esakal | Ganadhi jayanti 2021: बापूकुटी ‘शहरा’पासून दुरावली
sakal

बोलून बातमी शोधा

Gandhi Jayanti : बापूकुटी ‘शहरा’पासून दुरावली

Gandhi Jayanti : बापूकुटी ‘शहरा’पासून दुरावली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बळवंत ढगे

सेवाग्राम आश्रमामुळे वर्धा शहराची ओळख आहे. गांधी सिटी असे या शहराचे दुसरे नाव. महात्मा गांधींनी आयुष्याची १४ वर्षे या शहराला दिली. भूदान चळवळीचे नेते आणि गांधीजींचे आध्यात्मिक उत्तराधिकारी विनोबा भावे यांचे वास्तव्य सेवाग्राम आश्रमापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. मात्र या आश्रमासोबत सामान्य लोकांची नाळ तुटत चालली आहे.

एप्रिल १९३६ ला अगदी पहाटे पाच वाजता महात्मा गांधी आपल्या सहकाऱ्यांसोबत पायी चालत तेव्हाचे शेगाव, आजच्या सेवाग्रामला पोहचले. गावालगत एका शेतात वास्तव्याला सुरुवात केली. आज तो आश्रम देश-विदेशांतील हजारो युवकांना, नागरिकांना आपल्या गांधी विचाराची प्रेरणा देत आहे. मे १९३३ ला जमनालाल बजाज यांच्या निमंत्रणावरून महात्मा गांधी पहिल्यांदा मुंबईहून हावडा मेल एक्स्प्रेसने येथे पोहचले होते.

महात्मा गांधींनी २१ सूत्री रचनात्मक कामाची मुहूर्तमेढ वर्ध्याच्या भूमीत करून वर्धा मॉडेल संपूर्ण देशात रुजू करण्याचा त्यांचा मानस होता. स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक मार्गाने लढत ते देशाला आर्थिक स्वावलंबी, समाजाच्या तळागाळातील व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शक्य असणारे सगळे प्रयत्न वर्ध्यातून करत होते. त्या काळात वर्ध्यात देशातील नव्हे जगातील सर्व मोठे नेते त्यांना भेटायला येत. वर्धा जणू देशाची अघोषित राजधानी भासत होती. पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, खान अब्दुल गफार खान असे दिग्गज नेते वर्ध्यात ये-जा करायचे.

बजाज वाडी, महिला आश्रम परिसरात थांबायचे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठका वर्ध्याला होत असत. १९३९ च्या काँग्रेस कार्यकारिणीच्या सभेत जर्मन-ब्रिटन युद्धात ब्रिटिश सरकारला पाठिंबा न देण्याचा ठराव इथेच पारीत झाला होता. भारत छोडो आंदोलनाची रुपरेषा वर्धा इथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीत ठरली होती. मात्र देशाला दिशा देणारे आंदोलन आणि रचनात्मक काम ज्या भूमीत झालं, ते वर्धा शहर या महात्माचा वारसा जपतेय का? आव्हानात्मक असलेल्या या काळात गांधीजींच्या या कर्मभूमीचे काय झाले? गांधीजींची ओळख केवळ दुकानं, संस्थांपुरती सीमित राहिली का? गांधीजींची पदचिन्ह पुसली जात आहेत का? असे असंख्य प्रश्न आज निर्माण झाले आहेत. याचे विश्लेषण केले तर गांधीवादी लोक आणि त्यांच्या संस्था याला कारणीभूत आहेत, हे स्पष्ट दिसते.

२०१० मध्ये सेवाग्राम आश्रमातून गांधीजींचा चष्मा चोरीला गेला. मात्र तोपर्यंत केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी सेवाग्राम आणि वर्ध्याचे महत्त्व विसरले होते. सेवाग्राम आश्रमातील व्हिजीटर बुकनुसार चष्मा चोरीला जाण्यापूर्वी वर्षाला दीड ते दोन लाख लोक आश्रमाला भेट द्यायचे. यात नंतर मात्र लक्षणीय वाढ झाली.आज वर्षाला सहा ते आठ लाख लोक आश्रामाला भेटी देताहेत. २०११ मध्ये बापू कुटीचा अमृतमहोत्सव साजरा झाला. सेवाग्राम आश्रमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे तत्कालीन पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्या लक्षात आले.

त्यानंतर राज्य शासनाने ४९६ कोटींचा सेवाग्राम विकास आराखडा तयार केला. गांधीजींच्या शहराला गांधीजींची आठवण करून देण्यासाठीचा तो आराखडा होता. मात्र सरकार बदललं आणि सेवाग्राम विकास आराखड्याचे बजेट ४९६ कोटींवरून २४७ कोटींवर आले. निधीअभावी अनेक कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. अनेकांच्या मते, हा विकास आराखडा म्हणजे सेवाग्राम आणि सेवाग्रामलगतच्या परिसरात कॉंक्रिटचे रस्ते, नाले, सौंदर्यीकरण आणि गांधींच्या वास्तूचे कॉंक्रिटीकरणचा होता.

राजकारण्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे. कित्येक वर्षांपासून सेवाग्राम, वर्ध्यात राहणाऱ्या गांधीवादी यांच्यासाठी जबाबदार आहेत. इतक्या वर्षांनंतर ते गांधीजींच्या विचारांसोबत सामान्य जनतेची नाळ जुळवण्यात, त्यांना कनेक्ट करण्यात अपयशी ठरलेत. त्यामुळे आठ किलोमीटर अंतरावरच्या या आश्रमाबद्दल लोकांना आपलेपणाची भावना कधी आलीच नाही. हा कनेक्ट प्रस्थापित करण्याचे प्रयत्न गांधीवाद्याच्या पुढच्या पिढीनेही केले नाहीत. गांधी चळवळ पुढे नेणे, कनेक्ट करण्याऐवजी पदावर मरेपर्यंत चिकटून बसण्यात ते मग्न झाले. रचनात्मक कामासाठी उभ्या केलेल्या जीर्ण इमारती याची साक्ष देत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून आश्रमातील पदासाठी अक्षरश: भांडण सुरू आहे. प्रसारमाध्यमांतून त्याच्या चर्चा रंगू लागल्यात. यावरून गांधीवादी कुठल्या थराला पोहोचलेत, हे लक्षात येते.

वर्ध्यात अनेक गांधीवादी संस्था आहेत, मात्र शहरातील तरुणांसाठी त्याचे दरवाजे बंद आहेत. आपल्याला कुणी स्पर्धक होऊ नये किंवा आपली मक्तेदारी संपू नये ही भीती त्यामागे आहे. अनेक गांधीवादी संस्था एकमेकांच्या विरोधात कोर्टात गेल्या आहेत. त्यामुळे आत्मचिंतन, तुटलेला समाज जोडण्याची, समाजाला नवी दिशा देण्याची, गांधीजींचे मूल्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्यांना वेळ कुठे आहे. त्यामुळे हे मूल्य रुजवण्यासाठी वर्ध्याच्या मातीत दुसरा गांधी जन्माला येईल का, याची वाट पाहावी लागेल.

(लेखक पत्रकार असून, खादी उद्योगात वेगळ्या प्रयोगाने त्यांनी नवी ओळख निर्माण केली आहे.)

loading image
go to top