दिग्गजांच्या सोबतीने श्रीमंत झाली गाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Patki

श्याम बेनेगल साहेब, गोविंद निहलानी साहेब, वनराज भाटिया, पी. पी. वैद्यनाथन ही सगळी मंडळी जाहिरात आणि सिनेमातील खूप मोठी माणसे.

दिग्गजांच्या सोबतीने श्रीमंत झाली गाणी

श्याम बेनेगल साहेब, गोविंद निहलानी साहेब, वनराज भाटिया, पी. पी. वैद्यनाथन ही सगळी मंडळी जाहिरात आणि सिनेमातील खूप मोठी माणसे. त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली, त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. खूप गमतीजमती झाल्या. मला खूप काही शिकता आले. त्यांच्यासोबतच्या प्रवासाने माझे गाणे श्रीमंत झाले.

श्याम बेनेगल यांच्याबरोबर मी तीन प्रोजेक्ट केले. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ ही मालिका, ‘मम्मो’ आणि ‘सरदारी बेगम’ हे चित्रपट. श्याम बेनेगल म्हटलं की एक उत्तम दिग्दर्शक आणि काहीतरी नवा विषय, नवे प्रेझेंटेशन. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकावर आधारित ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या मालिकेचे काम करायचे ठरले. त्या मालिकेचे वनराज भाटिया हे खरे संगीतकार; पण सिंफनी, ऑपेरा, हार्मनी म्युझिक हे जर सोडले तर इंडियन म्युझिकबद्दल वनराज यांची पोच कमी होती. मग त्यांना मदतीला कुणीतरी लागायचा. मग क्लासिकल म्युझिक, ठुमरी, गझल्स वगैरेंसाठी ते माझी मदत घ्यायचे. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये भारतातील सर्व प्रकारच्या वाद्यांवर, संगीतावर आम्ही अभ्यास करून एकेक पाऊल पुढे टाकत होतो. विविध प्रांतातील वेगवेगळ्या प्रकारची गाणी, त्या गाण्याच्या पद्धती, तेथील नृत्य यांचा आम्हाला अभ्यास करावा लागला. बाहेरच्या प्रांतातून आम्ही काही गायक व वादकही बोलावले होते, कारण त्या गाण्याचा रिअल इफेक्ट मिळावा म्हणून. त्यामुळे आम्हाला प्रत्येक गाण्याचा कलर मिळायला लागला. काम होते वनराज यांचे; परंतु सिटिंग वगैरे माझ्या घरी व्हायची.

वनराज यांची एकच तक्रार असायची. मी नाथनकडे काम करतो याची. वनराज मला म्हणायचे की, मी तुला नाथनपेक्षा अधिक पैसे देतो; परंतु मी कधी पैशासाठी काम केले नाही. मोठमोठ्या लोकांबरोबर काम करून शिकायला मिळतेय म्हणून पैशाचा फारसा विचार न करता काम करायचो. ‘डिस्कव्हरी...’ या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. लोक पुन:पुन्हा टीव्हीवर ती मालिका पाहायचे. त्यानंतर श्याम बेनेगल यांनी ‘मम्मो’ चित्रपटाची घोषणा केली. त्यामध्ये एक गाणे गझल प्रकारचे होते. वनराज यांनी त्याला आपल्या भाषेत चाल लावली. गुलजार यांचे ते शब्द होते आणि गाणार होते जगजित सिंह.

वनराजकडे गाणे आले की ते मला फोन करायचे आणि गाणे सांगायचे. चाल लावून उद्या ये, असे बोलायचे; पण या वेळी सगळे काही गुपचूप चाललेले होते. काय झाले ते मलाही ठाऊक नव्हते. एका संध्याकाळी वनराज यांचा फोन आला. ते वरच्या पट्टीत बोलत होते. जगजित सिंह यांच्याबाबत राग व्यक्त करीत होते. वेस्टर्न आऊट डोअर स्टुडिओत वनराज यांना जगजित सिंह भेटले होते. त्या वेळी वनराज यांनी जगजित यांना ‘‘एक गाणे आहे... ते गाणे गुलजार यांनी लिहिले आहे. तुम्हाला गाण्याची ट्यून कधी ऐकवू,’’ असे विचारले. जगजित म्हणाले, की ‘‘मी संध्याकाळी सहा वाजता मोकळा होणार आहे. आपण येथून एकत्रच निघूया. मग ऐकव गाडीत मला ट्यून.’’ वनराज यांचा आवाज काही खास नव्हता. त्यांनी आपल्या स्टाईलने गाणे ऐकविले आणि ते ऐकताच जगजित यांनी वनराज यांना गाडीतून खाली उतरविले. म्हणून वनराज भडकले होते. जगजित यांची ही वागण्याची पद्धत योग्य नाही, असे मला सांगत होते. ‘‘आता तूच जगजितला फोन कर व विचार, असे ते का वागले माझ्याबरोबर.’’

मी जगजित यांना फोन केला. ते म्हणाले, ‘‘गाणे ऐकवण्याची ही काय पद्धत झाली... सूरांचा काहीच पत्ता नाही आणि ट्यूनचाही. मला त्यांचा राग आला म्हणून उतरविले गाडीतून.’’ मी ही बाब वनराज यांना सांगितली. ‘‘तुम्ही गाणे गाऊन दाखविले ते जगजित यांना आवडलेले नाही.’’ मग वनराज मला म्हणाले, ‘‘मी तुला गाणे पाठवितो. तू त्याला चाल लाव.’’ मी लगेच जगजित यांना फोन केला आणि सांगितले की, ‘‘त्या गाण्याला मी आता चाल लावतो आहे... आता तरी गाणार ना?’’ ते हो म्हणाले. दुसऱ्या दिवशी मी त्याला चाल लावली आणि ती जगजित यांना आवडली. नंतर या गाण्याचे रेकॉर्डिंग होते वेस्टर्न आऊट डोअरला. तेव्हा श्याम बेनेगल, गुलजार, वनराज, जगजित आणि मी तिथे होतो. गाणे छान रेकॉर्ड झाले.

वनराज भाटियांनी सांगितले की, ‘‘श्याम बेनेगल यांचा नवीन सिनेमा येत आहे. त्याचे नाव ‘ठुमरी’. गाण्यावर आधारित हा चित्रपट आहे.’’ गाण्यावर आधारित असे सांगितल्यामुळे मी मनोमन खुश झालो. पहिल्यांदा या चित्रपटाचे नाव ‘ठुमरी’ होते. त्यानंतर ‘सरदारी बेगम’ झाले. श्याम बेनेगल, वनराज आणि माझी एकत्रित एक बैठक झाली. श्याम बेनेगल यांनी आम्हाला चित्रपटाची कथा ऐकविली आणि सांगितले की, ‘‘क्लासिकल अशा प्रकारची बारा ते तेरा गाणी करायची आहेत. या वेळी जावेद अख्तरजी गाणी लिहिणार आहेत.’’ मग प्रश्न आला की ही गाणी गाणार कोण कोण? मी सांगितले की आरती अंकलीकर यांच्याकडून गाणी गाऊन घेऊया. कारण क्लासिकल आणि ठुमरी या दोन्ही पद्धतीने त्या उत्तम गातील. त्यांचा आवाजही निराळा आहे. त्यांच्याकडून गाणी गाऊन घ्यायचे ठरले. मी फोन लावला. त्यांनी लगेच होकार दिला.

आम्ही एका आठवड्यासाठी रेडिओ वाणी स्टुडिओ बुक केला. ठरल्याप्रमाणे पहिल्या दिवशी श्‍याम बेनेगल आले. त्यांनी पहिल्या गाण्याची सिच्युएशन सांगितली. जावेद अख्तर एका बंदिस्त खोलीमध्ये गेले. थोड्या वेळानंतर ते बाहेर आले आणि आमच्या हातात एक कागद ठेवला. तो गाण्याचा मुखडा होता. त्यानंतर त्यांनी पहिला अंतरा लिहिला... दुसरा लिहिला.. अशा पद्धतीने गाणे रेकॉर्ड झाले. आमच्या पाच ते सात जणांच्या टीमने गाणे रेकॉर्ड करून घेतले. अर्ध्या तासात आरती अंकलीकर यांनी ते गाणे छान गायले. मग श्यामजी आले आणि त्यांनी ते ऐकले. ते खुश झाले आणि संध्याकाळी येतो, असे सांगून निघून गेले. संध्याकाळी त्यांनी दुसरे गाणे ऐकून आमची पाठ थोटपली. अशा पद्धतीने पहिल्या दिवशी दोन गाणी झाली. मध्येच कुणीतरी म्हटले की सगळी गाणी आरती अंकलीकर गाणार आहेत का? मग चर्चा सुरू झाली आणि आशाताईंकडून दोन गाणी गाऊन घ्यायची असे ठरले.

आरती अंकलीकर, आशा भोसले, शुभा जोशी आणि आणखीन एक लहान मुलगी या सगळ्यांनी ‘सरदारी बेगम’ या चित्रपटातील गाणी गायली. हा एक आठवड्याचा ऑन द स्पॉट गाणी बनविण्याचा प्रकार सगळ्यांना खूप भावला. मला खूप मजा आली. एका वेगळ्याच विश्वात गेल्याचे समाधान लाभले. संगीतकार म्हणून नाव झाले ते वनराज भाटियांचे. चित्रपट संपल्यानंतरच्या शेवटच्या नामावलीत अगदी बारीक अक्षरात माझे नाव आले. मी तेथे सहायक म्हणून काम करीत होतो. एक प्रकारची गुरुदक्षिणाच म्हणून मी ते काम केले. तसं पाहायला गेलं तर नाथन किंवा वनराज यांच्याकडे मी कधी पैशासाठी काम केले नाही. आपले एक कुटुंब आहे त्याचाच विचार करून काम केले. आजही ‘सरदारी बेगम’चा विषय निघाला की वनराज यांचे नाव घेतले जाते; पण मला त्यामध्ये कसलाही कमीपणा वाटत नाही. माझ्या दृष्टीने महत्त्वाचे काय आहे, तर ते काम. समोर आलेले काम आपण चोखपणे केले पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे.

गोव्याचे निर्माते व दिग्दर्शक राजन तालक यांच्याबरोबर मी पुष्कळ काम केले आहे. त्यांच्या सावली आणि अंतर्नाद या चित्रपटाला संगीत दिले. सावली हा चित्रपट मराठीत; तर अंतर्नाद कोकणी भाषेत होता. अंतर्नादमध्ये बलमवा तुम क्या जानो प्रीत... या गाण्याला आरती अंकलीकर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मलाही चित्रपटातील संपूर्ण संगीतासाठी ५४ वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दिल्लीत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आम्हाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आम्हाला खूप आनंद झाला. हा पुरस्कार घेण्यासाठी आम्ही दोन दिवस अगोदर दिल्लीला गेलो होतो. कारण रिहर्सलसाठी. रिहर्सल कसली तर... पुरस्कार घ्यायला जाणार तेव्हा कोणत्या वाक्यानंतर उठायचे, किती पावले चालायचे आणि राष्ट्रपती व आपल्यामध्ये अंतर किती ठेवायचे याची. राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यासाठी मी तेव्हा देवाला नवस केला होता.

‘आपली माणसं’ हा सुधीर भटांचा चित्रपट. त्यात एकच गाणे होते ‘नकळता असे ऊन मागूनी येते’. माझ्याबरोबर स्पर्धा होती ती ‘विदूषक’ या चित्रपटाची. त्यामध्ये सोळा गाणी होती. म्हणजे एक गाणे आणि सोळा गाणी अशी मोठी स्पर्धा होती. तेव्हा देवाला गाऱ्हाणे घातले की देवा या एका गाण्याला पुरस्कार मिळाला, तर पुढील दहा वर्षे मला पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल. देवाने माझी ती विनंती ऐकली. दहा ते बारा वर्षे मला नामांकने मिळाली; पण पुरस्कार काही मिळाला नाही. बारा वर्षांनंतर ‘अंतर्नाद’ या चित्रपटासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच ‘सावली’ या चित्रपटासाठी राज्य पुरस्कार मिळाला. ते वर्ष माझ्यासाठी खूप चांगले गेले. त्याकरिता मी देवाचे आभार मानले.

(लेखक ज्येष्ठ सगीतकार आहेत.)