पंख सकारात्मकतेचे : वाहन व्यवसायाची हौस आणि बारडोलीचा वाहनबाजार

positivity
positivityesakal

लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल

उमेदीच्या काळात माणसाच्या मनामध्ये नोकरी-व्यवसायाचे (Business) विचारचक्र सुरू असते. खिशात पैसा कमी असला तर ते अधिक वेगाने फिरायला लागते. माझ्या डोक्यात असे चक्र सुरू असतानाच वाहन व्यवसायाचा विचार तरळून गेला आणि एका मित्राबरोबर तो सुरू केला. तिथून पुढे मात्र अडथळ्यांची जी शर्यत सुरू झाली, ती थेट गुजरातमधील बारडोलीच्या वाहन बाजारापर्यंत घेऊन गेली आणि नाशिकला पोचेपर्यंत माझी वाहन व्यवसायाची ‘हौस’ पूर्ण झाली! (Bardolis automotive market Saptarang marathi article by dr hemant ostwal nashik news)

ही घटना १९९८ मधील आहे. माझ्याकडे त्या काळी चारचाकी वाहन म्हणजेच कार किंवा एसयूव्ही वगैरे असे कुठलेही वाहन नव्हते. तेवढी आर्थिक सुबत्ताही नव्हती. तशी या गोष्टीची सुरवात १९९६ मध्येच झाली. त्या काळी भाड्याने गाडी देण्याचा व्यवसाय चांगलाच जोरात होता, तसा आजही आहेच. त्या वेळी माझ्या मनामध्ये असे आले, की एखादी गाडी आपणही घ्यावी. म्हणजे ज्या वेळी आपणास गरज असेल त्या वेळी ती आपणास स्वतःकरिताही वापरता येईल आणि इतर वेळी भाड्याने देऊन दोन पैसेही कमवता येतील. असा एक विचार माझ्या मनामध्ये आला. घरामध्ये चर्चा केली. आई आणि सौभाग्यवती सुरेखा दोघींनीही नकार दर्शविला, नव्हे स्पष्ट शब्दांत विरोधच केला. लहान बंधू संजय, ‘चल, करून तर बघू’, असे म्हणत तयार झाला. तरीदेखील त्या वेळी माझी आर्थिक परिस्थिती असे काही करण्याची परवानगी देत नव्हती.

त्यावरही आम्ही मार्ग शोधून काढला. त्या वेळी माझे मित्र व फॅमिली पेशंट असलेले श्रीकृष्ण पाटील स्वतः छोटेसे गॅरेज चालवीत असत. त्यांना या धंद्यातील बरीच माहिती असावी, असे आम्हाला वाटत होते (तो अंदाज आमचा चुकीचा होता, हे नंतर सिद्ध झाले). तर असे श्रीकृष्ण माझ्याबरोबर भागीदारीमध्ये या धंद्यात उतरण्यास तयार झाले. माझ्या तीन-चार हितचिंतकांनी मला बराच विरोध केला, की डॉक्टरसाहेब गाडी धंदा हा अतिशय बोगस धंदा. कृपया, या फंदात पडू नका. या धंद्यामध्ये सहसा कोणीही वरती येत नाही. एक वेळ जो कोणी स्वतः गाडी चालवीत असेल, तर कदाचित दोन पैसे मिळू शकतील, अन्यथा फार अवघड आहे. असा फार मोलाचा सल्ला त्या वेळी सर्व हितचिंतकांनी जीव तोडून दिला. हा सल्ला खूप मोलाचा होता, हे मात्र गाडी घेतल्यानंतर एखाद्या वर्षानंतर फार प्रकर्षाने जाणवले होते. एखादी गोष्ट करावयाची, असे आपले मन ज्या वेळी ठरविते त्या वेळी आपल्या मनाला त्या विषयाचे स्वरूप हे अतिशय चांगलेच वाटत असते. सर्वकाही हिरवे हिरवे वाटत असते, दिसत असते.

त्या विषयातील नकारात्मक बाजू कधीही त्या वेळी आपल्याला दिसत नसतात. माझेही त्या वेळी काहीसे असेच झाले होते. मी गाडी घेण्याच्या कल्पनेने अक्षरशः पछाडलेलो होतो. माझ्याबरोबर श्रीकृष्णरावदेखील खूपच उत्साहित झाले होते. त्या वेळेपर्यंत महिंद्र ॲन्ड महिंद्रच्या सर्व गाड्या थ्री डोअर म्हणजे तीन दरवाजांच्या असायच्या. त्या वेळी पहिल्यांदाच महिंद्र ॲन्ड महिंद्रने फाइव्ह डोअर म्हणजे पाच दरवाजे असलेली जीप आणायची ठरवलेली होती. त्या काळी महिंद्र ॲन्ड महिंद्रमधील बरेचसे कामगार आणि अधिकारी मंडळी माझी फॅमिली पेशंट्स असल्याकारणाने ओळखीची होती. त्यातूनच मला ही माहिती खात्रीलायकरीत्या कळलेली होती. नवीन मॉडेल येणार, यामुळेदेखील गाडी घेण्याची उत्सुकता, उत्साह अजूनच वाढला. पैशांची इकडनं-तिकडनं आणि अर्थातच बँकेचे कर्ज घेऊन व्यवस्था करून महिंद्र ॲन्ड महिंद्रची फाइव्ह डोअर पिझोड इंजिन असलेली कमांडर जीप आम्ही आणली.

गाडी नवीकोरी असल्यामुळे जवळपास रोजच भाड्याने धंद्यावर जाऊ लागली. पहिले चार-सहा महिने चांगले पैसेदेखील कमविले. सुरवाती-सुरवातीला श्रीकृष्णरावांनी बऱ्यापैकी लक्ष दिले; परंतु नंतर जणू काही त्यांचा आणि गाडीचा कुठलाही संबंध नाही अशीच त्यांची वागणूक झाली. कारण गाडीने बऱ्यापैकी खर्च काढायला सुरवात केली होती. पहिल्या चार-सहा महिन्यांत कमविलेले जास्तीचे पैसे, एक वर्षाच्या आतच कधी कसे संपून गेले याचा पत्तादेखील लागला नाही. इथपर्यंतदेखील ठीक होते.

दुसऱ्या वर्षामध्ये मात्र आम्ही म्हणजे मी घरून पैसे टाकायला

लागलो, यावरून श्रीकृष्णराव आणि माझ्यामध्ये वादावादीदेखील झाली. कारण श्रीकृष्णरावांनी हात वर करून दिले. मी नंतर देईन एवढेच सांगत राहिले. असे करता करता माझ्याही डोक्यावरून पाणी केव्हा गेले कळलेच नाही. गाडीला तिसरे वर्ष लागले होते. तोटा अजून वाढत चालला होता. श्रीकृष्णरावांकडे वारंवार पैसे मागूनही पैसे मिळत नव्हते. शेवटी गाडी विकून टाकण्याचा शहाणपणाचा महत्त्वपूर्ण निर्णय मी घेतला आणि मग शीघ्रगतीने मी कामालादेखील लागलो. ओळखीपाळखीचे, बरोबर वाहन खरेदी-विक्री करणारे एजंट, अगदी दैनिक वर्तमानपत्रांमध्ये छोट्या जाहिरातींमध्येदेखील जाहिरात देऊन झाली, पण सगळीकडे आम्हाला एक तर नकारघंटा मिळत होती किंवा खूपच कमी किमतीमध्ये मागणी होत होती. हा खेळसुद्धा जवळपास तीन महिने चालला. तरीही गाडी काही विकली जाईना. मी खूपच निराश झालो होतो आणि मग मात्र श्रीकृष्णराव पुढे आले आणि मीच ठेवून घेतो, असे म्हटले.

त्यांनीही संधी साधायचा प्रयत्न केला आणि जी कमी किमतीची ऑफर आलेली होती त्याच किमतीमध्ये त्यांनी गाडी ठेवून घ्यायचे ठरविले. त्यांना विचारले, ‘पैशांची व्यवस्था कशी करणार?’ ‘बँकेचे लोन आहेच, मी ते फेडत राहीन. तुमचे आधीचे पैसे आणि आताचे यांपैकी आता मी दहा हजार रुपये देतो, उरलेले हळूहळू करून देईन.’ सर्वच प्रश्न अवघड झाला होता. कारण बँकेचे लोन माझ्या नावावर होते. गाडी वापरणारा दुसरा राहील. उद्या काही अडचणी आल्या, तर असा सगळा अवघड प्रकार झालेला होता. शेवटी काहीही पर्याय न उरल्याने मी गाडी श्रीकृष्णरावांना फक्त दहा हजार रुपये घेऊन ताब्यात दिली. दर महिन्याला उरलेले पैसे द्यायचे ठरले; परंतु एकही पैसा श्रीकृष्णरावांनी पुढच्या पाच-सहा महिन्यांमध्ये दिला नाही आणि तसे बघितले तर गाडी भाड्याच्या उत्पन्नावर कुठलेही पैसे देणे अवघड होते. मग त्यांचीही हौस एकदाची फिटली आणि पुन्हा एकदा गाडी विकण्यासाठी जोरदार प्रयत्न आमचे दोघांचेही सुरू झाले.

सहा महिन्यांआधीचा अनुभव पुन्हा एकदा आम्हाला मिळत होता. आता तर अजूनच कमी किमतीमध्ये मागणी होत होती. त्याच वेळी आमच्या ऐकिवात, सुरतजवळील बारडोली येथे, दर रविवारी जुन्या वाहनांचा खूप मोठा बाजार भरत असल्याची बातमी आली. वाहनबाजार ही संकल्पना बहुधा गुजरातमध्येच पहिले आली आणि बारडोलीला भरणारा वाहनबाजार हा त्या वेळचा सर्वांत मोठा वाहनबाजार होता. आमच्या मनामध्ये आशेची पालवी फुटली. जणूकाही हा वाहनबाजार म्हणजे आम्हाला वाळवंटातील हिरवळच वाटली.

बातमी कळल्याच्या पहिल्याच रविवारी आम्ही मोर्चा वळविला तो बारडोलीला. श्रीकृष्णराव, मी आणि माझ्या मैत्रीखातर मला मदतीला म्हणून माझे खास मित्र बंधू डॉ. भास्कर शेलार. असा आम्हा तिघांचा मोर्चा गाडी विकण्यासाठी बारडोलीला निघाला. खरेतर मीदेखील श्रीकृष्णरावांना मदतीलाच जात होतो. कारण मी गाडी कधीच श्रीकृष्णरावांना विकून टाकलेली होती. अधिकृतरीत्या माझे काहीही काम नव्हते; परंतु जुने संबंध, मैत्री या सर्वातून आणि अर्थातच माझे अडकलेले पैसे काढण्यासाठी म्हणून माझा हा सर्व खटाटोप होता. मी आणि डॉक्टर शेलार तसे त्या ट्रिपमध्ये मदत, अधिक अभ्यास, अधिक भटकंती या पद्धतीनेच गेलो होतो. पहाटे पाचला निघून, अंदाजे साडेअकराच्या सुमारास आम्ही त्या वेळी बारडोलीला पोचलो होतो. बाजार बघितल्यानंतर आम्हाला जबरदस्त आश्चर्याचा धक्का बसला. कारण खरोखर बाजार खूपच मोठा होता. हजारो गाड्या तेथे उभ्या होत्या. तेवढ्याच आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा की आम्हाला कळले तेथे महिंद्र ॲन्ड महिंद्रच्या पिझोड इंजिनाच्या गाडीला कोणीही विकत घ्यायला तयार होत नव्हते.

फार अपवादात्मकरीत्या एखादी दुसरी पिझोड इंजिनाच्या गाडीची खरेदी-विक्री होत होती. आता इथपर्यंत आलो होतो तर प्रयत्न तर करू या, असे म्हणून आम्ही तिथल्या सर्व दलालांना भेटण्याचा प्रयत्न केला. बारडोलीला लवकर पोचायचे म्हणून कुठेही नाश्ता केलेला नव्हता आणि आता कडकडून भूक लागली होती. आम्ही जेवून घ्यावयाचे ठरविले आणि उरलासुरला सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का आता आम्हाला बसला. आम्हाला म्हणजे मला आणि डॉ. शेलार यांना बसला. आम्ही तर फक्त मदतीला येत असल्याने कुठल्याही प्रकारचे पैसे आम्ही बरोबर आणलेले नव्हते. श्रीकृष्णराव घेऊन जात आहेत म्हटल्यावर आम्ही गृहीत धरले होते, की त्यांनी पैसेदेखील सोबत घेतले असणारच. माझ्या खिशामध्ये मोजून पन्नास रुपये आणि तितकेच डॉ. शेलार यांच्या पाकिटामध्येदेखील. श्रीकृष्ण यांच्याकडे मोजून दहा-वीस रुपये, तेही येताना चहा पिण्यामध्ये खर्च होऊन गेलेले होते आणि भूक तर खूप लागली होती.

माझ्या लक्षात आले, की येथून पुढे नाशिकला घरी पोचेपर्यंत आता आपल्या सकारात्मकतेचा खरा कस लागणार आहे. कारण आपण आता येथे परिस्थिती बदलू शकत नाही. माझीही नाही म्हटली तरी ही चूकच झाली होती, की मीदेखील काहीही पैसे बरोबर घेतले नव्हते. मग मनाशी मी विचार केला, अरे चला आज यातूनही आनंद घेऊ या. लोक खासकरून ज्यांची रोजीरोटी रोजंदारीवर चालत असेल ते लोक तर रोजच ॲडजेस्ट करतात ना! मग आपणही करून बघू आणि यातून एक सकारात्मकतेचा धडा आयुष्यभराकरता घेऊ या, असे म्हणून कामाला लागलो.

positivity
‘स्टार्टअप’चा अवास्तव फुगा

जशी आम्हाला भूक लागली होती, तशीच भूक आमच्या जीपलादेखील लागलेली होती. आमच्या गाडीतले डिझेलदेखील जवळपास संपलेले होते. मोठ्या मुश्किलीने आमची गाडी ३०-४० किलोमीटर गेली असती आणि रस्त्याने पंक्चर वगैरे काही झाले तरीदेखील आमच्याकडे पैसे नव्हते. त्या काळी आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे क्रेडिट, डेबिटकार्ड, एटीएम कार्ड नव्हते. चला, शंभर रुपयांमध्ये काय काय करता येते ते तर बघू या, असा विचार करून एका साध्यातल्या साध्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. आम्ही ठरविले होते, की पन्नास रुपयांच्या आतच आपण जेवण संपवायचे. कारण पन्नास रुपये का होईना, आपण ते परतीच्या प्रवासासाठी राखून ठेवू या. पन्नास रुपयांच्या बजेटमध्ये जेवायला काय मिळते हे बघायचा प्रयत्न केला, तर मला आजही आठवते एक दालफ्राय त्या वेळी ३५ रुपयांना मिळत होता आणि तीन रुपयांना एक रोटी असे आमचे एक दालफ्राय आणि सहा रोट्यांचे बजेट बसत होते.

जेवण येण्याअगोदर कांदा, लोणचे, निंबू जे की फुकट असते ते आले आणि आम्ही कांद्यावर छानपैकी लिंबू आणि लोणचे टाकून त्यावरच बऱ्यापैकी ताव मारून बऱ्यापैकी पोट भरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा निसर्गाचा नियमच आहे, की ज्या वेळी आपल्याला कमीत कमी खायचे असते त्या वेळी भरपूर भूक लागत असते. तसेच आमचे झाले. तीन रोट्यांमध्येच आमची दालफ्राय संपून गेली. येथे आम्हाला आमच्या नशिबाने साथ दिली. काय झाले असेल बरे! तर दालफ्राय संपता-संपता त्यामध्ये एक खडा निघाला आणि काय सांगू तुम्हाला! आम्हाला अगदी आनंदी आनंद झाला. का बरे कारण तेवढ्याशा खड्यावरून आम्ही ते हॉटेल अक्षरशः डोक्यावर घेतले. भांडलो. जे की निर्विवादपणे चुकीचे होते, हे मला त्या वेळीही आणि आजही मान्य आहे.

positivity
भिन्नस्तरीय संकराची उत्तरमीमांसा

खरे सांगायचे तर त्याचे शल्य आजही माझ्या मनाला नेहमीच बोचत असते; परंतु त्या दिवशी भुकेपुढे आमचा नाइलाज होता आणि एका खड्यामुळे जवळपास संपलेली दालफ्राय आम्ही पुन्हा एकदा मिळवली, अशा रीतीने आमचे पोट तर भरले; परंतु अजून आमच्या गाडीचे पोट मात्र रिकामे होते. आम्ही गाडी नाशिक रस्त्याला घेतली आणि चक्क प्रवासी शोधू लागलो, की जे आमच्याबरोबर प्रवास करतील आणि आम्हाला भाड्याचे पैसेही देतील, जेणेकरून आम्ही डिझेल टाकू शकू. प्रवासी मिळविण्यासाठी आम्ही चक्क त्या काळी तेथील एसटीच्या भाड्यापेक्षाही १०-२० टक्के कमी पैसे घेतले आणि गाडी पूर्ण भरली. मी गाडी चालवत होतो. डॉ. भास्कर आणि श्रीकृष्णराव चक्क भाड्याचे पैसे गोळा करीत होते. अगदी हसू येत होते; परंतु नाइलाज होता, आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सकारात्मकतेने आमचे सर्व प्रश्न सुटले होते. आम्हाला भाड्यापोटी बऱ्यापैकी पैसे मिळाले होते. त्यातून आम्ही डिझेलही भरले आणि परतीच्या प्रवासामध्ये छानपैकी जेवणही केले.

आज हे सर्व आठवले तरी अंगावर काटे येतात, कारण सकारात्मकता अंगी नसती तर किती मोठी आफतच आमच्यावर बारडोलीला आली असती, याचा विचारही करवत नाही. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी आपल्यातील सकारात्मकता त्या प्रसंगावर यशस्वीरीत्या मात करीत असते. आपल्याला संकटातून बाहेर काढत असते, यात कुठलीही शंका नाही.

(लेखक नाशिकमधील सुयश या प्रथितयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com