Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

Theatre, Culture and Personal Memories : नाटकातील एखादी वस्तू केवळ रंगमंचावरील साधन राहत नाही, तर ती प्रेक्षकांच्या स्मृती, संस्कृती, स्थळ आणि काळाशी जोडली जाते. ‘बेगम बर्वे’, ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘महानिर्वाण’ आदी नाटकांतून हा अनुभव उलगडतो.
Theatre and Memories

Theatre and Memories

esakal

Updated on: 

आशुतोष पोतदार - potdar.ashutosh@gmail.com

महाविद्यालयीन शिक्षकाची कायमस्वरूपी नोकरी सोडून मी नुकताच बेंगळुरूला स्थलांतरित झालो होतो. कलाक्षेत्रासाठी अनुदान देणाऱ्या एका बिगरसरकारी संस्थेत काम सुरू केले. जगभरातील नाटके पाहायला मिळू लागली. तिथल्या रंगशंकरा थिएटरमध्ये २००८ च्या नाट्यमहोत्सवात सतीश आळेकर लिखित ‘बेगम बर्वे’ हे नाटक पाहण्याची अपूर्व संधी मिळाली. गिरीश कर्नाडांच्या खास शैलीतल्या अनाउन्समेंटनंतर सुरू झालेला तो चार सशक्त रंगकर्मींनी साकारलेला विलक्षण प्रयोग आणि चंद्रकांत काळे यांचे लयदार गाणे आजही डोळ्यासमोर उभे राहते. ‘‘देवा, आज आमची लाज तुम्ही राखलीत. आता हा शेला कंपनीचा राहिलेला नाही, तो तुमचा झालाय बापा. असं म्हणत नारायणराव आपल्या हाताने तो मायेचा शेला खांद्यावर घालतात आणि तोच शेला अंगावरची कवचकुंडलं होऊन बसतो.’’ असे म्हणत पहिल्याच अंकात काळेंनी खचाखच भरलेल्या नाट्यगृहात बहुभाषिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. त्या शेल्यात आळेकरांचे ‘बेगम बर्वे ’ दिसले तसेच बालगंधर्व दिसल्याचाही भास झाला.

वस्तूशी जोडलेल्या आपल्या स्मृतीही एकदम नाट्यमय असतात. म्हणजे, आपण कुठेही शेला बघितला, की ‘बेगम बर्वे’ हे नाटक आठवतं. कुठेही एखादं निष्पर्ण झाड दिसलं की फ्रेंच नाटककार सॅम्युएल बेकेटचं ‘वेटिंग फॉर गोदो’ हे नाटक आठवतं. स्मशान घाटावरचं साहित्य पाहिलं की आळेकरांचे ‘महानिर्वाण’ किंवा मृत्यूनंतरचे विधी करणाऱ्या ब्राह्मणांच्या वेदनेला नाट्यरूप देणारे प्रेमानंद गज्वी यांचे ‘किरवंत’ ही नाटके डोळ्यासमोर उभी राहतात. निळ्या आकाशात ढगाचा एक तुकडा पाहिला, की मोहित टाकळकरने दिग्दर्शित केलेली ‘घंटा घंटा घंटा घंटा घंटा’ या नाटकात ढगाच्या तुकड्याने उभारलेली देखणी दृश्यरचना आठवते. एखादं नाटक आपल्या डोक्यात राहतंच पण त्याबरोबर नाटकात वापरलेल्या वस्तूंतून संस्कृतीही उजागर होते. वस्तूंच्या स्मृतीत लपलेला स्थळ आणि काळ उजळून निघतो. नाटक आपल्या स्मरणात राहतं ते केवळ कथेमुळे, नाटककारामुळे किंवा नाटकाच्या लोकप्रियतेमुळे नाही, तर नाटकातील एखाद्या वस्तूमुळे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com