- दिलीप कुंभोजकर, kumbhojkar.dilip@gmail.com
बालपणात प्रत्येकाने गुणगुणलेली बालकवींची कविता म्हणजे -
‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहींकडे’. बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते.
इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. त्यात एक सतरा वर्षांचा युवक उभा राहिला आणि आपल्या कविता सादर करावयाच्या आधी म्हणाला -
अल्पमती मी बालक नेणे काव्यशास्त्रव्युत्पत्ती
कविवर्यांनो मदीय बोबडे
बोल धरा परि चित्ती।
बुद्धिविरहित आहे माझे
काव्य पोरके आज
त्या कवने होईल कैसे
जनमनरंजन काज?
या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्र्यंबक बापूजी ठोमरे या सतरा वर्षाच्या मुलाला ‘बालकवी’ ही पदवी दिली. बालकवींची काव्य-कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती. बालकवींची ही कविता लता मंगेशकर यांनी गायली तर संगीत हृदयनाथ यांचे आहे. ही कविता मूळ पाच कडव्यांची आहे पण लतादीदींनी तीन कडवी गायली आहेत.
आनंदी आनंद गडे,
इकडे तिकडे चोहिकडे || धृ.||
वरती खाली मोद भरे,
वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे || १ ||
मोद म्हणजे आनंद ! निसर्गकवी बालकवींना निसर्गातील आनंद दिसतो आहे, भासतो आहे, जाणवतो आहे. वाऱ्याबरोबर स्वच्छंद बागडणारा, खेळणारा, वरखाली झोके घेणारा, नभांना पळविणारा, ढगांबरोबर पळणारा, दहाही दिशात संचारणारा, जगातला आनंद दिसतो आहे. ही कवीची निसर्गाकडे बघण्याची दृष्टी आहे, जी त्याला सृष्टिसौंदर्य उलगडत आहे.
सूर्यकिरण सोनेरी हे,
कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने,
आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले,
गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे ॥२॥
कोवळ्या सोनेरी सूर्य किरणांनी चंद्राच्या शीतल चांदण्यात रमलेली सृष्टी जागी होऊन हसत आहे, प्रसन्न होऊन नहात आहे, सूर्य किरणांनी स्नान करीत आहे. आकाशातील मेघ सूर्यकिरणांबरोबर लपंडाव खेळत रंगले आहेत, सृष्टीचे चित्त हरपले आहे, सर्वत्र आनंदमय वातावरण पसरले आहे. चारही दिशा - पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आनंदाने भारल्या आहेत. निसर्गप्रेमाने संध्याराणी आनंदात गाणी गात आहे. बालकवींची काव्यप्रतिभा येथे दृष्टिसौंदर्य अनुभवत आहे.
नीलनभी नक्षत्र कसे,
डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला;
मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे ॥३॥
निळ्या निळ्या आकाशात तिन्हीसांजेनंतर नक्षत्रांचे राज्य असते. लुकलुकणारे तारे, ग्रह, चांदण्या कोणाला शोधत आहेत ? मोदाला ? आनंदाला ? तो तर त्यांच्या मध्येच आहे. तो सतत, इकडे, तिकडे सर्वत्र पसरला आहे .
मनाच्या कप्प्यात, अंतरंगात अनेक सुखाचे क्षण आहेत. तुम्ही बाहेर कशाला आनंद शोधत आहात ? तो तर तुमच्या जवळच आहे. मन हे कस्तुरीमृगाप्रमाणे आहे. आनंदाचा सुगंध आपल्या विशाल मनाच्या आकाशात अनेक सुख-समाधानाचे क्षण साठवून लुकलुकत आहेत. निसर्गातील सौंदर्य दाखवतानाच बालकवी आनंदाचे मानसशास्त्र सहज समजावून सांगत आहेत.
वाहति निर्झर मंदगती,
डोलति लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे,
कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले,
डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे ॥४॥
बालकवी हे नुसते कवी नव्हते तर शिल्पकार होते. त्यांच्या निसर्ग विषयक कविता म्हणजे शब्दशिल्पं होत. कविता वाचताना मनासमोर चित्रच उभे राहते.
‘वाहती निर्झर मंदगती...’ पावसाचा वर्षाव झाल्यानंतर सृष्टीत आलेली तकाकी, प्रसन्नता, मृदगंध, मातीचा सुवास, वाहणारा ओहोळ, निर्मळ निरागस निर्झर, त्यांचा सुरुवातीचा मंद प्रवास केवळ तीन शब्दांत मांडले आहे. चित्रकाराला अनेक रंगांनी साकारायला लावणारे शब्दचित्र तीन शब्दांत डोळ्यासमोर उभे करतात.
स्वार्थाच्या बाजारात,
किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो,
सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे ॥५॥
समाजातील आनंद तपासताना बालकवींना व्यापारातील व्यावहारिकता येथे जाणवते. व्यापार म्हणजे काय तर पैशांच्या माध्यमातून केलेला वस्तू-विनिमय. अर्थशास्त्रात Marginal Utility या संकल्पनेवर आधारित एक सिद्धान्त आहे. दिलेल्या पैशांचा त्याग आणि घेतलेल्या वस्तूमधून मिळणारे समाधान याचा समतोल ढळला की व्यापाराचा बाजार होतो. मला या वस्तूचा मोबदला जास्त हवा असे दुकानदार म्हणतो तर मला या पैशात जास्त वस्तू हवी हे ग्राहक म्हणतो. दोघांच्याही मनात स्वार्थ आहे. स्वार्थ साधला नाही तर द्वेष, मत्सर सुरू होतो. मन आपली प्रसन्नता घालवून बसते. बालकवी अशा लोकांना ''पामर'' म्हणत आहेत. पामर म्हणजे पापी हा अर्थ घेतला असावा. स्वार्थासाठी अनैतिक किंवा वाईट गोष्ट करणारा पण नंतर प्रायश्चित्त भोगणारा तो पामर. थोडक्यात स्वार्थी माणूस. (ख्रिश्चन किंवा हिब्रू मध्ये याचा वाटसरू अर्थाने हा शब्द आहे.) म्हणून बालकवी म्हणतात,
'स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात" पण निसर्गात असे काहीच नाही. त्यांना आनंद, मोद कसा मिळतो ? येथे बाजार नाही, स्वार्थ, लोभ, द्वेष, मत्सर (आणि पाठोपाठ येणारी ''ॲसिडीटी'') नाही. विंदा करंदीकर यांच्या कवितेप्रमाणे - निसर्ग म्हणजे :
"देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस,
देणाऱ्यांचे हात घ्यावे ॥
निसर्गातील आनंद देत जावा आणि घेत जावा. घेता घेता एक दिवस निसर्गाचा हात धरावा आणि पंचमहाभूतात विलीन व्हावे. जीवनाचा केवढा मोठा अर्थ बालकवी या शेवटच्या कडव्यात सांगून जातात.
दुर्दैवाने अशा बालकवींचा अंत वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी रेल्वे अपघातात झाला. या घटनेने मराठी सारस्वताचे फार मोठे नुकसान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.