- प्रा. अर्चना अंबिलधोक, archanaambildhok.9@gmail.com
रसशास्त्र अर्थात् सौंदर्यशास्त्र हे मानवी मनाचा आणि भावनांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. माणसाला काही स्थायीभाव जन्मतःच असतात आणि त्यातून काही भावना निर्माण होतात. ज्या वेळी या भावना परमावधीला पोहोचतात त्या वेळी रसाची निर्मिती होते. रस ही संज्ञा नाट्यशास्त्र-नाटक-अभिनय-साहित्य-संगीत या कलाशाखांच्या संदर्भात वापरण्यात आलेली आहे.
भारतीय साहित्यात रसविचारांची मांडणी भरतमुनी यांनी प्रथम केली. तिचं विस्तारित विवेचन अभिनवगुप्त यांनी केलं. भरतमुनींनी आठ रस आणि त्यांचे आठ स्थायीभाव सांगितले, तर नंतरच्या अभ्यासकांनी ‘शांत’ या नवव्या रसाची त्यात भर घालून ‘शांतता’ हा त्याचा स्थायीभाव असल्याचं नमूद केलं.
मानवी मन हे स्थिर आणि शाश्वत अशा भावनांनी परिपूर्ण असतं. या भावना म्हणजेच मानवाच्या अंगी असणारे स्थायीभाव होत. रती, उत्साह, दुःख, क्रोध, हास्य, भय, कंटाळा, विस्मय, शांतता या सगळ्याचा कमी-अधिक प्रभाव प्रत्येकाच्या ठायी असतो. भरतमुनी यांच्या काळाच्या आधीपासून काव्यातल्या रसाच्या महत्त्वाच्या स्थानाबद्दल साहित्यशास्त्रकारांनी विवेचन केलेलं दिसून येतं. काव्यातून रसननिष्पत्ती होते याबद्दल भरतमुनींनी मांडलेल्या सूत्राला साहित्यशास्त्रात महत्त्वाचं स्थान आहे.
विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती।
अर्थात् विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव (संचारी भाव) यांच्या संयोगातून रसाची निष्पत्ती होते, असं भरतमुनी नमूद करतात.
दैनंदिन व्यवहारात घडणारे विविध प्रसंग हे रसनिष्पत्तीस कारणीभूत ठरतात. घटनांचे कार्य आणि त्यास साह्यभूत ठरणाऱ्या प्रसंगांचं विवेचन ज्या स्थायीभावातून व्यक्त होतं त्यालाच ‘रसनिष्पत्ती’ असं म्हणतात.
भरतमुनींना संयोग, म्हणजेच केवळ एकत्र येणं असं अपेक्षित नसून विभाव , अनुभाव, व्यभिचारी भाव (संचारी भाव) यांच्या एकजीवतेतून होणारे संयोग - जे विविध घटनांचे मिश्रण असतात - त्यातून एक रुची अथवा आवड तयार होते. मनुष्याच्या ठाई असणारे भिन्न; मात्र एकरूप असे भाव-भावनांचे हिंदोळे ज्या आत्मसंयोगातून व्यक्त होतात त्याला ‘निष्पत्ती’ असं म्हटलेलं आहे. आणि ही निष्पत्ती म्हणजेच मनुष्याच्या ठाई असणारे विविध रस होत.
आचार्य मम्मट यांच्या ‘काव्यप्रकाश’ या ग्रंथात
श्रृंङ्गार हास्य करुणा रौद्र वीर भयानकाः।
बीभत्साद्भुतं संज्ञौ चेत्यष्टौ नाट्ये रसाः स्मृताः॥
असा उल्लेख आढळतो.
मानवाच्या ठाई असणाऱ्या पुढील प्रमुख नऊ रसांचं वर्णन भरतमुनी व अभिनवगुप्त यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनात येतं. मानवाच्या भावभावनांचं हे प्रकटीकरण चित्र-शिल्प-नृत्य-संगीत अशा विविध कलांमधून आपल्या प्रत्ययाला येतं.
१) श्रृंगार, २) वीर, ३) करुण, ४) हास्य, ५) रौद्र, ६) भयानक, ७) बीभत्स, ८) अद्भुत, ९) शांत हे ते प्रमुख नऊ रस आहेत.
दृश्यकला या माध्यमात चित्रकला, शिल्पकला किंवा हस्तकला यांच्या साह्यानं कलाकार त्याची कला सादर करतो.
या दोन्ही पद्धतींमध्ये माध्यम आणि त्याला उपलब्ध असणारा मंच म्हणजे साधनं ही वेगवेगळी असतात आणि त्यातून रसग्रहणही भिन्न स्वरूपात होतं. भारतीय कलाशास्त्रानं सर्व कलांचा एकमेकींशी असलेला संबंध स्वीकारला आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही बिंदूंना स्पर्श करणारं सौंदर्यमूलक सूत्र म्हणजे प्राचीन भारतीय कला होय.
ही अशी अभिव्यक्ती आहे, जिच्या माध्यमातून कलाकार त्याचं आत्मज्ञान, चिंतन आणि कौशल्य यांच्या आधारे संकल्पना यथार्थ रूपात प्रकट करत असतो. आणि, त्यानं निर्माण केलेली कलाकृती म्हणजे भावप्रेरित सृजनात्मक कल्पकतेचा नमुना असते.
नवरसांची माहिती पुढीलप्रमाणे :
१) श्रृंगाररस : सर्व रसांपैकी श्रृंगाराला ‘भावनांचा राजा’ असं म्हणतात. ‘श्रृंगार रसानं निर्माण केलेल्या आनंदाचं सामर्थ्य हे सर्व रसात अधिक आनंददायक असतं,’ अशा शब्दांत अनेकांनी या रसाचं समर्थन केलं आहे. श्रृंगाररसाला कलेत जास्त दृश्यमान्यता आहे; कारण, अद्वितीय प्रेम आणि श्रृंगार हे भाव मानवात आणि दैवी शक्तीतही असू शकतात. भारतीय लघुचित्रकलेतून व्यक्त झालेलं अमर्याद प्रेम, हळुवारपणा, संवेदनशीलता या सर्व स्थायी भावांचा उत्कृष्ट परामर्श या चित्रांमध्ये अनुभवायला मिळतो. मराठीतल्या लावण्या,भारुड आदींचा समावेश श्रृंगाररसयुक्त वाङ्मयात होतो.
चित्र : वधूची वाट पाहणारा राजपुत्र : हे चित्र अठराव्या शतकातलं आहे. वधूची आतुरतेनं वाट पाहणारा राजपुत्र चित्रकारानं चित्रित केला आहे. उन्हाळ्याच्या रात्री पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात हा राजपुत्र संगमरवरी सज्जामध्ये तिची वाट पाहत आहे. तरुण आणि लाजाळू वधूचं उत्कृष्ट वर्णन या चित्रात आढळतं. वधूची नाजूक आणि कोमल शरीरयष्टी, अलंकारयुक्त वस्त्रे आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा राजपुत्र या दोघांच्या हावभावातून श्रृंगार रसाचा प्रत्यय येतो.
२) वीररस : उत्साह हा या रसाचा स्थायीभाव आहे. उच्च संवेदना, पराक्रम, शौर्य, क्रोध आदी भावनिक अवस्थांतून व्यक्त होणारं सामर्थ्य आणि वीरता यांचा प्रत्यय या रसात येतो. सामर्थ्य, संयम, वीरता, सौहार्द, अभिमान, ऊर्जा, संतोष, निर्णय, दृढनिश्चय अशा विविध भावनांचा समावेश या रसात होतो. वीरभावना ही मूलतः ऊर्जेपासून उत्पन्न होते. मराठी भाषेतले पोवाडे, समरगीतं ही या रसाची उदाहरणं.
चित्र : युद्ध करणारी देवी : ‘देवीमाहात्म्य’ या मालिकेतलं हे चित्र लखनौ इथल्या राज्यसंग्रहालयात पाहायला मिळतं. राजस्थानी चित्रशैलीतलं हे चित्र १७०३ मध्ये रेखाटलेलं आहे. देवीनं राक्षसांच्या टोळ्यांशी केलेल्या युद्धातून त्यांचा केलेला नायनाट आणि नंतर आत्मविश्वासानं उभारलेलं शस्त्र यांचं चित्रांकन अतिशय उत्कट पद्धतीनं या चित्रात दिसतं. देवीची अश्वारूढ आकृती, भव्य दुधारी तलवार, देवीचे विस्फारलेले डोळे या सगळ्यांतून वीररसाचा प्रत्यय येतो.
३) करुणरस : करुणेच्या अर्थात् दुःखाच्या भावनिक अवस्थेतून निर्माण होणाऱ्या रसाला करुण रस असं म्हणतात. दुःख, वियोग,संकट, हृदयद्रावक प्रसंग यांतून या रसाची निर्मिती होते. दयनीय भावना, शाप, मत्सर, मृत्यू, बंदिवास, निराशा, वियोग, आजारपण, निष्क्रियता, असुरक्षितता, मृत्यू अशा विविध भावनांचा समावेश या रसाच्या प्रथम श्रेणीत होतो, तर द्वितीय श्रेणीत दया, अनुकंप, सद्भावना यांचा समावेश होतो. वात्सल्यमूर्ती आई आणि तिचं मुलाशी असणारी नातं, गाय आणि वासरू आदी चित्रं, गीतं यातून हा रस प्रत्ययाला येतो.
चित्र : ‘लॉर्ड चंदा’ : हे सोळाव्या शतकातल्या चित्रमालिकेतलं चित्र असून त्यातून या रसाचा प्रत्यय येतो. नायिका चंदा अंधकारमय वातावरणात झाडाखाली निर्जीव पडून राहिल्यानं नायक लॉरिक हा अतिशय अस्वस्थ होतो, दुःख करतो. साप चावल्यानं ती मृत्यू पावली आहे. या सर्व परिस्थितीचं वर्णन या चित्रांमध्ये आढळतं. झाडाच्या खोडाला बांधलेली तलवार आणि ढाल ही नायकाची असून तिथं आपल्याला साप दिसत नाही; पण त्याच्या दंशानं मृत्युमुखी पडलेली नायिका दिसते. नायकाचे मोकळे, विस्कटलेले केस, वाकलेलं शरीर, वेदनाग्रस्त चेहरा, पसरलेले हात, दुःखाच्या धक्क्यानं विस्फारलेले डोळे अशा शारीरिक हालचालीतून करुण रसाचा प्रत्यय येतो. ‘छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालय’ (मुंबई) इथं हे चित्र आहे.
४) हास्यरस : हास्य अथवा आनंद हा स्थायीभाव असलेला रस म्हणजे हास्यरस. हास्य हे अनुक्रमे श्रेष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ अशा तीन विभागांत विभागलं गेलं आहे. व्यंग्य, दर्शन, विडंबन, विसंगती, असंबद्ध भाषण,चेष्टा-मस्करी, विनोद यांमधून हास्यरसाची निर्मिती होते. वेशभूषा, केशरचना, अलंकार यांच्यामधली विकृतीतून - म्हणजेच, जे असायला हवं त्याच्या विपरीत असेल तर, त्यातून हास्यनिर्मिती होते. अनावश्यक अलंकार दाखवणं, लोभीपणा, सदोष शारीरिक हालचाली, विस्फारलेली नजर यांचं वेगवेगळ्या प्रकारे केलेलं चित्रण आपल्याला हास्यरसातल्या चित्रांमध्ये जाणवते.
चित्र : हास्यरसाचं उदाहरण म्हणून ‘कृष्ण लोणी चोरतो’ हे अठराव्या शतकातलं चित्र सांगता येईल. भागवतपुराणावरच्या चित्रमालिकेअंतर्गत येणारं हे चित्र पहाडी शैलीतलं असून, ते चंडीगडच्या संग्रहालयात आहे. बालकृष्ण हा यशोदामाईच्या घरात वाढत असताना तो गोकुळामध्ये सतत खोड्या करतो, चोरून लोणी खातो व मित्रांबरोबर अनेक बाळलीला करतो. या चित्रांमधून हास्यरसाची अनुभूती मिळते.
(उर्वरित पाच रसांची माहिती पुढच्या भागात)
(लेखिका ह्या कोल्हापूरमधल्या कनिष्ठ महाविद्यालयात इंग्लिशच्या अधिव्याख्याता असून, भारतीय सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासक आहेत, तसंच कोल्हापूरमधल्याच एका कलासंस्थेच्या सचिव आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.