सुमन कल्याणपूर भेटल्या अन्‌ आयुष्याचं भलं झालं!

माझ्या गायकीचा प्रवास टप्प्याटप्प्याने वळणे घेत होता. माझ्यासोबत काम करणारे काही सहृदयी मित्र, सहकारी कुठल्या तरी मोठ्या व्यक्तींना भेट म्हणून सांगत होते.
Suman Kalyanpur
Suman KalyanpurSakal
Summary

माझ्या गायकीचा प्रवास टप्प्याटप्प्याने वळणे घेत होता. माझ्यासोबत काम करणारे काही सहृदयी मित्र, सहकारी कुठल्या तरी मोठ्या व्यक्तींना भेट म्हणून सांगत होते.

माझ्या गायकीचा प्रवास टप्प्याटप्प्याने वळणे घेत होता. माझ्यासोबत काम करणारे काही सहृदयी मित्र, सहकारी कुठल्या तरी मोठ्या व्यक्तींना भेट म्हणून सांगत होते. माझ्या या प्रवासात हा सांगावा खूप महत्त्वाचा ठरला आहे. १९६४ च्या दरम्यान एका मित्राने सुमन कल्याणपूर यांना भेटण्याचे सांगून त्यांचा पत्ताही दिला. मी भेटलो आणि कालांतराने मी संगीतकार कसा झालो, त्याची ही गोष्ट...

१९६४ मध्ये मला दोन महान व्यक्तींबरोबर काम करण्याचा योग आला. एक म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी आणि दुसऱ्या सुमन कल्याणपूर. १९६४ मध्ये ‘मस्त्यगंधा’ या नाटकाची गाणी केल्यानंतर एका महिन्याने एक मित्र भेटला. म्हणाला, ‘अरे, सुमनताई एका चांगल्या हार्मोनियम वाजवणाऱ्याच्या शोधात आहेत. तू जाऊन भेट. ऑडिशन्स दे. खार रेल्वे स्टेशनजवळच त्या राहतात. तुझ्या आयुष्याचे भले होईल.’

दुसऱ्या दिवशी सुमनताई यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. विचारपूस झाली. त्यानंतर त्यांनी विचारले, ‘यापूर्वी कुणाकुणाला वादनासाठी साथसंगत केली आहे?’ मी सांगितले, ‘नव्या गायकांना घेऊन काही कार्यक्रम करतो आणि आता याच क्षेत्रात काहीतरी करायचे आहे.’ त्या म्हणाल्या, ‘काही वाजवून दाखवू शकतोस?’ मी म्हणालो, ‘मला क्लासिकल येत नाही, परंतु माझ्या आवडीचे दोन संगीतकार आहेत शंकर-जयकिशन, त्यांची गाणी वाजवून दाखवू शकतो.’ त्या म्हणाल्या, ‘कोणती वाजवून दाखवणार...’ मी म्हटले, ‘‘आजा सनम मधुर चांदनी में हम आणि ये रात भीगी भीगी...’ ही दोन्ही गाणी वाजवून दाखवताच त्या खूश झाल्या. ही गाणी त्यांच्याही आवडीची होती, हे मला नंतर समजले. त्या म्हणाल्या, ‘मला पाचसहा वादकांची एक टीम बनवायची आहे. एक तबलेवाला. एक फ्युटवाला, एक सितारवाला, एक ढोलकवाला वगैरे. या संपूर्ण टीमचे तुम्ही मॉनिटर असाल.’ हे ऐकून मला खूप आनंद झाला. तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा होता.

पुढील दोन महिन्यांत सितारसाठी अरविंद मयेकर, फ्युटसाठी रमाकांत पाटील, तबल्यासाठी अण्णा जोशी, ढोलकसाठी दुबेजी, कोंगोसाठी दिवाण गांगुली, अकॉर्डियनसाठी अरुण पौडवाल आणि मी हार्मोनियमवर अशी टीम तयार झाली. मग आमचे दिल्ली, कोलकाता, मद्रास, बंगलोर वगैरे ठिकाणी दौरे होऊ लागले. तब्बल चारेक वर्षे आम्ही विविध ठिकाणी प्रोग्रॅम केले.

१ जानेवारी १९६९ या दिवशी सकाळी सकाळी मला मिस्टर कल्याणपूर यांचा फोन आला. आपण तीन महिन्यांसाठी सुमन कल्याणपूर यांचा शो घेऊन वेस्ट इंडीज दौऱ्यावर जात आहोत, ही बातमी सांगितली. मला विश्वास बसला नाही, परंतु लगेच त्यांनी सांगितले, ‘‘ही आनंदाची बातमी तुम्ही तुमच्या टीमला सांगा. दोनेक दिवसांनी आपण आमच्या घरी एक बैठक घेऊ.’’ दोन दिवसांनी बैठक झाली. विविध बाबींवर विचारविनिमय करण्यात आला. अगदी सामान घेण्यापासून ते बूट आणि सुटापर्यंत चर्चा झाली. सुमनताई यांच्या बंगल्याजवळील एका दुकानातून सूट आम्ही एकाच रंगाचे शिवून घेतले. त्यानंतर सुमनताई म्हणाल्या, ‘‘आपल्याला पन्नासेक गाणी बसवावी लागतील. त्यामध्ये हिंदी आणि मराठीबरोबरच पंजाबी, गुजराती वगैरे गाणी असतील.’’ आम्ही पन्नासेक गाणी निवडली आणि सुमनताई यांच्या सांगण्यावरून त्यांचे सचिव शरू बर्वे यांच्या घरी मी आणि अरविंद मयेकर नोटेशन काढायला बसलो. नोटेशन कसे काढायचे हे मला मयेकर यांनी शिकवले. चारपाच दिवसांनी आमची दहा एक गाणी तयार झाली. संध्याकाळी सगळ्यांबरोबर रिहर्सल करताना मजा यायची.

चारेक दिवसांनी शरू मला म्हणाले, ‘अशोक, तू तबला छान वाजवतोस... पेटी छान वाजवतोस... नोटेशन काढणे तुला सोपे झाले आहे आता... अधेमध्ये तू छान गुणगुणतोस... मग तू संगीतकार का नाही होत...?’ मी म्हटले, ‘‘संगीतकार होणे हे वाटते तितके सोपे नाही. त्यासाठी रागांचा अभ्यास करावा लागतो. कल्पनाशक्ती अफाट लागते. विशेष म्हणजे तपश्चर्या खूप करावी लागते. हे सगळे झाल्यानंतर मग कुठे तरी संगीतकार बनता येते. माझी आताच कुठे संगीत क्षेत्रात एण्ट्री झाली आहे.’ माझ्या या उत्तरावर ते म्हणाले, ‘माझा एक कवी मित्र आहे औरंगाबादचा, अशोक परांजपे. तो माझ्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायला येणार आहे. तो तुला तीनचार गाणी देईल. तू तुझ्या सोयीनुसार त्याला चाली लाव.’ त्याप्रमाणे अशोक परांजपे यांच्याशी माझी ओळख झाली. अशोकजींनी चार गाणी दिली. सुरुवातीला या गाण्यांना चाली लावण्याचे मला खूप टेन्शन आले होते; परंतु एका महिन्यात मी चार गाण्यांना चाली लावल्या आणि ती चारही गाणी अशोक परांजपे आणि शरू यांना ऐकवली. त्या गाण्यांतील मेलेडी ऐकून ते खूश झाले. त्यांनी मला ही गाणी सुमनताई यांना ऐकवण्यास सांगितले, पण माझे धाडस झाले नाही. आठ दिवस झाले तरी मी सुमनताईंना या गाण्यांबद्दल काही बोललो नाही. त्या यायच्या, रिहर्सल करायच्या आणि निमूटपणे निघून जायच्या. मला शरू म्हणाले, ‘अशोक, तू सुमनताईंना गाणी ऐकवली का...?’ मी म्हणालो, ‘नाही. मला खूप भीती वाटते.’ ते म्हणाले, ‘आता मला तिथे यावे लागेल आणि सांगावे लागेल.’

त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शरू तिथे आले आणि त्यांनी सुमनताईंना सांगितले, ‘अशोकने चार गाणी बनवली आहेत, ती तुम्ही ऐका.’ सुमनताईंनी ती गाणी ऐकली. त्यांना ती खूप आवडली. लगेच त्यांनी मिस्टर कल्याणपूर यांना एचएमव्ही कंपनीत फोन लावायला सांगितला. तेथे कामेरकर नावाचे गृहस्थ होते. त्यांच्याशी सुमनताई फोनवर बोलल्या. या गाण्यांबद्दल आणि माझ्याबद्दल माहिती दिली. वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर आपण ही कॅसेट काढूया असेही त्यांचे बोलणे झाले आणि माझी पहिली भावगीताची कॅसेट १९७२ मध्ये आली.

ही गाणी बाजारात आली, तेव्हा ती लोकांना खूप आवडली. यामुळे इंडस्ट्रीत अशोक पत्की नावाचा नवीन संगीतकार आला आहे हे समजले. त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे १९७३ मध्ये आणखीन एक कॅसेट आली. त्यामध्ये नाविका रे..., केतकीच्या बनी... अशी गाणी होती. तीदेखील लोकांना प्रचंड भावली. ‘केतकीच्या बनी...’ या गाण्यासाठी बासरीवादन केले ते पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी. त्याची हकीकत अशी, की सुमनताईंनी खारदांडा येथे नवीन घर घेतले. त्या सहकुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहत होत्या आणि हरिप्रसाद चौरसिया चौथ्या मजल्यावर. सुमनताईंनी हरिप्रसाद यांना अशोकजींनी एक गाणे बनवले आहे, तुम्ही ऐकायला येताय का असे विचारले. त्यांच्या आग्रहामुळे ते व त्यांची पत्नी आले आणि त्यांनी केतकीच्या बनी... हे गाणे ऐकले. ते गाणे त्यांना इतके आवडले, की त्यांनी या गाण्यासाठी आपण बासरीवादन करणार असे सांगितले. अशा रीतीने या गाण्याचे सोने हरिप्रसाद चौरसिया यांनी केले.

‘केतकीच्या बनी...’ची रिहर्सल झाली आणि आता टेक करणार तोच मला हरिप्रसादजींनी विचारले, की ‘तू अपुव्ह म्युझिक डिरेक्टर हो क्या...?’ मी त्यांना म्हणालो, ‘हे काय असते, ते मला माहीत नाही.’ त्यावर ते म्हणाले, ‘रेडिओच्या ग्रेडनुसार तुम्ही संगीतकार असलात, की तुम्ही आकाशवाणी वा अन्य सरकारी कार्यक्रम करू शकता. तुम्हाला कुणी रोखू शकत नाही.’ गाणे संपल्यानंतर ते मला ऑल इंडिया रेडिओ स्टेशनला घेऊन गेले. तेथे माझा फॉर्म त्यांनी भरून घेतला. एवढा मोठा कलाकार माझ्यासाठी धडपडतोय हे पाहून माझे मलाच भरून आले. हरिप्रसादजी कलाकार म्हणून ग्रेट आहेतच, पण माणूस म्हणून किती ग्रेट आहेत याची प्रचीती मला तेव्हा आली.

दरवर्षी सुमनताई तीन रेकॉर्ड काढायच्या. एक दशरथ पुजारी, कमलाकर भागवत आणि तिसरी माझी. मला संगीतातील बारकावे अधिक शिकता यावे याकरिता सुमनताई दशरथ पुजारी आणि कमलाकर भागवत यांना ‘अशोकला तुमच्याबरोबर ठेवा’ असे सांगायच्या. मग मी त्या दोघांबरोबर काम करू लागलो आणि खूप काही मला शिकता आले.

संगीतकार पुरुषोत्तम उपाध्याय यांना गुजराती गाणी बनवायची होती. ते सुमनताईंकडे आले. सुमनताईंनी त्यांना या गाण्यांचा अॅरेंजर अशोक असला तरच मी गाईन अशी अट घातली. त्यांनी सुमनताईंची अट मान्य केली. त्यांची ती कॅसेट आलीच आणि आतापर्यंत सगळी त्यांची गाणी मी केली.

(लेखक ज्येष्ठ संगीतकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com