जाणिवेची 'जाणीव'

प्रा. कुंडलिक कदम
बुधवार, 5 एप्रिल 2017

जर कुटुंबात उपलब्ध असणारा पैसा, संपत्ती कशी निर्माण झाली आहे, त्यासाठी किती परिश्रम, कष्ट, संघर्ष करावा लागतो याची जाणीव जर नवीन पिढीला झाली नाही, तर त्याचे मूल्य त्यांना कळणार नाही. मग त्यांना उधळपट्टीची सवय लागेल. म्हणून ज्येष्ठांनी याबाबत करून दिलेल्या जाणिवेची 'जाणीव' ठेवणे गरजेचे आहे.

नाना मामा आमच्या नात्यामधील एक ज्येष्ठ गृहस्थ. त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये जीवन जगले आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असतानादेखील त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यांचा मोठा मुलगा बॅंकेत व्यवस्थापक आहे, तर लहान मुलगा एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहे. नाना मामांचे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सध्या चांगल्या सुस्थितीत आहे.

काही दिवसांपूर्वी एका कामानिमित्त नाना मामांच्या घरी गेलो होतो. ते आपल्या मोठ्या मुलाशी गप्पा मारत होते. मी तिथे गेल्यावर त्यांना नमस्कार केला. अनेक दिवसांनी नाना मामांची भेट झाल्यामुळे त्यांच्याशी बराच वेळ गप्पा सुरू होत्या. आमच्या गप्पा रंगात आल्या असतानाच नाना मामांचा नातू तिथे आला. गावातल्या शाळेत तो शिकत होता. आमच्या गप्पा सुरू असतानाच तो आपल्या वडिलांकडे पेन आणण्यासाठी पैशाची मागणी करीत होता. परंतु, नाना मामांचा मुलगा पेन आणण्यासाठी त्याला पैसे देत नव्हता. मुलगा पेन आणण्यासाठी वीस-पंचवीस रुपये मागत असताना नाना मामांचा मुलगा का बर पैसे देत नव्हता, याचं मला खूप आश्‍चर्य वाटत होते. मुलगा आपल्या वडिलांकडे बराच वेळ पेन आणण्यासाठी पैशाचा आग्रह करत होता. मुलाचा आग्रह पाहून मी त्यांच्या मुलाला म्हटले अरे, केव्हापासून पैसे मागतोय तो, का पैसे देत नाही त्याला?
'अहो, सर मागल्या काही दिवसांपासून तो दररोज पेन हरवतोय आणि रोज नवीन पेनसाठी पैसे घेऊन जातोय. रोज पैसे मिळतात म्हणून पेनची काळजी घेत नाही. पैसे आपल्या बाबाकडे किती कष्टाने येतात, कसे येतात याची जाणीव त्यांना नसते. या वयातच त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे. नाना मामांच्या मुलाने पैसे न देण्यामागचा उद्देश सांगितला.

हो, खरं आहे तुझं. चांगला हेतू आहे तुझा असं म्हणत मी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिल्यावर तो मला म्हणाला 'सर, आमच्या वडिलांनी खडतर परिस्थितीतून आम्हाला शिक्षण दिले आहे. आमच्या लहानपणी पैसा कमी होता, परिस्थितीमुळे जरी आम्हाला काही गोष्टी मिळाल्या नसल्या तरी आमच्या मुलासाठी आवश्‍यक सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना पुरवितो, आमच्या वडिलांनी (नाना मामा) पैसा योग्य कारणासाठी खर्च करावा तसेच आपल्या मुलांना पैसा कष्टातून, संघर्षातून मिळतो, याची जाणीव करून दिली आहे. म्हणून आमच्या मुलांना त्याची जाणीव व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. नाना मामाच्या मुलाने मुलाला पेन आणण्यासाठी पैसे न देण्याचा खुलासा केला. त्याने मुलाला वीस रुपये देऊन नवीन पेन घेण्यास सांगितले व पुन्हा पेन हरविल्यास पैसे मिळणार नाहीत असे सांगितले. नाना मामा आणि त्याची मुले यांनी योग्य कृती केली होती.

नाना मामांनी आपल्या मुलांमध्ये पैशाबद्दल योग्य जाणीव निर्माण केली होती. त्यांच्या मुलांनीसुद्धा वडिलांनी करून दिलेली जाणीव आपल्या कुटुंबात, व्यवहारात उपयोगात आणली होती. या जाणिवेतून आपल्या मुलांमध्ये जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबातील ज्येष्ठांचा काटकसर, बचत यावर भर असतोच. तो अगदी योग्य असतोच. पण आपल्या कुटुंबात उपलब्ध होणारा पैसा किती कष्टाने, संघर्षातून येतो हे नवीन पिढीला सांगणे हा पण असतो. कुटुंबात येणारा पैसा कुटुंबातील लोकांच्या परिश्रमातून, संघर्षातून येत असतो. याची जाणीव पुढील पिढीस करून देणे गरजेचे असते. तसे न झाल्यास त्यांना उधळपट्टीची सवय लागेल. कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अनावश्‍यक, मुबलक पैसा तरुण पिढीच्या हातात कष्टाशिवाय सहज उपलब्ध झाल्यास त्यातून त्यांना वाईट सवयी लागण्याचा धोका असतो.

पैसा मिळवण्यासाठी कष्ट, संघर्ष करावा लागतो. याची जाणीव योग्य वयापासूनच मुलांना करून देणे गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन गरजा, व्यवहार यामधून वेळोवेळी मुलांना, तरुण पिढीला पटवून देणे गरजेचे आहे. ज्येष्ठांनी याबाबत करून दिलेल्या जाणिवेची 'जाणीव' त्यांनी एकदा स्वीकारल्यानंतर निश्‍चितच त्यांचा भविष्यकाळासाठी फायदेशीर ठरणार आहे.

Web Title: be aware about capabilities your family

टॅग्स