‘जागल्या’ नाटककार

अतुल पेठे, नाट्यदिग्दर्शक
शनिवार, 19 मे 2018

‘सावध ऐका पुढल्या हाका,’ असं सांगणारा लेखक त्या-त्या रंगभूमीचा, समाजाचा महत्त्वाचा घटक असतो. तो समाजाला जागं ठेवतो. हे काम ‘द्रष्टे नाटककार’ विजय तेंडुलकर यांनी आयुष्यभर केलं. समाजाला जागं ठेवण्याचं काम त्यांनी आपल्या नाटकांतून केलं.

‘सावध ऐका पुढल्या हाका,’ असं सांगणारा लेखक त्या-त्या रंगभूमीचा, समाजाचा महत्त्वाचा घटक असतो. तो समाजाला जागं ठेवतो. हे काम ‘द्रष्टे नाटककार’ विजय तेंडुलकर यांनी आयुष्यभर केलं. समाजाला जागं ठेवण्याचं काम त्यांनी आपल्या नाटकांतून केलं.

विजय तेंडुलकर हे भारतीय रंगभूमीवरचे द्रष्टे नाटककार आहेत. मी त्यांना मराठी नाटककार म्हणेनच, पण ते खऱ्या अर्थानं भारतीय नाटककार आहेत. स्वतंत्र भारतात स्वतःच्या मुळाचा, अस्तित्वाचा शोध व स्वतःला स्वतःची ओळख मिळवून देणं ही गोष्ट सर्व क्षेत्रांत प्रामुख्याने दिसू लागली. साहित्य, नाट्यक्षेत्रातही याचं प्रतिबिंब दिसू लागलं. नाटकाचा विचार केल्यास त्या वेळी आपली रंगभूमी ब्रिटिश वसाहतीच्या प्रभावाखाली होती. अनेकदा शेक्‍सपिअरची नाटकं भाषांतरित, रूपांतरित, अनुवादितही झाली. त्या वेळी भारतीय रंगभूमीवर मोहन राकेश, बादल सरकार, गिरीश कर्नाड आणि विजय तेंडुलकर हे चार महत्त्वाचे, वेगळा विचार करणारे नाटककार उदयास आले. स्वतंत्र भारतातील रंगभूमी पारतंत्र्यातील भारतापेक्षा वेगळी असावी, असा शोधाचा खोल विचार त्यांनी केला. आपली भारतीय रंगभूमी कशी असावी किंवा कशी होती, आपली परंपरा काय होती, याचा शोध या चारही नाटककारांनी आपापल्या परंपरेत घेतला. तेंडुलकरांनी रंगभूमीची परिमिती बदलली. एका अर्थानं रंगभूमीचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. 

मध्यमवर्गीय रंगभाषेला तडा  
तेंडुलकरांनी जवळपास चाळीस नाटके, ७० ते ७५ एकांकिका, चित्रपटांच्या पटकथा, संवाद, मालिकांसाठी लेखन, कथा, कादंबऱ्या लिहिल्या. यातून एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर उलगडत गेलं. त्यांच्या नाटकांची चार वैशिष्ट्यं सांगता येतील. तेंडुलकरांच्या आधीची रंगभूमी मध्यमवर्गीय माणसाला कुरवाळणारी होती. घरगुती नातेसंबंध, आदर्शवादी नायक, अलंकृत भाषा, अनेकदा वास्तवाला सोडून असणारी भाषा ही या नाटककारांची गुणवैशिष्ट्यं होती. तेंडुलकरांनी या मध्यमवर्गीय रंगभाषेला तडा दिला. त्यांची भाषा अल्पाक्षरी होती, मात्र त्यांच्यासारखा लेखक विरामांचा वापर नाटकातून करू लागला. न बोललेल्या शब्दांतूनही अर्थ ध्वनित होतो, हे त्यांनी रंगभूमीला पहिल्यांदा दाखवून दिलं. त्यांचे विराम बोलू लागले, तर बोलके संवाद अल्पाक्षरी, कमी बोलणारे, अनालंकृत होते हे दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य असं की, त्यांनी आयुष्यभर माणूस, ज्याला जे कधी जनावरही म्हणायचे, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला.

माणसामध्ये चांगले, वाईट, किळसवाणे, दुर्गंधीयुक्त असे वेगवेगळे विकार असू शकतात आणि ते एकाच माणसात असू शकतात, याचं दर्शन त्यांनी प्रेक्षकांना पहिल्यांदा घडवलं. अन्यथा काळ्या आणि पांढऱ्या या दोन रंगांतील व्यक्तिमत्त्व रंगभूमीवर पाहण्याची सवय आपल्याला जडली होती. नायक-खलनायक अशी विभागणी बरेचदा होत असते. त्यांच्या नाटकातील पात्रं अनेक गोष्टींनी युक्त अशी आढळतात. चौथं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी त्यांच्या नाटकांतून क्रौर्य आणि लैंगिकता याचा शोध घेतला. माणूस सातत्यानं एका अर्थानं हिंसा आणि लैंगिकतेनं पछाडलेला असतो. संधी मिळत नाही किंवा गरज नसते म्हणून मेंदूवर पुटं चढतात. नाहीतर माणूस एका पातळीवर हिंस्र आणि लैंगिक, कामूक असाच प्राणी आहे. हा शोध त्यांनी नाटकांतून विविध पात्रांमधून, व्यक्तिरेखांद्वारे घेतलेला दिसतो. मी ‘तेंडुलकर आणि हिंसा ः काल आणि आज’ हा त्यांच्यावर बेतलेला माहितीपट तयार केला. त्यात तत्कालीन रंगभूमी, कोणत्या सामाजिक, राजकीय पदरांमुळं ते असं लिहायला उद्युक्त झाले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेंडुलकर ज्या काळात लिहीत होते त्या काळाचा विचार करूयात. भारतीय माणसाला १९६०नंतरच्या काळात खऱ्या अर्थानं आपला मोठा भ्रमनिरास झाला आहे, असं वाटू लागलं. स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळी जी आदर्शवादी परिस्थिती मनासमोर रेखाटली होती ती आता भंग पावू लागली, ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अस्मितांचे उद्रेक होऊ लागले. बेरोजगारी वाढू लागली. तरुण बोलत होते ते राज्यकर्ते बोलायला तयार नव्हते. जनमानसांत व राज्यकर्त्यांत दरी वाढू लागली. परिणामी, बंडखोर तरुण वेगळी भाषा बोलू लागला. तेंडुलकरांचे समकालीन पाहिल्यास भाऊ पाध्ये यांची कादंबरी याचं उदाहरण म्हणून घेता येईल. ‘वासू नाका’ या कादंबरीतून रखरखीत वास्तवाच्या भाषेचं दर्शन होतं. हेच तेंडुलकरांच्या लेखनातही दिसून येतं. याच काळात दलित पॅंथर, दलित साहित्याचा उगम झाला. सर्व पातळ्यांवर मुखवटे फाडण्याचे युग सुरू झाले होते. एका अर्थानं मध्यमवर्गीय, ब्राह्मणी भाषा गळून पडत होती. वास्तवातील, बहुजन समाजाची, वंचित, शोषित पीडितांची भाषा नाटक, काव्य, साहित्य, चित्रपटातून दिसू लागली. या पार्श्‍वभूमीवर तेंडुलकरांच्या चार नाटकांचा वेध घेऊयात. 

तेंडुलकरांचं ‘घाशीराम कोतवाल’ जगभर गाजलेलं महत्त्वाचं नाटक. पेशवाई १८१८नंतर बुडाली आणि दुसऱ्या बाजीरावाच्या काळात झालेल्या ब्राह्मण समाजाच्या अवनत अवस्थेचं दर्शन यातून घडतं. नाना फडणीसांसारखं धुरंधर व्यक्तिमत्त्व, इंग्रजांचा उगम कोणत्या पार्श्‍वभूमीवर झाला हे यात दिसतंच, पण त्या त्याहीपलीकडं जाऊन नाना फडणीस आणि घाशीराम ही सत्ताकेंद्रातील एकमेकांना वापरणारी केंद्रं कशी तयार होतात आणि गरज संपल्यावर कसं टाकून दिलं जातं, याचं दर्शन त्यांनी यात घडवलं. हे नाटक वेगवेगळ्या कारणांनी गाजलं. तेंडुलकरांना मात्र त्यातील अंतःप्रवाह वेगळे दिसत होते. दुसरं महत्त्वाचं नाटक म्हणजे ‘सखाराम बाईंडर’. या नाटकात दोन स्त्रियांची अतिशय वेगळी रूपं प्रखरपणे येतात. तिसरं ‘शांतता कोर्ट चालू आहे’, या नाटकाला कमलादेवी चटोपाध्याय पुरस्कारानं गौरवलं आहे.

‘घाशीराम कोतवाल’सारखंच हेही एक महत्त्वाचं रूपक आहे. एखाद्या स्त्रीचा, एखाद्या व्यक्तीचा माणसं कशाप्रकारे वापर करतात, चिरफाड करतात हे यात दिसतं. एका स्त्रीला समाज कोणकोणत्या पातळीवरून पाहतो, त्यात कोणत्या प्रकारचे क्रूर दृष्टिकोन असतात, तेही या नाटकात दिसतात. ‘कन्यादान’ या नाटकाचाही विषय महत्त्वाचा होता. एक दलित लेखक एकावेळी कवी आणि जनावर कसा असू शकतो, समाजवादाची झालेली पडझड याचा शोध त्यांनी या नाटकातून घेतला. याशिवाय अनेक घरगुती, हळूवार नाटकेही त्यांनी लिहिली.  

तेंडुलकरांमुळंच...
तेंडुलकरांच्या असण्यानं नवी पिढी घडली. त्यांनी नवीन पिढ्यांना दालनं उघडून दिली. त्यांनी जी भाषा, व्यक्तिरेखा, विषय रंगभूमीला अपवित्र होते ते तेंडुलकरांनी खऱ्या अर्थानं मोकळे केले, बिनदिक्कत बोलायची मुभा दिली. त्यांनी मराठी रंगभूमीची दालनं मोकळी केली. या महान लेखकावर कौतुक, टीका, चर्चा, समीक्षण झाले. त्यांच्या व्यक्तिरेखांना अनेकदा आधार वाटत नाही. त्यांची पात्रं त्यांना वाटतात म्हणून बरेचदा हिंस्र होतात. हिंस्रतेची कारणं सामाजिक, कौटुंबिक व आर्थिक परिस्थितीत कशी आहेत, आजूबाजूच्या जागतिक परिस्थितीत कशी आहेत, त्यांचा तात्त्विक अर्थ काय लागतो, मानसिक आजारांचाही शास्त्रीय पद्धतीनं वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार करता येतो हा विचार तेंडुलकरांनी अनेकदा करायचा नाकारला, हेही आपण त्यांचं दुर्बल स्थान म्हणू शकतो. याहीपेक्षा त्यांनी जे बलस्थान दिलं ते मला फार मोठं वाटतं. यामुळंच मराठी माणूस त्यांना विसरू शकत नाही. त्यांनी केलेली बिनदिक्कत विधाने, भाष्य त्या-त्या वेळी गाजली. तेंडुलकरांसारखा ‘सावध ऐका पुढल्या हाका,’ असं सांगणारा लेखक त्या-त्या रंगभूमीचा, समाजाचा महत्त्वाचा घटक असतो. तो समाजाला जाग ठेवतो. किंबहुना समाजाला जागं ठेवण्याचं काम तेंडुलकरांनी आयुष्यभर केलं आहे. 
(शब्दांकन - सोनाली बोराटे)

Web Title: atul pether article vijay tendulkar