

Marathi Theatre
esakal
आशुतोष पोतदार- potdar.ashutosh@gmail.com
नेहमीच्या गप्पांमध्ये आपण सहज म्हणून जातो, ‘उगीच नाटक करू नकोस!’ किंवा ‘सोंग नको घेऊस!’ कारण, नाटक म्हणजे घेतलेलं एक ‘सोंग’ मानलं जातं. माझ्या गावी -कोल्हापूर जिल्ह्यातल्या सांगावात- संग्या-बाळ्याचे खेळ व्हायचे, भजनं व्हायची. दिवसा कष्टाची कामं करणारी साधी माणसं आपापली कामं आवरून, रात्री सोंग घेऊन नाटकाच्या खेळासाठी उभी राहायची. आपापल्या भूमिकांत तल्लीन व्हायची. भवतालाचे निरीक्षण करत कलेची विविध रूपे आत्मसात करणारी ही कलाकार मंडळी, गात-नाचत-गिरकी घेत विविध रूपं धारण करायची. गावातल्या चौकात किंवा देवळात तात्पुरत्या उभारलेल्या रंगमंचावरल्या प्रकाशात स्वतःशी आणि परमेश्वराशी बोलता-बोलता ते रसिकांशीही संवाद साधायचे. रसिक प्रेक्षकही त्यांनी वठवलेल्या भूमिकांत रममाण व्हायचे. रंगमंचावर चाललेला त्यांचा नाट्यपूर्ण खेळ एका क्षणी खरा वाटायचा आणि दुसऱ्या क्षणाला ते सारं भासमय वाटायचं! पण जे दिसायचं ते ‘खोटं’ मात्र वाटायचं नाही.