकेच ताजे वाटते.

‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचाही असाच एक किस्सा आहे. या नाटकाची रिहर्सल कॅडल रोडवरील हॉलमध्ये चालायची. पं. वसंतराव देशपांडे, प्रसाद सावकार, फैय्याज, बालकराम अशी मंडळी तेथे जमायची. संगीत नाटक असल्यामुळे अनेक मंडळी उपस्थित असायची. या नाटकातील चार ते पाच गाणी कंपोझ झाली होती आणि अचानक अभिषेकीबुवा यायचेच बंद झाले. दोन दिवस झाले, चार दिवस झाले, अभिषेकीबुवा येतच नव्हते. ते का येत नाहीत, आजारी आहेत की काय, कुणाला काही समजत नव्हते. मग त्यांना शोधण्यासाठी आमची धावपळ सुरू झाली. पहिल्यांदा आम्ही त्यांच्या दादर येथील घरी गेलो. तेथे काही माहिती मिळाली नाही. नंतर गोव्यात त्यांची चौकशी केली. गोव्यात मंगेशी हे त्यांचे मूळ देवस्थान. तिथे त्यांचे घरही होते. त्यामुळे तिथे गेले असावेत, तर तिथेही नव्हते. लोणावळ्यात त्यांचा बंगला होता. तिथे कधी कधी रियाज करण्यासाठी ते जायचे. त्यामुळे तेथे चौकशी केली तर तिथेही ते गेलेले नव्हते. मग अभिषेकीबुवा गेले कुठे, आमच्यासमोर मोठा प्रश्न होता. पंधरा ते वीस दिवस झाले. त्यांचा काही ठावठिकाणा समजत नव्हता. आम्ही खूप चिंतेत होतो. त्यानंतर या नाटकाचे निर्माते प्रभाकर पणशीकर वसंतरावांना म्हणाले, की ‘आपली सगळी कामे झालेली आहेत. पुढील सात ते आठ गाणी आहेत. त्याला तुम्ही चाली लावून टाका.

केवळ गाण्यासाठी आपण थांबलो आहोत.’ त्यावर वसंतराव म्हणाले, की ‘नाही नाही. अभिषेकी करतील ते माझ्यासाठी सर्वस्व आहे.’ त्यानंतर त्यांनी प्रसाद सावकार यांना विचारले आणि त्यांनीही नाही सांगितले. मग माझ्याकडे येऊन मला म्हणाले, की ‘‘अशोक, तू सगळ्यात तरुण आहेस. त्यामुळे तू ही जबाबदारी घे.’ त्यावर मी त्यांना म्हणालो, की ‘ही गाणी म्हणजे शिवधनुष्य आहे आणि ते मला पेलणार नाही. मी नवीन आहे या क्षेत्रात. मला अजून खूप काही शिकायचे आहे.’ त्यानंतर आणखीन दोन-चार दिवस गेले आणि अचानक एके दिवशी सकाळी अभिषेकीबुवा तेथे प्रकट झाले. त्यांना असे अचानक आलेले पाहताच सगळ्यांची धावपळ सुरू झाली आणि आनंदही झाला. लगेच ते म्हणाले, की चला गाणी करायची आहेत. सगळ्यांनी बसून घ्या. आम्ही गोलाकार बसून घेतले. या भवनातील गीत पुराणे, घेई छंद मकरंद, राग मालिका होती आणि तीही झाली. दोन ते तीन-चार तास आम्ही सगळे प्रसन्न मुद्रेने काम करीत होतो. त्यानंतर हे नाटक रंगभूमीवर आले आणि प्रचंड गाजले. क्लासिकल नाटक असूनसुद्धा महाविद्यालयीन मुलेही या नाटकाला गर्दी करायची हे या नाटकाचे एक वैशिष्ट्य. कट्यारमधील गाण्याची ताकद मोठी होती. याबाबतीतील एक आठवण सांगायची तर शिवाजी मदिर येथील प्रयोगाला एक वर्षभर संगीतकार मदन मोहन यायचे. त्यांच्यासाठी पहिल्या रांगेतील एक सीट राखीव असायची.

मला संगीत देण्यासाठी पहिले नाटक मिळाले तेदेखील अभिषेकीबुवांमुळेच. धी गोवा हिंदू असोसिएशनचे ते नाटक होते. ‘आटपाट नगरीची राजकन्या’ असे त्या नाटकाचे नाव. ते बालनाट्य होते आणि त्यात सातआठ गाणी होती. अभिषेकीबुवा रामकृष्ण नाईकांना म्हणाले, की ‘‘या नाटकाला अशोक संगीत देईल. तो सतत काही ना काही नवीन करीत असतो. तो छान करील अशी मला खात्री आहे’’ आणि खरोखरच ते संगीत उत्तम झाले. मला कित्येकांचे कौतुकाचे फोन आले आणि तेथून माझा नाटकाचा प्रवास खऱ्या अर्थी सुरू झाला.

तुमचे काम उत्तम असेल तर तुम्हाला एकापाठोपाठ एक कामे मिळत जातात. माझ्या बाबतीत तस्सेच झाले. त्यानंतर मी स्वतंत्ररीत्या ‘कैकेयी’ हे एक नाटक केले. त्यातील संगीत ऐकून अभिषेकीबुवांनी मला शाबासकी दिली. छान केले आहेस असे ते म्हणाले. त्यांच्या पत्नी विद्याताईंनादेखील यातील गाणी खूप आवडली. त्यांनीही माझे कौतुक केले. अभिषेकी बुवांकडे मला खूप काही शिकायला मिळाले. मी सुरांनी आणि गाण्यांनी जो काही श्रीमंत झालो त्यामध्ये अभिषेकी बुवा यांचा वाटा मोलाचा आहे.

(लेखक प्रसिद्ध संगीतकार आहेत.)

Web Title: Ashok Patki Writes Drama Music Base

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..