गोव्यातलं महानाट्य संभवामि युगे युगे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Patki

अनेक नाटकांना संगीत देता-देता नाटकवाल्यांशी घरोबा वाढू लागला होता. त्यातूनच गोव्यातील ‘संभवामि युगे युगे’ महानाट्याला संगीत देण्याची संधी मिळाली.

गोव्यातलं महानाट्य संभवामि युगे युगे!

अनेक नाटकांना संगीत देता-देता नाटकवाल्यांशी घरोबा वाढू लागला होता. त्यातूनच गोव्यातील ‘संभवामि युगे युगे’ महानाट्याला संगीत देण्याची संधी मिळाली. हे महानाट्य म्हणजे गोव्यासाठी आणि मुंबईकरांसाठी एक चमत्कारच होता. खरं तर एवढा मोठा तामझाम घेऊन प्रयोग करणं खूप कठीण काम होतं; परंतु ते आव्हानही आम्ही पेललं...

एकदा मला गोव्याहून अजय वैद्य नावाच्या माझ्या मित्राचा फोन आला. अजय म्हणजे निवेदक. एक सुसंस्कृत गृहस्थ. निवेदन करण्यात त्यांचा गोव्यात मोठा गवगवा. विषय कोणताही असो, संगीत, नाटक, सिनेमा, नाट्यगीत... संगीतातील घराण्याचा अभ्यास ते इतक्या बारकाईने करतात, की सर्व काही तोंडपाठ असल्यासारखं बोलून दाखवतात. गोवा आणि मुंबईतील मोठमोठ्या गायक-वादकांची ओळख त्यांना आहे. शब्दांवर जबरदस्त पकड आणि मधुरवाणीमुळे समोरचा माणूस नुसता ऐकत राहतो... माझ्या मालिकांच्या शीर्षकगीतांवर ते एकदम खूश असतात. ‘राधा ही बावरी’ची त्यांची कॉलर ट्यून गेली बारा वर्षे मी ऐकतोय म्हणजे बघा... विशेष सांगण्यासारखं म्हणजे त्यांचे वडील शंभर वर्षे जगले.

आम्ही, म्हणजे मी आणि प्रतिमा कुलकर्णी गोव्याला गेलो होतो तेव्हा बोलता बोलता अजय वैद्य म्हणाले, की आज बाबांचा १०० वा वाढदिवस आहे. ते ऐकताच आम्ही मात्र चकित होऊन एकमेकांकडे पाहतच राहिलो. कसंही करून त्यांना भेटायला जायचं मी ठरवलं. मग मिठाई वगैरे घेऊन मी त्यांच्या घरी गेलो. बाबांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि १०० वर्षं जगलेला माणूस कसा असू शकतो ते जवळून पाहायला मिळालं. ते तरतरीत होते. पटकन उठायचे आणि पटकन बसायचे. आम्ही पाणी मागितलं तर स्वतः जाऊन फ्रिजमधून घेऊन आले. त्यांच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती नव्हती. ते अगदी टुणटुणीत होते. त्यांना भेटून खूप आनंद झाला...

नंतर पुन्हा एकदा मला अजयजींचा फोन आला. ते म्हणाले, की आम्ही तुम्हाला मुंबईला येऊन भेटायचं म्हणतोय. मी विचारलं, आम्ही म्हणजे? अजयजी तत्काळ म्हणाले, ‘जाणता राजा’च्या धर्तीवर एक महानाट्य करायचं आमच्या मनात आहे. आम्ही चौघे-पाच जण तुम्हाला येत्या रविवारी भेटायला आलो तर चालेल का? मलाही उत्सुकता होतीच. मी त्यांना भेटायचं निमंत्रण दिलं. म्हटलं, नक्की या... ही गोष्ट २००७ आणि २००८ ची आहे. रविवारी सकाळी दहा-साडेदहाच्या दरम्यान विजयदुर्ग संस्थेचे देसाई व त्यांचे छोटे बंधू राजू देसाई, अजय वैद्य आणि गोव्याचा एक संगीतकार साईश देशपांडे अन् दिग्दर्शक असे चार-पाच जण माझ्या घरी आले.

एकमेकांची ओळखपाळख झाल्यावर देसाई म्हणाले, की आम्ही ‘संभवामि युगे युगे’ नावाचं कृष्णाच्या जीवनावरचं महानाट्य करत आहोत आणि हे आमचे संगीतकार साईश देशपांडे... तुम्ही यांना मदत करावी, अशी आमची इच्छा आहे. कारण तुमचा इतका दांडगा अनुभव त्याच्यासोबत शेअर केलात तर त्यालाही मदत होईल! त्यांचं बोलणं ऐकून मी दोन मिनिटं शांतच राहिलो. म्हटलं, बहुतेक मला आता याच्याबरोबर असिस्टंट म्हणून काम करावं लागणार... सर्व मित्रच आहेत, असा विचार करून मी लगेच होकारही देऊन टाकला. जमेल तेवढी मदत मी तुम्हाला करीन, असंही सांगून टाकलं.

मग साईश कामाला लागला. त्याने अॅरेंजमेंट कशी करतात, रेकॉर्डिंग कसं करतात, तयारी कशी होते, कलाकारांना भेटायचं कसं, त्यांचं बजेट कसं ठरवायचं, रेकॉर्डिंग म्हणजे स्टिरीओ करायचं की डॉल्बी... इत्यादी सर्व बारकावे त्याने माझ्याकडून जाणून घेतले. गोव्यात मुंबईसारखं प्रस्थ नसल्यामुळे त्याला या गोष्टी माहीत नव्हत्या. निर्मात्यांपैकी एक असलेले राजू देसाई हे सर्व ऐकत होते आणि आपल्या वहीत नोंद करून ठेवत होते. मी त्यांना सर्व प्रकारची मदत करीन, असं सांगितलं. त्यानंतर ही सगळी मंडळी गोव्याला निघून गेली. दीड ते दोन तासांनी मला राजू देसाई यांचा पुन्हा फोन आला.

पत्कीसाहेब, तुम्ही तुमच्या घरी बोलत होता तेव्हाच आमच्या मनात एक विचार आला, की या महानाट्याचं संगीत तुम्हीच का करू नये... मी लगेच म्हटलं, की तुम्ही साईशला सांगितलं आहे. मी संगीत केलं तर त्याच्याकडून काम काढून घेतल्यासारखं होईल. मी तुम्हाला सगळी मदत करायला तयार आहे, मग काय...? तरीही आम्हाला असं वाटतं की याचं संगीत तुम्हीच करावं. त्याला काय सांगायचं किंवा कसं पटवायचं ते आमच्यावर सोडा. कारण एका महानाट्याचं एवढं मोठं काम करायचं म्हणजे संगीतकाराचा अनुभवही तेवढाच दांडगा असला पाहिजे.

साईशचं म्हणणंही तेच आहे. हवं तर तुम्ही बोला त्याच्याशी... देसाईंच्या अशा बोलण्यावर मी निरुत्तर झालो... साईशने फोन घेतला आणि मला म्हणाला, की सर, हे सगळं म्हणतात ते खरं आहे. माझा अनुभव तोकडा पडणार. उलट तुमच्याबरोबर रेकॉर्डिंगला आलो, तर मला खूप काही शिकता येईल. मी त्याला म्हणालो, की केव्हाही ये. तुझ्या ज्ञानात भर पडेल. मग एक-दोनदा तो आला खरा; पण त्याला नेहमी येणं जमणार नव्हतं. कारण तो ऑल इंडिया रेडिओच्या गोवा केंद्रात रेकॉर्डिस्ट होता. त्यामुळे दर वेळी त्याला ते सोडून येणं शक्य नव्हतं.

मी गाण्यांना चाली लावण्यास सुरुवात केली; परंतु सेटचा अंदाज नसल्याने चार वेळा गोव्याला रिहर्सल पाहायला गेलो. आपलं काम परफेक्ट व्हावं हा त्यामागचा हेतू. महानाट्यातील नृत्याचं काम मी मयूर वैद्यला दिलं होतं. कारण तोही एक मोठा नृत्यदिग्दर्शक आहे. तो अर्चना जोगळेकर यांचा शागीर्द आहे. त्याला काम दिल्यामुळे तो दीड ते दोन महिने तिथेच होता. त्या महानाट्यात दीडेकशे कलाकार काम करणारे होते. आमच्यातर्फे सगळं काम पूर्ण झालं होतं. त्यानंतर आमचा रेकॉर्डिस्ट अवधूत वाडकर म्हणाला, की मी येतो बघायला... काही राहिले असेल किंवा दुरुस्त करायचे असेल, तर उरकून घेऊ म्हणून आम्ही पुन्हा गोव्याला गेलो. त्याने तो सेट वगैरे सगळं पाहिलं. मग मुंबईला येऊन ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या आम्ही पू्र्ण केल्या. त्यानंतर अंतिम कॉपी आम्ही त्यांना पाठवून दिली. त्यांना ती खूपच आवडली.

‘संभवामि युगे युगे’ महानाट्य म्हणजे गोव्यासाठी आणि मुंबईकरांसाठी एक चमत्कार होता. त्यातील गाणी स्वप्नील बांदोडकर, माधुरी करमरकर, देवकी पंडित आणि पं. अजय पोहनकर यांनी गायली. गोव्याला एका मंदिरात प्रयोगाच्या आधी नाट्याचा मुहूर्त केला. ती गाणी आम्ही तिथे सादर केली तेव्हाच गोवेकरांना कुणकुण लागली की गोव्यात काहीतरी नवीन होत आहे. आम्हालाही काम करताना मजा आली. या महानाट्याचे प्रयोग केवळ गोव्यातच रंगले नाहीत, तर मुंबई, पुणे, बेळगाव इत्यादी ठिकाणीही झाले. साधारण ७५ ते ८० प्रयोग झाले असावेत. खरं तर एवढा मोठा तामझाम घेऊन प्रयोग करणं खूप कठीण काम होतं; परंतु राजू देसाई यांनी ते आव्हान व्यवस्थित पेललं. प्रेक्षकांनीही हे महानाट्य डोक्यावर घेतलं. त्याला चांगली पसंती दिली आणि विजयदुर्ग संस्था आणि राजू देसाई वगैरे सगळी मंडळी खूश होती. आम्हालाही खूप आनंद झाला. माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता...

(लेखक ज्येष्ठ संगीतकार आहेत.)