

Maratha Empire and British History
esakal
गणाधीश प्रभुदेसाई - ganadhish.prabhudesai@esakal.com
जगाभारी असा इंग्रजाला, पार जिरविला
भगवा फडकविला, बारभाईंनी अखिल जगतात, दाऊनी शौर्य बुद्धी अफाट, राखिले राज्य जाहले ख्यात...जी जी रं जी...
वडगावची लढाई’चे वर्णन करणाऱ्या पोवाड्यातील या ओळी. मराठ्यांच्या इतिहासात शौर्य, पराक्रम, मुत्सद्देगिरी आणि स्वाभिमान यांचे दर्शन घडविणाऱ्या अनेक लढाया झाल्या. त्यांपैकी १७७९ मध्ये झालेल्या वडगावच्या लढाईला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. इंग्रजांच्या वाढत्या सत्तेला मराठ्यांनी दिलेला जोरदार प्रतिकार आणि मराठ्यांच्या युद्धकौशल्याची प्रचिती देणारी ही लढाई भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. अजित देशपांडे लिखित ‘बखर एका लढाईची : अर्थात वडगावची लढाई-१७७९’ हे पुस्तक या ऐतिहासिक घटनेचा वेध घेणारे आहे.
य पुस्तकाच्या शीर्षकातील ‘बखर’ हा शब्द विशेष अर्थपूर्ण आहे. ‘बखर’ हा मराठीतील ऐतिहासिक लेखनाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यामध्ये ऐतिहासिक घटना, व्यक्ती, युद्धप्रसंग, पराक्रम आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती यांचे निवेदन केले जाते. त्यामुळे या पुस्तकाच्या शीर्षकातून एका विशिष्ट लढाईचा इतिहास कथन करण्याची भूमिका स्पष्ट होते. वडगावच्या लढाईकडे केवळ युद्ध म्हणून न पाहता, तत्कालीन मराठा साम्राज्याची राजकीय परिस्थिती, लष्करी सामर्थ्य, नेतृत्वगुण आणि इंग्रजांना दिलेले आव्हान या व्यापक संदर्भात पाहणे आवश्यक आहे.